विवाह - भाग 3 Ankush Shingade द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

विवाह - भाग 3

            

         देवनं अट मान्य करुन विवाह ठरवला. तसं अटीनुसार त्यानं किरायाचा कमरा घेतला. त्यानंतर त्यानं आपला विवाह केला व अटीनुसार त्यानं विवाहानंतर आपली वरात किरायाच्या कमऱ्यातच वळवली. स्वतःच्या हातचं बनवलेलं घर. त्या घरावर पाणी फेरलं. तसे दोन तीन दिवस झाले. 
          विवाहाला दोन तीन दिवस झाले होते. देव विचारच करीत होता. किराया कसा द्यायचा? पोट कसं पालवायचं? आपलं वेतन तुटपुंजं? आपण विवाह तर केला, परंतु पुढं काय? शेवटी विचार करता करता त्याला मार्ग सापडला. आपण पोलीस स्टेशनला तक्रार करायची. तक्रार करायची की आपलं पासबुक हारवलंय व ती तक्रार आपण बँकेत द्यायची. ज्या बँकेतून आपलं वेतन होतंय. तसं केल्याशिवाय मार्ग निघणार नाही. अन् शेवटी करणार तरी काय, मार्ग तर काढावाच लागेल. कसाही करुन काढावाच लागेल. परंतु संस्थाचालक. तो किती रागावेल. त्याचेशी दगाबाजीही होईल. शेवटी दगाबाजी केल्याबद्दल तो आपल्याला माफ करणार नाही. तसा दुसराच विचार त्याक्षणी आला. जावू द्यावं संस्थाचालक रागवेल तर. त्यानं प्रमाणाच्या बाहेर पैसा हडपला. अन् त्रास दिला तो वेगळाच. 
         असाच त्याचा विचार. परंतु त्याचेजवळ मार्ग नव्हता. हिंमत होत नव्हती. शेवटी हिंमत करुन त्यानं पासबुक हरविल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली व त्या तक्रारीची प्रत घेवून तो बँकेत गेला. ती तक्रार बँकेत दिली व त्यानं पासबुक उचललं. आता त्याला पुर्ण स्वरुपात वेतन मिळू लागलं होतं. तो आता कमऱ्याचा किरायाही देवू लागला होता. त्यातच आपल्या आईलाही आणि पत्नीलाही चांगल्या पद्धतीनं पोसू लागला होता. तो एकतर्फी सुखी झाला होता. परंतु हे जरी खरं असलं तरी तो दुसरीकडे दुःखी होता. कारण तो ज्या शाळेत नियुक्त झाला होता. तो संस्थाचालक गुंड प्रवृत्तीचा होता. देवनं पासबुक काढताच त्यानं त्यानंतर देवला भयंकर त्रासच देणं सुरु केलं होतं. ज्याचा त्रास त्याला म्हातारपणापर्यंत झाला होता. 
          देव आज सुखी झाला होता. नित्यनेमानं दर महिन्याला तो वेतन उचलत असे. ते वेतन परिवारासाठी खर्च करीत असे. तसं पाहिल्यास त्याचा परिवारही खुशच होता. अशातच माशी शिंकली व सुख भरल्या परिवारात कोणं आग लावली ते कळलंच नाही. अचानकच त्याच्या पत्नीचे वाद व्हायला लागलेच. ज्यातून त्याचं भविष्यातील जीवन दुःखदायक झालं होतं. वाटत होतं की आपला विवाह झाल्यानंतर आपलं जीवन सुखी होईल. परंतु ती त्याची सोच होती. घडलं दुसरंच होतं. जे त्याला नाही तर प्रारब्धाला मंजूर होतं.
         विवाह कशासाठी ? असा प्रश्न सर्वांना पडतच असेल. तसा पडल्याशिवाय राहात नाही. लोकं त्या विवाहाचा संबंध फक्त अश्लील गोष्टीशी जोडतात. अन् ती गोष्टही खरी आहे. कारण विधात्यानं ती गोष्ट विवाह रुपानं का होईना, विवाहात समाविष्ट केल्यानं विवाह टिकतो. काही लोकांचा टिकत नाही. कारण त्यांचे विवाहबाह्य विवाहापुर्वीच संबंध असतात किंवा विवाहानंतर निर्माण होत असतात. परंतु ती कारणं लपवून काही लोकं भलतीच कारणं पुढं करीत असतात व घटस्फोट घेत असतात.
         विवाह हे अश्लील बाबी करण्यासाठी नसतात. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण विवाहानंतर खरं सुख व्यक्तीच्या जीवनात निर्माण होत असते. तसं पाहिल्यास सर्वात महत्वाचं असतं जगणं. जगण्यासाठी आपल्या वयाच्या प्रौढावस्थेपर्यंत आपले आईबाप सोबतीला असतात. ते आपल्या विवाहाची प्रौढावस्था झाली की वयोवृद्ध झालेले असतात. काही लोकांचे आईवडील हे मृतावस्थेत आलेले असतात. काहींचे मरण पावलेले असतात. अशावेळेस आपल्या जगण्यात नवचैतन्य निर्माण व्हावं व आपल्याला जगता यावं म्हणून विवाह हे एकच माध्यम असतं.
         विवाह हे असं माध्यम आहे की त्या माध्यमातून बहुतेकांना आपले आईवडील प्राप्त होत असतात. कारण विवाह झाल्यानंतर जी पत्नी घरी येत असते. ती पत्नी आपल्या आईवडीलांपेक्षाही मुलांना प्रिय वाटत असते. तसंच स्रियांनाही त्यांचे पती आपल्या आईवडीलांपेक्षा प्रिय वाटत असतात. मात्र आपला समाज पुरुषसत्ताक कुटूंब पद्धतीवर आधारीत असल्याने घरातील पुरुष असलेला पती हा बाहेर कामाला जात असल्याने पत्नी नावाचा घटक घरी राहात असतो. तो घटक कंटाळतो. म्हणूनच तिला जीवन व वातावरण कंटाळवाणं वाटू नये म्हणून ते दोघंही एक दोन लेकरं जन्मास घालतात. हे लेकरं खेळणीसारखेच असतात की जे मनोरंजन करीत असतात. ज्यातून त्यांच्यासोबत वावरतांना आयुष्याचे दिवसं कठीण वाटत नाहीत. त्यांच्या जीवनात सुखशांती प्राप्त होत असते. म्हणतात की विधात्यानं सृष्टीची रचना केली व त्या जीवनात, ते जीवन कंटाळवाणे वाटू नये म्हणून मनोरंजनाची साधनं निर्माण केली. तसं आयुष्य हे दुःखदायकच बनवलेले आहे. असे दुःखदायक असलेले जीवन कंटाळवाणे वाटू नये म्हणून हे मनोरंजनाचे साधन. साधारणतः टिव्ही, रेडिओ माणसं किती पाहणार? त्यापेक्षा लेकरं बरे. असा विचार करुन आयुष्यभर सोबत राहणारी लेकरं जन्मास घालणं व पुढं त्यांच्यासोबत वावरुन संकटात त्यांना मदत करणं हे आईवडीलांचं कर्तव्य. हे सर्व करीत असतांना आयुष्य कितीही कठीण प्रसंग आले तरी चांगलंच कटतं. त्यात चिंतेची बाब राहात नाही वा चिंता लक्षात येत नाही. विवाहानंतर जेव्हा आपल्या आईवडीलांची जागा घेवून जोडीदार आपल्या जीवनात प्रवेशला आणि तो जर समजदार असला तर काही पाहावेच लागत नाही. मग आयुष्य अती सुंदरच होते. तसं पाहता म्हणतात की पती हा जर संसाराच्या बैलगाडीचं एक चाक असेल तर पत्नी ही दुसरं चाक असतेच. त्याशिवाय बैलगाडी बरोबर चालतच नाही. परंतु ज्याप्रमाणे बैलगाडीचं एक चाक बिघडलं की बैलगाडी एका जागेवर उभी होते. तसंच संसाराचंही आहे. चांगला संसार चाललेल्या संसारात कोणीतरी दलाल येतो व तो दलाल त्या चांगल्या संसारात आगीचे डोंब टाकून त्यांचा चांगला संसार तोडत असतो. कारण कोणाचाही सुखाचा संसार कुणाला चांगला बघवत नाही. असा व्यक्ती चांगल्या संसारात वितुष्ट टाकत असतांना त्या कुटूंबातील बैलगाडीच्या एका चाकाची गोष्ट दुसऱ्या चाकाला माहीत न करता दुसऱ्या चाकासोबत करीत असते. मग त्यात वास्तविक प्रकरणाची शहानिशा न करता संसाररुपी बैलगाडीची चाकं भडकतात व त्यातील एक चाक कामंच करणं बंद करतं. ज्यातून संसाराचा गाडा थांबतो. काही काही प्रकरणात चांगला संसारगाडा चाललेल्या रस्त्यावर खाचखळगे येतात. हे खाचखळगे म्हणजेच प्रेमसंबंध. बैलगाडीच्या एका चाकाचे प्रेमसंबंध त्याच बैलगाडीच्या दुसऱ्या चाकासोबत न राहता दुसऱ्याच वेगळ्या बैलगाडीच्या चाकासोबत वा इतर चाकासोबत निर्माण होतात. ज्यातून एका चाकाला तेलपाणी व वंगन मिळतं तर दुसऱ्या चाकाला ते मिळत नाही. मग त्या चाकाला संसार रस्त्यावरुन चालतांना त्रास होतो. ज्यातून ते चाक काम करणं मुळात बंद करतं. ज्यातून संसाराचा गाडा थांबतो. महत्वपूर्ण बाब ही की विधात्यानं जीवनात रंगत आणण्यासाठी व जीवन आनंददायी बनविण्यासाठी आईवडीलांनंतर जीवनात जोडीदार नावाची एक त्यांची जागा घेणारी वस्तू आणली. असे असतांना दोन जोडीदारांपैकी एका जोडीदारानं आपल्यासाठी इतर जोडीदार का शोधावा की संसारात वितुष्टता वा कलुषीतता निर्माण होईल? विवाह हा कशासाठी असतो? सुखासाठीच ना? मग जोडीदारानं विवाह झाल्यानंतर इतरांसोबत प्रेम का करावं की ज्यातून संसार तुटेल. मुलाबाळांचं नुकसान होईल. कधीकधी अशा गोष्टीनंच संसारही तुटत असतो. ज्यात जीवनात विरंगुळा निर्माण व्हावा व आयुष्य सुखकारक जगता यावं म्हणून विधात्यानंच मूल नावाची वस्तू त्यांच्या जीवनात आणून सोय केलेली असते. असं सुंदर आयुष्य टाकून जो कोणी विधात्याचा नियम तोडून दुसरीकडे लक्ष टाकतो. तो जीवनात कधीच यशस्वी होत नाही. त्याला थोड्यावेळासाठी ती गोष्ट चांगली वाटते. मग पुर्ण जीवनातच अंधार भरुन जात असतं. म्हणूनच असं करण्यापुर्वी म्हणजेच विवाह करण्यापुर्वीच जोडीदारानं विचार करावा. विचार करावा की जर त्याला विवाह झाल्यानंतर आपल्या जोडीदारावर प्रेम करणं सोडून इतरांसोबत प्रेम करायचं असेल तर त्यांनी विवाहच करु नये. कारण विवाह हा सुखासाठी असतो. असं इतरांसोबत प्रेम करुन संसारात दुःखदायक वितुष्ट आणण्यासाठी नाही. कधीकधी आपली पत्नी घरी असतांनाही लोकं बाहेर शारिरीक संबंध ठेवतात. आपली शारिरीक भूक भागविण्यासाठी. हे बरोबर नाही. हं, हे ठीक आहे की पत्नी जर आपल्यासोबत राहात नसेल तर शारिरीक भूक पुर्ण करण्यासाठी प्रेयसी म्हणून एखाद्या कन्येचा स्विकार करणं. परंतु तिही गोष्ट बरोबर वाटत नाही. 
