आज काय नवीन...? Sudhanshu Baraskar द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आज काय नवीन...?

रोजच्या जीवनात सहज एखाद्या जुन्या ओळखीच्या व्यक्तीला भेटतो, तेव्हा गप्पांच्या ओघात एक प्रश्न हमखास विचारला जातो — “मग, आज काय नवीन?” किंवा कधीकधी आपल्या मनातही प्रश्न पडतो, “आज असं काय नवीन आणि PRODUCTIVE काम केलं?” जेव्हा केव्हा फोनवर बोलणं होतं, तेव्हा हा प्रश्न मला कायम वडिलांकडून आणि सरांकडून विचारला जातो. सुरुवातीला वाटायचं, रोज रोज काय नवीन करणार? पण जसजसा विचार करू लागलो, तसतसा या प्रश्नामागचा उद्देश लक्षात येऊ लागला. आपल्या प्रगतीची काळजी असणारी माणसं आपल्याला असे प्रश्न विचारतात, कारण त्यांना आपण केवळ दिवस काढावेत असं नाही, तर प्रत्येक दिवसातून काहीतरी शिकावं असं वाटत असतं. सामान्य माणसाची एक प्रवृत्ती असते. एकदा एखाद्या ठिकाणी आरामदायी वाटू लागलं की हळूहळू आपण त्याच चौकटीत राहायला लागतो. नवीन काही करण्याची इच्छा आणि त्यासाठी लागणारी इच्छाशक्तीही कमी होऊ लागते. थोड्या काळासाठी हे छान वाटतं; पण या सवयीचा परिणाम आपल्या भविष्यातील प्रगतीवर होऊ शकतो. काळानुसार बदलणाऱ्या जगात स्वतःला अद्ययावत ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे, मग ते कोणतंही क्षेत्र असो. पण या सगळ्यात एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते — प्रत्येक दिवशी काहीतरी मोठं किंवा वेगळं केलंच पाहिजे असं नाही. कधीकधी एखादी नवीन गोष्ट शिकणं, एखाद्या जुन्या गोष्टीकडे नव्या दृष्टिकोनातून पाहणं किंवा काल केलेल्या चुकीतून काहीतरी शिकणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. कारण नवीनपणा हा नेहमी गोष्टींमध्येच असतो असं नाही, तर त्या गोष्टींकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनातही असतो. शेवटी, प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी शिकवून जातो; प्रश्न एवढाच की आपण त्यातून काय शिकतो? वैयक्तिक उदाहरण द्यायचं झालं, तर UK मध्ये उच्च शिक्षणासाठी आल्यानंतर मला अनेक नवीन गोष्टी अनुभवायला मिळाल्या. इथल्या परंपरा, संस्कृती, लोक आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे भाषा! भारतात आपण इंग्रजीचा वापर करत असलो, तरी इथल्या दैनंदिन संभाषणातील भाषेचा सहजपणा आत्मसात करायला काही काळ लागतोच. नवीन वातावरणाशी जुळवून घेताना अनेक गोष्टी शिकायला मिळतात आणि त्यातून मिळणारा अनुभव शब्दांत मांडणं कठीण आहे. असो, सांगण्याचा उद्देश एवढाच की नवीन गोष्टी शिकण्याची आणि माहिती मिळवण्याची मजा काही वेगळीच असते!

