आठवणीतले लंच Pralhad K Dudhal द्वारा जीवनी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आठवणीतले लंच

आठवणीतलं लंच...   

ही गोष्ट साधारणपणे  1998 सालातली आहे ,त्या काळी मी पुण्यातल्या वाकड सांगवी विभागात कार्यरत होतो.या भागात त्यावेळी मुख्यत्वे हिंजवडीत मोठ्या मोठ्या आयटी कंपन्या उभारल्या जात होत्या आणि त्या काळी टेलिकॉम  क्षेत्रात आमच्या  खात्याची मोनोपॉली होती,त्यामुळे अर्थातच या नव्याने विकसित होत असलेल्या भागात आमच्या टेलिकॉम विभागाच्या नेटवर्क उभारणीचे कामही तेवढ्याच वेगाने चालू होते.   

मोठ्या प्रमाणात  बाहेर  कामे  चालू  होती त्यामुळे दिवसातले दहा दहा तास कामाच्या सुपरवाईझरी निमित्ताने आमची खूप भटकंती व्हायची

    आठवड्यात एखाद्या दिवशी आम्ही त्या भागात नव्याने सुरू झालेल्या एखाद्या ढाब्यावर श्रमपरिहारासाठी जायचो.   

    कधी कधी खात्याच्या गाडीतून आम्ही सहासात जण लंचसाठीही अशा ठिकाणी जायचो.

  हवाई दलातून रिटायर होऊन एक्स-सर्व्हीसमन कोट्यातून आमच्या खात्यात लागलेला एक व्यक्ती- माळवे, ड्रायव्हर म्हणून त्यावेळी आमच्या गाडीवर नेमलेला होता.     

  उत्तम पर्सनॅलिटी  आणि  टापटीप  राहणीमान यामुळे कुठेही साईटवर जाताना आम्हा अधिकाऱ्यांपेक्षा या ड्रायव्हरचा खूप रुबाब  असायचा.

  कधी कधी त्याचा अती उत्साहापोटी केलेला आगाऊपणा आम्हाला खूपच त्रासदायक व्हायचा...     

  ‘जेवायला कोणत्या ढाब्यावर जायचं ,तिथे कोणती डिश चांगली मिळते,ड्रिंक्स कोणते कोणते मिळतात,सर्व्हिस कशी आहे..‘ इत्यादी गोष्टीची इथंभूत माहिती या महाशयांकडे असायची, शिवाय तिथे गेल्यावर तो ढाबामालकावर असे काही इंप्रेशन टाकायचा की वेटर जे  काही विचारायचे  ते त्यालाच विचारायचे!      

आम्हाला आता  त्याचा तो सतत चालू असलेला आगाऊपणा सवयीचा झालेला होता..   

  एकदा मात्र त्याचा हा आगाऊपणा त्याला आणि  पर्यायाने आम्हालाही चांगलाच नडला होता!   

    त्याचं काय झालं की एकदा आम्ही खात्याच्या गाडीतून माळवेने सुचवलेल्या हायवेवरच्या रानमळा (की काय) नावाच्या ढाब्यावर लंचसाठी गेलो..   

 दुपारचे दोन सव्वादोन झाले असतील...तिथे गेल्यावर नेहमीप्रमाणे सगळी सूत्रे माळवेने स्वतःकडे घेतली. तो तिथल्या मालकाशी एकदम सलगीने बोलत ऑर्डर्स देत होता...त्याच्या आवाजात तशीही एक्स सर्व्हीसमनची झलक असायचीच...   

    आमच्या त्या गृपमध्ये आम्ही दोनजण सोडले तर बाकीचे सगळे ड्रिंक्स घ्यायचे.     

  त्या दिवशी माळवेने ऑर्डर दिलेली  ड्रिंक्स आली  आणि त्या चार जणांचा प्यायचा कार्यक्रम सुरू झाला...   आम्ही दोघे टाईमपास करत समोरच्या प्लेटमधून मसाला पापडाचे तुकडे खात इकडे तिकडे बघत होतो...   

   आमच्या पलीकडच्या टेबलावर सात आठ गुंठामंत्री पेल्यावर पेले रिचवत आधीपासूनच बसलेले होते.   

   तब्बेतीने अगदी रानगठ्ठे असलेले ते पैलवान दारू चढल्याने चांगलेच रंगात आले होते. आमच्या ड्रायव्हरसाहेबांचा चेहरा नेमका त्या लोकांच्या टेबलकडे होता.   

  माळवे त्यांच्या स्टाईलमध्ये वेटरला एक एक ऑर्डर देत होते आणि त्यांची नजर त्या रांगड्या पैलवान लोकांवर पडत होती.    आमच्या लोकांचा पहिला राउंड संपल्यावर माळवेही चांगलेच जोशात आले होते.त्यांचा आवाजही वाढला होता ...   

    आणि अचानक काय झालं माहीत नाही... पलीकडच्या टेबलावरचा एक धिप्पाड सावळा रांगडा पैलवान तिरिमिरीत आमच्याकडे  बघत शिव्या देत उठला... 

.  खिशातला गावठी कट्टा काढून त्याने सरळ माळवेवर रोखला,गलिच्छ शिव्या देत तो ओरडू लागला ...

“ साला, कायरे, मघापासून सारखा सारखा  माझ्याकडं रागानं बघतोय? भोss आता तुला गोळीच घालतो..."

  त्याचा तो अवतार बघून आम्ही चांगलेच हादरलो... 

आमच्या माळवेची भीतीने चांगलीच घाबरगुंडी उडाली होती,तो घाबरून थरथर कापत होता.. घामाने डबडबलेल्या माळवेकडे बघवत नव्हते!   

 हे एवढं अचानक घडलं होतं की कुणाला काही सुचेना...चुकून त्याने गोळी झाडली तर?

  बापरे ... 

 ढाबा मालक धावत आला आणि पैलवानाला समजावू लागला;पण पैलवान अजूनच पेटला होता... 

  आम्ही पुढे होऊन त्या पैलवानासमोर हात जोडले, तेव्हा कुठे पैलवान थोडा शांत झाला...

  माळवेने नशेत नक्कीच त्याची आखों आखोमे छेड काढली असणार...   

  कसेबसे चार घास पोटात घालून आम्ही तिथून काढता पाय घेतला...   

   आम्ही गाडीत बसून निघालो तरी तो पैलवान तोंडाने शिव्या पुटपुटत आमच्या ड्रायव्हरकडे खाऊ का गिळू नजरेने बघत होता...    परत येताना आमच्या गाडीचा वेग नेहमीपेक्षा दीडपट नक्कीच असेल! 

 ते कायमचे लक्षात राहिलेले लंच होते! 

 ©प्रल्हाद दुधाळ.