          करुणा व देव नावाचं ते जोडपं. ते आज अगदी सुखातच होतं. ना कोणती कटकट होती ना कोणती समस्या. त्याला त्या जीवनात रमणीयता वाटत होती. 
        देवचा विवाह झाला होता व तो आता आपल्या संसारात सुखी झाला होता. शिवाय त्यानं बँकेचं पासबुक उचलल्यानं त्याला वेतनही भरपूरच मिळत होतं. जे वेतन त्याच्या जगण्याला पुरेसं होतं. अशातच माशी शिंकली व त्याची पत्नी किरायाचं घर सोडून तिच्या आईच्या घराकडे राहायला चालण्याविषयी आग्रह करु लागली. 
        एक महिना झाला होता. तो त्याच्या पत्नीचा आग्रह. त्याच्या पत्नीच्या मनात कोणीतरी खुळ भरलं ते देवलाही समजलं नाही. ती अचानक म्हणायला लागली की तुम्ही आपल्या आईला वृद्धाश्रमात ठेवा, नाहीतर बहिणीच्या घरी ठेवा. कुठेही ठेवा आणि माझ्या आईच्या शेजारी किरायाचा कमरा घ्या व तिथं राहायला चला. त्यातच देव म्हणत होता की त्याचं स्वतःचं घर असूनही त्यानं किरायानं कमरा घेतला. तो तिच्या तालावरच चालला. आता तो काही किरायाचा कमरा सोडणार नाही. आईला वृद्धाश्रमात ठेवून अंतर देणार नाही. 
        ते देवचं म्हणणं. त्याची पत्नी त्याच विषयावर तांडव करु लागली होती. त्यांचे नेहमी भांडण होत होते. ती भांडणं त्याच विषयावर जोरदार होत होती. तशी ती धमक्याही देवू लागली होती. अशातच तिला दिवस गेले व ती गरोदर राहिली.
            ती देवची पत्नी. तिचं नाव मंजू होतं. मंजू गरोदर होती व त्याच गोष्टीचा फायदा घेण्याचं तिनं ठरवलं. तशी ती आता जास्त भांडण करु लागली होती. शिवाय माहेरी जास्त व सासरी कमी राहू लागली होती. कधी यायचीच तर ती भांडत असे देवशी. एक एक दिवस त्याचा त्रासाचा जात होता. तसा तो घरी एकटा असतांना विचार करायचा. विचार करायचा की आईला ठेवायचे कुठे? ज्या आईनं त्याचे वडील मरण पावताच त्याची हिंमत खचू दिली नाही. तिनं आधार दिला. तो आधार जन्म झाल्यावर त्याला लहानाचं मोठं करण्यापेक्षा मोठा होता. आज आपल्याला वेतन मिळतं. पत्नीही आहे. आज आपण सबळ झालो. याचा अर्थ असा नाही की आपण आईला विसरायचं आणि पत्नीच्या मतानुसार चालायचं. आईला वृद्धाश्रमात टाकायचं आणि आपण पत्नीच्या माहेरकडे किरायानं कमरा घेवून राहायचं. तसा विचार करताच त्यानं पत्नीला तसं करण्यापासून नकार दिला. कारण त्याचे वडील मरण पावल्यानंतर त्याच्या आईनं घर चालवितांना बरीच मेहनत घेतली होती. 
           पत्नीनं देवच्या तोंडून ते नकाराचे शब्द ऐकले. त्या दिवशी तिनं भरपूर भांडण केलं होतं. त्यानंतर ती त्याला त्याच दिवशी रात्रीला सोडून गेली. ती कायमचीच जणू सोडून गेली होती. 
            देव आता आपल्या घरी होता. तो आता विना पत्नीशिवाय राहात होता. आई सोबतीला होती. परंतु त्याला पत्नीची सारखी व सतत आठवण यायची. परंतु त्यावर त्याचेजवळ उपाय नव्हता. काय करावं सुचत नव्हतं. त्याला पत्नीशिवाय करमतही नव्हतं. तसा त्याला विचार आला. आपण विवाह करतांना विवाह व्हावा, आपली पत्नी टिकावी म्हणून किरायाचा कमरा केला. किराया देखील भरपूरच आहे. परंतु आपली पत्नी काही आपल्याजवळ राहात नाही. तेव्हा आपण कमरा सोडायचा. जर तिला वाटत असेल तर ती येईल आपल्याच घरी राहायला. आपला किरायाही वाचेल. 
          तो त्याचा विचार. त्यानं आपल्या पत्नीला घरी आणण्याविषयी केलेले बरेच प्रयत्न. ते शेवटी विफल झाल्यानं त्यानं जे ठरवलं. ते आपल्या पत्नीलाही बोलून दाखवलं. परंतु ते काही तिनं मनावर घेतलं नाही. तिची ती एकच अट. आईला वृद्धाश्रमात टाकणे आणि माझ्या आईच्या शेजारी कमरा घेणे. जे देवला शक्य नव्हतं. शेवटी ती धमक्याही वारंवार द्यायची. जर तू असं नासी केलं तर तुझी नोकरी खाईल. तुला भिकेला लावील. आता मी गरोदर आहे.
          मंजूचं ते बोलणं. त्या वारंवार धमक्या. ते पोटातील वाढतं बाळ. साऱ्याच तिच्या गोष्टी. त्या गोष्टी लिखीत नव्हत्या. शिवाय कायदेही असे होते की त्या कायद्यानुसार पुरुषांचा दोष नसला तरी पुरुषांनाच दोषी धरलं जायचं. त्यामुळं देव घाबरत होता आणि शेवटी नोकरीचा प्रश्न होता. देव देव करता करता नोकरी मिळाली होती. फारच कष्ट शोषले होते त्यानं नोकरीसाठी. 
         तो किरायाच्याच कमऱ्यात होता. तो एकटेच अंथरुणावर पहुडला होता. रात्र बरीच झाली होती. त्याला झोप येत नव्हती. सारखी तो कुश बदलवीत होता. तसा त्याला विचार आला. ही नोकरी...... या नोकरीसाठी किती पापड बेलले. गावावरुन मी सायकलनं प्रवास केला. ते गाव की ज्या गावाला एकच मुख्य रस्ता जात होता. त्या रस्त्यावरून अनेक प्रवासाची साधनं जायची. त्यांना सायकल चालविणारी माणसं दिसायची. ती प्रवासाची साधनं चालविणारी सर्वच चालक मंडळी चांगली नसायची. काही वात्रट स्वभावाची असायची. जी तो सायकवर नोकरी स्थळी येत असतांना त्याला मारायची. कधी थंड पाणी त्याच्या उरावर फेकायची. कधी एखादं लहानसं खोडूक. त्यात जीव जायची पाळी असायची. कधी चित्र-विचित्र अपघात व्हायचे. जे अपघात पाहिले की गावाला सायकलनं जायची हिंमत होत नसे. वाटायचं की कधी एखाद्यावेळेस आपलाही असाच जीव जावू शकतो. नोकरी राहिल नोकरीच्या ठिकाणी. आपणच वर जावू व आपल्या आईला पाहणारं कुणी नसेल. तरीही हिंमत करुन गावाला जावं लागायचं व नोकरीसाठी त्रेधातिरपीट करावी लागायची. 
