Did I do something wrong? books and stories free download online pdf in Marathi

माझं काही चुकलं का !

माझं काही चुकलं का !

                       सेवानिवृत्तीनंतरचा काळ हा विश्रांतीचा काळ समजला जातो. पण जीवनभर काबाडकष्ट करून, कधी मन मारून, तर कधी मनोरंजनाला दूर सारून, तर कधी गरीबीत दिवस काढलेले असते. काही वेळेस तर परिस्थिती नसतांना देखील संकटातून मार्ग काढलेला असतो. त्यातूनच घर आणि थोडीफार पुंजी भविष्यासाठी राखून ठेवलेली असते. परंतु काळ बदलतो आणि एक दिवस संकटे उभे राहतात. 
                     असेच काहीसे विनायकच्या जीवनात घडले होते. मी सहजच विनायकला म्हणालो, "एवढे काय झाले रे! तुम्ही दोघेही चिंतेत आहात." तो म्हणाला, "आमचे निर्णय चुकलेत की काय? कुणास ठाऊक! आम्ही आता एकटेच पडलो." माझी उत्सुकता आता अधिकच वाढली. मी म्हणालो, "मला सांग बरं! त्यावर काही उपाय पाहता येईल." विनायकच्या शब्दात.......

                   सेवानिवृत्तीनंतर मला आता सुखी जीवन लाभले होते. आम्ही दोघेच आता आनंदाने राहत होतो. माझा मुलगा अमोल हा कम्प्युटर इंजिनियर झाला होता. त्याची पत्नी देखील नोकरीवर होती. तो नेहमीप्रमाणेच एक दिवस स्वतःच्या मोटर कारने पुण्यावरून भेटीसाठी येथे आला होता. त्याने रात्री जेवण घेत असतांना विषय काढला. तो म्हणाला, "बाबा, मी पुण्याला फ्लॅट घेतो आहे. त्यासाठी पुरेसे पैसे बँकेकडून कर्ज रुपात काढलेले आहे."
                     मी म्हणालो, " फार छान. योग्य निर्णय लवकर घेतलास. काही अडचण आहे कां?" मात्र आमचे हे संभाषण चालू असतांनाच मध्ये सुनबाई बोलली व म्हणाली, "आमचे मत असे आहे की, तुम्ही दोघेही इकडे एकटेच राहता हे आम्हाला बघवत नाही. तुमची चिंता लागलेली असते. तुम्ही व आई पण आमच्याकडे चला, असे म्हणतो. वाटल्यास हे घर विकून टाका व त्याबदल्यात आपण फोर बीएचके प्रशस्त फ्लॅट घेऊ. आपण सर्व तिथे स्वतंत्र व आनंदात राहू."
                     तेवढ्यात माझ्या जीवनसाथीने देखील, तुमचे विचार चांगले आहेत, अशी मान्यता दिली. मात्र माझे मन विचारात पडले. रात्री पत्नीने देखील म्हटले की, "आपली मुलं किती समजदार झाली आहेत, नाही का?"
                     मी म्हणालो, "त्यांच्याकडे काही दिवसांसाठी जाण्यास हरकत नाही. पण त्यांनी म्हटलेली कल्पना मला आवडली नाही बघ! आयुष्यभरात मिळवलेले घर व उरलेला पैसा असा खर्ची घालणे, माझ्या मनाला योग्य वाटत नाही."
                     पत्नी म्हणाली, "तुमचे जन्मभर विचार असेच आहेत. आयुष्यभर कधी आनंद बघवत नाही. माझं आयुष्यच गेलं असं मेलीच. जन्मभर सारवासारव करण्यात गेले. आता कुठे थोडे सुखाचे दिवस आलेत तर तेही तुम्हांला बघवत नाही." असे म्हणून ती रागाने निघून गेली.
                      मी दोन-तीन दिवस विचारच करीत बसलो होतो. मनाला हे विचार पटतच नव्हते, पण काय करणार? तीन मतें एका बाजूला झुकलेली असताना वजनाचा काटा तरी काय करणार?
