लग्नाची गोष्ट - भाग 5 Pralhad K Dudhal द्वारा काहीही मराठी में पीडीएफ

Featured Books
  • नियती - भाग 24

    भाग -24पण एक दिवस सुंदर तिला म्हणाला...."मिरा.... आपण लग्न क...

  • लोभी

          "लोभी आधुनिक माणूस" प्रस्तावनाआजचा आधुनिक माणूस एकीकडे...

  • चंद्रासारखा तो

     चंद्र आणि चंद्रासारखा तो ,जवळ नाहीत पण जवळ असल्यासारखे....च...

  • दिवाळी आनंदाचीच आहे

    दिवाळी ........आनंदाचीच आहे?           दिवाळी आनंदाचीच आहे अ...

  • कोण? - 22

         आईने आतून कुंकू आणि हळदची कुहिरी आणून सावलीचा कपाळाला ट...

श्रेणी
शेयर करा

लग्नाची गोष्ट - भाग 5

लग्नाची गोष्ट भाग ५
एकोणीसशे पंचाऐंशी फेब्रुवारीत माझे लग्न ठरले.माझी जरी सरकारी नोकरी होती तरी घरच्या जबाबदाऱ्या अंगावर असल्याने लग्न करुन संसार थाटण्याइतपत अजून मी आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेला नव्हतो.खरं तर अजूनही माझे बँकेत अकाऊंटही नव्हते.
आमच्या ऑफिसच्या पी अँड टी सोसायटीचे कर्ज अधिक माझ्या नियोजित पत्नीच्या ऑफिसच्या पतपेढीचे लग्नाआधीच कर्ज घेऊन कशीबशी मी लग्नाच्या खर्चाची तजवीज केली होती.
१६ मे ही लग्नाची तारीख ठरली,पण काही कारणाने माझ्या घरातून एक वेळ आर्थिक मदत सोडा,पण लग्नाच्या तयारीसाठीही म्हणावे तसे सहकार्य नव्हते.
निमंत्रणपत्रिका वाटणे,गावाकडून वऱ्हाड आणण्यासाठी ट्रक ठरवणे,रितीप्रमाणे भावकीची बैठक, लग्नसमारंभाचे बारीकसारीक नियोजन अशा गोष्टी माझ्या लग्नाच्या आदल्या रात्री उशीरपर्यंत बाळू नितननवरे या माझ्या पुण्यातल्या मित्राला बरोबर घेऊन सायकलवर फिरून आम्ही उरकत होतो.
विशेष म्हणजे पुण्यात ज्या कार्यालयात माझे लग्न होणार होते तेही मी आधी पाहिले नव्हते! वधू पक्षाकडून मात्र लग्नाची जोरदार तयारी चालू होती.
लग्नाच्या दिवशी ट्रकमधे वऱ्हाड घेऊन गावाहून बोपदेव घाटाने कच्च्या रस्त्याने पोलिसांना चुकवत पुण्यात अप्सरा थिएटरजवळ पोहोचलो आणि अचानक पोलिसांनी ट्रक आडवला.
पोलिसांनी सांगितल्यामुळे माझ्यासहीत सगळ्या वऱ्हाडी मंडळींना रस्त्यात उतरवून तो ट्रकवाला निघून गेला.मला त्याचे नावही माहित नव्हते.
धुळीने चेहरा व कपडे माखलेला मी माझ्या वऱ्हाडासहीत चालत चालत भावसार मंगल कार्यालय शोधू लागलो.सेव्हन लव्हज चौकात आतल्या बोळीत असलेले कार्यालय कसेबसे सापडले आणि बरोबर असलेल्या लोकांना घेऊन मी एकदाचा कार्यालयात पोहीचलो,मात्र मागे रेंगाळलेले बरेच नातेवाईक रस्ता चुकले होते.
कार्यालयात पोहोचल्यावर वधू पक्षाकडचे शहरी टापटीप पोशाखातल्या सजलेल्या लोकांच्यात धुळीने माखलेले माझी खेडूत वऱ्हाडी मंडळी आणि मीही अगदीच वेगळे दिसत होतो!
