सुखद क्षण
व्यक्तीच्या जीवनात अनेक प्रसंग घडतात. कधी सुख-दुःखाचे तर कधी यश-अपयशाची, आशा-निराशेची, तर कधी हसणे-रडणे आणि यासारख्या असंख्य आठवणी चे प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात थोड्या फार प्रमाणात घडतच असतात. त्यातले काही प्रसंग विसरले जातात तर काही प्रसंग ती आठवण म्हणून मनाच्या कप्प्यात नेहमीसारखे घर करून राहते.
या जीवन प्रवासात काही क्षण कायमस्वरूपी मनात राहते. काही आठवणी ह्या मनाला दुःख देऊन जातात.
अशाच आठवणी म्हणजे सुखद क्षण होय.
हे सुखद क्षण छोट्या-मोठ्या घटनांमधून घडत असतात. ते अधिकच जीवनाला आनंद देत राहतात. असेच काहीसे प्रसंग विनायकच्या जीवनात घडले आहेत. विनायकच्या शब्दांत.........
1
माझ्या बालपणाची ही एक आठवण. मी त्यावेळेस पाच वर्षाचा असेल व माझा मोठा भाऊ दोन्ही वडिलांसोबत शाळेत गेलो होतो. वडील हिवरा-मजरा येथे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक होते. हिवरा-मजरा हे गांव छोटेसेच होते. ते यवतमाळ जिल्ह्यातील वणी या तहसीलीत होते. वडिलांना शाळेच्या कामाच्या व्यतिरिक्त पोस्टाचे देखील काम होते. सकाळी आठ ते दहा पोस्ट ऑफिसचे नंतर 11 ते पाच वाजेपर्यंत शाळा असायची. त्यांच्यासोबत आम्ही दोघेही गेलो होतो. वडिलांना वाटले असेल की, मुलं घरी गेले असेल, पण आम्ही दोघे मैदानातच होतो. वडील शाळेतील पटांगणात असलेल्या गेट ला लॉक करून निघून गेले. आम्हांला दोघांनाही वाटले. आता कसे जायचे? गेटवर चढून जाणे शक्य नव्हते. आम्ही ठरवले की एकाने उजव्या बाजूने तर दुसऱ्याने डाव्या बाजूने निघायचे. बरं! त्यात स्पर्धा लावण्याची काही गरज नव्हती. पण ते बालपणच. निघतांना माझ्या डाव्या पायाच्या पोटरीत कुंपणाचे टोक रुतल्याने रक्त वाहू लागले. तर माझ्या भावाच्या डोक्याला तारेचे टोक लागले. आम्ही तसेच घरी परत आलो. आम्हीं घरी सांगितले नाही. फक्त तेल लावून आम्हीं समाधान मानले. पण तो शेवटी घाव होता. आमचा आईच्या लक्षात आले. पण आम्हांला रागावली नाही. पण वडिलांना बडबड ऐकावी लागली होती.
एकदा असेच काहीसे घडले. माझ्या भावाला वर्गात विमान कसे बनवायचे शिकवलेले असेल. त्यावेळेस भाऊ तिसरीत होता. मला म्हणाला, "कागद घेऊन ये. आपण विमान बनवू." मी लगेच आज्ञा पाळली. मी पोस्टात असलेल्या कागदा पैकी एक उचलून आणला. पण नंतर लक्षात आले की, तो चेक होता. भाऊने त्या कागदाचे विमान बनवले. फक्त दोनच तुकडे करण्यात आले होते. आम्हीं ते विमान दोन-तीन वेळा उडवून खेळाचा आनंद घेतला. शेवटी ते खताच्या ठिकाणावर जाऊन पडले. आम्ही दोघे परत घरी आलो. दुसऱ्या दिवशी ग्राहकाला ते पैसे द्यायचे असल्याने वडिलांना चेक दिसला नाही. नक्कीच आपल्या मुलांचा हा प्रताप असेल, असे त्यांना वाटले असेल. घरी येऊन कुणालाच काही बोलले नाही. मला हळूच म्हटलं, "बाळा, तू काही कागद उचलला का ऑफिसमधला." मी म्हटले, 'होय.' मला परिणामाची कल्पना थोडीच होती. मला शाळेत घेऊन आले व मला विचारले, 'कुठे ठेवला तो कागद?' 'आम्ही विमान केले त्याचे व खेळलो' मी म्हणालो. नंतर ते विमान मी खतावरून आणून दिले . पण माझे वडील दोघांवरही रागावले नाही व आम्हाला मार देखील बसला नाही. फक्त एवढेच, ऑफिसमधला कागद असा उचलायचा नाही. विचारल्याशिवाय हात लावायचा नाही. असा तो प्रसंग बालपणचा. परिणामांची चिंता कसली.