          आज ते दिवस गेले होते. त्यानं तो त्रास होवू नये म्हणून दोन कमऱ्याचं शहरात त्याच्या वडीलानं घेवून ठेवलेल्या जागेवर मकान बांधलं होतं. परंतु तेही त्याच्या पत्नीला पसंत न आल्यानं त्यानं किरायाचा कमरा घेतला होता. ते शेवटी विवाहासाठीच केलं होतं. परंतु पत्नी जवळ नसल्यानं त्यानं कमरा सोडायचा विचार केला व शेवटचं पत्नीला विचारलं. तू येणार आहे की नाही. तिनं जसं येण्याचं नाकारलं. तसा त्यानं कमरा सोडला व तो आपल्या स्वतःच्या घरी राहावरास आला होता.
          देव आपल्या घरी राहावयास आला होता. मात्र त्याचं पत्नीच्या माहेरी तिला मनविण्यासाठी जाणं सुरु होतं. तो नित्यनेमानं तिच्या माहेरी जात असे व अपमानीत होवून परत येत असे. तिच्या सदोदित धमक्याच असायच्या. पाहून घेईल. नोकरी कशी राहाते ते. खावटीतून अर्धा पगार वसूल करील.
           या साऱ्याच गोष्टी. तसा देव चिंतेतच असायचा. कारण तिच्या पोटात बाळ होतं. शिवाय तो दुसरा विवाहही करु शकत नव्हता. कारण हिंदू विवाह कायद्यानुसार एक पत्नी असतांना दुसरी पत्नी विवाह करुन घरी आणता येत नव्हती. नोकरी जाण्याची शाश्वती होती. शिवाय पोटात असणारं बाळ हा चिंतेचाच विषय होता. मात्र प्रारब्ध यावेळेस त्याच्या सोबत होतं. तसे तिच्या पोटातील बाळाला नऊ महिने झाले व ते गर्भाच्या बाहेर पडलं. 
           ते बाळ...... ते कसं वाढलं. कसं नाही. याची काळजी त्याला व तिला जरी असली तरी त्याची काळजी तिच्या परिवाराला नव्हती. परंतु जेव्हा नऊ महिने झाले होते व तिला रुग्णालयात भरती केलं गेलं. जिथं तिला प्रसवकळा सुरु झाल्या होत्या. तेव्हा तिला होणारा त्रास पाहून त्याला बोलावणं आलं. परंतु अचानकच आलेलं बोलावणं पाहून तो जावू शकला नाही. कारण कदाचीत काही कमीजास्त झाल्यास त्याचा दोष आपल्यावरच लागेल असं त्याला वाटलं. तसं दिसलंही. तद्नंतर ते बाळ मृत झाल्याचं कळलं.
          बाळ मृत झाल्याचं कळलं होतं. तसा तो रुग्णालयात दाखल झाला होता. त्यानं चौकशी केली. परंतु चौकशीअंती त्या बाळाच्या जन्माची व तिच्या रुग्णालयात दाखल झाल्याची नोंदही सापडली नाही. तशी रुग्णालय प्रशासनानं ती नोंद दाखवलीही नाही व अशाप्रकारे एक अध्याय संपला होता व देव थोडा निश्चींत झाला होता. 
           देव निश्चींत झाला होता. त्याचं कारण होतं बाळ. ते बाळ गर्भात असल्यानं तो चिंतेत असायचा सतत. तो तिला सोडू शकत नव्हता व तिही त्याला सोडून जावू शकत नव्हती. कदाचीत आपण मोकळे व्हायला हवे म्हणून ते बाळ कोणाला तिनं दत्तक दिलं असेल असंही त्याला वाटत होतं. परंतु त्याचं त्याला काही करायचं नव्हतं. शिवाय सासुरवाडीतील लोकं कसे वागले. हे त्याला वारंवार आठवू लागलं होतं. आपण खावटी वसूल करु. बाळाला भेटूच देणार नाही व बाळाचाही संपुर्ण खर्च मागू असे सासुरवाडीतील बोल होते. ज्यातून एक पर्याय मोकळा झाला होता. तसं पाहिल्यास आता सासुरवाडीशी त्याचं काही घेणंदेणं नव्हतं. ती परत यावी म्हणून त्यानं बरेच प्रयत्न केले होते व ते सर्व प्रयत्न विफल झाले होते. तरीही एक शेवटचा प्रयत्न करावा म्हणून तो परत सासुरवाडीत गेला. एक बिस्कीटचा पॉकेट नेला. शेवटी त्याहीवेळेस त्याचा अपमानच करण्यात आला. मग ठरवलं. आता तिचा आपण विचार करायचा नाही. आता काहीही होवो, आपण पत्नी करायची. लई झाले तिचे लाड आणि तिला मनवणं. आता बाळच नाही राहिलं तर तिची मनधरणी कशासाठी करावी. असाच विचार करुन त्यानं दुसरी पत्नी आणण्याविषयीचा विचार आपल्या मनात केला व ती मनातील इच्छा कार्यान्वीत करण्याच्या योजना ती आपल्या मनात करु लागली. हा जेव्हा मनात विचार होता. तेव्हा त्याला त्याची आई आठवत होती. आठवत होत्या त्या गतकाळातील वेदना. ती येण्यापुर्वीच्या खाल्लेल्या कच्च्या पोळ्या आणि कच्चा भात. अन् ती गेल्यानंतरही खाण्यात आलेला कच्चा भात व कच्च्या पोळ्या. त्याला त्याची आईही आठवत होती. आठवत होतं तिचं म्हातारपण. ज्या म्हातारपणाचं रुपांतरण आता बालपणात झालं होतं.  
           नशीबवान असतात त्या काळातील लोकं की जे सुखी असतात. म्हातारे झाले तरी त्यांची सेवा त्यांच्या स्नुषा करीत असतात. इथं तर देवच्या म्हाताऱ्या आईची सेवा करायचं सोडून त्याची पत्नी मंजू तिला वृद्धाश्रमात टाकायला लागली होती. तिला प्रचंड वेदना द्यायला लागली होती. 
            म्हातारपण, बालपण व तरुणपण..... खरंच रमणीय असावं. असं सर्वांनाच वाटत असतं. तसं पाहिल्यास तरुणपण व म्हातारपण हे प्रत्येकालाच येत असतं असं नाही. काहीजण काळाच्या ओघात लवकरच आपली पृथ्वीवरील जीवनयात्रा संपवून निघून जातात. त्यामुळं ज्यांच्या वाट्याला हे तरुणपण व म्हातारपण येत असतं, ते खरंच नशीबवान असतात. कारण तरुणपणातच व म्हातारपणातच खरं बालपण अनुभवायला मिळत असतं.
         बालपण....... काय असतं बालपण की ज्या बालपणात रमणीयता असते. आनंद असतो त्या बालपणात. तरीही कंटाळा येतोय त्याचा. वाटत असतं की आपण मोठे व्हायलाच हवे. कारण मोठे झाल्यावर कोणाची कटकट तर नाही ना राहणार. परंतु जसे आपण मोठे होतो. तशी जबाबदारी मागं येते व जबाबदारीची कटकट सोबतीला येते. मग वाटत असतं की आपलं बालपणच बरं होतं की ज्या बालपणात आपण मोकळे होतो. आईवडील रागावत होते तरी जबाबदारी नव्हती. ना पत्नीची कटकट असायची ना मुलाबाळाची. तसंच पत्नीवर्गांना वाटत असतं की आपल्याला बालपणात पतीची कटकट नव्हती ना मुलाबाळांची ना सासू सासऱ्यांची. हे तरुणपण असंच की कटकटींनी भरलेलं.
        ते तरुणपण व त्या तरुणपणातील ती दुःखदायक परिस्थिती. कधी वेदना अनुभावयास मिळतात. असं का होतं? त्याचं कारण आहे कर्म. बालपणात आपल्याला कळत नसल्यानं आपल्या हातून कळत न कळत चुका होतात. आपला खेळ सुरु असतांना काही प्राण्यांचे निष्पाप बळी जात असतात. जे चतूर पकडायला आपण जातो. त्याच्या शेपट्यांना धागे बांधतो. कधी सरड्यांना तंबाखूजन्य पदार्थ चारतो. कधी बेडकांना दगडं मारतो. कधी माकडांचा कळप हाकलतो. कधी काजव्यांना बाटलमध्ये बंदिस्त करतो. कधी रंगीत फुलपाखरु पकडतो. कधी विनाकारण मुंग्यांना मारतो. हा आपला खेळ असतो. परंतु यातून पाप घडत असते. ते आपल्याला कळत नसतं. त्याच आपल्या बालपणातील कर्माची शिक्षा आपल्याला तरुणपणात मिळत असते. ते तरुणपण आपलं अतिशय दयनीय व वेदनादायक स्वरुपात जात असते. तसंच म्हातारपणाचंही आहे. म्हातारपण हे याच बालपण आणि तरुणपणातील कर्मावर आधारीत आहे. तरुणपणात जर आपण आपल्या आईवडीलांना वृद्धाश्रमात टाकले तर आपल्याही म्हातारपणात आपली मुलं आपल्याला वृद्धाश्रमात टाकतीलच व आपल्या म्हातारपणातील नातवंडांसोबत खेळण्याचा विरंगुळा आपल्यापासून हिरावून घेतीलच. तसेच आपण आपल्या तरुणपणात कोणा लाचारांना त्रास दिला, तर त्याचीही शिक्षा ही आपल्याला म्हातारपणात भोगावीच लागते. जे म्हातारपण नरकयातनेपेक्षाही मोठं वाटते. महाभयंकर वेदनादायक. 
