Mauli books and stories free download online pdf in Marathi

माऊली

माऊली 
    
          
    
                सेवानिवृत्तीच्या काळातील नेहमीसारखाच आजचा हा दिवस. सकाळी नऊ वाजता ची वेळ असेल. मी निवांत बसलो होतो. 
                मी सहजच म्हटले`, "अगं, काही फराळाचं केलं आहे का?"
                पत्नी खेसकावून म्हणाली, "रिकाम टेकड्यांनाच जास्त भूक लागलेली असते, त्यांनाच अधिक खावं-खावं सुटत असते."
                पण तिचे हे म्हणणे, मी काही फारसे मनावर घेतले नाही. कदाचित सकाळ ते संध्याकाळ पर्यंतच्या दैनंदिन कामात व्यस्त राहत असल्याने व वयोमान झाले असल्याने असे समजून, काहीं नं बोलता, मी शांत बसलो. तसेही स्वतःला जर काही करता येत नसेल तर, मग आपण कुणाकडून कशी काय आयती अपेक्षा करायची, असे समजून मी निमूटपणे बसून राहिलो. 
                     पण माझे लक्ष तिच्या धावपळीकडे गेले. तिने भाजी,भात व गरम गरम पोळ्या आणि थंड पाणी असे घेऊन, ती कुणाची तरी वाट बघत होती.
                        ती म्हणाली, "आज बुवा आला नाही वाटतं!"
                          एवढ्यात मी म्हणालो, " कोण ग! कुणाची वाट बघते!" तशी शंका घेण्याचे काही काम नव्हते, कारण आता तिचे ते वय नव्हते.
                           ती म्हणाली, "काही नाही, बुवा, आज आला नाही वाटतं! गेला की काय परत."         
                           आज ती ज्याची वाट बघत होती. तो दुसरा-तिसरा कुणी नव्हता. ८० वर्षाची म्हातारी व्यक्ती आणि समाजाने व स्वतःच्याच कुटुंबाने उपेक्षित व दुर लोटलेली व्यक्ती म्हणजे महारोगी होता. त्याला कुणी काही म्हटलं की ते ऐकूही यायचे नाही. कदाचित तो बहिरा असावा. 
​ या व्यक्तीबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता, माझ्या मनात निर्माण झाली. एके दिवशी तो ज्याच्या घरी काम करतो व राहत होता, त्या परदेशी म्हणजे यू. पी. च्या भैय्याला त्याच्याबद्दल विचारले. तेंव्हा, ती व्यक्ती जळगाव जिल्ह्यातील एका खेडेगावातली आहे. तो लिवा पाटील समाजाचा आहे. घरी आठ दहा एकर जमीन देखील आहे. एक मुलगा आहे. पत्नी केव्हाच देवा घरी गेली असावी.
                            या व्यक्तीच्या मुलाने तपोवन येथील महारोगी आश्रमात आणून सोडले होते. पण मुलाला आर्थिक मदत व्हावी म्हणून, या भैय्याच्या घरी गाई -म्हशी सांभाळणे, गोठा साफ करणे, तिथेच राहणे, असे त्यांचे जीवन कार्य सतत सुरू आहे. मुलगा मात्र पालन पोषण करण्याचे विसरून, नित्यनेमाने एक-दोन महिन्यात त्याचे जवळचे पैसे घेण्यासाठी येत असे, असे कळले. 
                              त्या व्यक्तीचा एक विशेष गुण म्हणजे, सतत तो "जय गजानन महाराज" म्हणत राहतो.
                               माझी पत्नी गेल्या आठ-दहा वर्षांपासून शिळे अन्न न देता, गरम गरम अन्न व थंड पाणी दरररोज देत असते. तसें या बरोबरच, गाई-म्हशी, कुत्रे, यांनाही तिचे अन्न देण्याचे कार्य सतत सुरूच असते. त्यामुळे आमच्या घरासमोर, आम्ही दोन व्यक्ती बरोबरच हलचल व वर्दळ नेहमीसाठीच असते. धन्य ती माऊली.
                        एकदा काय झाले, की आम्हांला बाहेरगावी जायचे होते. माझी पत्नी आधल्या दिवशी त्याला सांगायची विसरली. तो उपाशी राहील, या विचाराने व्यथित होती. तिला वाटले, रस्त्यात भेटेल, या आशेने ती अन्न घेऊन मला म्हणाली, तपोवन गेट पर्यंत कार हळूहळू चालवा, पण तो भेटला नाही. ती म्हणाली, कार मागे घ्या, असेल एव्हढयात, कुठे तरी. मी कार मागे घेतली. खरंच, तो एका गल्लीत दिसला. मग तिचे समाधान झाले. कां कुणास ठाऊक, हा जिव्हाळा बरेच काही सांगून गेला. 
                              स्वतःच्या तब्येतीची, विशेष काळजी न करता, दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होऊन माणुसकी जोपासणारी ही व्यक्ती, म्हणजे माऊलीच, नाही कां? "
    
