ब्लॅकमेल - प्रकरण 13 Abhay Bapat द्वारा क्राइम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ब्लॅकमेल - प्रकरण 13

प्रकरण १३
दुसऱ्या दिवशी सकाळी कोर्ट चालू झालं त्यावेळी सरकारी वकील फारुख अचानक उभा राहिला आणि त्यांनी जाहीर केलं की सरकार पक्षातर्फे आम्ही आता थांबतो आहोत आम्हाला कुठलेही साक्षीदार किंवा साक्षी पुरावे द्यायचे नाहीत.
“मलाही हेच अपेक्षित होतं तुमच्याकडून” न्यायाधीश म्हणाले “खरंतर हे कालच संध्याकाळी घडलं असतं तर बरं झालं असतं. मला वाटत नाही की या प्रकरणात आरोपीला काही बचाव आहे.”
“१००% बचाव आहे युवर ओनर.” पाणिनी उभा राहत म्हणाला.
“मी कालचंच वाक्य पुन्हा उच्चारतो मिस्टर पटवर्धन, मला उगाचच वेळ घालवलेला चालणार नाही. मी खरोखरच कायदेशीर दृष्ट्या आवश्यक असलेला बचावच फक्त मान्य करीन.” न्यायाधीशाने पाणिनीला पुन्हा ऐकवलं.
“मला एका पोलिस अधिकाऱ्याला पुन्हा काही प्रश्न विचारायचेत अगदी दोन-तीनच प्रश्न उलट तपासणी मध्ये.” पाणिनी म्हणाला
“ही फार विचित्र आणि कायद्याला धरून नसलेली मागणी आहे.” फारुख गुरगुरत म्हणाला, “ही उलट तपासणी आधीच घ्यायला हवी होती पटवर्धनांनी.”
“जरा थांबा.” न्यायाधीश म्हणाले. “पटवर्धन यांना एखाद्या साक्षीदाराची पुन्हा उलट तपासणी घ्यायची असेल तर त्यापासून मी त्यांना वंचित करणार नाही.” मिस्टर पटवर्धन मला वाटतंय की या उलट तपासणी नक्कीच काहीतरी तथ्य आहे?”
“येस युवर ऑनर” पाणिनी म्हणाला
“ठीक आहे तर बोलवा.” न्यायाधीश म्हणाले आणि पाणिनी पटवर्धन याने संबंधित पोलीस अधिकाऱ्याकडे खूण करून नेमकं कोणाला बोलवायचं हे सूचित केल्यानंतर तो पोलीस साक्षीदाराच्या पिंजऱ्यात येऊन उभा राहिला.
“आरोपीच्या कडे असलेली पर्स ज्यात तथाकथित रिव्हॉल्व्हरठेवलं गेलं आहे असं सर्वांचं म्हणणं होतं, ती पर्स तुमच्याकडे आहे, बरोबर ना?” पाणिनीने विचारलं.
“बरोबर.”
“तुमच्याकडे रिव्हॉल्व्हरही आहे आणि ती पर्सही आहे बरोबर?” पाणिनीने विचारलं.
“बरोबर आहे.”
“आता मला सांगा ते रिव्हॉल्व्हर तुम्ही पर्समध्ये घालण्याचा प्रयत्न केला आहे का?”
“अर्थात आम्ही केलाय.” पोलिसाने उत्तर दिलं. “ती रिव्हॉल्व्हर ठेवताना एवढी घट्ट बसते की त्यामुळे पर्स ताणली जाते आणि त्याचा आकार पिळवटल्यासारखा होतो. त्यामुळेच ती पर्स विशेष लक्षात राहण्याजोगी होती.”
“माझी कोर्टाला विनंती आहे की सरकार पक्षाचे पुरावे म्हणून सादर करण्यात आलेली पर्स आणि ते रिव्हॉल्व्हर हे थोड्या वेळासाठी या साक्षीदाराकडे देण्यात यावं” पाणिनी म्हणाला
तशी सूचना क्लार्क ला दिली आणि क्लार्कने पर्स आणि रिव्हॉल्व्हर दोन्ही वस्तू साक्षीदाराकडे दिल्या.
“पर्समध्ये रिव्हॉल्व्हर ठेव.” पाणिनी म्हणाला
साक्षीदाराने पाणिनीच्या सूचनेनुसार ते रिव्हॉल्व्हर पर्समध्ये भरण्याचा प्रयत्न केला ते भरत असताना तो एकीकडे ते भरण्यात किती अडचणी येतात याचं वर्णन करत होता.
“बघा किती ताणायला लागत्ये मला पर्स, ही रिव्हॉल्व्हर ठेवण्यासाठी. दोन्ही बाजू अगदी ओढून घ्यायला लागतात. याच्यावरून लक्षात येतच की ही रिव्हॉल्व्हर बाहेर काढत असताना क्रेडिट कार्ड कसं बाहेर पडलं असेल.” पोलीस म्हणाला.
“आणि तू पर्स बंदही करू शकतोस?” पाणिनीने विचारलं.
“बंद करू शकतो पण कशीबशी. लक्षात घ्या पटवर्धन, जेव्हा पर्स उघडली जाईल त्या वेळेला जर कोणी पाहिलं तर त्याला रिव्हॉल्व्हरचा काही भाग दिसू शकेल विशेषतः लाकडी मूठ.”-साक्षीदार म्हणाला.ओ विचारल्यापेक्षा जास्त माहिती स्वत:हून देत होता.