         ते तरुणपण व त्या तरुणपणात सतत येणारा तो बालपणाचा विचार. ते कुठंतरी विधाता ऐकतं व आपल्याला कालापकाल म्हातारपणात घेवून जातं व कर्म परत येतं यानुसार आपल्याला पुन्हा एकदा बालपण येतं व आपण बालपणातील क्लुप्त्या करु लागतो. तेव्हा लोकं म्हणतात की या म्हाताऱ्याला म्हातारचाळ लागली की काय, परंतु ती म्हातारचाळ नसते तर ते परत आलेलं बालपण असतं. ते म्हातारपण की त्या वयात आपण निवांत बसलेलो असतांना आठवत असतं बालपण व बालपणातील खेळलेले ते भातूकलीचे खेळ. ते चक्करबिल्ले, कंचे, नदीत पोहायला जाणे, भोवरे खेळणे, विटीदांडू खेळणे, टायर चालवणे, दंगामस्ती करणे, फुलपाखरु पकडणे, सरड्याला तंबाखू चारणे. बेडकाला खडे मारणे, माकडं पळवणे. इत्यादी साऱ्याच गोष्टी. त्याच गोष्टी आपण नातवंडासोबत शेअर करीत असतो. आपला नातू आला की आपली क्रिकेट सुरु होते. कधी कंचे तर कधी चक्करबिल्ले सुरु होतात. त्यातच काही गोष्टींनाही पेव फुटत असतं. मी जेव्हा लहान होतो ना, तेव्हा अमूक अमूक करीत होतो. असे सारेच फुशारकीचे बोल आपल्या नातवंडासमोर सुरु असतात. तसंच नातवंडासमोर आपल्याला खेळायला रमायला आवडतं. कारण आपलं बालपण परत आलेलं असतं.
          बालपण व म्हातारपण चांगलं मिळणं हे चांगल्या भाग्याचं लक्षण आहे. ज्याचं भाग्य चांगलं आहे व जो खरंच नशीबवान असतो, त्यालाच म्हातारपण व बालपण चांगलं मिळत असतं. सर्वांना बालपण व म्हातारपण चांगलं मिळत नाही. बालपण तर सर्वांनाच मिळत असतं ना. ठीक आहे, बालपण सर्वांनाच मिळत असतं. परंतु ज्यांचे मायबाप लहानपणीच मरण पावतात. त्यांच्या नशिबात कुठं येतं बालपण. बिचाऱ्यांना आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी बालपणातच कामं करावी लागतात. कधी बाप किंवा आई यापैकी एक मरण पावल्यास सावत्रपणाचा त्रास सहन करावा लागतो. ज्यातून बालपण हिरावलं जातं. कधी कचरा वेचत वेचत उकिरड्यावर जिंदगी काढावी लागते. अशावेळेस कुठं आले ते कंचे खेळणं, तो चक्करबिल्ला आणि ती टायरं चालवणं, ते क्रिकेट खेळणं आणि ते भोवरे खेळणं. कधी पोहायला जाणं वा भोवरे खेळणं. या साऱ्याच गोष्टी नसतात जीवनात. जेव्हा बालपण असतं व बालपणात आईवडीलांचा आधार नसतो. 
         बालपणाचा विचार केल्यास बालपण असं होवून जातं की ते संपावं असंच वाटतं, आईवडील नसले तर...... कधीकधी जरी एखाद्याचे आईवडील जीवंत असले तरीही बालपण संपावं असं वाटतं. कारण आईवडील सारखे आपल्या मागं अभ्यासाचा तकादा लावत असतात. वाटत असतं की मोठे झाल्यावर कोणीच आपल्या मागं असा तकादा लावणार नाहीत. कोणीच अमूक हे कर, तमूक हे कर. असं म्हणणार नाही. आपण आपल्या स्वतःच्या मनाचे मालक असणार. परंतु तसा विचार करणं चुकीचं होतं. हे तरुणपणातच कळतं. जेव्हा आईवडील हेच खरे आपल्या जीवनाचे शिल्पकार आणि आधारस्तंभ होते याची जाणीव आपल्याला होते. तेव्हा वाटतं की काश! रम्यच होतं ते बालपण.
         आनंदी व रमणीय बालपण. हे झालं बालपणाबाबत. तरुणपण आल्यावर जेव्हा बालपण आठवतं. तेव्हा हळूच आपल्याजवळ सरकत येतं म्हातारपण. ते केव्हा येतं हे साधं कळतही नाही. अन् जेव्हा म्हातारपण येतं. तेव्हा पुन्हा आपल्यावर म्हातारपणासारखीच बंधनं येतात. आपली मुलगी, आपला जावई, आपला मुलगा, आपली स्नुषा, सारखे आपल्यावर रागावत असतात. अमूक अमूक करु नका, अमूक खावू नका. अशी सारीच बंधनं. मग त्यांच्याच मनानं वागावं लागतं. त्यांचे सतत टोमणे ऐकावे लागतात. वाटत असतं की हे टोमणे ऐकण्याऐवजी मेलेलं बरं. परंतु अशा काळात मरणही येत नाही. अतिशय जीवघेणा त्रास होत असतो म्हातारपणात. परंतु तो सगळा सहन करावा लागतो. असं वाटत असतं की एकप्रकारे बालपणातील त्रास परवडला की त्या बालवयात सगळे लाड करायचे. परंतु म्हातारपणात कोणीच आपल्याला चांगले म्हणत नाहीत. सगळेच टोमणे मारतात व सगळेच रागावतात. आपण आपल्या मनाचे मालक नाहीत. आपली स्वतंत्रताही हिरावली गेली आहे.
          अलिकडील काळात जे बालपण म्हातारपणात येत असतं, ज्याला म्हातारचाळ म्हणतात. तेही हिरावलं गेलं आहे. म्हातारपणातील विरंगुळा संपलाच आहे. लोकं आपल्याला म्हाताऱ्यांची कटकट नको म्हणून त्यांना वृद्धाश्रमात टाकत आहेत. तसंच बालपणही संपलेलं आहे. बालपणात लहानपणी खेळले जाणारे खेळ आता दिसत नाहीत. आम्ही ते खेळ खेळतच नाही. शहरात तर नाहीच नाही. अन् एखाद्यावेळेस खेळतो जर म्हटलं तर त्याला गावंढळ अशी उपाधी मिळते. ग्रामीण भागातूनही हे खेळ हद्दपार झाले आहेत. आता ती लहानपणची बैलगाडी दिसत नाही. त्या तरोट्याच्या पेंढ्या दिसत नाहीत. ती आमची मैत्रीण दिसत नाही की जी आमच्यासोबत राहून बाहुला बाहुलीचे लग्नसोहळे करायला मदत करीत होती. ते नवरी नवरदेवाचे खेळ आता दिसत नाहीत. अलिकडील काळात त्या खऱ्या बाहुलाबाहुलीच्या विवाहावर नव्हे तर खोट्या आमच्या खेळावर बंदी आणली आहे. त्यातच पहिल्या पावसात भिजणं आता दिसत नाही. पावसात भिजल्यास आता आजारी पडायचा धोका असतो. शिवाय आता आमचं बालपण घराच्या चार भिंतीत कैद आहे. आमची जिंदगी मोबाइल पाहण्यात व टिव्ही पाहण्यात कैद आहे.