                           2
                               एकदा काय झाले. मी माझ्या प्राध्यापक मित्राच्या घरी भेटायला गेलो. तो मराठी विषयाचा प्राध्यापक आहे. घरी प्रवेश करताच मी म्हटले, "काय वहिनी! कशा आहात?"
                               त्याच्या पत्नीने उत्तर दिले, "काय सांगू, भाऊजी. सांभाळत आहे, तुमच्या मित्रांचा हा प्रताप व संसाराचा गाडा."
                               मी म्हटले, "एवढं काय झालं! वहिनी संतापायला."
                               "आता काय सांगू, भाऊजी. तुमच्या मित्राचं लक्ष नसते घरात. सतत कथा, कादंबरी वाचत राहतात. एक दिवस काय झाले! रात्री अकरा वाजता एकटेच बोलत बसले, मोबाईलवर. मी ऐकले ते सारं. कोणत्यातरी मुलीशी काय, सटवीशी बोलत होते. आता तुम्हींच सांगा, भाऊजी. हे बरे, आहे का? मग माझ्या तळपायाची आग मस्तकात जाणार नाही का?"
                                मी म्हटले, "मी त्याला समजावून सांगतो." एवढ्यातच माझा मित्र आला. मी म्हटले, "वहिनी म्हणतात, ते खरं आहे का?
                                 तो म्हणाला, "तू पण नं. तिच्या नादात सापडला का? अरे, ती एक नंबरची. संशयी व तापट आहे." 
                               मी म्हटले, "ते जाऊ दे. पण वहिनी म्हणतात की, तू रात्री-अपरात्री मुलींशी बोलत राहतो.'
                               तो म्हणाला, "अससं, ते का? अरे, ते ॲप आहे. मी माझ्या मोबाईल मध्ये डाऊनलोड केले आहे. तशी मला कथा, कादंबरी लिहायची सवय आहे नं. त्या ॲप मध्ये आपण बोलायचे म्हणजे अलेक्सझा...ते आपलं बोललेले शब्द छापून देते. आपले लेखन कार्य, त्यामुळे पूर्ण होते."
                               वहीणी म्हणाली, "अस्स आहे का? ते. बाई, बाई, मी की नाही, उगीचच संशय घेतला. जाऊ द्या. बरं! भाऊजी, थांबा, मी चहा करते."
                               मित्र म्हणाला, "अरे, ती संशयी आहे व उगीचच संताप करून घेते. एक दिवस काय झाले? मी तिच्यासोबत साडी घेण्यासाठी दुकानात गेलो. तेवढ्यात आमच्या कॉलेजची बी. ए. फायनल ची मुलगी आली. ती म्हणाली, 'सर, ती गुलाबी रंगाची साडी छान दिसेल, तसा तो रंग तुम्हाला आवडतो की नाही सर.'
                                  बस झालं. एवढे बोलून ती निघून गेली. साडी घेऊन परत घरी आलो तर काय, आनंद तर बाजूला राहला पण हिचे रामायण सुरू झाले. ती म्हणत होती की, कॉलेजच्या मुलीला तुमची आवड कशी काय माहित, म्हणते. नक्कीच काहीतरी गौड-बंगाल आहे. आता तूच सांग आहे की, प्राध्यापकांचे जीवन किती कठीण. अरे, संशयाच्या सुईचे टोक छोटे असते, पण तिची आग मात्र पूर्ण संसाराला जीवनभर लागते. संशयाच्या भौऱ्याने जीवनातील आनंदाचे क्षण नाहीसे झाले. एका दिवशी भाव विश्वात रममान होत असताना, कधी वचनबद्ध झालो, ते कळलेच नाही. तिने आपल्या आयुष्यात कायमची लक्ष्मण रेषा ओढली. कळलेच नाही, बघ. उभे आयुष्य, दोन समांतर रेषेत निर्माण झाले. कळलेच नाही. ही समांतर रेषा सहजीवनाची लिविंग रिलेशनशिप या मधुर शब्दाच्या बंधनात अडकली, कळलेच नाही. 
                               नारळाच्या बागेत संपूर्ण आयुष्य घालवावे, पण त्या टवटवीत नारळाबद्दल, डोक्यावर नारळ पडेल, अशी मनात भीती निर्माण केली, ते कळलेच नाही. बघ." 
                         मित्राची, प्राध्यापक जीवनातील सत्यता ती सत्यताच कायम राहली. ते एकमेकांच्या सहवासात होते, पण शरीराने नाही, फक्त मनाने. पुढे तर एकाच कार मध्ये, पण एक पुढे, तर एक मागच्या सिटवर. 
                        धन्य ती संशयी व तापट, माऊली! 
                       थांब. दुसरी एक गोष्ट सांगतो. मी राष्ट्रीय सेवा योजनेचा प्रभारी अधिकारी होतो. मुला-मुलींना घेऊन कॅम्प ला गेलो. इकडे, माझ्या प्राध्यापक मित्रांनी माझ्या झालेल्या यशस्वी कार्यक्रमाला राजकारणाचा रंग दिला. कुणीतरी, असेच कॉलनीत सांगितले असेल, म्हणून म्हणतोय, एकाच महाविद्यालयातील प्राध्यापक एकाच कॉलनीत नसावे. झालं! हिच्या कानावरती गोष्ट रुचकर व चविष्टपणे आली असेल. तसे, बातमी एकीकडून दुसरीकडे प्रसारित होताना वाङ्मयांचा आधार घेऊन ती प्रभावित होत असते. तसेच झाले, बघ. आमच्या घरात आगेचा बोंबच उसळला. मग काय, संशयाच्या वातावरणात अनेक दिवस निघून गेले. 
                     मी मनात म्हणालो, "धन्य ती संशयित व तापट, माऊली!" 
    