“बरोबर तेच म्हणायचय मला.” पाणिनी म्हणाला “तर रिव्हॉल्व्हरला दोन बाजू आहेत एक बहिर्वक्र बाजू आणि अंतर्वक्र बाजू. आहेत की नाहीत? “ पाणिनीने विचारलं.
“मला लक्षात नाही आलं काय म्हणायचय तुम्हाला.” पोलीस गोंधळून म्हणाला.
“मला असं म्हणायचंय की ज्या वेळेला दुसऱ्यावर नेम धरला जातो त्यावेळी रिव्हॉल्व्हरची मूठ प्रथम हातात धरली जाते. आपलं बोट रिव्हॉल्व्हरच्या चापावर येतं आणि त्यानंतर रिव्हॉल्व्हरची नळी वर उचलली जाते आणि नेम धरला जातो बरोबर का?” पाणिनीने विचारलं.
“हो बरोबर.”
“याला मी बहिर्वक्र पद्धत असं म्हणतो. याउलट नेम साधून झाल्यानंतर ज्यावेळी बंदूक खाली ठेवली जाते तेव्हा बंदुकीची नळी प्रथम खाली जाते याला मी अंतर्वक्र पद्धत म्हणतो.” पाणिनी म्हणाला
“ठीक आहे.” पोलीस अधिकारी म्हणाला
“तर आता मला सांग तू पर्समध्ये तू अंतर वक्र पद्धतीने बंदूक ठेवल्यानंतर तू ती स्थिती बदलून पुन्हा बहिर्वक्र पद्धतीने करू शकतोस का?” पाणिनीने विचारलं.
“तसं केलं तर पर्स बंद करता येणार नाही.”
“ती रिव्हॉल्व्हर पर्समध्ये ठेवायला तुला बऱ्यापैकी वेळ लागला?” पाणिनीने विचारलं.
“खूप. घट्ट, बंदुकीच्या अंगाबरोबर पर्स होती ती.” पोलीस म्हणाला.
“आता बाहेर काढ बंदूक. बघूया किती वेळ लागतो तुला, किती लवकर तू ते बाहेर काढू शकतोस?”
“किती लवकर बाहेर काढू शकतो म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला?”-पोलीस
पाणिनीने आपल्या हातातील घड्याळाचा सेकंद काटा सुरू केला.
“चल, तुझी वेळ सुरू होते आत्ता.” पाणिनी म्हणाला
पोलिसाने पर्समधून बंदूक बाहेर ओढून काढायला सुरुवात केली पण चापाच्या ठिकाणी नेमकं पर्स चं कापड अडकलं पर्सच कापड एका हाताने आत ढकलणे आणि दुसऱ्या हाताने बंदूक बाहेर खेचणे ही दोन्ही त्याला एकाच वेळेला कसरत केल्यासारखं करावं लागलं.
“पाच सेकंद झाली.” पाणिनी म्हणाला
पोलिसाने आणखीन जोरदार प्रयत्न केले बंदूक बाहेर काढण्यासाठी.
“दहा सेकंद झाले” पाणिनी म्हणाला
“बारा सेकंद.” पाणिनी ने पुन्हा वेळ जाहीर केली. “तुला आता नेम धरण्याच्या अवस्थेत ती बंदूक आणायची असेल तर ती वळवून ती तुझ्या हातात धरली पाहिजे तसं करून दाखव.” पाणिनी म्हणाला
पोलिसाने पाणिनीला तसं करून दाखवलं.
“आता हे करायला तुला जो वेळ लागला त्याच्यापेक्षा कमी वेळात तू करू शकशील?” पाणिनीने विचारलं.
“नक्की. याच्या पेक्षा कमी वेळात मी जमवू शकेन.”
“ठीक आहे तर. परत ती बंदूक पर्स मध्ये ठेव. पर्स बंद कर. तयार रहा, पर्स मधून बंदूक बाहेर काढ आणि नेम धरायच्या अवस्थेत हातात धर आणि चाप दाबण्यासाठी चापावर हात ठेव. मी या सगळ्यासाठी लागणारा वेळ मोजतो.” पाणिनी म्हणाला
“मला ही सगळी चाचणी करण्यामागचा हेतूच लक्षात येत नाहीये केवळ वेळ काढू पणा चाललाय.” न्यायाधीश वैतागून म्हणाले
“तसं नाहीये न्यायाधीश महाराज मी खुलासा करतो. मृत व्यक्ती म्हणजे विवस्वान याला बरोबर कपाळावर गोळी घालण्यात आली होती त्यावेळेला त्याच्या खांद्याला असलेल्या चामड्याच्या पट्ट्यात त्याच्याकडे रिव्हॉल्व्हर होतं म्हणजे तसं ते नेहमीच असायचं. अशा प्रकारचे त्याच्याकडे रिव्हॉल्व्हर असताना आरोपी आपल्या पर्समध्ये बंदूक काढण्यासाठी झटापट करून बंदूक बाहेर काढेपर्यंत विवस्वान गप्प बसला असेल हे आपणास योग्य वाटतं का?” पाणिनीने विचारलं.
“ठीक आहे, ठीक आहे. आल लक्षात. चालू द्या तुमची चाचणी पुढे.” न्यायाधीश म्हणाले.