                      शेवटी मी नाईलाजाने होकार दिला आणि पैशाचा हिशेब केला. बँकेत 40- 50 लाख रुपये शिल्लक होते. ते काढण्या साठी बँकेत गेलो. तेवढ्यात तेथील शिपायाने आवाज दिला. तुम्हांला मॅनेजर साहेब आंत मधे बोलावत आहे. मी त्यांच्याकडे कडे गेलो. त्यांनी मला बसायला सांगितले व चहा ही बोलाविला. मॅनेजर म्हणाले, "सर, तुम्हीं मला ओळखलंत का? मी तुमच्या 1982 च्या बॅचमधील विद्यार्थी." मग माझ्या लक्षात आले की खरंच माझ्या नोकरीच्या काळातील पहिल्या वर्षातील हा विद्यार्थी होता. त्याला भेटून खूप आनंद झाला. कारण हीच माझी खरी संपत्ती होती व हे माझे खरे धन होते. तो म्हणाला, "सर, तुम्हांला यासाठी बोलावले होते की, तुमचा पैसे काढण्याचा फॉर्म माझ्याकडे आला आहे. आपण खात्यातील पूर्ण पैसे काढत असल्याचे कळले म्हणून. योगायोगाने माझे गुरु मला भेटले. पण सर, तुम्ही एकाएकी एवढे सारे पैसे कां काढता बरं!" मी त्याला सर्व हकीकत सांगितली.
                       तो म्हणाला, "ठीक आहे. पण खरं सांगू कां, सर तुम्ही कमीत कमी पाच लाख तरी तुमच्या नावाने राहू द्या. ते मुदती ठेवीत टाका. असू द्या, औषधी पाण्याला भविष्यासाठी आणि हं स्वतःचे घर मात्र न विकता थोडे दिवसांसाठी मुलांकडे जाऊन या".
                      आता मलाही हे त्याचे विचार पटलेले होते. एकदम आधारच वाटला होता. मी काढलेले पैसे मुलाच्या हातात दिले. त्याला आनंद झाला. मी त्याला समजावून सांगितले की, मी सध्याच घर काही विकत नाही. घाई-घाईत घर विकलेत तर किंमत येणार नाही. असे सांगून निर्णय हा लांबणीवर टाकला. मात्र इकडे पत्नी नाराज झाली होती. ती आपल्या मुलांकडे कायमस्वरूपी जाण्याचे पूर्णपणे तिने मनात निर्धारित केलेले होते.
                      रात्री जेवण करताना मुलगा म्हणाला, "बाबा, आम्हीं सकाळी लवकरच पहाटे पाच वाजता निघायचे म्हणतो."
मी मात्र त्याच्याकडे बघतच राहलो व पत्नीकडे पाहिले तर तिला देखील खंत झाल्याची जाणीव झाली. आम्ही दोघे स्तब्ध झालो.
                      तो म्हणाला, "बाबा, आई तुम्ही दोघेही या वंदे एक्सप्रेसने. मी तिकिटा पाठवतो. काळजी करू नका." सकाळी ते कारने निघाले. मी म्हटले, "बाळा, जरा सांभाळून जा व पोहचला की कळव."
                      तो निघून गेल्यावर पत्नी माझ्याजवळ आली व म्हणाली, "तुम्ही चांगला निर्णय घेतला. कमीत कमी घर तरी राहिले शिल्लक." 
                      काही दिवसांनी आम्ही दोघेही पुणे येथे गेलो. सुरुवातीचे काही दिवस फार आनंदात गेले. पण नंतर मात्र जाणवू लागले की, हळूहळू घरातील जबाबदारीचे वजन आमच्या दोघांच्याकडे येऊ लागले. ऑफिसच्या कामामुळे नाताचा अभ्यास घेणे व वेळेत त्यांना आणण्यासाठी जाणे, घरातील किराणा, भाजी ही कामें माझ्या वाटयाला आली तर पत्नीला चहा करून देणे, स्वयंपाक करणे, भांडी घासणे, फरशी पुसणे हे वाटायला आले. पण ह्यामुळे आमच्या मनाला वाईट वाटले नाही कारण आपण आपल्याच मुलाच्या घरी काम करीत आहोत, ही भावना आम्ही दोघांनी करून घेतली होती. त्यात फारसे काही वावगे नव्हते. पण घरातील भांडेवाली, फरशी पुसणारी, स्वयंपाक करणारी, अशी हळूहळू व्यक्ती कमी झाली. तेंव्हा मात्र माझ्या मनाला वाईट वाटू लागले. कारण पत्नीच्या वार्धक्यामुळे ही कामे तिला जास्त होत होती.
