अपराधबोध... - 1 Harshad Molishree द्वारा क्राइम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अपराधबोध... - 1

अस्वीकरण


ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कथेत आलेली पात्रे, घटना, ठिकाणे, संस्था आणि प्रसंग हे लेखकाच्या कल्पनेतून निर्माण केलेले आहेत. कोणत्याही वास्तविक व्यक्ती, घटनेशी किंवा संस्थेशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


कथेतील काही घटना व तपशील हे केवळ कथानकाच्या गरजेनुसार मांडले आहेत. त्यांचा वास्तव जीवनाशी संबंध जोडू नये.


ही कथा केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने लिहिलेली आहे.


----------------


.‎प्रकरण १ : हत्या

‎१९८०, खंडाळा, महाराष्ट्र.

‎जोरदार पाऊस नुकताच थांबला होता.

‎पहाटेचे साडेपाच वाजले होते. आकाश अजूनही ढगांनी भरलेले होते आणि वातावरणात पावसाचा गारवा दाटून राहिला होता. रस्त्याच्या कडेला साचलेल्या पाण्यातून एक शेतकरी सावकाश पुढे चालत होता. एका हातात कुडाळ आणि दुसऱ्या हातात कंदील होता.

‎दररोजप्रमाणे तो शेताकडे निघाला होता.

‎समर्थ निवासजवळ येताच अचानक त्याची नजर बंगल्याच्या फाटकासमोर पडलेल्या एका आकृतीवर गेली.

‎अंधारामुळे त्याला काहीच स्पष्ट दिसत नव्हते.

‎त्याने हातातील कुडाळ खाली टाकली आणि कंदील उंचावत त्या दिशेने धावत गेला.

‎जसजसा तो जवळ पोहोचला, तसतसा त्याचा वेग मंदावला.

‎फाटकासमोर एक माणूस पालथा पडला होता.

‎शेतकऱ्याने कंदिलाचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर टाकला.

‎क्षणभर तो जागच्या जागी स्तब्ध झाला.

‎त्या माणसाच्या चेहऱ्यावर अनेक गंभीर जखमा होत्या. नुकत्याच झालेल्या पावसामुळे आजूबाजूची माती चिखलात बदलली होती आणि त्या चिखलाने मृतदेह पूर्णपणे माखला होता.

‎शेतकऱ्याने थरथरत्या हाताने त्या माणसाला हलवण्याचा प्रयत्न केला.

‎कसलाही प्रतिसाद मिळाला नाही.

‎त्याचा श्वासही चालू नव्हता.

‎तो मेला होता.

‎शेतकरी घाबरून मागे सरकला. क्षणाचाही विलंब न करता तो गावाच्या दिशेने धावत सुटला.

‎काही वेळातच ही बातमी संपूर्ण गावात पसरली.

‎आणि त्यानंतर काही वेळातच पोलिस घटनास्थळी पोहोचले.

‎---

‎पोलीस निरीक्षक दिनकर सातपुते,यांनी घटनास्थळाची पाहणी सुरू केली.

‎मृतदेहाची झडती घेण्यात आली.

‎पाकीट नव्हते.

‎ओळखपत्र नव्हते.

‎फोटो नव्हता.

‎त्याची ओळख पटवणारी अशी कोणतीही वस्तू त्याच्या अंगावर सापडली नाही.

‎फक्त त्याच्या खिशातून,शंभर रुपयांच्या दोन नोटा सापडल्या.


दिनकरांनी मृतदेहाभोवती नजर फिरवली.


पावसामुळे जमीन पूर्णपणे चिखलमय झाली होती.


त्यामुळे मृतदेहाच्या आसपास काही पावलांचे ठसे स्पष्ट दिसत होते.


दिनकर खाली वाकले.


त्यांनी ते ठसे बारकाईने पाहिले.


एक जोडी ठसे बंगल्याच्या फाटकाच्या दिशेने येत होती आणि मृतदेहाजवळ येऊन थांबली होती.


