शापित गर्भ : जन्म की मृत्यू - भाग 3 AVINASH DHALE द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

शापित गर्भ : जन्म की मृत्यू - भाग 3

शापित गर्भ : जन्म की मृत्यू

लेखन : अविनाश शांताबाई भिमराव ढळे
: एक अस्वस्थमा


भाग – ३

क्रमशः....


रात्रीचा तो अंधार आता फक्त बंगल्याच्या चार भिंतींमध्ये उरला नव्हता... तो जणू आर्यनच्या श्वासात मिसळला होता.
या आधी जे काही घडलं होतं, त्यानंतर आर्यनच्या मनात एकच प्रश्न पुन्हा पुन्हा उठत होता..

अन्वी नेमकी कुठे होती?

आणि त्याहून भयंकर प्रश्न असा होता की...

आरशात दिसणारी ती गर्भवती स्त्री नेमकी कोण होती?

आर्यन काही क्षण तिथेच उभा राहिला.

समोर अंधार होता.

भिंतीवरचं घड्याळ मात्र अजूनही चालू होतं.

टक... टक... टक...

प्रत्येक आवाजासोबत त्याचं हृदय जणू छातीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतं.
त्याने हळूच मागे वळून पाहिलं.
दार बंद होतं.
खिडकी बंद होती.
पण खोलीत हवा नव्हती.
तरीही...

पडद्याचा एक कोपरा हळूहळू हलत होता.
आर्यनच्या अंगावर काटा आला.
त्याने मोबाईलची टॉर्च त्या दिशेने वळवली.
पडदा स्थिर झाला.
काहीच नव्हतं.

“काही नाहीये... काहीच नाहीये...” तो स्वतःशीच कुजबुजला.

पण त्याच क्षणी त्याच्या कानाजवळ कोणीतरी अगदी हळू आवाजात म्हटलं,

“खरंच?”

आर्यन दचकून मागे सरकला.
मोबाईल हातातून जवळजवळ सुटतच होता.
त्याने घाबरून आजूबाजूला पाहिलं.
कोणीही नव्हतं.
मात्र खोलीच्या कोपऱ्यात ठेवलेल्या जुन्या लाकडी कपाटाच्या दारावर...
तीन ओरखडे दिसत होते.
सरळ.
ताजे.
जणू आतून कोणीतरी नखांनी लाकूड खरवडलं होतं.
आर्यन काही क्षण त्या कपाटाकडे पाहत राहिला.
आणि मग...
आतून आवाज आला.
ठक्...
आर्यनचा श्वास थांबला.
ठक्...
या वेळी आवाज थोडा स्पष्ट होता.
ठक्... ठक्...
जणू कपाटाच्या आतून एखादं लहान मूल दारावर हात मारत होतं.
आर्यन मागे सरकला.

“कोण आहे?”

उत्तर आलं नाही.
त्याने थरथरत्या आवाजात पुन्हा विचारलं..

“कोण आहे आत?”

काही क्षण शांतता.
मग...

दाराच्या दुसऱ्या बाजूने एका मुलाचा मंद आवाज ऐकू आला...

“बाबा...”
आर्यनच्या अंगावर शहारा आला.

त्याच्या हातातील मोबाईलची टॉर्च थरथरू लागली.
तो आवाज पुन्हा आला.

यावेळी थोडा जवळून.

“बाबा... दार उघड...”

आर्यनच्या डोळ्यांसमोर अन्वीचा चेहरा आला.
त्याच्या पोटात एक विचित्र गोळा आला.

“अन्वी?”

कपाटाच्या आत काही क्षण शांतता होती.
आणि मग...
त्या मुलाचा आवाज पुन्हा ऐकू आला.

“आईला सांगितलं होतं ना...”

आर्यनच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला.

“या घरात येऊ नकोस...”

आणि लगेच कपाटाच्या आतून असा जोरदार आवाज झाला की आर्यन दोन पावलं मागे फेकला गेला.

धाडऽऽऽक!

कपाटाचं दार स्वतःहून उघडलं.
आत कपडे नव्हते.
फक्त काळोख.
घट्ट, काळाकुट्ट अंधार.

आर्यनने मोबाईलची टॉर्च आत टाकली.
एक जुना लाकडी पाळणा दिसला.
पाळणा हळूहळू हलत होता.

किर्र... किर्र... किर्र...
पण त्यात...कोणीच नव्हतं.
आर्यनचा घसा कोरडा पडला.
त्याने एक पाऊल पुढे टाकलं.
पाळणा थांबला. दुसरं पाऊल टाकलं.
पाळणा पुन्हा हलू लागला.
या वेळी वेगाने.

किर्र... किर्र... किर्र...

आर्यनला अचानक पाळण्यातून मंद स्वर ऐकू आला.
एखादी स्त्री अंगाई म्हणत होती.
स्वर इतका हळवा होता की शब्द समजत नव्हते.
पण ती धून...

तीच धून त्याने काही वेळापूर्वी आरशातून ऐकली होती.
आर्यनचा श्वास अडकला.
तो पाळण्याजवळ गेला.
त्याने टॉर्च आत वळवली.
आणि...
पाळण्याच्या पांढऱ्या कापडावर एक लालसर ओलसर डाग दिसला.
आर्यनने हात पुढे केला.
मात्र हात कापत होता.
त्याने कापडाचा कोपरा उचलला.
खाली काहीच नव्हतं.
फक्त एक लहान काळा धागा.
त्या धाग्याला एक छोटंसं धातूचं लॉकेट बांधलेलं होतं.
आर्यनने ते हातात घेतलं.
लॉकेटच्या मागच्या बाजूला काही अक्षरं कोरलेली होती.

“गर्भ जागा झाला की...”

पुढचं वाक्य अर्धवट होतं.
आर्यन ते वाचण्याचा प्रयत्न करत होता.
तेवढ्यात त्याच्या मागून एकदम मंद आवाज आला..

“पूर्ण वाचू नकोस...”

आर्यनने झटकन मागे वळून पाहिलं.
कोणीच नव्हतं.
पण त्याच्या हातातील लॉकेट अचानक गरम झालं.
इतकं गरम की त्याने ते खाली फेकून दिलं.
लॉकेट जमिनीवर पडताच...

बंगल्याच्या कुठल्यातरी अज्ञात भागातून मंत्रोच्चार सुरू झाला.
सुरुवातीला अगदी मंद.

जणू जमिनीखालून आवाज येत होता.

“ॐ... ह्रीं... क्ष्रौं...”

आर्यन स्तब्ध झाला.
आवाज एकाचा नव्हता.
अनेक आवाज एकाच वेळी मंत्र म्हणत होते.

“रक्तगर्भाय नमः...”

आर्यनच्या कपाळावर घाम फुटला.
मंत्रोच्चार वाढत गेला.

“निद्रितं जाग्रय...
निद्रितं जाग्रय...
निद्रितं जाग्रय...”


आणि अचानक...
पाळणा थांबला.

संपूर्ण बंगला शांत झाला.
इतका शांत...

की आर्यनला स्वतःच्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते.
धड्... धड्... धड्...

तेवढ्यात मोबाईलवर एक नवीन मेसेज आला.
आर्यनने स्क्रीनकडे पाहिलं.

मेसेज फक्त दोन शब्दांचा होता.

“मी आले.”

तुझी “अन्वी?

आर्यनच्या डोळ्यांत पाणी आलं.
“अन्वी?”

त्याने लगेच कॉल केला.
रिंग वाजली.
एकदा...
दोनदा...
तीनदा...
मग कॉल उचलला गेला.

आर्यन काही बोलण्याआधीच दुसऱ्या बाजूने तिचा श्वास ऐकू आला.
हळू...
जड...
घाबरलेला.

“अन्वी! तू कुठे आहेस?”

समोरून उत्तर आलं नाही.
“अन्वी, बोल ना!”

काही सेकंदांनी तिचा आवाज आला.
पण तो आवाज ऐकताच आर्यनच्या हातापायातलं बळ निघून गेलं.
कारण आवाज अन्वीचा होता...
पण बोलण्याची पद्धत तिची नव्हती.
ती अगदी शांतपणे म्हणाली

“आर्यन... तू मला आत का आणलं?”
आर्यनच्या छातीत धस्स झालं.

“मी तुला आत आणलं?”

दुसऱ्या बाजूने मंद हसू ऐकू आलं.

“तू नाही...”
क्षणभर शांतता.
मग आवाज आला..

“त्याने.”
“कोण?”

उत्तर नाही.

फक्त फोनच्या दुसऱ्या बाजूला एखाद्या लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला.
आणि त्याच वेळी आर्यनच्या मागे...
पुन्हा तोच आवाज आला..
ठक्... ठक्... ठक्...
आर्यनने फोन कानाला लावलेला असतानाच हळूच मागे पाहिलं.
पाळणा पुन्हा हलत होता.
आणि या वेळी...
त्यात काहीतरी होतं.

पांढऱ्या कापडाखाली एक छोटासा आकार दिसत होता.
आर्यनचा श्वास रोखला गेला.
त्याने फोन खाली केला.

कापडाखालील आकार हलला.
एकदा.
मग पुन्हा.
आर्यनने थरथरत्या हाताने कापड उचललं.
आणि...
त्याच्या तोंडून किंकाळी निघायची बाकी होती.
कारण तिथे...
एक बाळ होतं.
पण ते बाळ...
डोळे उघडे ठेवून आर्यनकडे पाहत होतं.
त्याच्या चेहऱ्यावर नवजात बाळासारखी असहायता नव्हती.
त्याच्या ओठांवर...
एक विचित्र हसू होतं.
आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे...
त्या बाळाच्या कपाळावर अगदी तसंच एक काळं चिन्ह होतं...
जे आर्यनने आधी त्या जुन्या लॉकेटवर पाहिलं होतं.
आर्यन मागे हटला.
बाळाने त्याच्याकडे पाहत ओठ हलवले.
आणि आवाज...
बाळाचा नव्हता.
तो एका वृद्ध माणसाचा होता.

“उशीर झाला, आर्यन...”

आर्यनच्या हातातून मोबाईल खाली पडला.
फोन अजूनही चालू होता.

आणि फोनच्या स्पीकरमधून अन्वीचा आवाज ऐकू येत होता..

“आर्यन... पळ...
आर्यनच्या पायाखालची जमीन जणू नाहीशी झाली होती.
समोर पाळण्यात ते बाळ शांतपणे पडलेलं होतं.
डोळे उघडे.
ओठांवर हसू.
आणि त्या डोळ्यांत...
एक विचित्र ओळखीची भावना.
जणू ते त्याला पहिल्यांदाच पाहत नव्हतं.
जणू...

ते त्याची वाटच पाहत होतं.
आर्यनने मागे सरकण्याचा प्रयत्न केला.
पण त्याचा पाय एखाद्या वस्तूला अडकला.
तो खाली पडता पडता वाचला.
जमिनीवर पडलेलं लॉकेट त्याच्या पायाला लागलं होतं.
त्याने ते उचललं.

यावेळी त्यावरची अक्षरं बदलली होती.
आता तिथे पूर्ण वाक्य दिसत होतं..

“गर्भ जागा झाला की, घर पुन्हा आई शोधतं.”

आर्यनच्या हातातून लॉकेट खाली पडलं.

“नाही...”

त्याने स्वतःशीच पुटपुटलं.

“हे शक्य नाही...”

अचानक बाळ हसू लागलं.
पहिल्यांदा मंद.
मग थोडं मोठं.
आणि पुढच्या क्षणी...
त्या हसण्यात बाळाचा आवाज राहिला नाही.
संपूर्ण खोलीत एक विकृत, खोल हशा घुमला.
आर्यनने कान झाकले.

“बस!”
पण हशा थांबला नाही.

भिंतीवरची घड्याळाची काटी अचानक थांबली.
२:१७

आर्यनने घड्याळाकडे पाहिलं.

त्याच्या अंगावर काटा आला.
पुन्हा तेच.

तीच वेळ.

ज्या वेळेला सात दिवसांपूर्वी त्याची झोप उडाली होती.
ज्या वेळेला त्याने पहिल्यांदा आरशात स्वतःच्या प्रतिबिंबाला स्वतःपासून वेगळं होताना पाहिलं होतं.

ज्या वेळेला या घराने...
त्याला पहिल्यांदा हाक मारली होती.
मंत्रोच्चार पुन्हा सुरू झाला.
या वेळी मात्र तो घराच्या आतून नव्हता.
तो जणू भिंतींच्या आतून येत होता.

“ॐ... क्ष्रौं... ह्रीं...”

ॐ... क्ष्रौं... ह्रीं...”
....
....
....
....

आर्यनने डोळे घट्ट मिटले.

“हे सगळं थांबवा!”

आणि त्याच क्षणी त्याच्या कानात कुणीतरी अगदी हळू आवाजात म्हटलं...

“मंत्र थांबवायचा असेल तर... गर्भ पूर्ण करावा लागेल.”

आर्यनने डोळे उघडले.

समोर...
आरसा होता.
तोच मोठा चौकोनी आरसा.
पण या वेळी त्यात आर्यनचं प्रतिबिंब नव्हतं.
आरशात एक वेगळीच खोली दिसत होती.
त्या खोलीच्या मध्यभागी एक स्त्री उभी होती.
तिचे केस चेहऱ्यावर पसरलेले होते.
दोन्ही हात पोटावर होते.
ती गर्भवती होती.

आर्यनचा श्वास अडकला.

ती स्त्री हळूहळू डोकं वर करू लागली.

केस बाजूला झाले.
आणि तिचा चेहरा दिसला.

आर्यनच्या डोळ्यांत भीती दाटली.
कारण...
तो चेहरा अनोळखी नव्हता.
तो चेहरा...
अन्वीचा होता.

“अन्वी!”

आर्यन आरशाकडे धावला.
पण आरशातील अन्वी मागे सरकली.
आर्यनने काचेवर हात ठेवला.

“अन्वी! माझं ऐक! तू कुठे आहेस?”

आरशातील अन्वीने त्याच्याकडे पाहिलं.
तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते.
तिने ओठ हलवले.

“मी इथे नाही...”

आर्यन थिजला.

“मग कुठे आहेस?”

तिने हळूच स्वतःच्या पोटाकडे पाहिलं.
मग आर्यनकडे.
आणि कुजबुजली..

“तो माझ्यात नाही...”

आर्यनच्या अंगावर शहारे आले.

“कोण?”

अन्वीने उत्तर दिलं नाही.
तिच्या मागे अचानक एक काळी सावली उभी राहिली.
ती सावली इतकी उंच होती की तिचं डोकं आरशाच्या चौकटीबाहेर जात होतं.
अन्वीने घाबरून मागे पाहिलं.
सावली तिच्या अगदी जवळ आली.
आणि तिच्या कानाजवळ काहीतरी कुजबुजली.
अन्वीच्या चेहऱ्यावर अचानक भीती उमटली.
ती आर्यनकडे पाहून किंचाळली..

“आर्यन! आरशाकडे पाहू नकोस!”

आर्यन मागे हटला.
पण उशीर झाला होता.
कारण आरशातील सावलीने आता त्याच्याकडे पाहिलं होतं.
आणि...
ती हळूहळू हात वर करत होती.
आरशाच्या काचेवर तिची बोटं उमटली.
एक...
दोन...
तीन...
चार...
पाच...
जणू ती आतून बाहेर येण्यासाठी काचेला ढकलत होती.
टक्...
काच हलली.
टक्...
पुन्हा.
टक्... टक्... टक्...
आर्यन मागे सरकत गेला.

आणि अचानक त्याच्या मागून एका मुलाचा आवाज आला..

“बाबा...”

आर्यनने मागे पाहिलं.
पाळणा रिकामा होता.
बाळ गायब होतं.
पण पाळण्याच्या खाली...
एक छोटासा रक्ताचा ठसा होता.
तो ठसा जमिनीवरून पुढे जात होता.
हळूहळू...
आरशाकडे.
आर्यन त्या रक्ताच्या ठशांकडे पाहत राहिला.
आणि त्याला अचानक जाणवलं—
तो ठसा रक्ताचा नव्हता.
तो...
लहान पावलांचा ठसा होता.
पण त्या पावलांचे आकार...
माणसाच्या बाळाचे नव्हते.
ते उलटे होते.
टाच पुढे...
बोटं मागे.
आर्यनच्या अंगावर काटा आला.
पावलांचे ठसे आरशापाशी जाऊन थांबले.
आणि आरशाच्या काचेवर...
एक छोटासा हात उमटला.
मग दुसरा.
मग तिसरा...
आर्यनने डोळे मिटले.
पण त्याच क्षणी त्याला स्वतःच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला.
थंड.
बर्फासारखा थंड.
त्याने डोळे उघडले.
त्याच्या अगदी जवळ एक स्त्री उभी होती.
ओले केस.
पांढरा चेहरा.
पोटावर दोन्ही हात.
आणि डोळे पूर्ण काळे.
ती अन्वी नव्हती.
ती आरशातील तीच स्त्री होती.