काही वेळानंतर रस्ता चुकलेले माझे नातेवाईक एकदाचे तिथे पोहोचले आणि सुपारी, साखरपुडा, हळद, आहेर मोडणे असे एकापाठोपाठ एक विधी मार्गाला लागले.
जेवणाच्या पंगती पडल्या आणि आलेली भावकी आणि नातेवाईक वधूपक्षाकडून केलेल्या पाहुणचाराने व रुचकर जेवणाने अगदी तृप्त झाले.
लग्नाचा मुहूर्त संध्याकाळी सहाचा होता.लग्न अगदी वेळेवर लावायचे असे आमचे ठरले होते त्याप्रमाणे मुहूर्ताच्या आधी मला तयार करुन कारमधून देवदर्शनाला नेले गेले.
मंदिरातून परत आलो ओवाळणी झाली तरी का कोणास ठाऊक मला कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच थांबवून ठेवण्यात आले.लग्नाची वेळ जवळ आली तरी मला आत नेईनात.
वधूकडील कर्ती मंडळी गंभीर चेहऱ्याने कुणाची तरी वाट बघताहेत हे माझ्या लक्षात आले.काहीतरी गडबड झाली होती! मी खूपच अस्वस्थ झालो होतो.
नक्की काय झाले आहे हे आजूबाजूला उभ्या असलेल्या नातेवाईकांना विचारायचा प्रयत्न केला,पण मला कुणीच काही सांगेना.तब्बल पंधरा मिनिटे मी घामाघूम होऊन मुंडावळ्या सावरत उभा होतो.
काही वेळा नंतर एकदाचे दोघेजण स्कूटरवरून आल्याचे दिसले आणि वाट पहात उभे असलेले सगळे तणावमुक्त झाले.करवल्या पुढे येऊन माझ्या कपाळावर त्या स्कूटरस्वारांनी आणलेले बाशिंग बांधू लागल्या.
मग माझ्या लक्षात आले की या बाशिंगासाठी मला एवढा वेळ ताटकळत ठेवले होते.
खरं तर मला अशा प्रकारे ताटकळत ठेवल्याचा प्रचंड राग आला होता,पण आधीच लग्नाचा मुहूर्त टळून गेला होता. प्रयत्नपूर्वक आलेला राग गिळून मी लग्नाला उभा राहिलो..
लग्न लागले फोटोसेशन झाले आणि मी वधूच्या चुलत्याला थोडे गुश्शातच नक्की काय झाले होते म्हणून विचारले.
त्यांनी मला सांगितले की माझ्या एका नातेवाईकाने “बाशिंग” बांधल्याशिवाय हे लग्न होणार नाही अशी ऐनवेळी अडवणूक केली होती!
त्या व्यक्तीच्या अडवणुकीमुळे मंडईतून बाशिंग आणायला वेळ गेला आणि मला ताटकळत ठेवावे लागले होते!
लग्नात विघ्न आणून अडवणूक करणाऱ्या त्या व्यक्तीचा खरं तर खूप राग आला होता मी त्याला शोधत होतो, परंतु जुजबी नाते असलेली ती व्यक्तीने अक्षता पडल्याबरोबर पोबारा केला होता!
लग्न उरकले, कार्यालय सोडायची वेळ झाली तरी आमचे वऱ्हाड रस्त्यात सोडून निघून गेलेला तो ट्रक परत आला नव्हता.
तब्बल एक तास कार्यालयाबाहेर नववधूबरोबर उभे राहून आम्ही ट्रकची वाट पहात होतो.
एकदाचा कुणीतरी दुसरा ट्रक ठरवून आणला आणि वऱ्हाड त्यात बसले.आम्हा दोघांना ड्रायव्हरच्या बाजूच्या बाकड्यावर बसवले होते.
शहरात वाढलेली स्मिता-माझी पत्नी,आयुष्यात पहिल्यांदा ट्रकमधून प्रवास करत होती!
थोड्याच वेळात माझ्या खांद्यावर डोके ठेऊन ती विश्वासाने अनोळखी वाटेवर निघाली होती.
~ प्रल्हाद दुधाळ, पुणे.
(9423012020)