Where did we fall short? books and stories free download online pdf in Marathi

आम्ही कुठे कमी पडलो?

आम्ही कुठे कमी पडलो?
    
          
               आयुष्याच्या वाटेवर प्रत्येक व्यक्तीला प्रश्न पडतो की, आम्ही कुठे कमी पडलो? वयोपरत्वे केंव्हा तरी हा प्रश्न जाणवत असतो. तसा हा प्रश्न छोटा असला तरी, त्यामागे आपले संपूर्ण आयुष्य दडलेले असते. संपूर्ण आयुष्यातील संघर्ष, नाती, धडपड, स्वप्ने, अपेक्षा, यशापयश आणि चुका, आठवणी इत्यादी सगळ्यांचा हिशोब या प्रश्नात सामावलेला असतो.
               कधी मुलांकडे, तर कधी स्वतःच्या संसाराकडे पाहताना जाणवते. आपण कुठे कमी तर नाही पडलो ना! मग नाती जपतांना, संसार करताना हा प्रश्न नक्कीच डोळ्यासमोर येतो. कधी संसार करताना झालेल्या कळत नकळत घटनांमुळे व त्याच्या परिणामामुळे हा प्रश्न मनाला भावतो.
               कधी कधी जाणवू लागते की, एखादी संधी सुटून गेली तर नसेल, आपण योग्य वेळी धाडस केले असते तर किंवा परिस्थिती खडतर असेल, तेव्हा बचत केली असती तर किंवा थोडा अधिक अभ्यास केला असता तर यामुळे मनात पोकळी निर्माण होते आणि हा प्रश्न आणखी खोल होत जातो. सगळे असूनही आपण कुठे कमी पडलो तर नाहीं ना!
                 मात्र या प्रश्नाचा अर्थ स्वतःला दोष देण्यास नाही, तर उलट हा प्रश्न स्वतःला प्रामाणिक होण्याची संधी देते. 
                 दैनंदिन व्यवहारांमुळे मनुष्याला आयुष्य जगत असताना स्वतःकडे पाहायला वेळच मिळत नाही. सकाळपासून तर संध्याकाळ पर्यंत, जबाबदाऱ्या, कर्तव्य, कुटुंब, पैसा, मुलांचे शिक्षण, नोकरी आणि सामाजिक संबंध, नाते जोपासणे व भविष्याची चिंता, यामध्येच कुठेतरी हरवून जातो.
                 यातच वर्षानुवर्षी निघून जातात, पण निवृत्तीनंतर मात्र एक शांत संध्याकाळी मन विचलित होते आणि मन प्रश्न विचारते, "आपण आयुष्यात काय मिळवले आणि काय गमावले? " हाच प्रश्न दुसऱ्या प्रश्नाला जन्म देते, "आम्ही कुठे कमी पडलो?" 
                 कदाचित पैसा अधिक कमवू शकलो नाही, मुलांना चांगले शिक्षण दिले असेल की नाही, त्यांच्यासोबत पुरेसा वेळ घालविला की नाही, निर्माण झालेले गैरसमज व राग, याला संवादाने कमी करण्यात, कमी तर नाहीं पडलो ना! असे सारखे वाटायला लागते. कधी कधी "तिला माझ्या मनाची कल्पना आहे किंवा त्याला स्वतःहुनच समजेल", 'मीच आधी बोलू कां?' या विचारांनी नाती दुरावली तर नाही ना! 
                कधी कधी समोरच्याला अधिक स्पष्टीकरणाची गरज नसते. फक्त एवढेच ऐकायचे असते, 'मी तुझ्यासोबत आहे.' किंवा 'तुला काय वाटते, मला सांग.' हे दोन शब्द बोलण्यात कमी तर नाही पडलो, असे अनेक प्रश्न निर्माण होतात.
                     दुसऱ्या बद्दलचे प्रेम मनात असणे व ते व्यक्त करणे, यात खूप मोठा फरक असतो. आपल्याला आपल्या जोडीदाराची काळजी असते. पण 'तू माझ्यासाठी महत्त्वाचे आहेस.' हे म्हणायचे राहूनच गेलेले असते. प्रेम मनात ठेवले तर ते कसे कळणार? कधी कधी माणूस आयुष्यभर प्रेम करत राहतो, पण ते व्यक्त न केल्यामुळे समोरच्याला प्रेम करतच नव्हता, असे सारखे वाटत राहते. यातूनच गैरसमज निर्माण होतात व प्रश्न पडू लागतो की, 'आम्ही कुठे कमी पडलो?' मग वाटते प्रेम करण्यापेक्षा प्रेम व्यक्त करण्यात अधिक महत्त्वाचे असते.