2
मला आयुष्यात कधीही न जमलेली गोष्ट म्हणजे स्वयंपाक. वास्तविकत: ज्या पुरुषानां स्वयंपाक येतो, ते भाग्यवानच म्हणावे लागेल. कारण त्यामुळे कमीत कमी पत्नीचे कामात त्यांना हातभार लावता येते व त्यांचे मन जिंकता येते. मला ते मात्र कधीच जमले नाही. तसे मी प्रयत्न केले नव्हते, असे नाही. पण कधीच जमले नाही.
मी नव्या वर्गात असेल. त्यावेळेसची घटना. मी मनात विचार केला. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सकाळीच लवकर उठावे. तसा मला आज स्वयंपाक करण्याची आवश्यकता नव्हती. कारण माझी बालमैत्रीण कौशी स्वयंपाक करून मला खाऊ घालत होती. आज मात्र मी तिला आच्छर्यचकित करायचे ठरविले होते. पहिला प्रश्न पडला की, पोळी आधी करायची की भाजी आधी करायची. मग ठरविले की पोळ्या आधी करून घ्याव्यात. मी कोपऱ्यामध्ये नेहमीप्रमाणे कणिक घेतली, पण किती घ्यायची याचा अंदाज नव्हता. कारण किती कणीक मध्ये किती पोळ्या होतात, ते मला माहीत नव्हते. फक्त आयत ते खायचे, एवढेच माहीत होते. मग प्रश्न पडला की, पाणी किती टाकावेत. तरी पण अंदाजाने पाणी टाकले. ते जास्तच झाले. त्यामुळे गोळा काही तयार होत नव्हता. शेवटी आणखी कणीक ओतली. एवढा गोळा मोठा तयार झाला की खूप जास्त. आवश्यकतेपेक्षा अधिकच. एवढ्यात कौशी आली आणि म्हणाली. "डियर, आज पाहुणे येणार आहेत कां? अरे वेड्या, तुला कोणी सांगितलं करायला हे! मी आणणार होते ना. तू पण की नाही, अफलातूनच काहीही करतोस. आण इकडे, हो बाजूला".
मग मात्र तिने बडबड करीत स्वयंपाक पूर्ण केला. जेवण केल्यावर रात्री त्या पुतळ्यांचा चिवडा करून रविवारी सुट्टी आम्हीं घालवली. मी तिला म्हटले, "असे किती दिवस दुसऱ्यावर अवलंबून राहवयाचे, म्हणून प्रयत्न केला" ती म्हणाली, "अरे! प्रयत्न केला ते ठीक झाले. पण ते सांगून करायचे असते ना. " पण तिची ही मैत्री अल्पकाळच ठरली. देवाने, तिला लवकरच माझ्यापासून हिरावून घेतले होते.
नववी व दहावी दोन्हीं वर्ष मला स्वयंपाक येत नसल्याने खूपदा उपाशीच राहावे लागत होते. आजूबाजूच्या लोकांची दया झाली तरच पुरेसे अन्न मिळायचे. दिवस निघून गेले. पण तिची सोबत स्मरणात राहिली.
3
मी कौशिच्या निधनाने पूर्णपणे खचून गेलो होतो. मी कला शाखा सोडून दिली व पुन्हा परत कॉमर्स ला आलो होतो. नको ती आठवण. मन बेचैन होते. मला जातांनी तिने म्हटलं की प्राध्यापक होशील असे तिने वचन घेतले होते.