          म्हातारपण व बालपण या एकाच नाण्याच्या दोन बाजू. परंतु आज बालपणातील विरंगुळा जसा संपलेला आहे, तसंच संपलेलं आहे आता म्हातारपण. कारण म्हातारपणात आम्ही विचार करतो की आम्ही म्हातारपण आमच्या नातवंडासोबत काढू. परंतु तो आमचा विचार असतो. आमच्या लेकराचा नसतोच. ते आमची इच्छा नसतांना आम्हाला वृद्धाश्रमात टाकत असतात व आमच्या म्हातारपणातील विरंगुळा आमच्याजवळून जबरदस्तीनं हिरावून घेत असतात. विशेष सांगायचं झाल्यास ती मंडळी खरंच नशीबवान असतात की ज्यांना चांगलं बालपण लाभतं व त्या बालपणात त्यांचे लाड पुरवले जातात. ज्यांचे आईवडील जीवंत असतात. तसंच म्हातारपणाचंही आहे. ते म्हातारे खरंच नशीबवान असतात की ज्यांची लेकरं त्यांच्या शब्दाच्या बाहेर जात नाहीत. त्यांची सेवा करतात. अन् खासकरुन ते नशीबवान असतात की ज्यांची जोडीदार त्यांच्या उत्तर आयुष्यातही त्यांच्या सोबतीला असते. तो जोडीदार जीवंत असेल तर म्हातारपणही स्वर्गासारखंच रमणीय वाटत असतं आणि तो जोडीदार जर आपल्या म्हातारपणाच्या पुर्वीच सोडून गेला तर ते सर्व म्हातारपणातील जीवन दुःखदायक आणि कंटाळवाणं वाटतं. ज्याला नरकयातना म्हणतात. महत्वपूर्ण बाब ही की बालपण, तरुणपण आणि म्हातारपण, ह्या आपल्या आयुष्यातील घडामोडी. या घडामोडीत आनंद प्राप्त होणं वा ते जीवन आनंदात जाणं. या गोष्टी आपल्या कर्मावर आधारीत असतात. आपलं तरुणपणात कर्म चांगलं असेल तर आपल्याला चांगलं म्हातारपण मिळत असते. अन् बालपण हे पुर्वजन्मातील कर्मावर आधारीत असते. आपलं पुर्वजन्मात कर्म चांगलं असेल तर बालपण चांगलं जाते. म्हणून कर्मच चांगलं करावं. ज्यातून बालपण, तरुणपण व म्हातारपण चांगलं जाईल. त्याचा तिटकारा व तिरस्कार वाटणार नाही. तसंच ते संपूच नये असे वाटेल. तेच स्वर्गासारखं वाटेल. यात शंकाच नाही. 
          हे जरी खरं असलं तरी देवची पत्नी मंजू देवच्या आईच्या म्हातारपणाचा व बालपणाचा मनोरंजक काळ हिरावणारी होती. तिच्यामुळं देवच्या आईच्या म्हातारपणातील विरंगुळा संपला असता, जर देवनं तिचं ऐकलं असतं तर...... आज देवला ते सगळं आठवत होतं.
           पोटातील बाळ मरण पावल्याचं कळताच देव आपल्या पत्नीला भेटायला सासुरवाडीत गेला व अतिशय अपमानीत होवून तो परत आला. त्यानंतर त्यानं दुसरी पत्नी आणायचे ठरवले. परंतु त्यातही एक अट होती. दुसरी पत्नी आणतांना गाजावाजा नकोच. जर गाजावाजा झाला तर आपल्याला कैद होणार. मग आपल्या म्हाताऱ्या आईला जेवन बनवून कोण देणार. न्यायालय आणि पोलीस प्रशासन हे भावनेवर खेळत नाही. त्यांना कोणत्याच स्वरुपाची दयामाया नसते. कोणत्याही प्रकरणाची शहानिशा करण्यापुर्वीच ते अटक करतात. त्यानंतर तपास होतो. तपासाअंती दोषी न आढळून आल्यास आरोपीची सुटका होते. 
          देवची आई म्हातारी होती व तिला आता म्हातारपणानं स्वयंपाकही करता येत नव्हतं. त्यातच तिला आधार देणारं कोणीच नव्हतं. देवच्या बहिणी आपल्या घरी होत्या व त्यांनाही त्यांच्या आईबद्दल कोणतीच दया माया नव्हती. जणू त्यांचे वडील जाताच त्यांनी सावत्रआई असल्यागत आपल्याच स्वतःच्या आईला व आपल्याच सख्ख्या भावाला त्यांनी सावत्रपणाची वागणूक दिली होती. त्याच गोष्टीची चिंता देवला सतावत होती. ज्या गोष्टीचा फायदा त्याच्या पत्नीनं घेतला होता. अशातच त्याला वाटत होतं. विवाह करतांना एवढी मिजास का असावी. कारण जर तिला नांदायचे नव्हतेच तर तिनं आपल्या स्वतःच्या मायबापाचा व माझा पैसाही खर्च करायला नको होता. तिनं जाणूनबुजून सोडचिठ्ठीचा वाद निर्माण केला आहे. जो एकदम शेवटासच नेला आहे. शिवाय तिच्या वडिलांनी विवाह करतांना साऱ्याच तिच्या इच्छा पुरवल्या होत्या. जेवनात वेगवेगळे पदार्थ ठेवले होते. सभागृह केला होता. मंडप डेकोरेशन आणि सर्व प्रकारच्या गोष्टी केल्या होत्या. ज्याला भरपूरच खर्च आला होता. 
           विवाह हे साध्यापणानं करावेत. त्यात भपकेबाजपणा नकोच. शिवाय शक्य झाल्यास प्रेमविवाहाला पसंती द्यावी. राजमान्य विवाहाला नकोच. कारण अलिकडील काळात घटस्फोटाचे प्रमाण वाढत असल्याने असे केल्यास पश्चातापाची वेळ येत नाही.
          प्रेम....... सध्या प्रेमविवाह जास्त होवू लागले आहेत. त्याचं कारण आहे, हुंडा पद्धती व विवाहाला लागणारा अवाढव्य खर्च. शिवाय विवाह केल्यानंतरही तो विवाह टिकेलच, याची काही शाश्वती नसते. 
          मध्यंतरीचा काळ असाच आला होता. मिजासीपणाला जास्त महत्व आले होते. त्यातच मला एवढाच हुंडा हवा. मला अशीच मुलगी मिळावी. अशी मिजास वाढीस लागली होती. आता मुलींची संख्या कमी झाल्यानं मिजासीचे तेवढे महत्व वाटत नाही. शिवाय आता बऱ्याचशा विवाह प्रकारात मुलगा मुलगी चांगले निघाले तर ठीक. नाहीतर त्याची परियंती ही घटस्फोटापर्यंत होते. यामूळे सध्या विवाह करतांना मिजासपणा उतरलेला आहे. तरीही काही ठिकाणी हा मिजासपणा आजही सर्रासपणे सुरु आहे. ज्याला काहीच पर्याय नाही.
        विवाह..... अलिकडील काळात विवाह हा अतिशय खर्चाचा प्रकार झाला आहे. स्वतःचं अस्तित्व लोकांना चांगलं दिसावं. म्हणूनच वधूपिते आपल्या मुलीच्या विवाहात अतोनात खर्च करीत असतात. त्या खर्चात देवादेवी, हळद, अहेर, फोटोग्राफी, त्यात नवीनच आलेली ड्रोनफोटोग्राफी, विवाह स्थळी स्वर्ग बनवल्यागत धुक्याचे लोट. ज्यात नायट्रोजन हा विषारी वायू असतो. जो आपल्या शरीरावर आघात करतो. तशीच नायनोऱ्यात नवीनच आलेली फेस सिस्टम, डिजे, बँड, घोडा वा बग्गी, प्रवासासाठी गाड्या आणि विवाहासाठी भव्यदिव्य स्वरुपाचा सभागृह आणि अतिशय महत्वाचं असतं जेवन. 
         जेवन...... विवाहाचं जेवन म्हटलं तर साधंसुधं जेवन नसतंच. त्यात आता नवीन प्रकार समाविष्ट झाले आहेतच. ज्यात न्युडल्स, पाणीपुरी, आईस्क्रीम इत्यादी पदार्थ असतात. हे जर पदार्थ विवाहात असतील, तर तो श्रीमंतांचा विवाह वाटतो. तसं पाहिल्यास आता विवाह करतांना तो विवाह गरिबांचा की धनिकांचा, हे ओळखूच येत नाही. गरीबही तेवढ्याच ताकतीनं विवाह सोहळा साजरा करतो. प्रसंगी कर्ज काढतो आणि ते कर्ज फेडत बसतो साल न साल. कारण अलिकडील काळात विवाह, तोही अतिभव्य स्वरुपाचा विवाह करण्याची स्पर्धाच लागलेली आहे. 
          विवाह करतांना विवाहात अतिभव्यदिव्य स्वरुपाचे पदार्थ असतात. त्यातील एक एक लहान लहान स्वरुपाचे पदार्थ खाल्ले तरीही पोट भरतं. त्या सर्व पदार्थाची चव पाहाणं होत नाही. एवढे पदार्थ असतात. सर्वसामान्य विवाह सोहळ्यात पानीपुरी, न्युडल्स, भेळ, मंच्युरियन, आईस्क्रीम हे पदार्थ असतात. काही ठिकाणी डोषेही आणि कटलेटही असतात, तर काही ठिकाणी रसमलाई व रसगुल्लेही असतात. काही ठिखाणी गुलाबजामून व दिलजनी असते. तर काही ठिकाणी आलुबोंडे व मिरचीभजेही असतात. यातही जेवन वेगळंच असते. जेवनातही पुरी, भाजी, रानण्या रोट्या, रुमालरोट्या, बेसन भाकर, भात, वरण, मट्टा वा कढी, भात इत्यादी पदार्थ असतात. भाज्यातही विविध प्रकारच्या भाज्या असतात. बैंगन आलू, पनीर, बेसन वडी, काही ठिकाणी मांसालाही प्राधान्य असते. पोळ्यामध्येही विविध प्रकार असतात. रुमाल पोळी, साधी पोळी, साधी पुरी, पालक पुरी, इत्यादी. भातातही दोन चार प्रकारचे प्रकार असतात. बिर्याणी भात, पुलाव भात, साधा भात, मसाला भात इत्यादी. त्यातच असे बरेच पदार्थ. जे खातांना वऱ्हाडी लोकांना मजा येते. तरीही काही लोकं जेवन चांगलं बनलं नव्हतं. असा गवगवा करुन बाहेर पडतात. साधे पदार्थ असतील तर खाणाऱ्यांची कुरकूर जास्त असते. त्यांना वाटत असते की वधुपिता हा एवढा श्रीमंत असून आपल्या मुलांचा विवाह हा भिकाऱ्यासारखा केला. आता विवाहपित्याच्या दिव्याखालचा अंधार हा विवाहपित्यालाच माहीत असतो. तो कसातरी आपल्या मुलांचा विवाहसोहळा साजरा करतो, ज्यात त्याची कंबर वाकलेली असते. परंतु खोट्या दिखाव्याच्या भरवशावर तो उभा असतो. त्यातही कोणी जर त्याला नावबोटं ठेवली की बस. सारं संपतं. अन् या सर्व गोष्टी करुन पालथ्या घड्यावर पाणी तेव्हा पडतं, जेव्हा विवाह झाल्यानंतर पतीपत्नीचं पटत नाही व घटस्फोट होतं. ज्यात संसारात रमतांना वधूचा दोष असला तरी ती संपुर्ण दोष वराचा दाखवते व वराचा जरी दोष असला तरी संपुर्ण दोष तो वधूचा दाखवतो. 