दुसरी जोडी मृतदेहापासून रस्त्याच्या दिशेने जात होती.


आणि तिसरी...


ती मृतदेहाच्या अगदी जवळ होती.


दिनकर काही क्षण शांत राहिले.


तेवढ्यात त्यांच्या लक्षात आले की तिसरे ठसे इतर दोन्ही ठशांपेक्षा वेगळे आहेत.


त्यांनी मागे वळून शेतकऱ्याकडे पाहिले.


शेतकरी थोड्या अंतरावर उभा होता.


दिनकरांनी त्याला जवळ बोलावले.


“तुम्ही मृतदेहाजवळ गेला होतात ना?”


शेतकऱ्याने घाबरत मान हलवली.


“हो साहेब.”


दिनकरांनी त्याच्या पायांकडे पाहिले.


चिखलाने माखलेल्या त्याच्या जुन्या चपलांच्या ठशांचा आकार आणि मृतदेहाजवळचे तिसरे ठसे अगदी जुळत होते.


दिनकरांनी काही क्षण त्या ठशांकडे पाहिले.


“हे ठसे तुमचेच आहेत.”


शेतकऱ्याने सुटकेचा श्वास घेतला.


“हो साहेब... मीच कंदील घेऊन त्याच्याजवळ गेलो होतो. आधी तो जिवंत आहे की नाही, ते पाहण्यासाठी.”


दिनकरांनी मान हलवली.


म्हणजे तिसऱ्या ठशांचे गूढ संपले होते.


किमान वरवर तरी.


त्यांनी पुन्हा उरलेल्या दोन पावलांच्या ठशांकडे पाहिले.


दोन अनोळखी व्यक्ती.


त्यापैकी एक बंगल्याच्या दिशेने आला होता.


दुसरा रस्त्याच्या दिशेने गेला होता.


दोघांचा मृतदेहाशी काहीतरी संबंध असण्याची शक्यता होती.


दिनकरांनी जवळच्या पोलिस कर्मचाऱ्याला सांगितले,


“हे दोन्ही ठसे जपून ठेवा. पंचनामा होईपर्यंत या भागात कुणालाही फिरू देऊ नका.”

त्यानंतर दिनकरांनी त्या शेतकऱ्याला चौकशीसाठी जवळ बोलावले.

‎“तुम्ही हा मृतदेह किती वाजता पाहिला?”

दिनकरांनी विचारले.

‎शेतकरी अजूनही घाबरलेला होता.

‎“साहेब... सकाळी साडेपाचच्या सुमारास. रोजच्यासारखा शेताकडे जात होतो. तेव्हा अंधार होता, त्यामुळे लांबून काही नीट दिसलं नाही. जवळ आलो आणि कंदिलाच्या उजेडात पाहिलं... तर हा माणूस पडलेला दिसला.”

‎तो क्षणभर थांबला.

‎“पहिल्यांदा वाटलं, कदाचित पडला असेल. पण जवळ जाऊन पाहिलं तर... तो जिवंत नव्हता.”

‎दिनकरांनी त्याच्याकडे बारकाईने पाहिले.

‎“तुम्ही याला ओळखता का?”

‎शेतकऱ्याने मान हलवली.

‎“नाही साहेब. मी याला कधीच पाहिलं नाही.”

“काल रात्री काही संशयास्पद दिसलं किंवा ऐकू आलं?”


शेतकऱ्याने काही क्षण विचार केला.


“नाही साहेब. पाऊस फार जोरात होता. काही ऐकू आलं असतं तरी कदाचित कळलं नसतं.”


दिनकरांनी मान हलवली.


‎दिनकरांनी त्याला आणखी काही प्रश्न विचारले. त्यानंतर त्यांनी गावातील इतर लोकांचीही चौकशी करण्यास सुरुवात केली.

‎काही वेळाच्या चौकशीनंतर एक नाव समोर आले.

‎प्रभाकर.