“थांबा माझी जोरदार हरकत आहे या गोष्टीला. ही योग्य प्रकारे चाललेली उलट तपासणी नाही. कारण खून होताना जी परिस्थिती अस्तित्वात होती त्यानुसार ही चाचणी घेण्यात येत नाहीये. आपल्याला काय माहिती आरोपीच्या पर्समध्ये त्या वेळेला पाणिनी पटवर्धन म्हणतात त्याप्रमाणे अंतर्गोल पद्धतीने रिव्हॉल्व्हर ठेवली होती? विवस्वानच्या घरात प्रवेश करण्यापूर्वीच तिने ती पर्स मधून बाहेर काढली नसेल कशावरून?” फारुख म्हणाला.
“मला वाटतंय की पटवर्धन यांच्या मनात ठोस असं काहीतरी आहे म्हणून तेही चाचणी करतात मलाही याच्यात आता रस निर्माण झालेला आहे.” न्यायाधीश म्हणाले.
आता त्या पोलीस अधिकाऱ्याच्या सुद्धा लक्षात आलं होतं की पाणीनी पटवर्धन यांना नेमकं काय हवं होतं त्याने मगाच पेक्षा जास्त जलद गतीने रिव्हॉल्व्हर पर्स मधून बाहेर काढली. “साधारण सहा सेकंद लागली तुला आत्ता. म्हणजे मगाच पेक्षा निम्म्यानेच.”-पाणिनी म्हणाला.
“मी पुन्हा सांगतो न्यायाधीश महाराज, की या चाचणीला काहीही अर्थ नाही दाराशी बेल वाजवण्यापूर्वीच आरोपी पर्समधून आपली रिव्हॉल्व्हर काढून अगदी चापावर बोट ठेवून तयार असणार आणि दार उघडल्या उघडल्या विवस्वान तिच्या हातातील रिव्हॉल्व्हर पाहून एकदम गर्भगळीत झाला असणार.” सरकारी वकील फारुख म्हणाला.
“असं? मग पुढे काय झालं असेल?” पाणिनीने खवचटपणे विचारलं

“हे बघा तुम्ही माझी उलट तपासणी घ्यायचा प्रयत्न करू नका.” फारुख चिडून म्हणाला
पाणिनी हसला. “ठीक आहे मला काय म्हणायचे ते मी कोर्टाला उद्देशून बोलतो. असं लक्षात घ्या की सरकारी वकील म्हणतात त्याप्रमाणे जर आरोपींनी दारातूनच आपली रिव्हॉल्व्हर बाहेर काढून ठेवली असेल आणि त्यानंतर बेल वाजवून विवस्वानला दार उघडायला लावला असेल तर त्या परिस्थितीत तिने विवस्वानला दारातच गोळी घातली असती त्या ऐवजी आपल्याला असं दिसतंय की विवस्वानला त्याच्या फ्लॅटच्या अगदी टोकाला म्हणजे जेव्हा तो त्याच्या कॉटच्या शेजारी उभा असेल किंवा बसलेला असेल अशा स्थितीत त्याला गोळी घातलेली आहे आणि ती सुद्धा अगदी जवळून गोळी घातलेली नाही तर थोड्याशा अंतरावरून गोळी घातलेली आहे. सरकारी वकील म्हणतात त्याप्रमाणे अगदी दारात असतानाच गोळी घातली गेली असती तर पहिली गोष्ट म्हणजे तो दारातच पडलेला दिसला असता आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतक्या जवळून गोळी घातली गेली असती तर रिव्हॉल्व्हर मधून गोळी सुटल्यानंतर जी पावडर बाहेर येते ती पावडर विवस्वानच्या अंगावर म्हणजे जखमेभोवती दिसायला हवी होती तशी ती दिसत नाही.” पाणिनी म्हणाला
न्यायाधीशांनी त्यांना मुद्दा पटल्यासारखी मान डोलावली.
“कदाचित असं झालं असेल की, आरोपीने गोळीचा धाक दाखवून त्याला खोलीत मागे जायला भाग पाडले असेल.” फारुख ने आपला मुद्दा मांडायचा प्रयत्न केला
“काय हेतू होता त्यामागे आरोपीचा?” पाणिनीने विचारलं.
“त्याला घाबरवण्यासाठी धमकी देण्यासाठी. अन्यथा त्याने तिच्या हातातली बंदूक खेचून घेतली असती आणि...... ओह !पण मी हे कशाला बोलतोय? अक्षरशः वेळ वाया घालवणे अशी चाचणी घेणं म्हणजे फारुख चिडून म्हणाला.
“मग नका घालवू वेळ वाया.” पाणिनी म्हणाला
“मला शिकवायचा प्रयत्न करू नका.” फारुख जोरात ओरडला
“माफ करा न्यायाधीश महाराज, माझ्यावर तो गुरगुरला म्हणून मी त्याला तसंच उत्तर दिलं.” पाणिनी म्हणाला
न्यायाधीश हसले. “पुढे चालू करा. तुम्हाला आणखीन काय प्रश्न विचारायचे असतील तर.”
“फ्लॅटची कसून तपासणी केली तुम्ही?” पाणिनीने विचारलं.
“मी केली. इतरही अनेक जणांनी केली.”
“मृत व्यक्तीच्या कपड्यांच्या कपाटाकडे तुमचे लक्ष गेलं?” पाणिनीने विचारलं.
पोलीस हसला. “नक्कीच. त्याचीही आम्ही तपासणी केली.”
“कपाट कपड्याने खूप भरलं होतं?”
