अझिझा - 1 Anjali Gote द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • टापुओं पर पिकनिक - भाग 60

    ६०. ती खिडकीजवळची जागा होती. हवामानही छान होते. तरीही, काहीत...

  • सानिका - 4

    भाग ४ आपण बघितलं :- सानिका आणि तिचे मित्र खूप धमाल करतात . आ...

  • फुलबाग

    "पंधराच दिवस?" अनिताने विचारलं."हॊ पंधराच!" तन्मय म्हणाला."आ...

  • तोतया वारसदार - भाग 28

      पात्र रचना व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मु...

  • अझिझा - 1

    १.             सादिमच्या आयुष्यात घडून गेलेल्या चांगल्या-वाई...

श्रेणी
शेयर करा

अझिझा - 1

१.

   
   
   
    सादिमच्या आयुष्यात घडून गेलेल्या चांगल्या-वाईट घटनांना वाचून त्यांना पुन्हा एकदा शब्दांच्या माध्यमातून बघण्याचा एक निष्फळ प्रयत्न करून तरी पाहू, असं उगीच वाटून गेलं. म्हणून मी तिची आकाशी वही -डायरी खाली काढली. २०१४ ते २०१५ ह्या वर्षात तिने एका वाढदिवसापासून दुसऱ्या वाढदिवसापर्यंत केलेला प्रवास त्या वही मध्ये होता. तिचा  तो प्रवास पुन्हा अनुभवायला, किंवा अनुभवण्याचा निष्फळ प्रयत्न करायला मी निघाले होते. तिची ती आकाशी वही मी घाईत वाचणार नव्हते, निर्णायक होऊन तर अजिबातच नाही. कारण काहीही करून मला त्या  कोऱ्या पानावर सादिमच्या उमटलेल्या भावना जाणून घ्यायच्या होत्या. म्हणून आकाशी वहीतल्या त्या सगळ्या गोष्टी शांतपणे घिसडघाई न  करता वाचायच्या, असं मी ठरवून टाकलं; पण दिवसभरातल्या कामाच्या व्यापात किंबहुना लिखाणाच्या पसार्‍यात मला तो आठवणींचा आणखी जास्तीचा पसारा मांडून ठेवायचा नव्हता. म्हणून मी माझ्या वाचनासाठी संध्याकाळी माझ्या सोईची वेळ ठरवून टाकली.
    उन्हं उतरतिला आली तरी माझा लेखन प्रपंच चालू होता. एव्हाना डोळ्यावरचा चष्मा खाली घसरत कुरकुर करू लागला होता. हातातली पेन, कागद आणि  अर्धवट लिहिलेल्या  कागदावर अडकून असलेला माझा घामेजलेला तळवा हे सगळे आता पुरते वैतागले होते आणि त्या सगळ्यांना पुढ्यात मांडून बसलेली मी ही भयंकर त्रासले होते. कारण, आज दिवसभरात माझा एक साधा लेख पूर्ण झाला नव्हता. आताची माझी आळसटलेली बुद्धी किंबहुना विचारशक्ती  पाहता तो लेख आजच्या दिवसात पूर्ण होईल असं वाटतही नव्हतं. म्हणून मी माझा घामेजलेला तळवा त्या कागदावरून खाली घेतला. नाकाच्या टोकावर घसरत येणारा चष्मा काढून टेबलावर ठेवला आणि मानेला झटके देत, आळस झटकण्याचा प्रयत्न करत त्या खुर्चीवरून उठले. 
  वाफाळणार्‍या कॉफीचा आस्वाद घेणारी जीभ गरम घुटक्यांमुळे सुखावत होती. तर माझी नजर स्क्रीनवर झळकत असलेल्या वाचकांच्या  प्रतिक्रिया वाचण्यात मग्न होती.
  'अनुभवाला कल्पकतेची जोड देऊन शब्दांमधून व्यक्त होणं म्हणजे लिहिणं होय. आणि अशा प्रकारे लिहिणाऱ्या एक उत्तम लेखिका आहात तुम्ही.' 
     - व्यंकटेश सारंग.
    प्रतिक्रियेतला तो मजकूर वाचून माझ्या चेहर्‍यावर हलकं स्मितहास्य पसरलं. मजकूराच्या शेवटचं नाव वाचून ओठांचे कोपरे रुंदावत कधी त्या स्मिताचं रूपांतर एका भल्या मोठ्या चकचकीत  हास्यात झालं ते कळलंच नाही.  'व्यंकटेश' माझ्या मनाने  मनातल्या मनातच त्या नावाची पुनरावृत्ती केली. हातातला कप बाजूला ठेवत मी आपली बोटे सराईतपणे की-बोर्डवर फिरवली.
     'तुमच्या या अभिप्रायाबद्दल मनापासून आभार!'
      - अझिझा.
   बाजूला ठेवलेला कॉफीचा मग पुन्हा हातात घेत मी माझी टिप्पणी त्या प्रतिक्रियेखाली  नोंदवली. माझी टिप्पणी त्या प्रतिक्रिये एवढी खास नव्हती. मला त्या टिप्पणीला खास बनवायचंही नव्हतं. त्याचं आणि  माझं नातं मला त्या इंटरनेटच्या जगात उघडं पाडायचं नव्हतं. वाचक आणि लेखक असा सुरू झालेला प्रवास आजही वाचक आणि लेखक इतकाच मर्यादित आहे, असंच काहीसं भासवायचं होतं मला.
     कॉम्प्युटर शट डाऊन करून आणि त्या सगळ्या प्रतिक्रियांना  तिथल्या तिथे सोडून मी ती आकशी वही-डायरी घेऊन गॅलरीत आले. सूर्याची एक तिरिप बरोबर मी उघडलेल्या पानावर येऊन पडत होती. त्यामुळे पानावर असलेली काही अक्षरं काहीशी सोनेरी असल्यागत भासू लागली. डोळ्यांवरचा चष्मा नीट करत मी ती डायरी वाचायला सुरुवात केली,
       