‎मृत व्यक्तीचे नाव कदाचित प्रभाकर असावे, एवढीच माहिती सध्या पोलिसांच्या हाती लागली होती.

‎पण प्रभाकर कोण?

‎तो कुठे राहत होता?

‎खंडाळ्यात का आला होता?

‎आणि सर्वात महत्त्वाचे—

‎त्याची हत्या कोणी केली होती?

‎या प्रश्नांची उत्तरे मात्र अजूनही अंधारात होती.

‎---

‎दिनकरांनी त्यानंतर समर्थ निवासाबद्दल गावकऱ्यांकडे चौकशी केली.

‎पण प्रत्येकाकडून जवळजवळ एकच उत्तर मिळाले.

‎“तो बंगला गेल्या पंधरा वर्षांपासून बंद आहे.”

‎“तिथे कोणी राहत नाही.”

‎“कोणी येत-जातही नाही.”

‎गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार समर्थ निवासाबद्दल गावात एक वेगळीच भीती होती.

‎लोकांना तो बंगला भुताटकीचावाटत होता.

‎रात्री त्या बंगल्याजवळून जाणे तर दूरच, दिवसाही तिकडे कोणी फिरकत नसे.

‎दिनकरांनी बंगल्याकडे पुन्हा एकदा पाहिले.

‎पंधरा वर्षांपासून बंद असलेल्या बंगल्याच्या फाटकासमोर एक अनोळखी माणूस मृतावस्थेत सापडला होता.

‎हा केवळ योगायोग होता?

‎की या जुन्या, ओसाड बंगल्याच्या भिंतींमध्ये दडलेले एखादे रहस्य पुन्हा जागे झाले होते?

‎दिनकरांच्या मनात पहिल्यांदाच ही शंका डोकावली.

‎त्यांनी आपल्या सहकाऱ्याकडे पाहिले.

‎“शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवा.”

‎क्षणभर थांबून ते म्हणाले,

‎“आणि सुनील...”

‎“जी, साहेब?”

‎“उद्याच्या वृत्तपत्रात या मृत व्यक्तीच्या छायाचित्रासह ओळख पटवण्यासाठी जाहिरात द्या. कदाचित कोणीतरी याला ओळखत असेल.”

‎सुनीलने मान हलवली.

‎पोलिस मृतदेह घेऊन निघून गेले.

‎दिनकर मात्र काही क्षण तिथेच उभे राहिले.


त्यांची नजर पुन्हा त्या चिखलातील दोन अनोळखी पावलांच्या ठशांकडे गेली.


पावसाचे थेंब पुन्हा टपटपू लागले होते.


हळूहळू ते ठसे पुसले जाऊ लागले.


दिनकरांनी शेवटचा एक कटाक्ष बंगल्याकडे टाकला.


दोन अनोळखी पावलांचे ठसे.


त्यापैकी एक बंगल्याकडून आला होता.


आणि दुसरा...


तो कुठे गेला होता?


दिनकरांनी उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला.


पण त्या क्षणी समर्थ निवासाच्या काळोख्या खिडकीतून त्यांच्याकडे कुणीतरी पाहत असल्याचा भास झाला.


त्यांनी पुन्हा त्या खिडकीकडे पाहिले.


तिथे कोणीच नव्हते.


फक्त अंधार होता.

****


दुसऱ्याच दिवशी वर्तमानपत्रात अज्ञात मृतदेहाच्या ओळखीकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली.

दिनकरला वाटत होतं—जाहिरात पाहून कोणीतरी नक्कीच येईल. त्याचा नातेवाईक... एखादा मित्र... किंवा निदान असा कोणी, ज्याने प्रभाकरला पूर्वी कधी पाहिलं असेल.


पण दुर्दैवाने दोन दिवस उलटून गेले तरी कोणीच आलं नाही.