“हो. चांगलंच भरलेलं होतं.”---पोलीस
“तपासणी करताना तुमच्या हे लक्षात आलं होतं का, की त्याचे सगळे कपडे आणि त्यांचे सूट हे शिंप्याकडून शिवून घेतलेले होते? म्हणजे एकही कपडा रेडीमेड नव्हता?” पाणिनीने विचारलं.
“हो सर आले लक्षात. सर्व कपडे शिंप्याकडून शिवून घेतलेले होते.” पोलिसांनी उत्तर दिले.
“एकही अपवाद नव्हता?” पाणिनीने विचारलं.
पोलीस थोडासा अडखळला. थोडा विचार करून म्हणाला, “तिथे एकच जर्किन होतं की जे रेडिमेड असल्यासारखं वाटत होतं कारण त्याच्यावर शिंप्याच लेबल नव्हतं.”
“ओके. त्या जर्किन चं माप काय होतं ते तू पाहिलंस? म्हणजे अशा अर्थाने की ते जर्किन मृत व्यक्तीच्या म्हणजे विवस्वानच्या अंगाच्या मापाचं होतं का?”
“नाही तसं करायची काय गरज होती? आम्ही नाही पाहिलं ते.” पोलीस पोलीस म्हणाला
“ते जर्किन इथे कोर्टात हजर करायचं झालं तर किती वेळ लागेल तुम्हाला?”
सरकारी वकील रौनक फारुख याची सहनशक्ती आता संपली होती
“ओह ! न्यायाधीश महाराज, काय चाललं आहे कुठे भरकटत चालल्ये ही उलट तपासणी? मला नाही माहिती ते जर्किन कुठे आहे. मला वाटतं ते पोलीस चौकीत असेल कदाचित. आपण तर म्हणाला होतात की तुम्ही वेळ काढून पणाचे धोरण चालू देणार नाही आणि हे काय चाललंय?”
न्यायाधीशांनी त्यांना हे म्हणणं पटलं असल्याप्रमाणे होकारार्थी मान हलवली आणि पाणिनीला प्रश्न केला
“ते जर्किन इथे कोर्टात का हवय तुम्हाला पटवर्धन? तुम्ही काही खुलासा करू शकता याबद्दल?”
“मला करायचाच आहे खुलासा या गोष्टीचा. एक अत्यंत महत्त्वाचा क्लू म्हणून मला ते जर्किन इथे कोर्टात यायला हवं आहे. या साक्षीदाराला मला एकच प्रश्न विचारायचा आहे. त्या नंतर मी माझी उलट तपासणी थांबवणार आहे. नंतर बचाव पक्षातर्फे आम्ही आमची केस सादर करणार आहोत. त्यात माझा पहिला साक्षीदार कनक ओजस कडे खाजगी गुप्तहेर म्हणून काम करणारी समिधा द्रविड ही असणार आहे. तिची साक्ष संपण्यापूर्वी मला ते जर्किन इथे कोर्टात यायला हव आहे. या व्यतिरिक्त मी मयताचे कपडे शिवणारा टेलर त्याला सुद्धा कोर्टात हजर केलं जावं. त्याला समन्स काढल जाव अशी मी विनंती करतो आहे. खरं म्हणजे त्याला मी तशा आशयाची लेखी सूचना आधीच दिली आहे.” पाणिनी म्हणाला
न्यायाधीशांनी सरकारी वकील यांना सूचना दिली की ते जर्किन त्यांनी कोर्टात हजर करण्याची व्यवस्था करावी आणि पाणिनी पटवर्धनला सूचना केली की त्यांनी आता साक्ष देत असल्या पोलिसाला पुढचे प्रश्न विचारावेत.
“तर मग मला असं सांगा, विमानातून ज्या वेळेला ते रिव्हॉल्व्हर ताब्यात घेण्यात आलं आणि तपासणीसाठी लॅब मध्ये देण्यात आलं त्यावेळेला तुम्ही तिथे हजर होतात का?”
“हो. हजर होतो.”
“त्याच्यावर काही ठसे तुम्हाला मिळाले का?”
“ठोस असे म्हणजे ओळखता येतील असे मिळाले नाहीत. तुम्हाला माहिती आहे पटवर्धन सर की बंदुकीच्या धातूवर हाताचे ठसे फार वेळ टिकून राहत नाहीत.”
“मला कल्पना आहे गोष्टीची. या बंदुकीवर इतर काही प्रक्रिया केल्या गेल्या होत्या का?” पाणिनी म्हणाला.
“ हो.”
“ म्हणजे काय तपासण्या केल्या गेल्या का त्यावर? विशेषता रक्ताच्या संदर्भात?”
साक्षीदार थोडासा अडकला नंतर म्हणाला " हो तशा चाचण्या त्यावर केल्या गेल्या."
“बेंझीडाईन टेस्ट केली गेली? पाणिनीने विचारलं
“हो. केली.”
“त्याच्यातून काय निष्कर्ष निघाले?”
साक्षीदार एकदम सावध झाला आपले शब्द काळजीपूर्वक उच्चारत तो म्हणाला," बंदुकीच्या संपूर्ण पृष्ठभागावर रक्ताचे अवशेष मिळाले. विशेषतः एका विशिष्ट ठिकाणी रक्त जास्त लागलेलं आढळून आलं आणि नंतर ते अन्यत्र पसरवण्यात आलं वर करणे असं दिसतंय कोणीतरी ते रिव्हॉल्व्हर धन किंवा" ओल्या कापडाने पुसून त्यावरचे रक्ताचे डाग घालवण्याचा प्रयत्न केला असावा. पोलीस म्हणाला.