   

     १३ जून २०१४

प्रिय नवी अनू,
   तुझं नाव सुद्धा अनूच आहे. सॉरी यार, पण दुसरं नाव  सध्या सुचत नाहीये. कारण डाव्या हातात एक सुई खुपसलेली आहे आणि उजव्या हातात मी कसाबसा पेन सावरला आहे. आता ह्या दवाखान्यातल्या उदासवाण्या संध्याकाळी तुझ्यासाठी अजून छान नाव मी शोधू शकत नाही. त्यामुळे जमलं तर तुझ्या ह्या बिचाऱ्या मैत्रिणीला माफ कर.
   माझ्या ह्या नव्या प्रवासातली माझी नवी आणि तितकीच खास मैत्रीण तू असशील. जसे अनुने- माझ्या जुन्या डायरीने माझ्या आयुष्यातले अनेक प्रसंग बघितले, त्यांना स्वतःमध्ये सांभाळून ठेवलं तसं तुलाही करायचं आहे. मी रडताना माझे डोळे पुसायला, माझ्याशी बोलायला माझी अनू नव्हती; पण माझा राग आणि माझी निरर्थक बडबडब ऐकून घ्यायला मात्र माझी अनू होती आणि इथून पुढे तू असशील. अनुवर माझा जितका राग उमटला तितका तुझ्यावर उमटणार नाही ह्याची मी काळजी घेईन. मी आशा करते, की तू माझ्या सगळ्या स्वप्नांना पूर्ण होताना बघशील. अपूर्ण स्वप्नांमुळे, तुटलेल्या नात्यांमुळे आणि मागे सुटलेल्या लोकांमुळे अनेक अश्रुंचे थेंब गालावरून ओघळून अनुच्या पानांमध्ये समावलेले आहेत; पण तुझ्यात मात्र नक्कीच माझे आनंदाश्रू  आणि पूर्णत्वाकडे झुकत चाललेली माझी स्वप्नं सामावतील.
  वर्तमानात निरर्थक वाटणाऱ्या घटनाच कदाचित माझ्या भविष्यातल्या सर्वात सुंदर आठवणी असतील. आणि त्या सगळ्या घटनांना जपून ठेवणारी माझी नवी मैत्रीण तू असशील. मी माझा पुढचा प्रवास करण्यासाठी खूपच उत्सुक आहे. माझ्या नव्या मैत्रिणीबरोबरचा माझा हा प्रवास अधिक आनंददायी, सुखकर आणि सर्वोत्तम ठरेल अशी मी अशा करते.
    चला तर मग, आयुष्यात आलेल्या ह्या नव्या वळणापासून  पुढच्या प्रवासाला सुरुवात करू.  
     मला माहिती आहे, दवाखान्यातल्या बिछान्यावर  होणारी माझी नवी सुरुवात ही तितकीशी खास नसेल. ह्या दवाखान्यातल्या रटाळवाण्या गोष्टी तितक्याश्या रंजक ही नसतील. पण स्वतःला खोटी आस दाखवणं गरजेचं आहे. ह्या खोट्या आशेमुळे जगणं फार नाही निदान थोडं तरी सोपं होईल, म्हणून हा सगळा खटाटोप!
       

तुझीच मैत्रीण,
सादिम.
   
  ह्या सगळ्या लिहिल्या गेलेल्या गोष्टी फार जुनाट नव्हत्या. ह्या शब्दांना कागदावर उमटून फार फार तर काही महिने झाले असतील.
  'पण खरंच, किती बालिशपणाचं होतं हे सगळं! जरी बालिश असलं तरी खरं होतं.' माझं निर्णायक मन मला एकाच नाण्याच्या दोन वेगवेगळ्या बाजू दाखवण्याचा एक प्रयत्न करत होतं.
    डोळ्यांवर एकसारख्या पडणाऱ्या उजेडामुळे माझे डोळे चुरचुरायला लागले. होणाऱ्या त्रासामुळे वाचता येईना, डोळ्यातल्या पाण्यामुळे अक्षरं धुसर दिसू लागली म्हणून मी ती वही बंद केली.
       

    °°°


To be continued....
   
     
   ©AnjaliGote