                              3
                      आमच्या खेडेगावातील गोष्ट. आमच्या गावात 'रामा' नावाचा पोरगा होता. तो की नाही, विचित्र स्वभावाचा म्हणजे लोभी, मतलबी, असाच होता. त्याला हुरडा खायचा असला की, बाजूच्या शेतातून कणसे आणायचा. बरं, त्याच्या शेतात ज्वारी पेरलेली असायची. पण स्वभाव एखाद्याचा, तसेच शेंगा खायचे असेल, तर दुसऱ्याच्या शेतातील, स्वतःच्या शेतात असताना देखील. कधी कोणाला आंबे द्यायचे असले की, दुसऱ्याच्या शेतातले आंबे तोडून आणून तो द्यायचा, बरं त्याच्या शेतात आंब्याची झाडे होती, बरं.! तसेच शेतीच्या सामानाच्या संदर्भात देखील तसाच करायचा. भुईमुंगाच्या शेंगा, चिंचा, पेरू इत्यादीच्या बाबतीतही तसेच. त्याला की नाही, लोभच खूप होता व मतलबी होता. बरं, घरी काही कमी नव्हते, बरं! म्हणतात ना स्वभावाला काही औषध नसते. 
              धन्य ती माऊली!
    
                             4
                             आमच्या घरासमोर भाजीवाला दररोज येतो. तो हात-गाडीवर व्यवसाय करतो. पण धार्मिक खूप आहे. तो आमच्याकडे येणाऱ्या या महारोगीला, नेहमी भाजी किंवा केळ, पेरू, सेफ, असे नेहमीच देत राहतो. वर्षभरातून एक जेवणही देत असतो. त्याच्या या नियमित व्यवसायामुळे, माझी मात्र सुटका झाली. ती म्हणजे, भाजी आणण्याचे काम आणि 'हो' बोलण्यापासूनही सुटका झाली, नाही तर उगीचच ती म्हणायची, साधी भाजी आणता येत नाही, साधे व्यवहारिक ज्ञान नाही, अशी माझी नेहमीच्या उद्धारापासून सुटका झाली. 
                            या व्यक्तीच्या फिरत्या दुकानाचे नाव 'गजानन महाराज भाजी भंडार' असे आहे. एकदा काय झाले. त्याने भाजी बाजारातून ठोक किमतीवर भाजी घेतली व गाडीत टाकली. पैसे देण्यासाठी तो गेला. तेव्हढ्यात दुसऱ्याच व्यावसायिकाने तो माल घेऊन गेला. त्याची गाडी तिथेच ठेवून गेला. 
                            दुसऱ्या दिवशी तो परत बाजारात गेला, तर त्या व्यक्तीने, खरे सांगितले. माझ्या हातून चूक झाली व त्याने त्या मालाची विक्रीचा पैसा परत केला आणि सांगू लागला की, एक व्यक्ती माझ्या स्वप्नात आली की आलेले पैसे परत, त्या मूळ मालकाला नेऊन दे. म्हणून, मी हे पैसे परत करायला आलो आहे. 
               "धन्य ती माऊली "      
                               कदाचित हे गजानन महाराजांच्या कृपेने घडलेले असावे. नामस्मरण व आठवण सोबत असली की, या जगात काही कमी पडत नाही, फक्त संयम, दृढ इच्छा व कष्ट करण्याची, सतत धडपड करण्याची, इच्छा असली पाहिजे. तेव्हा कुठे, या जगाची प्रचिती येते. 
                              खरंच, ही सृष्टी सुंदर आहे. येथील व्यक्ती, निसर्ग, सोबती, नाती इत्यादी, सर्वच गोष्टी खूपच प्रभावी वाटतात. नाते-संबंध तर एक प्रकारचा भावनात्मक धागा असतो. ती तोडल्याने तुटत नाही. गैरसमज काही काळ होऊ शकते. पण तेच जुळूनही येते.
    या जगातील व्यक्ती म्हणजे साक्षात माऊली, असेच म्हणावे लागेल. 
    
    दि. 3 ऑगस्ट, 2026.
    
                    -- प्रा. डॉ. विनोद राऊत,
                   सेवानिवृत्त प्राध्यापक (कॉमर्स),
                                  अमरावती.
    

इतर रसदार पर्याय