“दॅट्स ऑल युवर ऑनर.मला आणखीन काही नाही विचारायचं” पाणिनी म्हणाला
“मिस्टर फारुख, फेर तपासणी तुम्हाला काही विचारायचंय?” न्यायाधीश म्हणाल

“आम्हाला काही विचारायचं नाही हे सगळे मुद्दे आमच्या दृष्टीने फालतू आहेत.”
“”ठीक आहे मिस्टर पटवर्धन तुम्हाला आता बचाव पक्षाच्या बाजूने साक्षीदार सादर करायचे आहेत?” न्यायाधीश म्हणाले.
“.हो मगाशी म्हणालो प्रमाणे समिधा द्रविड ही माझी पहिली साक्षीदार आहे.”
समिधा द्रविड पुढे आली तिने तिचा परिचय करून दिला तिला प्रश्न विचारायला पाणिनी उठून उभा राहिला.
“आरोपीला तू प्रथम कधी बघितलंस?”
“एका रात्री कनक आणि मी एका टॅक्सीत बसून होतो. कनकने वर्तमानपत्रात एक जाहिरात दिली होती अशा अर्थाची की जी व्यक्ती दुसऱ्याला पैसे देऊ इच्छित आहे ती विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वेळी टॅक्सीत बसलेल्या व्यक्तींच्या ताब्यात ती रक्कम देऊ शकते.”
समिधा द्रविड म्हणाली
“ठीक आहे. त्या वेळेला तू आरोपीशी बोललीस?”
“नाही. ती आमच्या टॅक्सीच्या जवळून दोन-तीन वेळा पुढे मागे गेली पण ओळखीची काहीही खूण किंवा खाणाखुणा तिने केल्या नाहीत.”
“बर, त्यानंतर तू तिला कधी पाहिलंस”
“त्याच्या दुसऱ्याच दिवशी.”
“कुठे?”
“डेल्मन हॉटेलच्या खोली नंबर 767 मध्ये.”
“बरं तिथे तू असताना काय झालं?”
“मीच त्या खोलीचा रहिवासी असल्याचा भास मला निर्माण करायचा होता तसं माझ्या कामाचं स्वरूप होतं.”-समिधा
“म्हणजे त्या खोलीचा खरा रहिवासी म्हणजे आरोपी होती?”
“हो. बरोबर.”
“मग आरोपी बरोबर काय झालं त्या ठिकाणी?” पाणिनीने विचारलं.
“तुम्ही त्याच मजल्यावर आणखीन एक खोली भाड्याने घेतली होती तुम्ही आरोपीला त्या खोलीत घेऊन गेलात.”
“त्यानंतर काय झालं ?” पाणिनीने विचारलं
“त्यानंतर थोड्यावेळाने खोलीचे दार वाजलं आणि या खटल्यातील मयत विवस्वान वाटीकर हा त्या ठिकाणी आला.”
“काय बोलणं झालं त्याच्याशी?”
“वरकरणी अस दिसत होतो की त्याला पैसे हवे होते. त्याला ते एका माणसाकडून हवे होते. आणि जेव्हा त्यानं खोलीमध्ये तुम्हाला आणि मला अशा दोन व्यक्तींना पाहिलं तेव्हा त्याला संशय आला की आपल्याला कुठल्यातरी सापळ्यात अडकवलं जात असावं.”
“मग तू पुढे काय केलस ?” पाणिनीने विचारलं.
“तुम्ही मला हळूच केलेली खूण समजली. मी असं भासवलं की मी तुमची मैत्रीण आहे आणि मी तुम्हाला तिथे हॉटेलच्या रूम मध्ये भेटायला आले होते. आणि मी तिथून बाहेर जायला निघाले जाताना मी तुम्हाला जवळ घेऊन तुमच्या गालाचे चुंबन घेतलं. पण तुम्ही मला सुचवल्याप्रमाणे बाहेर आल्यावर मी टॅक्सी केली. हॉटेलच्या गेट पाशी थांबून राहिले आणि विवस्वान तिथं बाहेर आल्यानंतर रत्नगर्भ अपार्टमेंट पर्यंत मी त्याचा पाठलाग केला. त्यानंतर त्या सगळ्याची माहिती मी तुम्हाला दिली. त्याच्या गाडीचा नंबर तुम्हाला दिला. त्याच्या अपार्टमेंटचं नाव आणि पत्ता तुम्हाला सांगितला.”
“नंतर?” पाणिनीने विचारलं.
“नंतर मी परत आले आणि ब्लॅकमेल चे पैसे मागायला कोणीतरी येईल या प्रतीक्षेत त्याच रूम मध्ये थांबले.”
“आरोपी ज्यावेळी या खोलीत होती त्यावेळेला तू तिची पर्स पाहिली होतीस का?” पाणिनीने विचारलं.
“बघितली होती.” -समिधा
“आता पुरावा म्हणून सादर झालेली पर्स आणि जी आता मी तुला दाखवतोय ती तीच आहे?”
“एक तर हीच पर्स किंवा अगदी हुबेहूब त्याच्यासारखी दिसणारी दुसरी पर्स असेल.”