कायद्याप्रमाणे मृतदेहाचा छायाचित्र आणि बोटांचे ठसे CID कडे पाठवण्यात आले होते. त्यावरून राजपत्रात ओळख पटविण्यासाठी प्रकाशन होणार होतं. मृतदेहाची शारीरिक ठेवण, अंगावरील कपडे, ओळखण्यासारख्या खुणा आणि मिळालेल्या वस्तूंचा तपशीलही संबंधित पोलीस ठाण्यांना पाठवण्यात आला होता.


तरीही... दोन दिवस झाले होते.

मृतदेह कोणाचा, याचा काहीच ठावठिकाणा नव्हता.


“सर... दोन दिवस झाले. अजून काहीच तपशील मिळाला नाही की हा मृतदेह नेमका कोणाचा आहे. मला तर वाटतं, या केसचं काही होणार नाही. बिनवारशी मृतदेह असेल कोणाचातरी. साधं पाकीटसुद्धा नव्हतं त्याच्याकडे.”


सुनीलच्या बोलण्यावर दिनकर काही क्षण शांत राहिला.


“नाही... सुनील. प्रभाकर तसा माणूस नाहीये.”

“कसं काय म्हणताय, सर?”


“त्याचे कपडे बघितलेस ना? अगदी व्यवस्थित होते. खिशात पाकीट नव्हतं, ओळखपत्र नव्हतं... पण दोनशे रुपये होते.”


दिनकरने क्षणभर टेबलावर ठेवलेल्या कागदांकडे पाहिलं.


“मला तरी तो बिनवारशी माणूस वाटत नाही.”


सुनील काही क्षण विचारात पडला.


“सर... पण जर तसं असेल, तर हा माणूस आहे तरी कोण?”


दिनकरने त्याच्याकडे पाहिलं.


“अजून कोणी त्याची चौकशी करायला का आलं नाही"... 


हाच तर प्रश्न आहे, सुनील.


खोलीत काही क्षण शांतता पसरली.


“सर, अजून एक गोष्ट कळली मला...”


“काय?”


“ज्या दिवशी हा मृतदेह सापडला, त्या दिवशी तुम्ही त्या भुताटकी बंगल्यात गेला होता... बरोबर?”


दिनकर अचानक शांत झाला.


त्याने सुनीलकडे पाहिलं नाही.

काही क्षण तो तसाच बसून राहिला.


मग त्याची नजर नकळत खिडकीबाहेर गेली.

आणि त्याच्या डोळ्यांसमोर पुन्हा तोच बंगला उभा राहिला.


रात्रीचे बारा वाजून पंधरा मिनिटे झाली होती.

दिनकरने मनगटावरील घड्याळाकडे एकदा पाहिलं आणि गाडीवरून खाली उतरला.


तो समर्थ निवासाच्या फाटकाजवळ उभा होता.

जिथे मृतदेह सापडला होता, त्या जागेकडे त्याने काळजीपूर्वक नजर टाकली.


रात्र गडद होती.


खंडाळ्याच्या डोंगरांवर पसरलेलं धुकं आणि अधूनमधून कोसळणारा पाऊस वातावरण आणखी भयाण करत होता.


दिनकरने गाडी एका बाजूला लावली.

फाटक ढकलून तो सावधपणे आत शिरला.

त्याने खिशातून बॅटरी काढली आणि तिचा प्रकाश आजूबाजूला फिरवला.


ओलसर माती... उंच वाढलेलं गवत...

काही ठिकाणी पडलेली सुकलेली पानं...

आणि त्या सगळ्याच्या मधोमध उभा असलेला तो काळाकुट्ट बंगला.


दिनकर हळूहळू पुढे सरकत राहिला.


काही क्षणांनी तो मुख्य दरवाजासमोर येऊन थांबला.

दरवाजाला मोठं लोखंडी कुलूप लावलेलं होतं.

कुलपावर आणि दरवाजाच्या कडांवर साचलेली धूळच सांगत होती की बंगला अनेक वर्षांपासून बंद होता.


दिनकरने बॅटरीचा प्रकाश दरवाज्यावरून फिरवला.

काहीच संशयास्पद दिसत नव्हतं.


