अद्भूत रामायण - 2 गिरीश द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अद्भूत रामायण - 2

अद्भुत रामायण भाग २
तेव्हा नारदमुनी आणि पर्वत ऋषी दोघांनी तीच्याशी‌ विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा राजा म्हणाला, तुम्ही दोघांनी पण ईच्छा व्यक्त केल्याने आता उद्या दरबारात श्रीमती ज्याला वरमाला घालेल, तो तीचा पती होईल.
उद्या येतो असे सांगून ते दोघे तिथून निघाले. नारदमुनी विष्णूंकडे गेले.
आणि म्हणाले की, आपला भक्त व महापराक्रमी अम्बरिष राजाची एक श्रीमती नावाची रुपवती कन्या आहे.
मला तीच्याशी विवाह करावयाचा आहे. पण आपले भक्त पर्वत ऋषी हे पण तीच्याशी विवाह करुन इच्छितात.‌
तेव्हा राजाने सांगितले की, उद्या दरबारात आपणा दोघांपैकी जो अधिक सुंदर दिसेल त्याच्या गळ्यात श्रीमती वरमाला घालेल आणि त्याच्याशी तीचा विवाह होईल.
 हे विष्णू, तुम्ही माझ्यासाठी एक काम करा. उद्या दरबारात पर्वत ऋषींचा चेहरा फक्त श्रीमतीला वानरासारखा दिसूं दे, दुसऱ्या कोणाला तसा दिसूं नये.
विष्णू म्हणाले, मुनीवर तुम्ही आनंदाने जा मी तुमच्या इच्छा पूर्ण करेन.
तेव्हा नारदमुनी बाहेर पडले.
नंतर पर्वत ऋषी विष्णूंकडे आले व श्रीमतीचा वृत्तांत सांगून म्हणाले, तुम्ही उद्या नारदाचे तोंड माकडा सारखे आहे असे श्रीमतीला दिसूं दे बाकी कुणाला नको.
भगवान म्हणाले, तुम्ही अयोध्येत जा, नारदांना तुम्ही इथे आल्याचे बोलू नका. मी तुमच्या मनासारखे घडवतो.
इकडे अयोध्येत राजाने सर्व नगरी सजविली, सगळीकडे सुगंधी जल शिंपडले. दरबार पण सजवला. उच्च प्रतीचे गालीचे घातले. अनेक लोकांना निमंत्रण दिले.
नारद व पर्वत ऋषी दरबारात आले.
नंतर उत्तमोत्तम दागिने घातलेली, लक्ष्मी सारखे डोळे असलेली, शुभ लक्षणांनी युक्त अशी श्रीमती अनेक दासींच्या मधून चालत दरबारात आली.
राजाने तीला सांगितले की या दोघांपैकी तुला आवडेल त्याला नमस्कार करून वरमाला घाल. तेव्हा ती पुढे आली पण वरमाला कुणालाच घातली नाही तेव्हा राजाने विचारले तू वरमाला का घालत नाहीस?
तेव्हा ती म्हणाली दोघे ऋषी मला ओळखता येत नाहीत कारण ते दोघे माकडा सारखे दिसत आहेत आणि मला त्या दोघांमध्ये एक तरुण दिसत आहे ज्याचे हात लांब आहेत व तो अतिशय सुंदर आहे, सुवर्णासमान कांती असलेला असा तो तरुण माझ्याकडे बघून हास्य करीत आहे.
नारदांनी विचारले त्याला किती हात आहेत? ती म्हणाली दोन .
पर्वत ऋषीनी विचारले त्याच्या हातात काय आहे?
ती म्हणाली धनुष्य बाण.
 तेव्हा दोघा मुनींच्या लक्षात आले की, ही विष्णूंची माया असणार.
नारद मनात म्हणाले माझे तोंड माकडा सारखे कसे दिसते, तेव्हाच पर्वत ऋषी पण विचार करीत होते की माझा चेहरा माकडा सारखा कसा दिसतोय.
 राजा म्हणाला हा सर्व काय प्रकार आहे तेव्हा मुनी म्हणाले तूच काहीतरी केले असशील. श्रीमतीने आमच्या दोघांपैकी एकाला वरमाला घातली पाहिजे. तेव्हा राजाने परत श्रीमतीला सांगितले की पुढे जा व वरमाला घाल.
