त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का? - भाग ४ Meenakshi Vaidya द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का? - भाग ४

या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का भाग ४

मागील भागात आपण बघीतलं की मृदुलाला कृपाच्या घरी जाण्याची हिंमत होत नसते. बघू मृदुला हिंमत करू शकते का?

मृदुला जरा सावरली आणि कृपाकडे जायचं म्हणून उठली. तयार झाली निघताना पायात चप्पल घालताना पुन्हा तिचे पाय अडखळले. तिच्या पायात गोळे आले. क्षणभर ती भिंतीचा आधार घेऊन उभी राहिली. तिने डोळे मिटून घेतले होते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू धारा पुन्हा सुरू झाल्या.

मृदुलाच्या सासूबाई तेवढ्यात बाहेरच्या खोलीत आल्या आणि त्यांना भिंतीचा आधार घेऊन निश्चल उभी असलेली मृदुला दिसली. तिच्या गालावर अश्रूंचे ओघळ दिसले. त्यांच्या लक्षात आलं की मृदुला अजूनही कृपाकडे जाण्याची हिंमत करू शकत नाहीय. त्या हळूच पुढे झाल्या आणि त्यांनी मृदुलाच्या पाठीवर हाताने थोपटलं तशी मृदुला भानावर आली. तिने सासूकडे वळून बघितलं. मृदुलाचा चेहरा विदिर्ण झाला होता.

मृदुलाच्या काळजाचा तुकडा कोणीतरी ओरबाडून नेला आहे असं दु:ख मृदुलाला झालंय हे सासूच्या लक्षात आलं. त्यांनी म्हणून समजून घेतलं की मृदुलासाठी कृपा ही फक्त पेशंट नव्हती तर मृदुलालाही संजीवनी देणारी, तिच्यासाठी श्वासा इतकी महत्वाची असणारी व्यक्ती होती. सहाजीकच आहे त्यामुळे तिचं दु:ख सगळ्यां सारखं नव्हतं.

" मृदुला मन घट्ट कर आणि कृपाच्या घरी जा. तिथे तुला खंबीरपणे  उभं रहावं लागेल. कृपाच्या मुलांना, नव-याला सावरणारे असतील पण तुला तिथे कोलमडून पडून चालणार नाही. जा बाळा मन कणखर करून जा."

सासूचं हे बोलणं ऐकताच मृदुलाने गालावर ओघळलेले अश्रू पुसले. डोळे कोरडे केले आणि निघाली.

" कार  चालवशील का नाहीतर रिक्षाने जा."

"  चालवीन नीट. जाते कारने. तुम्ही काळजी करू नका."

मृदुला सगळं बळ एकवटून कारने कृपाकडे जायला निघाली.

***

मृदुला कृपा ज्या सोसायटीत रहात होती तिथे आली. कार बाहेरच पार्क करून मृदुला सोसायटीच्या आवारात शिरली. कृपाचं पहिल्या मजल्यावर घर होतं. खाली सगळे ओळखीचे, नातेवाईक जमले होते. वातावरणात एक उदास छटा भरली होती. मृदुला जिन्यापर्यंत येईपर्यंत सगळ्यांची कुजबूज कानावर आली.

" खूप छान होत्या हरीशच्या मिसेस."

"खरय आपल्या सोसायटीत येऊन त्यांना पंधरा वर्षे झाली. कृपावहिनींनी आल्या आल्याच किती छान सगळ्या बायकांचा गृप केला."

"हो नं नाहीतर कोणालाही आपल्या मजल्यावरच काय आपल्या बाजूच्या फ्लॅट मध्ये कोण राहतं हे माहीत नव्हतं. कोणाशीही ओळख नव्हती."

"तर काय त्यांच्या मुळेच बायकांचं भिसी मंडळ सुरू झालं."

"गणपतीच्या कार्यक्रमाचा केवढा उत्साह होता कृपा वहिनींना."

"दाभाडे खरंतर आपली ओळख सुद्धा यांच्या गेटटुगेदर मुळेच झाली."

सावंत बायकांच्या गृपमध्ये असलेल्या आपल्या बायकोकडे बघून म्हणाले.