                     बोलणे प्रत्येकालाच आवडते. पण बोलण्याच्या पाठीमागील भावना अधिक महत्त्वाची असते. जोडीदार म्हणतो, 'अलीकडे तू माझ्याशी फार कमी बोलते.' त्या वाक्याच्या मागे 'मला तुझी साथ हवी आहे.' हे समजूनच घेत नाही. आपण शब्दांकडे लक्ष देतो, पण शब्दांच्या भावनांकडे लक्ष देत नाही. यातूनच गैरसमजाचा जन्म होतो. याच ठिकाणी नाती कमकुवत होतात.  
                  कधी आपण परिस्थिती समजून घेण्याआधीच निर्णय घेतो. मग आपल्याला वाटते की, मी समजून घेण्यात कमी पडलो. म्हणूनच माझ्या मतें, एकमेकांच्या संवादातील शब्दातच शक्ती असते. ती नात्यांना जोपासत असते.
                    आपण कधी कधी अहंकाराला अधिक महत्त्व देतो. 'तिने आधी बोलावे' 'मीच कां बोलू ' यामुळे देखील दोघांमधील अंतर वाढत जाते. तेवढ्यातच आजूबाजूच्या व्यक्तींनी अतिशयोक्ती करून केलेले खोटे कथन ही अधिक प्रभावी ठरते. तेच अनुकूल वाटायला लागते. त्यातूनच दोघांमध्ये अंतर वाढते. कधी कधी तर संशय निर्माण झाला, तर आयुष्यभर त्याची ठिणगी जाणवत राहते. 
                  माणूस चुका करतो आणि कायमचे मनात ठेवतो. त्या आठवणी, आपल्याला जाणवतात. दुःख देतात. प्रसंगी रडविते. मग स्वतःलाच दोष देत राहतो. यावर माफी मागणी योग्य ठरते. जर पूर्वीसारखी नाती होत असेल तर माफी मागायला काय हरकत आहे? मनात राग येऊन जगण्यापेक्षा मन मोकळे करून जगण्यात काय हरकत आहे. मात्र गैरसमजातून वाद निर्माण झाले तर मग ब्रम्हदेवही अवतरले तरी तो राग जात नाहीं. संशय हा शब्द तसा भयानक असतो. कधी कधी संपूर्ण जीवनच उद्धस्त होते. त्यावर सद्या तरी औषधं उपलब्ध नाहीं. असेल तर मला कळवावे. कारण मी त्याच आजाराने पीडित आहो.
                 आपण कधी कधी आपल्या मुलांसाठी खूप काही करतो. त्यांना प्रत्येक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. पण त्यांना त्या सुविधांचा कसा उपयोग करावा, हे सांगण्यास कमी पडत असतो. मुलांना आपण महागडे मोबाईल घेऊन देतो. महागडे कम्प्युटर घेऊन देतो, पण त्याचा वापर कसा करायचा, हे मात्र सांगत नाही. परिणामत: त्या साधनांचा दुष्परिणाम आपल्याला जाणवू लागते. आपण कुठेतरी कमी पडू लागतो.
                   आपण अनेकदा मुलांवर स्वप्नांचे ओझे लादतो. 'तुला हेच करायचे ', 'डॉक्टर व्हायचेच आहे' 'इंजिनियरच झाला पाहिजे.' तू खेळायला जाऊ नको, टीव्ही पाहू नको, फक्त अभ्यासच कर, असे सारखे विचारांचा भडीमार, या बालमनावर करीत राहतो. खरं तर, मुलांना आपल्या अनुभवाची गरज असते. आपल्या आदेशाची गरज नसते, हे आपण जाणून घेतले पाहिजे.  
                  आई-वडिलांनी आपल्या मुलांना शक्य तेवढा वेळ, मुलांच्या सानिध्यात घालावयास पाहिजे. सवांदाने त्याला आपलेसे करून घेऊन त्याच्या भविष्याच्या काळासाठी धडे शिकवले पाहिजे. केवळ आदेश देऊन त्यांच्याशी सतत दडपण आणण्याऐवजी त्यांचे सोबत राहून, आपल्या अनुभवाचे कथन करावयास पाहिजे. म्हणजे आपल्याला 'आम्ही कुठे कमी पडलो?' या प्रश्नाचे उत्तर मिळेल.
                   शेवटी आयुष्यात जीवन जगतांना पैसा व संपत्ती गोळा करण्यापेक्षा आयुष्य खरोखर जगलो काय? स्वतःच्या आरोग्याची व आरोग्याकडे लक्ष दिले काय? मित्रांच्या अडीअडचणी कडे लक्ष दिले काय? नाती किती जोपासली, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. 