                        मी एक दिवस विषय काढला. पण सुनबाई मध्येच बोलली व म्हणाली, "कर्जाचे हप्ते वाढले, शिक्षण खर्च वाढला, शिवाय तुमच्या येण्याने वाढलेला खर्च, यामुळे सारे अडचणीचे ठरत आहे."
                        मी मात्र गप्पच राहलो. पत्नी म्हणाली, "कशालाच विषय काढायचा. चालू द्या ना. जसे चालते तसें. मी हळूहळू करते सगळी कामें."
                        एके दिवशी काय झाले. सुनबाईच्या मोबाईल ची घंटी वाजली. ती आपल्या खोलीत गेली. तेथूनच सुनबाईनी आवाज दिला,, "माझ्यासाठी चहा ठेवाल आणि हं अमोल साठीही."
                         तिनी चहा केला व सुनबाई कडे नेताना तिच्या ते चहाचे मघ खाली पडले. मग काय सुनबाईंची बडबड सुरू झाली. 'माझ्या लग्नात, माझ्या मित्रानी तो सेट भेट दिला होता. आठवणींचा सारा चुराडा केला, या खेरडीने.'
                        मुलगा म्हणाला "जाऊ दे गं. दुसरा आणता येईल. त्यात काय विशेष."
                         सुनबाई म्हणाली, "पण आठवणीचे काय? ते आणता येईल काय?"
 इकडे मात्र माझ्या पत्नीचे मन खिन्न झाले. मी देखील विचारात पडलो. हळूहळू आम्हाला वातावरणातील बदल जाणवू लागला होता.
                       दुसऱ्या दिवशी तसेच काहीसे घडले. तिच्या मैत्रिणी घरी गोळा झाली. त्यांची पार्टी ठरली होती. त्यां सर्व जणी गप्पागोष्टी मध्ये रंगून गेलीत. कोणीतरी म्हटले की, तुझे बरे आहे गं! तुला अशी मोलकरीण मिळाली. आमचे कुठे नशीब एवढे!"
                      मी या कथनाने त्रस्त झालो. मला राग येणे साहजिकच होते. मी पत्नीला म्हणालो, "मला काही बोलायचे आहेत. बाहेर चल. बरं फिरून येऊ." 
                      ती म्हणाली, "एवढे कशाला त्रास करून घेता. होतच असते. तरुण मुलं आहेत. त्यांच्या हातून होतात चुकां, कधी कधी. आपण मोठे आहोत. समजून घ्यायचे आपण."
                       आतापर्यंत मी शांत होतो. मात्र मी आता मोठ्या आवाजात तिला म्हणालो, "तुला बाहेर यायचं आहे की नाहीं माझ्यासोबत." 
                       ती म्हणाली, "बरं, बाबा!"
बाहेर आल्यावर निवांतपणे बगिच्यात बसलो होतो. मी म्हणालो, "मी तुझे काहीही ऐकणार नाही. तयारी कर. आपण उद्या सकाळीच निघू या."
                      ती म्हणाली, "कशाला एवढं मनाला लावून घेता. होत च असते. घरामध्ये. यालाच संसार म्हणतात."
                      ते काही नाहीं. मी कडक शब्दांत म्हणालो, "येशील तर ये, नाही तर मी जाणार म्हणजे जाणार."
                      ती म्हणाली, "आहे की नाही, आता तुमचं, तुमचं काही वेगळंच आहे. मुलाला तर विचारावं लागेल नं. लेकरू आहे आपलं ते."