"हो सावंत खरं बोललात. अहो सुरवातीला मी या गेटटुगेदर आणि या गृपच्या विरूद्धच होतो पण बायकोच्या आग्रहाखातर आलो आणि मग  लक्षात आलं की आपल्या आजूबाजूच्या लोकांना भेटून आणि गप्पा मारून छान वाटतंय म्हणून मी बायकोला त्याच क्षणी सांगीतलं की हा तुझा गृप तू कंटीन्यु कर मी बरोबर पुरूषांचा गृप  बनवतो."

दाभाडे ऊत्तरले.

"खरय कृपा वहिनी ग्रेट आहेत."

सावंत डोळ्यात अश्रूंचा साथीनं म्हणाले.

"अं काय म्हणालात?

दाभाडेंनी गोंधळून विचारलं.

"ओ साॅरी अहो अजून मन मानत नाही हो कृपा वहिनी नाहीत."

"खरय तुमचं."

हे सगळे संवाद ऐकत ऐकत मृदुला जिन्यापर्यंत पोचली आणि मनातच म्हणाली.

"माझी कृपा होतीच ग्रेट. माझं मनसुद्धा मानत नाही की कृपा आता आपल्यात नाही."

या विचारसरशी खळकन एक अश्रू मृदुलाच्या गालावर ओघळला.

मृदुला सावकाश जिना चढून वरती गेली. कृपाच्या घराबाहेर समस्त महिला मंडळ जमलं होतं. सगळ्यांचे डोळे अश्रूंनी गच्च भरले होते. काहीजणींनी तोंडात पदराचा बोळा कोंबून आपले हुंदके आवरले होते. मृदुलाने एकेक जणींना बाजूला करत आत जाण्याचा प्रयत्न केला.

आता शिरताच समोर कृपाच्या मुलांना बघताच मृदुलाच्या पायातले त्राण गेलं. ती कशीबशी स्वतःला सावरत आत गेली. कृपाच्या मोठ्या जाऊबाईंजवळ जाऊन उभी राहिली पण याक्षणी काय बोलावं हेच तिला कळेना. ती नुसतीच त्यांच्याकडे बघत राहीली. त्यांचं लक्ष जाताच त्या रडतच म्हणाल्या,

" तुमची मैत्रीण गेली हो."

आणि हुंदक्यांचा कल्लोळ त्यांच्या तोंडून बाहेर पडला.

मृदुलाने त्यांच्या खांद्यावर हात ठेवून थोपटलं आणि स्वतःचे हुंदके आवरले.

" कृपाला अजून घरी आणलं नाही."

रडतच तिच्या जावेनं मृदुलाला सांगीतलं.

"हं" 

मृदुलाच्या तोंडून फक्त एवढाच हुंकार निघाला. तेवढ्यात समोरच्या दाराशी हालचाल झाली. काहीच क्षणात कृपाचं पार्थिव घरात आणलं आणि एकच कल्लोळ उडाला. कृपाच्या पुतण्या,नणंद कृपाच्या मुलांना सावरत होते. दोघं मुलं गांगरून गेली होती. आईकडे बघत मनातील दुःखाचा कढ कसाबसा दाबत होती.

मृदुलाची अवस्था आणखी बिकट झाली. तिला सुचेना काय करावं. कृपाचं पार्थिव समोरच्या खोलीत ठेवलं तसं एकेकजण दर्शन घ्यायला येऊ लागले. मृदुला निश्चलपणे कृपाकडे बघत होती. मृदुलाचं शरीर थंड पडलं होतं आणि डोकं सुन्न झालं होतं. मृदुलाचे अनेक कॅंन्सर ग्रस्त पेशंट देवाघरी गेले होते. तेव्हा त्यांच्या घरी मृदुला गेली होती. पण आत्ता सारखी ती कधी हवालदिल झाली नव्हती. कृपाचा मृत्यू मृदुलाला खूप चटका लावून गेला.

"कृपा काग गेलीस? तुझ्यामुळे मी शब्दांशी जोडल्या गेले. तुझ्यामुळे शब्द यात्री झाले. कितीतरी शब्दांचे अर्थ मला मनापासून कधी भावले नव्हते कारण तोपर्यंत अर्थाचा गाभा मला कोणी उलगडूनच दाखवला नव्हता त्यामुळे मला त्या शब्दांचं सामर्थ्य कळलंच नव्हतं. हे सगळं तुझ्या मुळे कळलं. आता मला शब्दांचं अंतरंग आणि त्यांच्या लीला कोण ग समजावून सांगणार? का गेलीस तू इतक्या लवकर?"

