झपाटलेला वाडा - भाग 1: पहिली रात्र
आर्यन जेव्हा आरशात बघायचा तेव्हा त्याला लेखक नाही, एक भिकारी दिसायचा.
तीन पुस्तकं. तीनही आपटली होती. शेवटच्या प्रकाशकाने पुस्तक तोंडावर फेकलं नव्हतं, त्याने एक वाक्य फेकलं होतं जे पुस्तकापेक्षा जास्त लागलं होतं.
"आर्यन, तुझ्या भुतांच्या गोष्टीत भूतच नाहीये. फक्त कल्पना आहे. वाचकाला भीती वाटायला हवी, तुझी गोष्ट वाचून त्याने मागे वळून बघायला हवं. त्यासाठी तुला अनुभव घ्यावा लागेल. खरा अनुभव. मेलेल्या माणसाच्या घरात झोपून बघ."
त्याला तो अनुभव हवा होता. म्हणून तो माळशेतला आला.
पुण्यापासून पन्नास किलोमीटर आत, जिथे गुगल मॅप संपतो आणि लोकं रस्ता बोटाने दाखवतात, तिथे माळशेत गाव आहे. आणि गाव जिथे संपतं, तिथून एक कच्चा रस्ता सुरू होतो. त्या रस्त्यावर एकही घर नाही, एकही दिवा नाही. फक्त एक वाडा उभा आहे.
*भोसले वाडा.*
बाहेरून बघितलं तर वाटेल दोन मजली वाडा आहे. पण आतून बघितलं तर कळतं तो दोन मजली नाहीये, तो दोनशे वर्षांचा खोल खड्डा आहे. त्याच्या भिंतींना ओल नाही लागली, त्याच्या भिंतींनी ओल पिऊन टाकली आहे. कौलं काळी पडली आहेत. लाकडी खांबांना वाळवी लागली नाही, त्यांना कोणीतरी नखांनी ओरबाडलं आहे. अंगणात तुळशी वृंदावन आहे, पण त्यात तुळस नाही. फक्त उकरलेली माती आहे. जणू आतून कोणीतरी बाहेर येण्याचा प्रयत्न केलाय. आणि कोपऱ्यात विहीर. तीस फूट खोल. तिच्यावर पिंपळाचं झाड. त्या झाडाची पानं हिरवी नाहीत, ती काळसर आहेत. आणि विहिरीतून सतत आवाज येतोय. पाणी हलल्याचा. बुड... बुड... जणू आत कोणीतरी पोहतंय.
दलालाने चावी हातात दिली नाही, लांबून फेकली आणि वाड्याकडे बोटाने इशारा केला.
"साहेब, वीस वर्ष झालं कोणी आत गेलं नाही. जोशी कुटुंब गेलं होतं. नवरा बायको आणि आठ वर्षांची पोरगी. तीन दिवस राहिले. चौथ्या दिवशी पोरगी धावत बाहेर आली. नागडी. अंगावर ओरखडे. तेव्हापासून ती बोलत नाही. फक्त भिंतीवर नखांनी लिहिते. 'ती येते, ती येते'."
आर्यनने चावी उचलली. ती इतकी गार होती की त्याची बोटं झिणझिणली. लोखंड गार नसतं, प्रेत गार असतं.
दार ढकललं. आणि सगळ्यात भयानक गोष्ट घडली. दाराने आवाजच केला नाही. शंभर वर्षांच्या दाराने किर्र आवाज करायला हवा. याने केला नाही. ते उघडलं, जणू त्याला माहित होतं आर्यन येणार आहे. आणि ते त्याचीच वाट बघत होतं.
आत पाऊल टाकताच श्वास अडकला. वास ओलसरपणाचा नव्हता. तो वास होता दोन दिवस पाण्यात पडलेल्या प्रेताच्या साडीचा. गोड, कडू आणि सडका.
हॉलमध्ये एक झोपाळा होता. रिकामा. पण तो हलत होता. हवा नव्हती. तरी तो हलत होता. हळू... हळू... आणि एका जागी थांबला. जणू कोणीतरी त्यावर बसून आर्यनकडे बघतंय.