“ज्या रिव्हॉल्वर ने खून झाला आहे असं सरकार पक्षाचे म्हणणं आहे, ते रिव्हॉल्व्हर मी आता या पर्समध्ये घालतो आणि तुला असं विचारतो की तुझ्या मतानुसार ज्या वेळेला तू आरोपीला खोली सोडताना पाहिलंस त्यावेळी तिच्या पर्समध्ये हे रिव्हॉल्व्हर असण्याची शक्यता होती का?” पाणिनीने विचारलं.
“शक्यच नाही हे एवढं मोठं रिव्हॉल्व्हर त्या पर्समध्ये ठेवलेलं असणं. नाहीतर त्या पर्सचा आकार एकदम विचित्र झाला असता आणि तो बाहेरून कळला असता मला.” समिधा म्हणाली.
“घ्या उलट तपासणी” पाणिनी म्हणाला
सरकारी वकील फारुख कुठून उभा राहिला “आरोपीने तिची रिव्हॉल्व्हर पर्स व्यतिरिक्त अन्यत्र कुठेतरी ठेवलेली असू शकते? म्हणजे तिच्या सुटकेसमध्ये किंवा हॅन्ड बॅग मध्ये?”
“तिची सुटकेस तर पटवर्धन सरांनी आपल्या ताब्यात घेतली होती. म्हणजे हॉटेलमधनं बाहेर काढण्याच्या दृष्टीने. त्यामुळे तिच्याकडे फक्त तिची हॅन्डबॅग आणि पर्स एवढच होतं.”
“तर मग हॅन्डबॅग मध्ये ती रिव्हॉल्व्हर लपवू शकली असेल?”
“नाही तेवढी जागा नव्हती हॅन्ड बॅग मध्ये कारण ती हॅन्डबॅग ब्लॅकमेलरला देण्यासाठी नोटांनी पूर्णपणे खच्चून भरलेली होती. थोडं अतिशयोक्ती च्या भाषेत सांगायचं तर मुंगी सुद्धा आत शिरायला जागा नव्हती त्या हॅन्ड बॅग मध्ये”
“किती पैसे होते त्या हॅन्डबॅग मध्ये?”
“रक्कम मी मोजली नाही पण संपूर्ण हॅन्डबॅग अगदी वर पर्यंत भरलेली होती.” समिधा म्हणाली.
फारुख थोडासा अडखळला.
“ठीक आहे. माझी उलट तपासणी संपली.” त्याने जाहीर केलं तेवढ्यात एका पोलिसाने कोर्टात येऊन एक जर्किन कोर्टाचे ताब्यात दिल.
पाणिनी उठून उभा राहिला “आपल्याला आत्ता लक्षात आलंय की पोलीस अधिकाऱ्याने मी म्हणतो ते जर्किन जे विवस्वानच्या कपड्याच्या कपाटातून जप्त केलं होतं आणि जे त्याच्या मापाचे नव्हतं ते जर्किन आता कोर्टाच्या हवाली केल आहे.”
“आपल्याला काय माहिती त्याच्या मापाचे होतं का नाही ते? ” फारुख गरजला
“लवकरच आपल्याला कळेल ते. मी विवस्वानच्या टेलरला पुढचे प्रश्न विचारू इच्छितो.” पाणिनीने जाहीर केलं

विवस्वानचा टेलर बल्लाळ साक्षीदाराच्या पिंजऱ्यात आला तो एक बुटकेला असा चाळिशीच्या घरातला माणूस होता. थोडासा स्थूल होता पण ज्या पद्धतीने तो साक्षीदाराच्या पिंजऱ्यात चालत आला त्यावरून तो थोडा चपळही दिसत होता. त्याने त्याची माहिती दिल्यानंतर पाणिनीने त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली

“ विवस्वानला तू कधीपासून ओळखतो आहेस?”
“साधारण सात वर्षांपासून. म्हणजे गेली सात वर्ष तो माझा ग्राहक आहे मी त्याचे सर्व कपडे शिवतोय.”

“किती कपडे शिवले आहेस त्याचे आत्तापर्यंत तू ?” पाणिनीने विचारलं.
“अरे बापरे अगणित कपडे शिवले मोजता येणार नाहीत. केवळ सूट म्हंटले तरी तो दर सहा महिन्यांनी आपला नवीन सूट माझ्याकडून शिवून घ्यायचा मी त्याचे बारा ते पंधरा सुट आतापर्यंत शिवले असतील. शिवाय शर्ट,पँट वेगळेच.”
“म्हणजे त्याच्या कपड्याची माप तुझ्या फाईलला असतीलच” पाणिनी म्हणाला
“अर्थातच! प्रत्येक वेळेला तो येईल त्यावेळेला त्याचं माप घेणं ची गरज पडू नये म्हणून मी त्याची फाईलच बनवली होती. तो माझ्याकडे येऊन त्याने खरेदी केलेले कापड द्यायचा त्याला नेमकं काय हवं आहे, काय फॅशन हवी आहे ते सांगायचा आणि पुढच्या काही दिवसात मी त्याच्याप्रमाणे त्याला कपडे शिवून द्यायचो.”
“मी तुला आता एक जर्किन दाखवतो; जे आम्ही बचाव पक्षाचा पुरावा क्रमांक एक म्हणून सादर करणार आहोत, आणि तुला असं विचारतो की ते जर्किन तू शिवल आहेस का?”
त्या टेलरने ते जर्किन आपल्या हातात घेतलं मागून पुढून नीट पाहिलं आणि म्हणाला नाही हे “मी शिवलेले नाही. नक्कीच मी शिवलेल नाही.”