नंतर महाविद्यालय शिक्षणासाठी मी हिंगणघाटला आलो. वडीलांना सेवानिवृत्तीला एक वर्ष बाकी होते. शिवाय त्या वातावरणातून बाहेर काढायचे असल्याने म्हणून मला हिंगणघाटला आणले होते. इथे आमचे स्वतः चे छोटे दोन रूमचे घर होते. वना नदीच्या काठावर अगदी शेवटचेच आमचे घर होते. इथेही बरेच दिवस मला तसेच दिवस काढावे लागले. पण मला कॉलेजच्या पहिल्याच वर्षी दोन मित्र मिळाले. यात बाबा कोळंसे व जफर हुसेन कुरेशी. दोघेही माझे जिवलग मित्र. बाबा खोली करून राहायचा. तो शेतकरी कुटुंबातील होता. पण हुशार होता व स्वयंपाक त्याला खूप चांगल्या प्रकारे येत होता. त्यालाही माहीत झाले होते की, मला स्वयंपाक येत नव्हता म्हणून. त्यामुळे माधुकरीसारखं कधी बाबाकडे तर कधी कुरेशीकडे जेवण घेत होतो. तर कधी खाणावळीत.
माझा दुसरा मित्र फार गरीब होता. तो मार्केट मध्ये काम करून शिक्षण घेत होता. त्यामुळे सकाळची एक तासिका करून जायचा. दुपारी सायकलच्या दुकानावर काम करायचा. हुशार होता. पण वेळ न मिळाल्याने तो शेवटच्या वर्षी त्याला अपयश आले. पण त्यानंतर त्याला शिक्षण घ्यायची संधी मिळाली नाहो. वडिलांचे निधन झाले. आई व तो राहत होते. त्याची आई मला जेवण न करता कधीच जाऊ देत नव्हती. त्याचे आईचे स्वप्न होते याचे शिक्षण आमच्या सोबत व्हावे. पण आर्थिक स्थिती नाजूक होती. तो मागेच पडला. कॉलेजच्या पहिल्या वर्षी आमच्या प्री-युनिव्हर्सिटिचा निकाल लागला. त्यावर्षी 117 विद्यार्थ्यामध्ये 16 विद्यार्थी पास झाले होते. त्यात मी एकटाच प्रथम श्रेणित उत्तीर्ण झालो. बाबा वर्गातून दुसरा तर कुरेशी तिसरा होता. आमची मैत्री तेंव्हा पासून आजतागायत कायम आहे. परिस्थिती वाईट असते.
हं थोडं विसरलोच बघा. मी तुम्हांला माझी स्वयंपाकाची गोष्ट सांगत होतो. ते उपाशी राहण्याचे थोडे दिवस माझ्या वाटेला आले. कारण घराजवळची एक मला मैत्रीण भेटली. नळावर पाणी भरतानाच ओळख झाली. तिनेच पुढील चार वर्षे काढून दिले.
पुढे एम. कॉम. ला मात्र जेवणाची उत्तम व्यवस्था वसतिगृहात असल्याने मला फारसे जाणवले नाही. पण कधी मेस बंद राहली की पंचायत व्हायची. केवळ भिजलेले पोहे करून दिवस काढले.
4
बी. कॉम. पार्ट दोन ला असतानाची गोष्ट. मला उकडपेंडी करून घ्यायची इच्छा झाली. मी तयारी सुरू केली. एरवी आई एकच प्लेट देते म्हणून मी आज जास्त प्रमाणात साहित्य घेतले. पण कळलेच नाही, ते कसे करायचे. पाणी टाकल्यामुळे काय झाले, कळलेच नाही. मिश्रण तयार होत नव्हते. त्यामुळे ते चुलीवर ठेवले. काय झाले ते कळलेच नाही. एवढ्यात मैत्रिणीचा प्रवेश झाला. तिने हा सर्व प्रकार पाहताच ओरडली. "कशाला मूर्खपणा केलास! येत नाहीत तर आवाज द्यायचा होता ना. उठ. हो बाजूला."