भिंतीवर एक मोठा बाईचा फोटो होता बाई सुंदर होती, पण फोटो बघून सुंदर वाटत नव्हतं, भीती वाटत होती. कारण तिच्या डोळ्यात मृत्यू दिसत होता. तिच्या कपाळावरचं कुंकू लाल नाही, काळं वाटत होतं. तिच्या गळ्यात मंगळसूत्र होतं, पण ते उलटं घातलं होतं. फोटोला झेंडूचा हार होता, पण आता फक्त दोरा उरला होता आणि खाली वाळलेली फुलं पडली होती. आणि त्या फुलांवर कोणतेही कीटक नव्हते जणू त्यांनाही कसली तरी भीती वाटत होती
आर्यनने बॅग उघडली. लॅपटॉप टेबलावर ठेवला. लाईट नव्हती म्हणून दोन मेणबत्त्या लावल्या. मेणबत्तीच्या उजेडात फोटोवरची बाई जास्तच जिवंत वाटू लागली. तिची सावली भिंतीवर हलत होती,
रात्री 8:30 वाजता त्याने लिहायला सुरुवात केली. "माझी पहिली रात्र..."
तेवढ्यात वर आवाज आला.
*छम.*
एकच पैंजण. वरच्या खोलीत.
आर्यनने टाईप करणं थांबवलं. कान लावला.
परत. *छम... छम...* आता दोन. कोणीतरी चालत होतं. लाकडी फळीवर. हळू एकदम हळू. जणू पायाला जखम झाली आहे.
"कोण आहे वर?" आर्यन ओरडला.
आवाज थांबला. पण त्याच्या जागी दुसरा आवाज आला. लहान मुलीच्या हसण्याचा एकदम असा विचित्र. खि... खि... खि..
आर्यन उठला टॉर्च घेतली जिन्याकडे गेला. जिना लाकडी होता. धुळीने भरलेला. वीस वर्षांची धूळ. पण त्या धुळीवर आता पाय उमटले होते. ओले पाय लहान मुलीच्या पायासारखे. आणि त्या पायातून लालसर पाणी निघत होतं. प्रत्येक पायरीवर एक पाय. खाली येत होता.
छम... छम... छम... आवाज आता जिन्यावर आला. अगदी जवळ.
आर्यनने टॉर्च वर मारली. जिना रिकामा. कोणीच नाही. पण उमटलेले पाय अजूनही ओले होते. आणि त्याच्या नाकात एक वास आला. ओल्या केसांचा. खोबरेल तेलाचा आणि विहिरीच्या शेवाळाचा.
त्याच्या मागून एकदम थंड हवा आली. इतकी थंड की दोन्ही मेणबत्त्या एकाच सेकंदात विझल्या. आणि त्याच्या अंगातून भीतीची लहर गेली
अंधार. घट्ट अंधार. फक्त टॉर्चचा गोल प्रकाश.
आणि त्या प्रकाशात त्याला दिसलं, त्याच्या लॅपटॉपच्या कीबोर्डवर काहीतरी आहे. त्याने जवळ जाऊन बघितलं.
मुठभर केस. लांब, काळे, ओले. एका बाईचे. आणि त्या केसांच्या टोकाला काहीतरी चिकटलं होतं. पांढरं तुटलेलं नख. त्यावर लाल नेलपॉलिश.
आर्यनने किंचाळायचा प्रयत्न केला, पण आवाजच निघाला नाही जणू त्याचा आवाज घश्यातच गोठला होता त्याने केस खाली झटकले. तो वरच्या खोलीत पळाला. चादर अंगावर घेतली. चादरीला तोच वास येत होता. तो त्याला जिन्यावर आला होता
आर्यनने डोळे बंद केले. पण डोळे बंद केल्यावर जास्त भीती वाटू लागली.
पैंजणाचा आवाज आता त्याच्या पलंगाभोवती फिरत होता. छम छम छम... कधी उजवीकडे, कधी डावीकडे. आणि मग एकदम त्याच्या कानाजवळ.