                   चुकीच्या वेळी संसारात मौन पाळणे फार महत्त्वाचे असते. हा अबोला नसतो तर एकमेकांना समजून घेण्याचं काळ असतो. चूक कुठे होत आहे, हे समजून घेण्याचा काळ असतो. अशा वेळेस मौन 
औषधासारखे काम करते. कधी बोलायचे आणि कधी शांत राहायचे, हीच नात्यांची खरी कला असते. कधी कधी प्रश्न आपोआप सुटतात. प्रश्नातच उत्तर शोधायचे असते. 
                     चूक मान्य करणे, ही व्यक्तिमत्त्वाची मोठी ताकद असते. पण आपण काय करतो, दुसऱ्याला दोष देतो. चुकीच्या वेळेस एकमेकांशी वाद घालतो. परिणामत: नाते दूर होऊ लागते. एकमेकांच्या मनात दुरावा निर्माण होऊ लागतो.
                    आता आपल्याला पडलेल्या प्रश्नांकडे वळलो असता लक्षात येते की, पैसा कमाविण्यात कमी पडलो नाही, तर माणसे जपण्यात कमी पडलो.
                     घर उभे करण्यात कमी पडलो नाही, तर घरातली माणसांची मने, भावना, जोपासन्यात कमी पडलो.
                     मुलांना शिक्षण देण्यात कमी नाही पडलो, तर त्यांना जीवनाचे मूल्य समजावून सांगण्यात कमी पडलो. 
                      जग जिंकण्याच्या प्रयत्नात, स्वतःला व स्वतःची मने जिंकण्यात कमी पडलो. 
                      बोलण्यात कमी नाही 
 पडलो, ऐकण्यात कमी पडलो.
                      प्रेम करण्यात कमी नाही पडलो, ते व्यक्त करण्यात कमी पडलो. 
                      मी इतरांना समजून घेताना, स्वतःला समजून घेण्यात कमी पडलो.
                    शेवटी, 'आम्ही कुठे कमी पडलो' हा प्रश्न पश्चातापाचा नाही, तर नवीन बदल घडवून आणण्याची सुरुवात आहे. आज आपण निर्णय घेऊ शकतो की, कुठेही कमी पडायचे नाही, ज्या व्यक्तींशी बोलायचे आहे, तिच्याशी बोलायचे. मित्रांना वेळ द्यायचा. आवडीनिवडी पूर्ण करायची. एखादा छंद जोपासयाचा. म्हातारपण एक आनंदाचा क्षण असतो. जे संपूर्ण जीवन कालावधीत करता आले नाही, ते पूर्ण करण्याची एक संधी असते. बिनधास्त जगायचे आणि म्हणायचे, 
    "I don't care what the world thinks."
                      चला आता. स्वतःशीच वचन घेऊ या.  
                     "वेळ मिळेल तेव्हा प्रेमासाठी वेळ काढू. ज्यांच्याशी बोलावेसे वाटते, त्यांच्याशी बोलू. मनातले दुःख दडवून ठेवायचे नाही. माणसे जितकी जपता येईल, तेवढी जपायची."
                      कारण शेवटी आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या सोबत संपत्ती, पद, प्रतिष्ठा, प्रसिद्धी बसणार नाही, तर जोपासलेली नाती असतील. त्यांच्या चेहऱ्यावरचे स्मित हास्य असेल. त्यांच्यासोबतचे क्षण आठवायचे. त्यावेळेस पश्चाताप नसून उत्तर जवळ असेल. 
                    'हो ' काही ठिकाणी कमी पडलो असेल, पण आता ते ओळखले. उरलेले आयुष्यात माणसे जपायची, नाती जपायची, त्यांना आनंद द्यायचा व मनापासून जगण्यात आयुष्य घालवायचे. 
                    हीच खरी आयुष्याची संपत्ती. हीच खरी माणुसकी. 
                    आणि याच जाणिवेतून आयुष्याची सर्वात सुंदर सुरुवात करायची आणि म्हणायचे, "आता आम्ही कुठेही कमी पडायचे नाही,"
                  हो की नाही.
    
 दि. 10 सप्टें, 2026.
    
                  प्रा. डॉ. विनोद राऊत 
       सेवानिवृत्त प्राध्यापक (वाणिज्य) 
                        अमरावती.

इतर रसदार पर्याय