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, घरी वडिलांशी कुठल्याही विषयावर चर्चा झाली की त्यांचा एक प्रश्न कायम असतो — “बाकी... आज काय नवीन?” कधी या प्रश्नाचं उत्तर असतं, तर कधी नसतं. पण या प्रश्नामुळे एक गोष्ट नेहमी जाणवते — जगाच्या दुसऱ्या टोकाला काय घडत आहे, कोणत्या नवीन घडामोडी होत आहेत आणि आपण स्वतः काय नवीन शिकलो, हे जाणून घेण्याची उत्सुकता कायम असायला हवी. कारण बऱ्याच वेळा बातम्यांमधून आपल्यापर्यंत पोहोचणारी माहिती आणि प्रत्यक्ष परिस्थिती यांत फरक असू शकतो. त्यामुळे कोणतीही गोष्ट समजून घेताना तिच्या मुळाशी जाणं आणि स्वतःची समज विकसित करणं महत्त्वाचं ठरतं. माझे गुरू आणि मार्गदर्शक यांच्यामुळे ही उत्सुकता आणि नवीन गोष्टी जाणून घेण्याची ऊर्जा मला नेहमी मिळत आली आहे. अभियांत्रिकी शिक्षणासाठी पुण्यात असताना कॉलेजमध्ये सरांसोबत नवीन तंत्रज्ञानाबद्दल सतत चर्चा व्हायची. अभियांत्रिकी पूर्ण करून पाच वर्षं झाली, तरी आजही आमच्या चर्चा त्याच उत्साहाने सुरू असतात. यातून गुरु-शिष्याचं नातं केवळ शिक्षणापुरतं मर्यादित नसतं, तर ते आयुष्यभर शिकण्याची प्रेरणा देणारं असतं, याची जाणीव होते. असं नातं काळानुसार अधिक दृढ होताना पाहणं, हेही एक वेगळंच समाधान आहे. त्यांच्या विचारांतून मला नेहमी एक गोष्ट शिकायला मिळाली आहे — आधीपासून अस्तित्वात असलेल्या गोष्टींचा वापर करून ज्ञान आणि कौशल्य विकसित करणं महत्त्वाचं आहेच; पण त्याच ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग करून काहीतरी नवीन निर्माण करणं आणि त्यातून समाजासाठी उपयुक्त योगदान देणं, याचं समाधान काही वेगळंच असतं. अस्तित्वात असलेल्या गोष्टी वापरण्यातून कौशल्य विकसित होतं; पण त्याच गोष्टींकडे नव्या दृष्टिकोनातून पाहून काहीतरी वेगळं निर्माण करण्यात खरी सर्जनशीलता दिसून येते. एखादी गोष्ट अनुभवणं, तिचा वापर करणं आणि त्यातून शिकणं यात काहीच गैर नाही. उलट, त्यातूनच नवीन कल्पनांना दिशा मिळू शकते. पण आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग करून एखादी समाजोपयोगी संकल्पना प्रत्यक्षात आणता आली आणि तिचा इतरांना फायदा झाला, तर त्याहून समाधानकारक गोष्ट कोणती? अर्थात, याबाबत प्रत्येकाची मतं वेगळी असू शकतात.

UK मध्ये शिक्षण घेताना मला नवीन माहिती मिळवण्याची आणि काही वेगळ्या तंत्रज्ञानांचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. या अनुभवांकडे मी केवळ शिक्षणाचा भाग म्हणून नाही, तर माझा दृष्टिकोन अधिक व्यापक करण्याची संधी म्हणून पाहतो. मनापासून केलेल्या प्रयत्नांतून मिळणारा आनंद, समाधान आणि सकारात्मक अनुभव आपल्याला समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देतात. आपल्या ज्ञानाचा उपयोग योग्य ठिकाणी झाला आणि त्यातून इतरांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडला, तर त्यापेक्षा मोठं समाधान दुसरं काय असू शकतं? या सगळ्यामागचा उद्देश एकच — नवीन संकल्पना, नवीन माहिती आणि नवीन तंत्रज्ञान यांचा योग्य मेळ घालून केलेल्या कामातून समाजाचं आणि पर्यायाने जगाचं कल्याण व्हावं. कारण प्रगती केवळ नवीन गोष्टी स्वीकारण्यात नसते, तर त्यांचा योग्य उपयोग करून त्याहून चांगलं काही निर्माण करण्यात असते. आणि कदाचित, अशाच छोट्या-छोट्या प्रयत्नांतून जग पुढे जात राहतं.

नवीन काही शिकण्याच्या किंवा करण्याच्या प्रवासात प्रत्येक वेळी यश मिळेलच असं नाही. कधीकधी अपयश येतं, अपेक्षेप्रमाणे परिणाम मिळत नाहीत किंवा आपण ठरवलेल्या मार्गात अडथळे येतात. पण कदाचित, अशाच वेळी आपल्याला सर्वाधिक शिकायला मिळतं. कारण प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवतो; गरज असते ती त्यातून मिळालेला धडा समजून घेण्याची. दिवसाच्या शेवटी स्वतःला एक साधा प्रश्न विचारता आला — आज मी काय नवीन शिकलो आणि कालपेक्षा आज स्वतःमध्ये काय सुधारणा केली? — तर कदाचित प्रत्येक दिवसाला एक नवा अर्थ मिळू शकेल. प्रगती नेहमी मोठ्या बदलांतूनच घडते असं नाही; कधीकधी रोजच्या छोट्या सुधारणाही आपल्याला खूप पुढे घेऊन जातात.

कालच्यासारखा आजही सूर्य उगवतोय,
नव्या दिवसासोबत जुनंच जग चालतंय...
 बदलतोय काळ की फक्त तारीख बदलतेय?
पण प्रश्न शेवटी तोच... आज काय नवीन?

— सुधांशू संजय बारस्कर