पण एवढ्याने माझे समाधान झाले नाही. मग मी ठरवले की, शेवया करून बघू. कारण ते सोपे असते तयार करायला, अशी आई म्हणायची. शेवटी गंज चुलीवर ठेवून पाण्यात शेवया टाकल्या, पण पाणी काढण्यासाठी भांडे घ्यायचे विसरलो. तसे मला माहीतच नव्हते. काय करायचे ते. त्यामुळे स्नानगृहच्या दगडावर भांडे नेले. तेथे पाणी काढायला सुरुवात केली, तर गरम असल्याने वरचे झाकण निसटल्याने पूर्णपणे दगडावर शेवया पडल्या व घसरत मोरीत गेल्यात. तेवढ्यात मैत्रीण आली. तिनी एक थापड पाठीवर जोरात लगावली व म्हणाली, "खबरदार! पुन्हां स्वयंपाक करायचा प्रयत्न केला तर. काही बोलू नकोस." असे होते ते गंमतीचे दिवस.
आयुष्यात पुन्हा मी प्रयत्न करून पाहला नाही. पण सुदैवाने पत्नीची साथ व स्वयंपाकात ती निष्णात असल्यामुळे जीवन सुखी व आनंदीत गेले. फक्त खंत एवढीच राहिली की मी पत्नीला मदत करू शकलो नाही. तिचा भार कमी करू शकलो नाही.
पण यामुळे एक शिकायला मिळाले की, अन्नाला निमुट पणे काही न म्हणता सेवन करायचे. शांत राहायचे. आज मात्र मी पत्नीच्या सहजीवनात खूप आनंदी आहे, किंबहुना देवालाही हेवा वाटावा, असे माझे जीवन आनंदी आहे.
5
मला आयुष्यात सहजासहजी काही गोष्टी मिळाल्या नाहीत. कुठे तरी संघर्ष करावा लागला होता. दहावी मधील ही गोष्ट. मला भूगोल हा विषय होता. माझ्या आवाडीचा विषय.
मला ऍटलास म्हणजे नकाशा घायचा होता. किंमत केवळ 4.80 रुपये होती. वडिलांना म्हटलं तर पाहू म्हणाले. आई ला म्हटलं तर विचारते, अशी म्हणाली.
शेवटी मी माझी गुप्त बँक फोडली. त्यात मला मिळालेले खाऊंचे पैसे होते. ते मोजले. एक रुपया कमी पडत होता. तो मी माझ्या मित्राकडून घेतला. नंतर त्याला परत केला. मग मात्र मी ऍटलास घेतला. मला त्यामुळे 75 गुण त्या विषयात मिळाले होते.
एकदा असेच घडले. कॉलेज चे पहिले वर्ष होते. मला अभ्यासासाठी टेबल लॅम्प घायचा होता. वडिलांना म्हटले तर बक्षीस मिळव, मग घे म्हणाले. स्नेह संमेलनात प्री -युनिव्हर्सिटि परीक्षेत कॉलेज मधून पहिला आल्यामुळे मला 21 रुपये बक्षीस मिळाले. मी त्यात टेबल लॅम्प घेतला. इथे एक अडचण आली. किंमत 24 रुपये होती. दुकानदार किंमत सोडायला तयार नव्हता. मी बाबा व कुरेशी तिघेही दुकानात गेलो तर आता मात्र दुकानदाराला काय वाटले कुणास ठाऊक. त्याने ती वस्तू मला दिली. असे होते ते संघर्षाचे दिवस. पण त्यातूनच शिकायला मिळाले.
6
माझ्या स्वभावाचा एक गुणधर्म म्हणजे विसरभोळेपणा. पण किती असावा, यालाही काही मर्यादा असावी की नाही. एकदा काय झाले. मी कॉलेजला स्कूटर घेऊन गेलो व येतांना पायी घरी आलो. जेवण केले व पायीचं बँकेत जाऊन येत होतो. येतांनी रस्त्यात एक विद्यार्थी मला भेटला आणि म्हणालात, "कां बरं! सर, पायी चाललेत. चला, मी सोडून देतो." मी म्हणालो, "काही नाही, जेवणानंतरची पायी फिरणे, बरे असते. " पण आता मात्र माझ्या लक्षात आले की, आपण स्कूटर कॉलेज मध्ये विसरलो.