“मी आता तुला असं विचारतो की हे जर्किन विवस्वान ला बरोबर बसलं असतं का?”
साक्षीदाराने आपल्या खिशातून टेप काढली जर्किन ची माप घेतली आणि नकारार्थी मान हलवली.
“या जर्किन मध्ये तर विवस्वान पूर्णपणे बुडून गेला असता” टेलर म्हणाला.
“तुम्ही असेच थोडे साक्षीदाराच्या पिंजऱ्यातून थोड्या वेळासाठी बाहेर या आणि आरोपीच्या शरीराची मापे घ्या, आणि मला सांगा की हे जर्किन आरोपीचे मापाचे आहे का ?” पाणिनी म्हणाला
“पटवर्धन साहेब, त्यासाठी मला बाहेर येऊन आरोपीच्या शरीराची मापे घेण्याची गरज नाही तेव्हा नजरेनेच आणि टेलरिंग मधला एक तज्ञ या नात्याने मी सांगू शकतो की हे जर्किन तिच्या मापाचे नाही.”
“घ्या उलट तपासणी” पाणिनी म्हणाला
“मला काहीही विचारायचं नाही.” फारुख म्हणाला
“बचाव पक्षातर्फे आम्ही हे जर्किन पुरावा क्रमांक एक म्हणून सादर करून घेऊ इच्छितो.” पाणिनी म्हणाला
“काहीही संबंध नसलेला पुरावा सर तपासणीत आम्ही मांडलेल्या मुद्द्याशी पूर्णपणे विसंगत या कारणास्तव आमची जोरदार हरकत आहे हा पुरावा म्हणून सादर करून घेण्यासाठी.” फारुख म्हणाला.
“माझंही असच मत आहे” न्यायाधीश म्हणाले. “म्हणजे पटवर्धन,तुम्ही या जर्किनचा खटल्याशी असलेला संबंध शाबित करण्याबद्दल काहीतरी विधान जोपर्यंत करत नाही तोपर्यंत मी माझा निर्णय राखून ठेवतो.”
“ जेव्हा स्वत:जवळ शस्त्र बाळगणाऱ्या,आणि अत्यंत धोकादायक अशा ब्लॅकमेलरशी सौदा करायला एखादा माणूस जातो तेव्हा साहजिकच तो आपल्याबरोबर बंदूक घेऊ जाणार हे उघड आहे.एवढेच नाही तर ते शस्त्र कोणत्याही क्षणी आपल्याला समोरच्यावर रोखून गोळी झाडता आली पाहिजे अशा प्रकारे हातात तयार ठेवणार हे उघड आहे.पण त्याच बरोबर ते ब्लॅकमेलर ला दिसू नये याची काळजी घेणार हे स्वभाविक आहे.हे करायचा सोपा मार्ग म्हणजे आपल्या हातात बंदूक रोखून तयार ठेवणे आणि ते जर्किन किंवा तत्सम कपड्याने झाकणे. मला जरा ते जर्कीन द्या ” पाणिनी म्हणाला आणि त्याने आपला उजवा हात कोपरापासून आडवा करून पंजात रिव्हॉल्व्हर धरली आणि कोर्टाच्या क्लार्क कडून घेतलेले जर्किन आपल्या उजव्या हाताच्या कोपरावर टाकले. आता पंजात धरलेली रिव्हॉल्व्हर झाकली गेली होती. “आता खून कसा झाला असावा आणि कोणी केला असावा या बद्दल मी माझी मीमांसा किंवा सिद्धांत सांगतो.” पाणिनी म्हणाला
“एकादषम कंपनीत काम करणाऱ्या एका मुलीचे त्याच कंपनीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी काहीतरी लफडे असल्याची बातमी विवस्वान ला कळली असावी आणि त्याने त्या अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करायचे ठरवलं असाव.वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव त्याला कळले नसावे पण त्याने कंपनीच्या सर्व वरिष्ठांना वैयक्तिक पत्र लिहून पैशांची मागणी केली असावी.जो पैसे देईल तो लफडेबाज असा साधा विचार त्याने केला असावा. अर्थात कंपनीतले कोणीतरी त्याला सामील असल्याशिवाय त्याला त्यांचे पत्ते मिळाले नसते. पण जो माणूस विवस्वान ला फितूर होता त्याला सुद्धा माहित नसावे की नेमका कोणता वरिष्ठ अधिकारी आहे. विवस्वान ने लिहिलेलं पत्र जर बाहेर कुणाला मिळाल असत तर इज्जत गेली असती..म्हणून तो क्ष अधिकारी आपला हक्काचा माणूस म्हणून प्रयंक कडे गेला असावा आणि त्याला भरपूर पैसे देण्याच्या आमिषाने त्याने पटवले असावे की त्याने विवस्वानला भेटावे आणि सांगावे की ती मुलगी ही त्याच्या पासूनच गरोदर होती.त्याने रीवा ला जावे विवस्वान ला भेटावे आणि त्याला रोख रक्कम देऊन गप्प करावे.त्यासाठी त्याने प्रयंकला पाच लाख रोख रक्कम दिली. दुर्दैवाने प्रयंक रीवाला जाण्यासाठी म्हणून त्याच्या गाडीत पेट्रोल भरायला गेला असतांना अपघातात बेशुद्ध होऊन नंतर हॉस्पिटल मधे मरण पावला.