*"जा..."*
एका बाईचा आवाज. कुजबुज नाही. ती थेट त्याच्या मेंदूत बोलली.
*"इथून जा... नाहीतर आमच्यासारखाच विहिरीत सडशील..."*
आर्यनने डोळे उघडले.
आणि त्याच्या छातीतलं रक्तच गोठलं.
त्याच्या पलंगाच्या समोर, दारात, ती उभी होती.
एकेकाळी पांढरी साडी असणारी पण आता साडी पांढरी राहिली नव्हती चिखलाने शेवाळाने भरून तिचा रंग बदलला होता. त्यातून चिखल आणि शेवाळाचे पाणी खाली गळत होते. तिचे ओले केस पूर्ण चेहरा झाकत होते. तिचे पाय दिसत नव्हते. पण तिच्या पायातले पैंजण हवेतच हलत होते. तिचा चेहरा दिसत नव्हता, केसांमुळे. फक्त तिचं तोंड दिसत होतं. उघडं. त्यातून काळं पाणी वाहत होतं. विहिरीतलं पाणी. आणि तिच्या पदराला धरून एक लहान मुलगी उभी होती.
सात वर्षांची. पांढरा फ्रॉक. फ्रॉक फाटलेला. तिच्या हातात एक बाहुली. बाहुली जळलेली. तिचा एकच डोळा होता. आणि ती मुलगी हसत होती. त्या बाईच्या रडण्यात ती हसत होती.
ती मुलगी आर्यनकडे बघून म्हणाली, "दादा, आई म्हणते तू पण आमच्यासोबत खेळणार? विहिरीत खूप जागा आहे."
आर्यनने आरडाओरडा केला आणि टॉर्च फेकून मारली. टॉर्च भिंतीवर आपटली आणि विझली.
परत अंधार. आणि अंधारात फक्त त्या मुलीचं हसणं. खि...खि... खी... थोड्या वेळाने आवाज शांत झाल्यावर आर्यनने मोबाईलचा टॉर्च लावला. समोर कोणीच नव्हतं. फक्त रिकामा पलंग.
पण जमिनीवर ओले शेवाळ पडलेले होते आणि कोणीतरी बोटाने लहान बोटाने त्यावर लिहिल होत
*"आम्हाला न्याय हवा आहे - सुनिता + श्रुती 2004 - आम्हाला त्याने मारलं - विहिरीत"*
आणि त्या शेवाळाच्या बाजूला दोन गोष्टी पडल्या होत्या. एक तुटलेलं पैंजण आणि ती जळलेली बाहुली. बाहुली अजूनही ओली होती.
आर्यन खाली धावला. फोटोच्या मागे बघितलं. फोटोच्या मागच्या लाकडावर कोळशाने ओरबाडून लिहिलं होतं.
> "माझा नवरा रमेशने आम्हाला मारलं. पैशासाठी. तो अजूनही पुण्यात आहे. बिल्डर झाला आहे. -
आर्यनचा फोन वाजला. टॉवर नव्हता. पण फोन वाजला. अननोन नंबर.
त्याने उचलला. पलीकडून लहान मुलीचा आवाज आला.
"दादा, उद्या पौर्णिमा आहे. उद्या आम्ही दोघी विहिरीतून बाहेर येतो. तू बघायला येशील ना?"
फोन कट झाला.
आर्यनने आरशात बघितलं. त्याच्या खांद्यावर एक छोट्या हाताचा ओला ठसा होता. आणि त्याच्या पाठीमागे आरशात, ती बाई अजूनही उभी होती. तो मागे वळला, तिथे कोणीच नव्हतं. पण आरशात ती होती.
आणि त्याच्या लॅपटॉपवर आपोआप टाईप होत होतं...
*"उद्या विहिरीत बघ. तीन प्रेतं आहेत. तिसरं कोणाचं आहे ते बघ..."*
रात्र अजून संपली नव्हती. पौर्णिमेला अजून 24 तास होते.
क्रमश: