भाग १
संध्याकाळचे सात वाजले होते. जोशींच्या घरात सगळे हॉल मध्येच बसले होते.
सुरेंद्र जोशी त्यांच्या नेहमीच्या जागेवर वर्तमानपत्र वाचत बसले होते. चेहऱ्यावरचा कडकपणा अजूनही तसाच होता. मुख्याध्यापक म्हणून आयुष्यभर त्यांनी शिस्त पाळली होती. घरच्यांकडूनही तीच अपेक्षा होती.
शैलजा स्वयंपाकघरातून चहाचे कप घेऊन येत होत्या. धाकटी जाऊ सुषमा भाजी निवडत बसली होती. महेंद्र.. सुरेंद्र जोशींचा धाकटा भाऊ मुलगा देवर्षय सोबत ऑफिस मधून आल्यावर काही बोलत बसले होते. गार्गी... महेंद्र आणि सुषमाची धाकटी मुलगी मोबाईल मध्ये गुंतली होती.
हॉलच्या भिंतीवर लावलेल्या मोठ्या फोटोवर सगळ्यांची नजर अधून मधून जात होती.
दिव्यांश
हसरा चेहरा
एअरफोर्सचा युनिफॉर्म
फोटोला घातलेला हार
कालच त्याचा चौदावा झाला होता.
घरातले दुःख अजूनही ताजे होते.
बेल वाजल्याचा आवाज आला. गार्गी मोबाईल ठेवून दार उघडायला गेली. दार उघडताच ती जागच्या जागी थिजली...
"शिव... शिवदादा...?"
तिच्या आवाजातला धक्का ऐकून सगळ्यांनी दाराकडे पाहिलं. आणि पुढच्याच क्षणाला हॉलमध्ये शांतता पसरली.
दारात शिवांश उभा होता.
त्याच्या शेजारी एक मुलगी उभी होती.... साडी नेसलेली होती
तिच्या गळ्यात मंगळसूत्र होतं.
दोघांच्या हातात लग्नाचे हार होते.
सुरेंद्रांच्या हातातलं वर्तमानपत्र हातातून खाली पडलं. शैलजा स्तब्ध होऊन बघत राहिल्या. महेंद्र आणि सुषमा एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले.
शिवांशने त्या मुलीचा हात घट्ट पकडला आणि कोणाचीही नजर न चुकवता तो त्या मुलीला घरात घेऊन आला.
"ही श्रीजा... माझी बायको..."
काही क्षण तो थांबला.
"आम्ही लग्न केलंय आज."
घरात जणू बॉम्बच फुटला.
"काय?..."
सुरेंद्र जोरात ओरडले.
"तू लग्न केलंयस...?
त्यांच्या डोळ्यात आणि आवाजात अविश्वास होता.
"हो."
शिवांशचा आवाज शांत होता.
"अरे तुझ्या सख्ख्या धाकट्या भावाचा काल चौदावा झालाय. सगळं घर अजूनही दुःखात आहे. "
"थोडीतरी लाज शरम ठेवायची असते माणसाने!"
"त्याला जाऊन अजून पंधरा दिवसही झाले नाहीत... आणि तू लग्न करून बायको घेऊन घरी येतोस. "
सुरेंद्रांचा आवाज संतापाने थरथरत होता.
शैलजांच्या डोळ्यात पाणी दाटलं. त्यांना काहीच समजत नव्हतं.
श्रीजाने मान खाली घातली. तिच्या हाताची बोटं थरथरत होती.
"दादा शांत हो...आधी शिवचं म्हणणं ऐकून घेऊ."
महेंद्र मध्ये पडले.
"ऐकून घेऊ? यापेक्षा अजून काय ऐकायचं आणि बघायचं बाकी राहिलंय?"
सुरेंद्र संतापले होते. संतापाने त्यांचा चेहरा लाल झाला होता.
"भावोजी... आपल्याला माहिती आहे.. शिव कधीच बेजबाबदाऱपणे वागत नाही. काहीतरी कारण असेल. ऐकून तर घेऊयात. तुम्ही शांत व्हा."
सुषमानेही समजावण्याचा प्रयत्न केला.
"गार्गी, देव... तुम्ही आत जा दोघं... आम्हाला दादाशी बोलायचंय."
तिने दोन्ही मुलांना आत पाठवलं.
हॉलमध्ये पुन्हा शांतता पसरली. सगळ्यांची नजर शिवांशवर खिळली होती. तो काही क्षण काहीच बोलला नाही. मग त्याने श्रीजाकडे एक नजर टाकली. ती भितीने थरथरत होती. तिच्या डोळ्यात भिती स्पष्ट दिसत होती. शिवांशने एक दीर्घ श्वास घेतला. मग तो सावकाश शांत आवाजात म्हणाला,
"श्रीजा प्रेग्नेंट आहे."
क्षणभर कुणालाच काही कळलं नाही. सगळे त्याच्याकडे पाहत राहिले.
"तीन दिवसांपूर्वी मला कळलं . "
सुरेंद्रांच्या कपाळावर आठ्या पडल्या.
"म्हणजे?"
शिवांशने घट्ट मूठ आवळली. तो काही क्षण थांबला.
"आमच्या हातून चूक झालीये."
त्याचा आवाज आता जड झाला होता.
श्रीजाचे डॊळे घट्ट मिटले गेले.
"आणि त्या चुकीची जबाबदारी माझी आहे."
हॉलमध्ये शांतता पसरली.
सुरेंद्र खुर्चीतून उठले.
त्यांच्या चेहऱ्यावर संताप, दुःख, निराशा सगळं एकत्र दिसत होतं.
"शिव...."
ते रागात फक्त एवढंच म्हणू शकले.
शिवांश मात्र जागेवरून हलला नाही.
"म्हणूनच मी लग्न केलंय."
त्याचा आवाज ठाम होता.
"ह्या अवस्थेत मी श्रीजाला एकटीला सोडू शकत नाही."
हॉलमध्ये काही क्षण शांतता पसरली. शिवांशचं बोलणं ऐकून सगळेच स्तब्ध झाले होते. काय बोलावं ते कोणालाच सुचत नव्हतं. सुरेंद्रांच्या डोळ्यात संताप स्पष्ट दिसत होता. त्यांची नजर आधी शिवांशवर गेली आणि मग श्रीजावर.
"तू असं वागशील असं मला कधीच वाटलं नव्हतं शिव...."
त्यांचा आवाज थरथरत होता.
"तुझ्यावर सगळ्यात जास्त विश्वास होता माझा. तुझा अभिमान होता मला."
शिवांश शांत उभा होता.
"पण आज तू निर्लज्जपणाच्या सगळ्या मर्यादा ओलंडल्या आहेस."
शैलजांच्या डोळ्यात पाणी आलं. महेंद्र आणि सुषमा एकमेकांकडे अस्वस्थपणे पाहत होते. सुरेंद्रांची नजर श्रीजावर गेली.
"आणि तुझ्याबरोबर उभी असलेली ही मुलगी..."
"तेवढीच जबाबदार आहे अशा बेताल वागण्याला."
"अशा मुलीला मी सून म्हणून कधीच स्वीकारू शकत नाही."
श्रीजाच्या डोळ्यात पाणी तरळलं. तिची मान आणखी खाली गेली. शिवांशचा जबडा घट्ट झाला पण तो काहीही न बोलता शांत उभा राहिला.
"तुम्ही दोघेही आत्ता ह्या घरातून चालते व्हा. शिव तुझा आणि ह्या घराचा आता काहीही संबंध नाही."
सुरेंद्रांनी कठोर आवाजात शिवांशला सांगितलं.
शैलजांच्या हातातला कप खाली पडला. त्या मटकन खाली बसल्या. शिवांश घाईने आईच्या दिशेने पुढे झाला. पण त्यांनी त्याला हातानेच थांबवलं. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.
"माझा एक मुलगा नियतीने माझ्याकडून हिरावून घेतलाय...."
"आता माझा हा मुलगा तरी माझ्या नजरेसमोरून दूर करू नकात."
"मी हात जोडते तुमच्यापुढे."
म्हणत रडत त्यांनी हात जोडले. त्यांच्या डोळ्यातलं पाणी वाहत होतं.
सुषमा शैलजांजवळ गेली. तिने त्यांना आधार देत जवळ घेतलं.
"वहिनी शांत व्हा. स्वतःला सांभाळा. आपण मार्ग काढूयात."
महेंद्रही मोठ्या भावाजवळ गेला.
"दादा... तू शांत हो."
"शिवने लग्न केलंय. त्याची जबाबदारी तो स्वीकारतोय."
सुरेंद्रांनी महेंद्रकडे पाहिलं.
"असा टोकाचा निर्णय घेऊ नकोस."
महेंद्रचा आवाज बोलताना भरून आला.
"आपण दिव्यांशला गमावलंय. आता शिवलाही नाही गमावू शकत."
"भावोजी... शिव ह्या घरातला सगळ्यात मोठा मुलगा आहे. "
"असं करू नकात. रागात निर्णय घेऊ नकात."
सुषमाही डॊळे पुसत म्हणाली.
सुरेंद्र काही क्षण न बोलता उभे राहिले. मग वळले आणि रागारागाने आपल्या खोलीकडे निघून गेले. त्यांच्या जाण्याचा आवाज शांततेमुळे घरभर घुमला.