मृदुलाचं मन टाहो फोडत होतं. मृदुला भानावर आली तेव्हा कृपाला खाली नेण्याची तयारी सुरू होती. खाली सगळी तयारी झाल्याचं कोणीतरी सांगितलं तेव्हा कृपाच्या पार्थिवापाशी कृपाचा हात हातात घेऊन बसलेल्या हरीशजवळ त्यांचे मोठे भाऊ आले आणि त्याला खांद्यावर थोपटत म्हणाले,

"चल हरीश कृपाला नेण्याची वेळ झाली."

"दादा मी सहनच करू शकत नाही रे की कृपा आता नाही."

"कळतंय मला तुझं दु:ख पण तू स्वतःला सावरायला हवं. तू खचलास तर मुलं कोणाकडे बघतील?"

बराच वेळाने खूप कष्टाने हरीश उठून उभा राहिला. कृपाला ऊचलल्याबरोबर त्याची दोन्ही मुलं त्याला येऊन बिलगली.

"बाबा.."

त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत हरीश म्हणाला,

"बाळांनो आता आपणच एकमेकांना सांभाळून जगायचं आहे. आता तुमची आई नाही आपल्याला सांभाळून घेणारी. शहाण्यासारखे रहाल‌नं?"

"हो बाबा"

 धाकटा मुलगा रडतच म्हणाला

"बाबा आम्ही आई सांगायची तसंच वागू. तुम्हाला त्रास नाही देणार."

मोठा मुलगा म्हणाला.

तसं हरीशने दोघांना जवळ घेतलं. तिघही एकमेकांचं सांत्वन करत रडत होते.

मृदुलाला हे सगळं बघवेना ती मनात म्हणाली,

"देवा इतक्या लहान वयात  नकोरे कोणाची आई नेऊस. किती कठीण असतं आईशिवाय जगणं. कृपाच्या मुलांची काळजी घे."

आलेला हुंदका मृदुलाने दाबला. मृदुलाच्या लक्षात आलं की सगळे खाली गेले तीच फक्त त्या घरात एकटीच उभी होती. हे लक्षात आल्यावर ती भरभर जीना उतरुन खाली आली.

खाली कृपाला नेण्याची पूर्ण तयारी झाली होती. सगळ्यांनी तिला हार घातला होता. हिरवी साडी नेसवली होती. मृदुला जडशीळ पावलाने समोर गेली आणि कृपाच्या पार्थिवावर हार घातला. मृदुला थोडीशी मागे सरकली तशी कृपाच्या पार्थिवाला चार जणांनी खांदा देऊन उचललं आणि …

'श्रीराम जय राम जय जय राम ' असं धीरगंभीर आवाजात म्हणत ते सगळे ॲम्ब्युलन्स पर्यंत गेले.

कृपाचं पार्थिव ॲम्ब्युलन्समध्ये ठेवल्या गेलं. त्यानंतर हरीश त्याचे भाऊ, जावई आणि मित्र ॲम्ब्युलन्स मध्ये बसले. दार लावून तो माणूस गाडीत जाऊन बसला. गाडी सुरू झाली. हळूहळू गाडी घरापासून लांब गेली. बाकी सगळे लोक आपापल्या गाडीतून ॲम्ब्युलन्स च्या मागे निघाले.

सगळ्या बायका खिन्नपणे आपापल्या घरी गेल्या. हरीशच्या मुलांना सावरत काकू आणि आत्याने त्यांना घरी नेलं. मृदुलाच्या डोळ्यासमोर अर्थशून्य वर्तुळ निर्माण झालं. ती जाणाऱ्या ॲम्ब्युलन्स कडे निष्क्रियपणे बघत होती. तिच्या डोळ्यात तिच्या मेंदूत काहीही शिरत नव्हतं.

_________________________________

मृदुला कृपाच्या जाण्याच्या धक्क्यातून कधी सावरेल? 

बघू पुढील भागात.