श्रीमतीने देवाला नमस्कार केला व परत वरमाला घालण्यासाठी पुढे आली, पुन्हा तोच तरुण दिसल्यावर तीने त्याला वरमाला घातली.
आणि अचानक ती तेथून नाहीशी झाली असे लोकांच्या लक्षात आले, एकच गोंधळ उडाला, हे काय झाले, हे काय झाले असे सगळे म्हणू लागले.
इकडे विष्णूंनी तीला आपल्या धामात आणले.
प्राचीन काळी विष्णू प्राप्ती साठी केलेल्या त्यामुळे तिला श्रीमतीचा जन्म मिळाला होता आणि म्हणूनच ती अशा रीतीने विष्णूधामात पोहोचली होती.
दोन्ही मुनीवर दुःखी होवून परत विष्णू धामात आले. विष्णूंनी श्रीमतीला लपण्यास सांगितले.
नारद वंदन करून म्हणाले, तुम्ही आमची ही काय दुर्दशा केली, तुम्हीच श्रीमतीचे हरण करून इकडे आणले ना?.
विष्णू कानावर हात ठेवून म्हणाले आपण हे काय बोलत आहात?.
तेव्हा नारदांनी त्यांना हळूच विचारले मला वानरमुख कसे प्राप्त झाले?.
तेव्हा विष्णूनी‌ उत्तर दिले की, पर्वत ऋषीनी मला तशी‌ प्रार्थना केली होती. तुम्ही दोघांनी पण मला‌ जी प्रार्थना केली त्याप्रमाणे मी तुमच्या प्रेमाखातर हे केले. त्यात माझा किंवा तुमचा दोष नाही.
तेव्हा मुनी म्हणाले मग तो तरुण कोण होता? त्यावर विष्णू म्हणाले असे मायावी लोक असतात मला याबाबत माहिती नाही.
ते दोघे म्हणाले, म्हणजे राजानेच काहीतरी केले आहे. मग ते राजाकडे गेले. राजाला म्हणाले की तूच काहीतरी कपट करून आम्हाला फसवले आहेस, आम्ही तुला‌ शाप देतो की घोर अंधकार तुला व्यापेल व तुझे आत्मरुप तुला कळणार नाही.
 तीथे एक तमोराशी (अंधार चक्र ) तयार झाले, तेव्हा विष्णू नी सुदर्शनचक्राला पाठवले व ते अंधार चक्र त्याच दोघांच्या मागे लागले. ते दोघे विष्णूंकडे गेले व आम्हाला वाचवा अशी प्रार्थना केली.
तेव्हा विष्णूनी विचार केला की, हे तीघेही आपले भक्त आहेत, आणि आपल्याला तीघांचे हित केले पाहिजे.
विष्णू म्हणाले, हे मुनीश्रेष्ठ मी हे सर्व भक्त रक्षणासाठी केले आहे, मला क्षमा करा, तसेच सुदर्शनचक्राच्या अपराधाबद्दल त्याला पण क्षमा करा.
दोघांच्या लक्षात सर्व प्रकार आला. त्यांनी क्रोधाने विष्णूंना शाप दिला.
हे विष्णू, ज्याप्रमाणे आपण श्रीमतीचे अपहरण केले आहे त्याचप्रमाणे अम्बरिषच्या वंशात, राजा दशरथाचे पुत्र म्हणून आपण जन्म घ्याल, आणि श्रीमती राजा जनकाला धरतीतून प्राप्त होईल, तो तीचे पालनपोषण करेल व आपल्याशी तीचा विवाह झाल्यानंतर एक राक्षस आपल्या या पत्नीचे अपहरण करेल आणि आम्हा दोघांना जे विरहाचे दुःख झाले तसे तुम्हालाही दुःख भोगावे लागेल.
तेव्हा मधुसूदन म्हणाले अम्बरिषच्या वंशात दशरथ नावाचा धार्मिक राजा होईल मी त्या राजाचा पुत्र म्हणून जन्म घेईन.
भरत व शत्रुघ्न नावाचे माझे भाऊ असतील आणि शेष स्वतः लक्ष्मण म्हणून जन्म घेतील. ऋषींचा शाप व्यर्थ जाणार नाही.
हे चक्रा तू आता परत जा, मी आवाहन करीन तेव्हा ये. या दोघांना सोडून दे. तेव्हा ते अंधार चक्र नष्ट झाले व सुदर्शनचक्र अदृश्य झाले.