शिवांशने एक दीर्घ श्वास घेतला.
"ठीक आहे.... बाबांनी सांगितलंय तर मी आणि श्रीजा इथून निघून जातो."
शिवांश शांत आवाजात म्हणाला.
"शिव...."
शैलजा रडत म्हणाल्या. पण शिवांश काही बोलला नाही. तो भरभर पायऱ्या चढून वर आपल्या खोलीकडे निघून गेला.
श्रीजा जागच्या जागी उभी होती. अपराधीपणाने तिची नजर खालीच होती.
महेंद्र आणि सुषमा शैलजांना सावरत होते. तेवढ्यात सुषमाची नजर श्रीजावर गेली.
फिक्कट पडलेला चेहरा
डोळ्यांतली भिती आणि पाणी
चेहऱ्यावर जाणवणारा ताण
आणि पोटापाशी एकमेकांत गुंफलेले तिचे हात
क्षणात सुषमाला पुन्हा जाणीव झाली.... श्रीजा प्रेग्नेंट आहे.
"श्रीजा.... इथे सोफ्यावर बस. उभी नको राहूस."
तिच्या आवाजात मृदूता होती.
श्रीजाने वर पाहिलं. ती संकोचली पण मग सोफ्यावर जाऊन बसली.
सुषमा उठली आणि महेंद्रांकडे पाहून म्हणाली,
"चला... भावोजींशी बोलूयात."
ती आणि महेंद्र आत सुरेंद्रांच्या खोलीकडे गेले.
खोलीत सुरेंद्र खिडकीपाशी उभे होते.
"दादा.."
महेंद्रने सुरेंद्रांना हाक मारली.
"दादा राग बाजूला ठेवून थोडा विचार कर. "
"शिवला तू आत्ता घरातून बाहेर काढलंस तर तो जाईलही..."
"पण परत येईल की नाही माहीत नाही...."
"त्यांचं चुकलं पण.... जबाबदारी पण स्वीकारली ना त्याने. जे घडून गेलंय त्यात बदल होणार आहे का?"
"ह्या घराचा एक मुलगा आधीच गमावलाय आपण. आता दुसऱ्याला दूर लोटू नकोस. आपणच मोठया मनाने स्वीकारायला हवं."
महेंद्रचा आवाज बोलताना भरून येत होता. शिवांश आणि दिव्यांश दोघेही त्यांच्या अंगाखांद्यावर मोठे झालेले. दोघांवरही त्यांचा फार जीव होता.
"भावोजी... लग्न केलंय त्यांनी. आणि आपल्या शिवचं बाळ..."
सुषमा डॊळे पुसत म्हणाली. तिला बोलवेना पुढे.
"चला भावोजी... थांबवा शिवला."
ती भरल्या आवाजात म्हणाली.
खोलीत शांतता पसरली. काही क्षण कुणीच बोललं नाही. सुरेंद्रांनी डॊळे मिटून दीर्घ श्वास घेतला. पण ते वळले नाहीत. महेंद्र आणि सुषमाने काही क्षण थांबून त्यांच्या बोलण्याची वाट पाहिली.
"अहो चला... शिवला थांबवू."
सुषमा भरल्या आवाजात म्हणाली.
ते दोघेही बाहेर आले तेंव्हा... शिव बॅग घेऊन खाली उतरून येत होता. श्रीजा पण उठून उभी राहिली होती. शिवांशने तिचा हात धरला आणि तो दाराकडे वळला. महेंद्र पटकन त्याच्यासमोर येऊन उभे राहिले.
"कुठे निघालास?"
शिवांश काही बोलला नाही.
सुषमा पुढे झाली. तिने त्याच्या हातातून बॅग काढून घेतली.
"कुठेही जायचं नाहीये."
शिवांश तिच्याकडे पाहत राहिला.
"श्रीजाला घेऊन तुझ्या खोलीत जा."
"बाकीचं आपण नंतर बोलू."
ती ठाम आवाजात म्हणाली.
शिवांशची नजर सुरेंद्रांच्या खोलीकडे गेली.
"काकू निघतोय आम्ही."
शिवांश पुन्हा बॅग घ्यायला वाकला.
"शिव काकूचं एवढंही आता ऐकणार नाहीस का?"
सुषमाचा भरलेला आवाज ऐकून शिवांशचा चेहरा आता मवाळ झाला.
त्याने श्रीजाकडे बघितलं आणि म्हणाला,
"चल वर रूममध्ये जाऊ."
तो वर जायला निघाला... श्रीजा पण त्याच्या मागोमाग गेली.
To be continued........
*********************