तो पुढे गेला.


बंगल्याच्या बाजूला असलेल्या एका खिडकीजवळ थांबला.


खिडकीची एक काच फुटलेली होती.

त्याने आजूबाजूला एकदा पाहिलं.


मग बॅटरीचा प्रकाश त्या तुटलेल्या काचेतून आत सोडला.


आतलं दृश्य पाहून त्याला पहिल्या नजरेत तरी हेच जाणवलं—

बंगला खरंच अनेक वर्षांपासून बंद होता.

जुनं, धुळीने माखलेलं फर्निचर...


कोपऱ्याकोपऱ्यात पसरलेली कोळ्यांची जाळी...

भिंतींवरचे उखडलेले रंग...

जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू...

आणि त्या सगळ्यावर पसरलेली एक विचित्र, मृत शांतता.


दिनकरने बॅटरीचा प्रकाश हळूहळू प्रत्येक कोपऱ्यात फिरवला.

एका क्षणासाठी त्याला वाटलं—

काहीतरी हललं.

त्याने ताबडतोब प्रकाश त्या दिशेने वळवला.

काहीच नव्हतं.

फक्त जुनं कपाट.


दिनकरने पुन्हा नीट पाहिलं.

काहीच नाही.


त्याने एक दीर्घ श्वास घेतला.


“भास झाला असेल...”

तो पुटपुटला.


पण त्याचं मन मात्र त्याला मानायला तयार नव्हतं.

बराच वेळ पाहणी करूनही त्याला काही सापडलं नाही.


शेवटी तो बाहेर आला.


गाडीवर बसला.


इंजिन सुरू करण्याआधी त्याने पुन्हा एकदा मागे वळून बंगल्याकडे पाहिलं.

विशेषतः...

त्या तुटलेल्या खिडकीकडे.

काही क्षण तो तसाच पाहत राहिला.

आणि अचानक—


त्याला असं जाणवलं...

कोणीतरी त्या काळोखातून त्याच्याकडे पाहत होतं.

दिनकरच्या अंगावर काटा आला.


पण पुढच्याच क्षणी त्याने नजर हटवली.

गाडी सुरू केली.

आणि तो तिथून निघून गेला.


“सर!”


सुनीलच्या आवाजाने दिनकर अचानक भानावर आला.


“काय?”


“काही सापडलं का तुम्हाला?”


दिनकरने काही क्षण त्याच्याकडे पाहिलं.


“नाही... काहीच नाही.”


सुनील हसला.


“तुमचं बरं आहे, सर. एवढ्या रात्री एकटे तिकडे जाता. तुमची हिम्मत पण कमाल आहे.”


तो थोडा थांबला.


“आणि एवढं सगळं करूनही काहीच सापडलं नाही.”


दिनकरने त्याच्याकडे पाहिलं.


“तेच तर, सुनील...”


“काय?”


“हेच तर मला पटत नाही.”


त्याचा आवाज आता गंभीर झाला होता.


“एक खून झाला आहे... आणि घटनास्थळी काहीच नाही?”


सुनील शांत झाला.


“ना हत्यार... ना कोणताही ठोस पुरावा.”


दिनकर खुर्चीत मागे रेलला.


“मृतदेहाच्या चेहऱ्यावर कितीतरी जखमा होत्या. जणू त्याला आधी कुणीतरी खूप मारहाण केली होती.”


तो क्षणभर थांबला.


“डोक्याला आधीच गंभीर जखम होती... आणि त्याच्या पाठीमागून एक गोळी लागलेली होती. तीच शेवटी त्याच्या मृत्यूचं कारण ठरली असावी.”


“पाऊस होता, म्हणून गोळीचा आवाज कोणाला ऐकू आला नसेल... हे मान्य.”


दिनकरचा आवाज अधिक विचारमग्न झाला.

“पण एक गोष्ट समजत नाही.”


“काय, सर?”