स्कूटरची चाबी विसरणे, हे नेहमीचेच होते. मी जात असलेल्या सर्व दुकानदारांना, ते माहीत होते. बरं! चाबी खिशात टाकायची की नाही, पण नाही. दुकानाच्या काऊंटरवर ठेवीत होतो.
असेच एकदा मी आणि माझी पत्नी दोघेच खामगांवला गेलो होतो. बाजारातील मध्य भागातील चौकात, पोहोचताच पत्नीने मला थांबा असे म्हटले. मी माझी स्कूटर थांबवली. तिला आठवण झाली असेल. तिला काहीतरी घ्यायचे होते. ती लगेच दुकानाकडे वळली. तेवढयात मी विसरलो. पुढे जाऊ लागलो. तिने आवाजही दिला असेल, पण तो आवाज, मला ऐकू आला नाही. ती तिथेच थांबली. मी मात्र पुढे गेलो. नंतर माझ्या लक्षात आले की, मी विसरलो. मी परत आलो. तिला वेगळेच कारण सांगितले. ती मात्र समजून गेली. काय तुमचा हा वेडेपणा, एवढे बोलून तिने वाट मोकळी केली.
7
मी वर्धा येथे वसतीगृहात असतानाची ही गोष्ट. संध्याकाळची वेळ होती. मी माझ्या खोलीत मित्रांसोबत गप्पा मारत होतो. तेवढ्यात एक व्यक्ती व आमचा शिपाई खोलीत आले. त्या अनोळखी व्यक्तीने परिचय दिला. मी शिपायाला चहा करायला सांगितलं. तसा तो माझ्या परिचयाचा होता. शिवाय माझ्या खेडेगावातील जावई लागत होता. कारण त्याची पत्नी माझ्या गावातली होती. आर्वी नाका जवळ त्याचे घर होते. मी त्या अनोळखी व्यक्तीने दिलेले पत्र वाचण्यात गुंग होतो. पत्रात एव्हढेच लिहिले होते की, मी सकाळी आठ वाजता काझीपेठ पैसेंजर ने जात आहे. तू मला स्टेशनवर भेटायला ये. प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर.
मी त्याप्रमाणे मित्राला घेऊन स्टेशनवर गेलो. मित्राला म्हटले की, तू इथेच थांब. प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन मी पुढे जाणार, तेवढ्यात ती व तिचे भाऊजी आले. तिच्या भाऊजींनी तिकीट काढले. तिने ते तिकीट घेतले व त्यांना जायला सांगितले. मी व ती सोबतच फ्लॅटफॉर्म वर पोहोचलो. पंधरा मिनिटे वेळ होता. आता मात्र भेटण्याचे कारण व घटना याबद्दल तिने सांगितले. माझ्या हातात लग्नाची पत्रिका दिली. पण ती हुंदके देऊन रडत होती. मीच म्हटले, "अगं, सर्वच गोष्टी मनाला वाटेल, अश्या घडत नाहीत. जे मिळाले त्यात समाधान मानायचे. दु:खी होऊ नकोस. ती आमची शेवटचीच भेट ठरली. मी लग्नाला गेलो नव्हतो. तसे मी त्याच वेळेस सांगितले होते. हा दुसरा प्रसंग माझ्या जीवनात आला. एक कौशिच्या जाण्याचा तर दुसरा हा विरहाचा. ती सारखी माझ्याकडे अदृश्य होईपर्यंत बघतच होती. आसवांचा बांध फुटला होता. काय कुणास ठाऊक? मी शून्य अवस्थेत परत निघालो. परतीची पावली जड झाली होती. मित्र मात्र समजून गेला. आता मात्र माझाही आसवांचा बांध फुटला. मला मित्र म्हणाला, "अरे, चल. समजवं मनाला. सर्व काही मनासारखे होत नसते. असू दे. सांभाळ स्वतःला. प्रवासाची मंजिल गाठायची आहे. आणखी किती दुःखाचे डोंगर येतील कुणास ठाऊक? असेच प्रसंग मनाला अधिक बळ देत असते. ते गोड मांणून घे. "