ती हळूच आर्यनच्या कानाजवळ आली.
आणि कुजबुजली..

“तुझ्या बायकोला मी नाही आणलं...”

आर्यन श्वास रोखून उभा राहिला.
ती स्त्री हसली.

“तिने मला आणलं.”

आर्यनने थरथरत विचारलं.

“कुठे आहे अन्वी?”

त्या स्त्रीने हात पुढे केला.

तिच्या बोटाने जमिनीवर एक दिशेकडे इशारा केला.
बंगल्याच्या मागच्या बाजूला असलेल्या बंद खोलीकडे.
आणि ती म्हणाली..

“जिथे या घरात पहिल्यांदा गर्भाला मृत्यू दिला गेला...”

आर्यनचे डोळे विस्फारले.
ती स्त्री अचानक त्याच्या चेहऱ्याजवळ आली.
तिचा श्वास बर्फासारखा थंड होता.

“तिथेच तुझ्या मुलाचा जन्म ठरला आहे.”

आर्यनने मागे हटण्याचा प्रयत्न केला.
पण त्याच क्षणी ती स्त्री अदृश्य झाली.
फक्त तिचा मंद हशा खोलीत घुमत राहिला.

आर्यन काही क्षण स्तब्ध उभा राहिला.
मग त्याने स्वतःला सावरलं.
बंद खोली.
बंगल्याच्या मागची बाजू.
अन्वी.
गर्भ.
आणि...
या घराचा जुना शाप.
तो हळूहळू त्या दिशेने चालू लागला.
त्याच्या मागे आरसा शांत झाला.
पण आरशाच्या काचेवर...

एक वाक्य हळूहळू उमटलं..

“आर्यन... तू वडील होणार नाहीस.”

आर्यन... तू वडील होणार नाहीस.”

आर्यन... तू वडील होणार नाहीस.”


क्षणभराने त्याखाली दुसरं वाक्य उमटलं..

“तू फक्त ......

"तू फक्त........

"तू फक्त त्याचा जन्म घडवणार आहेस.”

आर्यन थांबला. त्याच्या पायाखालची वाळू जणू काय सरकत होती...

त्याने मागे वळून आरशाकडे पाहिलं.

आरशात आता कोणीच नव्हतं.

फक्त...

त्याचं स्वतःचं प्रतिबिंब.

पण त्या प्रतिबिंबाच्या मागे...

एक लहान मूल उभं होतं.

आर्यनने मागे पाहिलं.

कोणीही नव्हतं.

पुन्हा आरशात पाहिलं.

मूल अजूनही उभं होतं.

यावेळी ते हसत होतं..

आणि त्याच्या हातात...


अन्वीच्या मोबाईलसारखाच एक मोबाईल होता.

त्या मोबाईलवर एक नवीन मेसेज चमकत होता

“आई अजून जिवंत आहे.”

आर्यनच्या डोळ्यांत आशेची एक क्षीण चमक आली.
पण त्याच क्षणी पुढचा मेसेज आला

“पण किती वेळ... ते तुझ्यावर आहे.”

आणि त्याच क्षणी...
बंगल्याच्या मागच्या बंद खोलीतून एक किंकाळी ऐकू आली.

“आर्यऽऽऽन!”

तो आवाज...
अन्वीचा होता.

आर्यन पूर्ण ताकदीने त्या आवाजाच्या दिशेने धावला.
त्याला अजून माहीत नव्हतं...
की तो ज्या खोलीकडे धावत होता...
ती खोली गेल्या तीस वर्षांपासून आतून बंद होती.
आणि त्या खोलीच्या दारावर...
जुन्या रक्ताने एकच शब्द लिहिलेला होता

“आई.”....
..............…...........................................

क्रमशः.......भाग ४

भेटूया पुढील भागात, याच सोबत तुमच्या काही सूचना किंवा अभिप्राय असतील तर नक्की कळवा..!

आपला -
अविनाश शांताबाई भिमराव ढळे
( एक अस्वस्थमा )

Copyright ©️ avinash.b.dhale11@gmail.com