         घटस्फोट..... या घटस्फोट प्रक्रियेत मुलगा व मुलगी, त्या दोघांनाही संसार कसा व्यवस्थीत करावा वा चालवावा. याबाबतीत कोणीही समजावून सांगत नाहीत. उलट एखाद्या वकिलाचा सल्ला घेतल्यास तो त्यात तेलमीठ लावतो व आपला स्वार्थ साधत आपण असे करु, तसे करु याची बतावणी करतो. ज्यातून न्यायालयात खटला दाखल होतो व त्या खटल्यातून ते अशा ठिकाणी पोहोचतात की ज्या ठिकाणी ते अख्खा, कितीतरी रुपये लावून तयार केलेला अल्बम फाडून फेकतात वा त्याला जाळून टाकतात.
          विवाहाचा खर्च..... त्या विवाहाच्या खर्च एकंदरीत मोजमाप केल्यास कितीतरी रुपयाचा खर्च येत असतो. तो खर्च लाखोच्या घरात येतो. अन् जेव्हा विवाह तुटतो, तेव्हा त्या खर्चाचा काहीच उपयोग नसतो. शिवाय विवाह तोडायचा झाल्यास अलिकडील काळात मुलीचा जरी गुन्हा असेल तरी तो गृहित न धरता तिला खावटी म्हणून एवढी मोठी रक्कम मिळते की तिच्या विवाहाचा खर्च निघतो. परंतु पुरुषांचं काय? त्यांचा विवाहाचा खर्च तर जातो. शिवाय घटस्फोट झाल्यास त्यानंतरही खावटीचा खर्च भरुन द्यावा लागतो. काही ठिकाणी हुंडाही द्यावा लागतो. त्यातच सोनेनाणे आणि नवरी वा नवरदेवांचे कपडे करावे लागतात. त्यालाही पैसे लागतातच. शिवाय अहेरामध्ये नातेवाईकांनाही कपडे घ्यावे लागतात. 
          विवाह सोहळ्यात खर्च हा विपूल प्रमाणात लागत असतो. शिवाय घटस्फोट झाल्यास त्यानंतरही वरपित्याला खर्च येत असतो. अन् घटस्फोट झाल्यास केलेल्या खर्चाचा काही उपयोग नसतो. हीच बाब लक्षात घेवून अलिकडील काळात प्रेमविवाह वाढत आहेत. कारण प्रेमविवाहात एवढा खर्च लागत नाही. ना बँड करावा लागत, ना घोडा करावा लागत. ना कुणाला कपडे घ्यावे लागत, ना स्वतःचे कपडे घ्यावे लागत. जेवनालाही खर्चच नसतोच. ना हुंडा द्यावा लागत. ना फोटोग्राफी करावी लागत. त्यातही पुढं जावून घटस्फोट झालाच तर फोटोचा अल्बम जाळावा लागत नाही. महत्वपूर्ण बाब ही की असा प्रेमविवाह केल्यास पश्चातापाची वेळ येत नाही. कारण भरपूर खर्च वाचतो. परंतु ज्या विवाहात मान्यता असते. असा विवाह केल्यास आणि तो तुटल्यास पश्चातापाची वेळ येते. त्यानंतर व्यक्ती एवढा तुटतो की त्याची मिजास जाते व त्यानंतर कशीही मुलगी का मिळेना, ती मुलगी तो स्विकार करीत असतो. मुलगीही अगदी तसंच करीत असते.
           विवाह हे होतच राहणार. परंतु विवाह पित्यांना सांगायचं झाल्यास अशी मिजास आपण का करावी की ज्यातून पुढं पश्चातापाची आपल्यावर वेळ येईल. आपल्या मुलांचा विवाह झाल्यानंतर पटू शकणार नाही. घटस्फोट होईल, त्यापेक्षा साध्या पद्धतीनं विवाह करायला काय हरकत आहे. दाखवू द्या ना त्यांना, त्यांच्या मुलांच्या विवाहात भपकेबाजपणा. कारण त्यांच्याजवळ भरपूर पैसा आहे व तो नितळत्या घामाचा नाही की ज्यातून त्यांना पश्चाताप होईल. तो पैसा कुठंतरी भष्टाचार करुन आलेला असेल हे लक्षात घ्यावे. तसा पैसा आपल्याजवळ आलेला नाही. मग बस, पुरे झालं म्हणत दिशा ठरवा. होत असेल तर प्रेमविवाहाला सहमती द्या. आज खरं सांगायचं झाल्यास प्रेमविवाह टिकू लागले आहेत, जर आपली सहमती असेल तर. ज्यात जास्त पैसाही लागत नाही आणि तेवढाच घटस्फोटही होत नाही. तसा मान्यता पावलेला व जातीचा असलेला विवाह टिकत नाही. म्हणूनच विवाह करतांना जास्त दिखावा करुन विवाह करु नये. कारण आपण विवाह कितीही चांगला केला, विवाहात कितीही खर्च केला, कितीही जेवनात जिन्नस ठेवले, कितीही विवाहात प्रकार वापरले, तरी त्याला नावबोटं ठेवणारे भरपूर आहेत. त्यातच घटस्फोट झाल्यास आपली अवस्था ना रहेगा बॉस ना बजेगी बासरी अशी होते. ती होवू नये म्हणून विवाह हा साध्या प्रकाराने करावा. त्यात भपकेबाजपणा नकोच.
           देवचे आधीचे विचार होते जातीतच विवाह केलेला बरा. त्यामुळंच त्यानं जात निवडली होती व जातीतच त्यानं विवाह केला होता. त्याच्यासमोर कित्येक आंतरजातीय विवाहाच्या संध्या आल्या होत्या. परंतु त्या संध्या त्यानं धुडकावून लावल्या होत्या. कारण त्याला जातीतच विवाह करायचा होता. जात महत्वपूर्ण होती. वाटत होतं की जातीतच सन्मान मिळतो व जातीत विवाह केल्यास जात आपल्याला वाळीत टाकत नाही. 
           हाच जातीचा देवनं केलेला विचार. मंजू जातीतीलच मुलगी होती की जिच्याशी त्यानं विवाह केला होता. तसं पाहिल्यास तिच्या पोटातील बाळ मरण पावलं होतं व त्यातच त्यानं दुसऱ्या विवाहाची योजना आखली होती. त्याचं कारण होतं, त्याची होणारी आबाळ. शाळा व घर सांभाळतांना त्याची त्रेधातिरपीटच उडत होती. 
           देवनं दुसरा विवाह करायचे ठरवले होते. त्यातच त्यानं मुली पाहाणं सुरु केलं होतं. तसा तो आजही निर्व्यसनी होता. काही समाजकंटक त्याला व्यसन कर म्हणत होते. म्हणत होते की व्यसन केल्यानं सारं दुःख विसरतं. परंतु त्यावर तोही विचार करायचा. विचार करायचा की व्यसन केल्यानंतर अंगात नशा असेल, तेव्हापर्यंत काही वाटणार नाही. परंतु जर नशा उतरलीच तर तेच हाल होतील जीवांचे. तसा त्यानं एकदोन दिवस प्रयोगही करुन पाहिला. परंतु त्यानं जो व्यसनाबाबत विचार केला होता. ते सत्य होतं. जोपर्यंत अंगात नशा असायची, तोपर्यंत बरं वाटायचं. अंगातील नशा जशी उतरली, तसं देवला कसेतरीच वाटायचे. त्यातच डोकं दुखण्यासारख्या व्याधी दिसायच्या. शेवटी ठरवलं, काहीही झालं तरी चालेल, परंतु नशा अजिबात करायची नाही. 
           देवनं जातीतच विवाह करायचा, असं ठरवताच त्यानं मुली शोधणं सुरु केल्या. परंतु त्याला मुली तरी कशा मिळतील? दोष त्याचा जरी नसला तरी त्याला विवाहाचा एकप्रकारे डागच लागला होता. लोकं म्हणायचे की टाळी एका हातानं वाजत नाही. काही ना काही त्याचा दोष असेलच. शिकलेल्या मुली तर नकारच देत होत्या त्याला. शेवटी उपाय उरला नाही व त्यानं प्रेम करायचं ठरवलं. तशी त्याला पुन्हा जातीतीलच मुलगी हवी होती. परंतु ती न मिळाल्यानं प्रेम करुन दुसऱ्याच जातीची मुलगी मिळविण्यासाठी त्यानं प्रयत्न सुरु केले होते. अशातच त्याला एक मुलगी मिळाली. जिला आई नव्हती. जिची आई बालपणातच मरण पावली होती. जिला वडील होते व तेही आजारी होते. जिला भाऊ होता. पण तोही आपल्या पत्नीसोबत घरदार सोडून वेगळी पोळी भाजण्यासाठी निघून गेला होता. तो स्वतःचं घर सोडून आपलं सुख पाहण्यासाठी वेगळ्याच ठिकाणी राहायला गेला होता. जिला बहिण होती. परंतु ती बहिणही वेगळीच चूल मांडण्यासाठी विवाह करुन मोकळी झाली होती. जिला नातेवाईक होते. परंतु ते नातेवाईकही त्यांना जवळ करीत नव्हते. अशातच देवचा प्रवेश तिच्या आयुष्यात झाला व ती देवला चाहायला लागली होती.
            तिचं नाव करुणा. करुणाच्या घरी देव नित्यनेमानं जावू लागला होता. तिच्या सुखदुःखात तो सहभागी होवू लागला होता. तिच्या वडिलांना पैसा लावू लागला होता. तिलाही मदत म्हणून पैसा देवू लागला होता. तिचं आजारपण व तिला होणाऱ्या दुःखदायक वेदना जोपासू लागला होता. तिही त्याच्या दुःखात सहभागी होवू लागली होती. तसं तिचं वय वाढलं होतं. तिचा विवाहही झालेला नव्हता. विवाह तरी ती कोणाशी करणार. आजपर्यंत तिच्याशी विवाह करण्यासाठी तिच्याकडे कोणीच फिरकला नव्हता. स्वार्थी काळ होता. विवाहासाठी लोकांना मुली हव्या होत्या. परंतु मुलगा असतांना त्यांचे मायबाप लोकांना हवे नव्हते. करुणाच्याही आयुष्यात तेच होतं. बहिण व भाऊ आपल्या वडिलांची सेवा न करता वेगळी पोळी शेकत होते. ते घराकडे ढुंकूनही पाहात नव्हते. अशातच देवचा प्रवेश, तिच्या आयुष्याला वेगळं वळण देणारं ठरलं. ज्यात तिला दुःख असलं तरी त्यात आनंद वाटत होता. देव तिच्या भावना जोपासत असे व तिच्या दुःखात वेळोवेळी धावून जात असे.
          करुणानंही त्याच्या भावना जोपासल्या होत्या. ती त्याला हिंमत देत त्याला असलेलं मंजूचं दुःख विसरायला मदत करीत होती. मंजूनं आपल्या वागण्यातून त्याच्या अंतर्मनात तीव्र घाव केला होता. ती जखम चिघळतच चालली होती. अशातच करुणानं त्या जखमेवर मीठ न चोळता मलम लावण्याचं काम केलं होतं. 
          करुणा त्याचेशी बोलत होती. ती त्याला आवडू लागली होती. परंतु आपण तिला आवडतो की नाही? हा प्रश्न त्याच्या मनात होता. तसं पाहिल्यास तोही तिला आवडू लागला होता. परंतु आपण त्याला आवडतो की नाही? हाच प्रश्न तिच्यादेखील मनात होता. त्याला तिच्याशी विवाह करायचा होता. परंतु विचारायचं कसं? हाही दुसरा प्रश्न होता. कारण ती डाग लागलेली मुलगी नव्हती की जिचा विवाह झाला होता. शेवटी हिंमत करुन तो संधी शोधू लागला. ती तिला विवाहाबद्दल विचारायची संधी होती. तशातच एक दिवस संधी साधून देवनं मोठी हिंमत करुन तिला विचारलं. 
         "माझ्याशी विवाह करशील?"
          तो त्याचा प्रश्न. अचानक त्याच्या तोंडातून आलेला प्रश्न. तिही त्याच प्रश्नाची संधी पाहात होती. तसा तो प्रश्न हिंमत करुन त्यानं तोंडातून काढला होता.
           तिनं तो प्रश्न ऐकला. ती अवाक झाली. क्षणभर चूप राहिली. त्यावर काय बोलावं. काय प्रतिक्रिया द्यावी हे काही तिला सूचत नव्हतं. तसा तो म्हणाला,
          "जर तुला विवाह करायचा नसेल, तर स्पष्ट सांगून दे. रागावू नकोस. मी सहज विचारलं."
          ते त्याचं परत बोलणं. त्यावर ती म्हणाली,
          "नाही."
          तिचं ते उत्तर. त्यावर त्याचा चेहरा पडला. ते तिनं तिच्या चाणाक्ष नजरेनं टिपलं. त्यावर तो काहीच बोलला नाही. त्याला फारच वाईट वाटलं. आता आपण उद्यापासून थोडा संपर्क कमी करु असंही त्याला वाटलं. तसा तो काहीवेळ थांबला व निरोप घेवून तो परत आपल्या घरी आला.
           तिचा तो नकार. तो घरी येताच तो विचार करु लागला. करुणा आपल्याला कशी होकार देणार. ती डाग न लागलेली मुलगी. शिवाय आपली सोडचिठ्ठी झालेली नाही. मग आपण का बरं निराश व्हायचे? आपण नवं जीवन सुरु करायचं. तिची आठवण विसरायला हवी. कारण तिच्यावर आपलं प्रेम निर्माण झालेलं. आपण उद्यापासून तिच्या घरी जायचं नाही. कारण आपलं प्रेम वाढत जाणार. परंतु ते एकतर्फी असणार. या एकतर्फी प्रेमाचा फायदा काय? जर तिचंही आपल्यावर प्रेम असतं तर तिनं नक्कीच होकार दिला असता.
           तो त्याचा विचार. त्या दिवसापासून त्यानं तिच्या घरी जाणं बंद केलं. तशी तिला त्याची आठवण येऊ लागली होती. त्यालाही तिची आठवण येतच होती. ती तो मनात दाबत होता. तिही मनात दाबतच होती. असेच पुरते आठ दिवस निघून गेले.
           आठ दिवस झाले होते. तिला त्याची आठवण येत होती. त्यालाही येतच होती तिची आठवण. शेवटी आठ दिवसानंतर ती त्याला भेटली. म्हणाली,
            "तू आठ दिवस झाले, घरी आला नाही. काय झालं?" 
            "सहजच." त्यानं तिच्या बोलण्यावर उत्तर दिलं. तशी ती म्हणाली,
           "राग आला काय माझ्या बोलण्याचा?"
           "कोणतं बोलणं?"
           "मी नकार दिला तो." 
           "नाही, नाही."
           "मग येणं बंद केलं ना."
           "होय."
           "कारण काय?"
          "मी जर असाच वारंवार येत गेलो तर माझ्या मनात तुझ्याबद्दल प्रेम निर्माण होईल. जे एकतर्फी प्रेम असेल. अन् आता तसं प्रेम करणं बरोबर नाही." त्यानं अगदी स्पष्ट स्पष्ट सांगून टाकलं. तशी ती म्हणाली,
           "तुझं प्रेम आहे का माझ्यावर?"
           "होय."
           "मनापासून प्रेम करतोय का तू माझ्यावर?"
           "होय."
          "तुला माझे वडील आजारी आहेत हे माहीत असूनही."
             "होय, माहीत आहे ते मला."
            "हे बघ, मी माझ्या वडिलांना सोडू शकत नाही हे माहीत आहे का तुला."
             "होय, तेही माहीत आहे मला."
             "तरीही तू माझ्याशी विवाह करायचं म्हणतोस?"
             "त्यात काय?"
             "माझ्या वडिलांना सांभाळून घेशील?"
             "त्यात काय एवढं."
             "तर मग ठीक आहे. मी तुझ्याशी विवाह करायला तयार आहे. परंतु माझी एक अट आहे."
            अट...... कोणती अट असेल आणखी हिची. त्याला आश्चर्य वाटलं. वाटलं की आणखी हिची कोणती अट असेल की जी अट तिनं टाकलेली आहे. तसा न राहवून तो म्हणाला.
             "अट? कोणती अट आहे आणखी?"
              "माझी एक अट आहे. तू विवाहाबद्दल माझ्या वडिलांना विचारावं."
            "एवढंच ना. ठीक आहे. मी विचारणार तुझ्या वडिलांना. आता तर झालं."
            "ठीक आहे. ये घरी." ती म्हणाली व चालती झाली.
           ती घरी गेली. त्यानंतर तो बरेचवेळेस तिच्या घरी गेला. परंतु त्याची तशी तिच्या व त्याच्या विवाहाविषयी तिच्या वडिलांना विचारायची हिंमत त्याला झाली नाही. तसे बरेच दिवस झाले. तसा तो एक दिवस उजळला. ज्या दिवशी त्यानं तिच्या वडिलांना सहजपणे विचारुन टाकलं होतं. 
            ते पावसाळ्याचे दिवस होते व ठरल्याप्रमाणे तो तिच्या घरी गेला होता. बाहेर पाऊस जोरात सुरु होता. रात्र झाली होती. तिचे वडील बाहेर गेले होते. ते आजारपणातून सवरले होते. विजाही कडाडत होत्या. ती घरी एकटीच होती व ती थोडं त्याला थांबवत होती. तसा तो म्हणाला,
          "काश! आपण विवाह केला असता तर..... मी घरी गेलोच नसतो. इथेच पहुडलो असतो. परंतु काय करु. आता इथं तसा झोपू शकत नाही. कारण आता त्यावर उपाय नाही. तूच विचार ना आपल्या वडिलांना. माझी हिंमत होत नाही."
            ते त्याचे बोल. त्यावर ती म्हणाली,
           "विवाह करायचाय ना. मग तुलाच हिंमत करावी लागेल. मी विचारलं तरी त्याचा काहीच फायदा नाही. मी एक स्री आहे व या काळात स्रियांना काही निर्णय घ्यायची उजागिरी नसते."
           "मग तुझ्या बहिणीनं कसा घेतला स्वतःच निर्णय?"
           "तिचं जावू दे. परंतु मी तिच्यासारखी नाही. मी वेगळ्या स्वभावाची आहे. म्हणूनच तू विचार."
           "ठीक आहे. आजच विचारुन टाकतो." ते त्यानं तिच्याजवळ बोललेले बोल. त्यानंतर थोड्याच वेळात तिचे वडील आले. ते भिजलेच होते. 
            तिचे वडील घरी आले. त्यांनी हातपाय धुतले. तसे ते खुर्चीवर बसले. तशी ती आत गेली व संधी साधून देव तिच्या वडिलासोबत गोष्टी करु लागला.
           "मी घरी थांबलो नसतो. परंतु विजा चमकत होत्या. ती घाबरत होती. तिनंच मला थांबायला लावलं. म्हणूनच मी थांबलो." ते त्याचं बोलणं. त्यावर प्रतिसाद न देता तिचे वडील चूप बसले. तोच काही वेळ गेला. तशी हिंमत करुन तो म्हणाला,
           "एक गोष्ट बोलू का तुमच्यासोबत? रागावणार नाही तर बोलतो."
            "बोला."
            "माझ्याशी विवाह करुन टाका तिचा." ते त्यानं स्पष्टपणे बोलून टाकलं आणि तो प्रतिक्रियेची वाट पाहू लागला. तोच ते म्हणाले,
            "तिचा विवाह जुळलेला आहे." असं बोलून ते चूप झाले.
             देवनं ते ऐकलं व तोही चूप झाला होता. तो तरी काय बोलणार होता. त्याला स्पष्ट उत्तर मिळालं होतं. त्या बोलण्यावर उत्तर न देता अगदी क्षणभरातच तो आपल्या घरी भर पावसात रवाना झाला होता.
            दोन तीन दिवस झाले होते. पुन्हा तीच स्थिती देवच्यासमोर निर्माण झाली होती. तो विचार करु लागला होता की तिचा विवाह कोणाशी जुळलेला असेल. अन् विवाह जर जुळलेला आहे तर ते त्याला आपल्या घरी का बरं येवू देतात. कदाचीत ते खोटं बोलले असतील किंवा त्यांनी वेळ मारुन नेली असेल. तसं ते तिलाच विचारुन पाहावं. तशी त्यानं तिची भेट घ्यायचा विचार केला व दोन तीन दिवसानंतर तो तिला भेटायला गेला. विचारलं,
             "तुझा विवाह जुळलेला आहे काय?"
             "नाही."
             "मग तुझे बाबा कसे म्हणाले."
             "काय म्हणाले?"
             "म्हणाले की तुझा विवाह जुळलेला आहे."
             "माझा विवाहच जुळलेलाच नाही."
             "मग?"
             माझ्या आतेभावानं मागणी घातली आहे बरेच दिवसांपासून. म्हणतो की तिला सरकारी नोकरी लागल्यावर तो विवाह करेल."
            "अन् नाही लागली तर?"
            "तर माहीत नाही."
            "आता तूच विचार आपल्या वडिलांना. आता मी नाही विचारत."
             "एक उपाय सुचवू का यावर?"
             "काय आहे उपाय?"
             "जर ही गोष्ट माझ्या वडिलांच्या मित्राला सांगितली आणि माझ्या वडिलाच्या मित्रांकडून त्यांना विवाहासाठी तयार केलं तर......"
             "तसं करता येईल?"
             "प्रयत्न करायला काय हरकत आहे."
             "परंतु तुझी माझ्याशी विवाह करायची इच्छा आहे काय?"
            "माझे वडील तयार झाले तर...... नाही तर नाही."
            "ठीक आहे. असे जर आहे तर विचारतोच."
             देवनं सर्व प्रयत्न केले व त्यानं तिच्या वडिलांना विवाहासाठी तयार केलं. आता आला होता पैशाचा प्रश्न. तसा तो तिच्याशी राजरोषपणे विवाह करु शकत नव्हता. शेवटी तिचे वडील तयार झाल्यानंतर त्यानं तिला एका मंदिरात नेलं. त्यानं गांधर्व विवाह केला व म्हणाला की माझी जेव्हा केव्हा सोडचिठ्ठी होईल, तेव्हा राजरोषपणे तो थाटामाटात तिच्याशी विवाह करेल. तेव्हापर्यंत तिनं चूप राहावं.
         तिनं त्याचेशी कलियुगात गांधर्व विवाह केला होता. ती चूप होती. कधीकधी ती निराश होत असे व त्याला राजरोषपणे विवाह करण्याविषयी म्हणत असे. परंतु त्यानं आजपर्यंत तिच्याशी राजरोषपणे विवाह केला नव्हता. त्याचं कारण होतं, त्याची कायद्यानुसार सोडचिठ्ठी न होणं आणि राजरोषपणे विवाह करुन नोकरी न गमावणं. त्याला वाटत होतं की नोकरी आहे म्हणून पैसा आहे व पैसा आहे म्हणून सर्वकाही आहे. त्यावरुनच त्याचे कधी तिच्याशी वादही होत होते. परंतु तो आजही आपल्या पहिल्या पत्नीच्या बंधनातून मुक्त झाला नव्हता. हिंदू विवाह कायद्यानुसार त्याला आजही घटस्फोट न झाल्यानं दुसरा विवाह राजरोषपणे करण्यापासून बंधन टाकलं होतं.
           मंजूनही आपले आतापर्यंत चार पाच विवाह करुन टाकले होते. तिचं विवाह केल्यानंतर तिच्या स्वभावगुणामुळं एकाही व्यक्तीशी पटलं देखील नाही व पुरावे नसल्यानं कोणत्याही तिच्या पतीवर्गांना तिला जाब विचारता आला नाही. ती मोकळी सूटतच राहिली व सर्वांना फसवतच राहिली होती. शिवाय तिच्याशी विवाह करणाऱ्या पुरुषांनाही हिंदू विवाह कायद्यानुसार दुसरी पत्नी राजरोषपणानं करता येवू शकले नाही. त्यांना विवाह करतांनाही आपलीच नाही तर आपल्यासोबत राहणाऱ्या मुलींच्याही विवाहाच्या इच्छा पुर्ण करता आल्या नाहीत. मंजूसारख्या अशा कितीतरी महिला होत्या की त्यांच्यामुळं कितीतरी देव नावाच्या पुरुषवर्गाच्या भावनांची कत्तलच होत राहिली. कारण न्यायालयात दाद मागतो म्हटल्यास वेळ आणि खर्चीक बाब असायची. जी देवला पटत नव्हती.
           देव न्यायालयात गेला नाही. त्याचं कारण तेच होतं. न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यावर त्यात भरपूर वेळ लागणार होता. शिवाय खावटी म्हणून त्याला भरपूर रक्कम तिला द्यावी लागली असती. देवनं आपल्या दुसऱ्या पत्नीला खऱ्या पत्नीचा दर्जा दिला. जो समाजाला मान्य नव्हता व समाजानं त्या गोष्टीला स्विकारलंही नव्हतं. मंजूशी विवाह हा जणू त्याच्या आयुष्यातील घडलेला एक अपघातच होता.
         समाजात असे कितीतरी लोकं होते की त्यांच्या पत्नी त्यांच्याजवळ राहात नव्हत्या. त्या माहेरी राहायच्या. विवाहबाह्य संबंध ठेवायच्या. कधी दुसरा विवाह करुन मोकळ्या व्हायच्या. त्यांच्या विवाहाचे पुरावेही सापडायचेच नाहीत. कायद्यानुसार फारकत घ्यायच्याच नाहीत त्या. खावटीही जबरन वसूल करायच्या. अन् असे कितीतरी पुरुष होते की जे आपल्या पत्नीच्या अशाच प्रकारच्या वागण्यानं त्रस्त होते. त्या पत्नी स्वतः गांधर्व विवाह करायच्या. पुरावे सोडत नसत. परंतु पुरुष तसा गांधर्व विवाहही करु शकत नव्हते. कारण होतं, पुरुषार्थ आणि पुरुष असल्याचा गुन्हा. पुरुषसत्ताक कुटूंब पद्धती. जी नावापुरतीच होती.