8
हिंगणघाटला असतानांची गोष्ट. आईने एक म्हैस घरी पाळली होती. म्हैस मात्र शांत स्वभावाची. तिच्यासाठी कडबा आणण्यासाठी सायकलने एका
शेतात गेलो होतो. त्या शेतकऱ्याने मला कडब्याची पेंडी सायकलवर ठेवण्यास मदत केली. पुढे जात असतांना माझी सायकल वजनामुळे पडली. शेतकरी जवळ आल्यावर मुख्य रस्त्यापर्यंत त्यांनी माझी सायकल आणून दिली. तो म्हणाला, "असे काम तुला करता आले नाही, तर कसे करणार." मी म्हटलं, " मला हे काम काही नेहमीसाठी करायचे नाही. आणि माझे ते ध्येयही नाही. " मग तो म्हणाला, " नाही शक्य झाले तर!" मी म्हणालो, "असे कसे नाही होणार. ते पूर्ण होईपर्यंत मी माझे प्रयत्न सोडणार नाही. " "बरं! यशस्वी हो." असे म्हणून शेतकरी शेतात गेला व मी घरी आलो. पण त्याचे ते बोलणे, मी मनावर घेतले. मी माझा अभ्यास अधिक करू लागलो. कदाचित तो साक्षात पांडुरंग असावा. त्याने परीक्षा पाहली असावी.
9
एम. कॉम. ला असतानांची गोष्ट. माझा मित्र बाबा कोळसे व मी दोघेही वर्धा ला होतो. तो आर्वी रोडवर खोली करून राहत होता. मी संध्याकाळी त्याच्या रूमवर गेलो होतो. तो स्वतःच्या हाताने भाकरी करीत होता. त्याला स्वयंपाक उत्तम येत होता. त्यामुळे त्यांनी आज आग्रहच केला होता. मला नाईलाजास्तव जेवन घ्यावे लागले. तेवढयात त्याने विषय काढला. तो म्हणाला, "विनोद, अरे माझे लग्न जुळले."
मी म्हटले, "एवढी काय घाई आहे लेंका! एवढे शेवटचे वर्ष आहे, ते पूर्ण होऊ दे. नंतर कर आणि हो नोकरीच काय?"
तो म्हणाला, "हिंगणघाटला आपल्या कॉलेजला मला लावून देणार व मुलगी ही देणार आहे. "
मी म्हटले, "लेंका, तुझी तर लॉटरी च लागली बघ. तुझे नशिबच चांगले." तो म्हणाला, "ते जाऊ दे. उद्या आपण तिला भेटायला जायचे कां? आपण तिच्या गावाला जाऊ या." मी म्हणालो, 'ठीक आहे.'
आम्ही ठरल्याप्रमाणे आधी देवळीला गेलो. तेथे माझे मोठे भाऊ राहत होते. त्यांची मोटर सायकल घेऊन आम्ही व्हाया वायगाव निपाणीवरून त्यांच्या सासरी गावी पोहोचलो. आता त्या गावाचे नाव आठवत नाही. अगोदर त्याच्या चुलत बहीण असलेल्या घरी पोहोचलो. तिनेच लग्न जुळवून आणले होते. नंतर मी त्याच्या सासऱ्याच्या घरी गेलो. तेथे मुलगी एकटी होती. आई वडील शेतावर गेले होते. तेवढ्यात पाणी घेऊन मुलगी आली. मी म्हटले, 'तुला अनुकूल आहे, अशीच आहे. '
बाबा म्हणाला, "ते जाऊ दे. अरे, बोल ना तू काहीतरी. प्रश्न विचार."
मी म्हटले, "अहो वहिनी! आमचे हे मित्र तुम्हाला कसे वाटले? " ती काय बोलणार बिचारी, ती लाजतच व हसतच घरात गेली. मित्राने माझ्या पाठीवर हात मारत तू पण लेंका? सारं एका वाक्यात सारे बंधन एकत्र केले. अशा प्रश्न कधी करीत असते कां?