                      तिने विचारले असेल, पण काहीच समाधान झाले नसावे, कारण सकाळी तिची तयारी माझ्याही लवकर झाली होती. आम्ही ऑटो रिक्षाने स्टेशनवर आलो. तसे मुलांनी कारने पोहोचवून देण्यासाठी प्रयत्न केला होता. पण मीच त्याला नाही म्हटले. राहू दे. असे म्हणालो.
                     जाता जाता सुनबाईला म्हणालो, "मैत्रिणीची निवड देखील करता आली पाहिजे. लाडू पेढे खायला सर्वच गोळा होतात. संकटात येतात तीच खरी मैत्रीण. आणि हो शब्दही जपून वापरले पाहिजेत. शब्द हे जोडण्याचे काम करते आणि नातं तोडण्याचेही काम करते. पैसा सर्वस्व नसते."
                     आम्ही मात्र आता आमच्या गावाकडे निघालो होतो. कायमस्वरूपी राहण्यासाठी आणि कधीच परत न येण्यासाठी. कारण जिथे आस्था नसते, प्रेम नसते, जिथे जिव्हाळा नसतो, केवळ पैसाच श्रेष्ठ असतो, त्या ठिकाणचे वैभव काय कामाचे?
                  रेल्वेचा प्रवास सुरु झाला. पत्नी म्हणाली, "तुम्ही मात्र योग्य निर्णय घेतला. तो मात्र फारच उत्तम. मला आवडला. कारण घर विकले नाही, बरे झाले! नाही तर काय झाले असते आपले. मुलगा आपला असतो पण परिस्थिती सारखी नसते. परिस्थिती आपला रंग दाखवत असते. जीव तुटतो त्याच्यासाठी, पण ते आता आकाशात उडण्यासाठी सक्षम झाले आहेत. आता काळजी करण्याचे कारण नाही. "
                    तात्पर्य एवढेच की, सेवानिवृत्ती आयुष्याचा शेवट नसून आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरुवात असते. या उलट सहजीवनात योग्य निर्णय घ्यायचे असतात. सेवानिवृत्त नंतरच्या आयुष्यात निर्णयांचे स्वरूप बदलत असते. आता आपली वेळ असते. त्यामुळे काय करायचं, कुठे राहायचं, पैसा कसा वापरायचा, आरोग्याची काळजी कशी घ्यायची आणि उर्वरित आयुष्य आपल्या जीवनसाथी बरोबर कसे जगायचे, याबाबत सुज्ञ निर्णय घेणे महत्त्वाचे ठरते. 
                        सेवानिवृत्तीनंतर देखील 
आर्थिक नियोजन, खर्चाचे नियोजन, पैशाची योग्य गुंतवणूक, याबाबतचे निर्णय परिस्थितीसापेक्ष घेणे गरजेचे असते. कारण सर्वांना लाभलेली परिस्थिती वेगवगळी असू शकते. 
                        सेवानिवृत्तीनंतर आता माझी गरज कुणालाच नाही, असे समजू नये. अनुभव, ज्ञान व प्रेम हे समाजाला नेहमी आवश्यकता असते. 
                        सेवानिवृत्तीनंतर निर्णय घेताना 'लोक काय म्हणतील ' यापेक्षा आपण आपल्या आयुष्यात आपले जीवन अर्थपूर्ण व आनंदी आणि समाधानी कसे राहील, याकडे लक्ष देणे गरजेचे असते. सेवानिवृत्ती ही खऱ्या अर्थाने नव्या आयुष्याची वाट निवडण्याची सुवर्णसंधी असते. हे लक्षात घेतले पाहिजे. हो की नाही! 

दिनांक 15 सप्टें., 2026 

                          --प्रा. डॉ. विनोद राऊत,
            सेवानिवृत्त प्राध्यापक (वाणिज्य )
                                           अमरावती.
                    ​

इतर रसदार पर्याय