“एखादा माणूस एवढं सगळं करून एखाद्याला गोळी मारतो... मृतदेह तिथेच का सोडतो?”


सुनील काही बोलला नाही.


“तो मृतदेह कुठेतरी लपवू शकत होता. घाटात नेऊन टाकू शकत होता. त्या दरीत टाकला असता तर कदाचित कोणालाच तो सापडला नसता.”


दिनकर काही क्षण शांत राहिला.


“मग... त्याने असं का केलं?”


त्याने सुनीलकडे पाहिलं.


“हा खून करून गेलेल्या माणसाला मृतदेह सापडावा, असंच जणू वाटत होतं.”


सुनीलच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.


“म्हणजे...?”


“माहित नाही.”


दिनकर उठला.


“पण मला हे प्रकरण अजिबात सरळ वाटत नाही.”


काही क्षण शांतता.


मग दिनकरने विचारलं,


“शवविच्छेदनाचा अहवाल कधीपर्यंत येईल?”


“पूर्ण अहवाल?”


“हो.”


“माहितीनुसार अजून थोडा वेळ लागेल, सर.”


“किती?”


“डॉक्टरांचा प्राथमिक अहवाल कदाचित लवकर मिळेल. पण पूर्ण अहवाल आणि फॉरेन्सिक तपासणीचा निकाल यायला आठवडा-दोन आठवडे लागू शकतात.”


दिनकरने मान हलवली.


“मला पूर्ण रिपोर्ट हवा आहे.”


“हो, सर.”


सुनीलने फाईल उघडली.


“आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मृतदेहाचा पूर्ण तपशील मी आसपासच्या सगळ्या पोलीस ठाण्यांना पाठवला आहे.”


“CID कडे?”


“हो. छायाचित्र आणि बोटांचे ठसेही पाठवले आहेत.”

तो पुढे म्हणाला,


“राजपत्रात ओळखीसाठी प्रसिद्धीसुद्धा जाईल.”

दिनकर काही क्षण विचारात पडला.


“आणि हरवलेल्या व्यक्तींच्या नोंदी?”


“त्या देखील तपासत आहोत.”


सुनीलने फाईल बंद केली.


“दोन-तीन दिवसांत काहीतरी माहिती मिळेल, साहेब.”


दिनकरने त्याच्याकडे पाहिलं.


“मिळायलाच हवी.”


तो थोडा थांबला.


“कारण मला वाटतं... हा मृतदेह जितका शांत दिसतोय, तितकं हे प्रकरण शांत नाही.”


सुनील काही बोलला नाही.


दिनकरची नजर पुन्हा त्या फाईलवर स्थिरावली.


फाईलच्या पहिल्या पानावर फक्त दोन शब्द लिहिले होते—


“अज्ञात मृतदेह.”


पण दिनकरच्या मनात मात्र एक वेगळाच प्रश्न घुमत होता—


“अज्ञात... की जाणीवपूर्वक अनोळखी ठेवलेला?”


दिनकर आणि सुनीलचं बोलणं सुरू असतानाच अचानक एक पोलीस कर्मचारी धावत आला.


“साहेब…”


त्याचा धापा टाकणारा आवाज ऐकून सुनीलने त्याच्याकडे वळून पाहिलं.


“काय झालं?”


पोलीस कर्मचाऱ्याने क्षणभर श्वास सावरला आणि घाईघाईने म्हणाला,


“साहेब… एक बाई आली आहे.”


“बाई?”


“होय, साहेब.”


तो क्षणभर थांबला.


“तिचं म्हणणं आहे… की प्रभाकरचा खून तिने केला आहे.”


सुनीलच्या चेहऱ्यावरचे भाव एका क्षणात बदलले.


दिनकर मात्र जागच्या जागी स्तब्ध उभा राहिला.


बाहेर पावसाचा आवाज अजूनही तसाच सुरू होता…


पण आता त्या पावसापेक्षाही मोठं वादळ या प्रकरणात येणार होतं.


"पुढील भाग लवकरच".....