वहिनी परत चहा घेऊन आली तेव्हा मी म्हटले, "तुम्ही उत्तर दिले नाही. हो का नाही. वहिनी म्हणाली, 'सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जात नाही, काही ते समजून घ्यायचे असते."
मी म्हणालो, "जा घरात. काय बोलायचे आहे ते बोलून ये."
दरवाजाजवळ जाताच तो म्हणाला, "येतो आम्ही. ताई वाट बघत असेल."
मी म्हटले, "पागल आहेस कां लेंका! काय होईल तुझे कुणास ठाऊक? चांगले आत मध्ये जाऊन, गप्पात रंगून जायचे होते. धन्य आहे लेंका!" तेवढ्यात भावी वहिनींनी आतूनच डोक्याला बोट लावत मुक अभिनयाने डोकंच नाही असे म्हटले. मी मात्र त्यांच्या मूक अभिनयावर स्मित हास्य केलं.
नंतर आम्ही वर्धेला परत आलो. असा आहे माझा जिवाभावाचा मित्र. आता सेवानिवृत्त झाला आहे. आम्हीं आता मोबाईलवर दररोज चॅटिंग करत असतो. तसं मला विनोद म्हणणारा तो माझा एकमेव मित्र होता. आयुष्यात मला नंतर कोणीही विनोद या नावाने हाक मारली नाही.
तसेच त्याच्या संदर्भातली मला आणखी एक गोष्ट आठवली. मी हिंगणघाट ला गेलो होतो. तो म्हणाला, "अरे! सोबत चल बरं. एका ठिकाणी जाऊ." मी म्हटले, 'कुठे जायचं?'
त्याची एक मैत्रीण जीवाभावाची होती. तिला याने काही सांगितले नव्हते. घरी गेलो. मला नंतर कळले की याला पत्रिका द्यायची होती. घरी पोहोचलो. काही न बोलता मैत्रिणीच्या हातात त्यांनी पत्रिका दिली. तिने विचारले, "कोणाची आहे."
तो म्हणाला, 'बघ.'
तिने पत्रिका उघडताच एक ठेवून दिली, त्याच्या गालावर. काहीच कळले नाही. मी म्हटले, "असे असते कां लेका! काही संवाद नाही. काही नाही. असा धक्का द्यायचा असतो कां? तुमचे दोघांचे प्रेम होते तर ते व्यक्त करावयास हवे होते. कधी कधी प्रेम करण्यापेक्षा ते व्यक्त करणे महत्त्वाचे असते."
तिने स्पष्टच सांगितले. मी येणार नाही म्हणून. मी म्हटले, "सांभाळ हे प्रकरण. आता तरी आत मध्ये जा. नाही तर येशील परत दरवाजातून. वेळ लागला तर चालेल. त्याचा वाद सुरूच होता. शेवटी मलाच मद्यस्थी करावी लागली. त्याची मैत्रीण मला ओळखत होती. ती शेवटी मला म्हणाली, "सर्व पुरुष सारखेच असतात. विनां हृदयाचे. भावनांना न समजून घेणारे. बुदधू."
मी म्हटले, "जाऊ दे. ताई!" असे म्हणताच, ती ही माझ्या मागे धावली. मी लगेच म्हटले, 'चल, आता लवकर.'
अशी झाली आमची सुटका.
आता मी, माझा मित्र, कुरेशी व ती मैत्रीण, माझी मैत्रीण, आम्ही सर्वजण हिंगणघाट ला गेलो की खूप गप्पा मारत असतो.
हा माझा मित्र तसा फार विनोदी आहे. त्याला इंग्लिश व मराठीचे फार वेड आहे. एकदा त्याच्या घरी जाण्याचा योग आला. वहिनींनी स्वयंपाक केला होता. जेवायला बसलो होतो. एवढ्यात मला म्हणतो कसा, विनोद! दवडीतल्या पोळ्या संपल्या वाटते रे! अरे, जेवण कमी कर, लेका. "
मला त्याचीही विनोद बुद्धी परिचयाची होती. वहिणी मात्र संतापली. पाहुण्यांशी असे बोलत असतात कां? मीच म्हटले,'वहिनी, त्याला गंमत करायची सवयच आहे आणि मी काय त्याच्या घरी नाही, मी वहिनींच्या घरी आलो आहे.'
खरंच तुम्ही पुरुष सगळे सारखेच. पण काही म्हणा वहिनी, स्वयंपाक उत्तम झाला. भानच राहिले नाही. जेवण करताना. वहिनी म्हणाल्या, "बरे! पुरे आता तुमची स्तुती."
अशा आमच्या गप्पा नेहमी रंगत असे. आता मोबाईलवर बोलण्याची तेवढी मजा येत नाही.
10
एकदा काय झाले मी, माझी मुलगी, आणि माझी पत्नी रामटेक ला गेलो होतो. रस्त्यातच वर टेकडीवर बरेच वानर सेना बसलेली होती. त्यातले मोठे वानर माझ्या पत्नी जवळ आले. काही न मिळाल्यामुळे तो नंतर माझ्याजवळ आला. माझ्याजवळही काहीच नव्हते. त्यामुळे वानराने माझा हात पकडत, मग फुटाणे विकणाऱ्या बाईकडे नेले. जवळपास चार-पाच फुटावर ती बसली होती. तिला न सांगता पुढे मला फुटाणे देत असतानाच वानराने घेतले व मी पैसे दिले. पण तेवढयात वानराने हात धरून माझ्या हातावर काही फुटाणे ठेवले. मी बघतच होतो. मी ते फुटाणे इतरांना देण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी सर्वांना हाकलून दिले. कोणालाच खाऊ देत नव्हता. काय म्हणायचे ते कळतच नव्हते.
लगेच माझी पत्नी म्हणाली.. त्यातल्या दोन-तीन दाणे आपण खाऊ. नंतर इतरांना देऊ. खरंच, आम्ही त्यातले फुटाणे उचलले तर त्यांनी नंतर विरोध केला नाही. त्यांनी मात्र इतर वानरानी त्रास होऊ देऊ नये, म्हणून आम्ही बाहेर येईतोस्तव आमच्या सोबतच होता. तो प्रामाणिक व जिव्हाळा असलेला प्राणी होता. प्राण्यांमध्ये जिव्हाळा, प्रेम असते ते कळले. ते बरेच काही शिकवून जातात. काय कुणास ठाऊक? या घटनेने बरेच काही शिकविले.
आमच्याकडे सध्याही घरी न पाळलेलेले कुत्रे आमच्याकडे राहतात. त्यांच्यापासून कोणताही त्रास नाही व फिरायला घेऊन जायची गरज नाही. त्यालाही माझी पत्नी नाही म्हणता नित्यनेमाने अन्न देत असते. कधी कधी तर अन्न शिल्लक नसले तर वेळेवर त्याच्यासाठी पोळी करून देते. त्यामुळे गायी, म्हशी, कुत्रे, महारोगी, एवढे सारे आम्हीं दोघां व्यक्ती व्यतिरिक्त अनेक जण सोबत राहते. खरंच, प्राणी किती एकनिष्ठ राहतात.
आयुष्यात बरेच असे प्रसंग आहेत की, ज्यामुळे संघर्षाची दिशा मिळते. संकटे अनेक येतात पण त्या प्रत्येक संकटातून नवीन मार्ग मिळतो आणि वेळोवेळी निसर्गाची मदत मिळाली. हे सर्व काही भाग्यच म्हणावे लागेल. जीवनात कितीही संघर्ष आले तरी त्यातून निघण्यासाठी नवीन दिशा मिळाली. एक नवीन जगण्याचे सामर्थ्य मिळाले. एवढे मात्र निश्चित.
........... O.............
दि. 5 नोव्हेंबर, 2026.
-प्रा. डॉ. विनोद राऊत,
से. नि. प्राध्यापक,
अमरावती.