नशिबाने क्ष व्यक्तीने त्याच्याकडे दिलेली रक्कम त्याने गाडीत आपल्या बरोबर नेली नव्हती तर स्वत:च्या घरीच ठेवली होती.पेट्रोल भरून आल्या नंतर तो ती रक्कम घेऊन तो रीवाला जायला निघणार होता,पण त्याआधीच अपघातात अडकला. पण आता जे काम प्रयंक करणार होता ते करण्यासाठी क्ष व्यक्ती ला विवस्वान कडे रोख रक्कम घेऊन जाणे आवश्यक होते.म्हणून त्याने कंपनीच्या तिजोरीतून आणखी पाच लाख काढले आणि रिव्हॉल्व्हर घेऊन तो रीवा ला गेला. ते रिव्हॉल्व्हर प्रयंक पारसनीसचं होतं.पाच लाख रुपये घेऊन विवस्वान गप्प बसला तर ठीक नाहीतर त्याला संपवायचा या निश्चयानेच तो गेला. दारातच आपलं रिव्हॉल्व्हर हातात तयार ठेवलं असाव आणि ते दिसू नये म्हणून आपलं जर्किन मगाशी मी दाखवलं त्या पद्धतीने हातावर टाकून रिव्हॉल्व्हर दिसणार नाही याची काळजी घेतली असावी.विवस्वान च्या फ़्लॅट मधे गेल्यावर त्याने विवस्वान ला ओळखलं की हा एक नंबर चा ब्लॅकमेलर आहे,आणि विवस्वान ने ही ओळखलं की ज्या वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्याच कंपनीतील मुलीशी अनैतिक संबंध ठेवले आहेत तो स्वत: मालक आहे.आणि त्याची लालच वाढली.त्याने ओळखलं की हा माणूस पाच लाखात सौदा करण्याजोगा नाही.त्याने जास्त रकमेची मागणी केली असावी त्या वरून त्यांच्यात वाद झाले असावेत आणि त्याने विवस्वान वर गोळी झाडली असावी.मुद्दामच त्याने रक्ताच्या थारोळ्यात आपल्या हातातील प्रयंकची रिव्हॉल्व्हर टाकली असावी आणि देवनारला निघून ला असावा.”

न्यायाधीशांना पाणिनीच्या थेअरीमधे रस निर्माण झाल्याचे दिसत होते पण त्यांना शंका होती, ते पुढे झुकले आणि त्यांनी विचारलं, “ पटवर्धन,त्या क्ष कडे प्रयंक ची रिव्हॉल्व्हरकशी आली असेल?”

“ युअर ऑनर, प्रयंक हा उत्तम नेमबाज होता त्याने आपल्या बहिणीला, म्हणजे आरोपी प्रचिती ला त्याच रिव्हॉल्व्हर वर नेमबाजीचा सराव दिला होता, त्याची आणि गरोदर राहिलेल्या ‘त्या’ मुलीची खूप मैत्री होती,कदाचित प्रेम असाव.त्याने तिला संरक्षणासाठी किंवा सरावासाठी स्वत:चे रिव्हॉल्व्हर वापरायला दिले असावे.” पाणिनी म्हणाला

“ ते ठीक आहे पण ते रिव्हॉल्व्हर क्ष कडे कसे आले? ” न्या.सरदेसाई यांनी रास्त शंका विचारली.

“ इथे आपण  दोन शक्यता विचारात घेऊ.पहिली म्हणजे, क्ष आणि कंपनीतील गरोदर राहिलेली मुलगी यांचे संबंध होते.म्हणजे त्याच्याच पासून तिला दिवस गेले होते त्यामुळे तिच्याकडे असलेली प्रयंकची रिव्हॉल्व्हर त्याला मिळणे अवघड नव्हते. दुसरी शक्यता ही की क्ष ला असे वाटले असेल की रोख पाच लाख आणि रिव्हॉल्व्हर घेऊनच प्रयंक पेट्रोल भरायला गेला असावा. अपघात झाल्याचे कळताच तो तातडीने पंपावर गेला असेल आणि पैशाची बॅग मिळवण्याचा प्रयत्न केला असेल पण प्रयंक ने बॅग नेलीच नसल्याने त्याला फक्त त्याची रिव्हॉल्व्हर सापडली असावी आणि ती त्याने तिथून उचलली असावी.”

“ वा वा,” फारुख नाटकीपणाने टाळ्या वाजवत म्हणाला. “ अॅडव्होकेट पटवर्धन असं काही सांगताहेत की त्यांना खुनी माणसाने स्वत: केलेल्या खुनाचे व्हिडिओ रेकोर्डिंगच दाखवलंय.”

“ हे विधान करून तुम्ही खुनी माणूस प्रचिती नसून वेगळा आहे हे मान्य करताय ?” न्या.सरदेसाई नी विचारलं. पाणिनी हसला.

“ आता हे तर साफ आहे की क्ष ही व्यक्ती खून करतांना आपल्या बरोबर जर्किन घेऊन गेली होती.तर आता कोर्टात आणलेले जर्किन मी, माझे साक्षीदार म्हणून  इथे कोर्टात हजर असलेल्या तिघांना घालायला सांगतो. ज्याला हे जर्किन बरोबर बसेल त्याचेच ते आहे आणि तीच व्यक्ती खुनी आहे.”  पाणिनी म्हणाला.

( प्रकरण १३ समाप्त.)