What to do next! books and stories free download online pdf in Marathi

पुढे काय करायचे!

                      पुढे काय करायचे!

                         माणसाच्या आयुष्यात अनेक प्रश्न येत असतात. त्याची उत्तरे बाहेर कुठेही सापडत नाहीत. कुणाला विचारले, तर तेही उत्तरे समाधानकारक देत नाहीत किंवा ते स्वतःला पसंतही पडत नाही. मग आपण समाजातील परिस्थितीचा विचार करून स्वतःच निर्णय घेतो. पण निर्णय घेताना स्वतःच्या मनाचा शोध घेत नाही. बहुदा आपले निर्णय हे समाजाधिष्ठित असतात.
                         या सर्व प्रश्नांमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ‘पुढे काय करायचे?’. हा प्रश्न जीवनभर प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावर पडतच असतो जसे बालपण, शिक्षण व नोकरी शोधणे, कुटुंब पालन पोषण व जबाबदारी, पुढे मुलांचे शिक्षण, आजार, म्हातारपण या प्रत्येक टप्प्यावर, हा प्रश्न कमी अधिक प्रमाणात सर्वांनाच पडतो. म्हातारपणी तर हा प्रश्न अधिकच तीव्र होतो.
                         ‘पुढे काय करायचे?’, हा प्रश्न केवळ भविष्यातील नियोजनाचा प्रश्न नाही. तो आपल्या जीवनाच्या दिशेचा प्रश्न असतो. या निर्णयावरच आपले पुढील जीवन अवलंबून असते. आपण कुठे चाललो आहे, आपल्याला काय हवे आहे, व उरलेल्या आयुष्याचा उपयोग आपण कशा कशाप्रकारे करून घ्यायला हवं, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे केव्हा ना केव्हा शोधावीच लागते, त्यावर आपले जीवन अवलंबून असते. 
                          आयुष्याच्या धावपळीत व समाज व्यवस्थेच्या विळख्यात आपण सापडलेले असतो. बहुधा विद्यार्थ्यांना तर आपण काय करावे, हे कधी कधी सुचतच नाही. त्यांचे शिक्षण पूर्ण होऊन जाते आणि आता नोकरीसाठी शोधा शोध सुरू होते. कोणी म्हणते नोकरी कर, कोणी म्हणते व्यवसाय कर, कोणी म्हणते शेती उत्तम आहे, कुणी म्हणते सरकारी नोकरीच बघ. एकंदरीत मन विचलित होऊन जाते. काय करावे सुचतच नाही. 
                           एकदा असाच एक विद्यार्थी, पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर माझ्याकडे आला. त्याचे मनात असाच काहीसा संभ्रम तयार झाला होता. वडिलांचे म्हणणे, समाजाचे म्हणणे, गुरुजनांचे म्हणणे, यामुळे नेमके काय करावे, याचा निर्णय घेताना त्याचे मन वेड्यासारखे झाले होते. कळतच नव्हते. त्या विद्यार्थ्यांनी मलाच प्रश्न केला होता की, ‘मी पुढे काय करायचे?’. मलाही प्रश्नच पडला होता. मी मात्र विचार करून उत्तर दिले. “हे बघ. तू असा प्रत्येकाला प्रश्न विचारलास तर तू बूचकळ्यात पडशील कारण प्रत्येक जण आपापल्या परीने उत्तर देईल. नाही कां! मी त्याला करावे मनाचे! ही गाढवाची कथा सांगितली. हे बघ. तुला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर तूच शोध. स्वतः मनाचा निर्णय घे. तुझे मन काय म्हणते, त्याचा विचार कर. तू लोकांच्या मनाचा विचार करू नको, कारण ज्याचे जवळ जाशील, त्याप्रमाणे उत्तर मिळेल. 
                           आता तू माझ्याकडे आलास. मी म्हणेल की तू प्राध्यापक हो तर जमेल का तुला! त्यासाठी आणखी पुढे शिकायचे? किती वर्ष घालवायचे? याशिवाय नोकरीसाठी देणगी देण्यासाठी पैसे कुठून आणणार? असा विचार येईल की नाही. आणखी कोणाकडे जाशील तर तो म्हणेल की अधिकारी हो, एमपीएससी, यूपीएससी, ची परीक्षा दे. आयएएस हो, कोणी म्हणेल व्यवसाय टाक? कोणी म्हणेल शेतीच कर. म्हणजेच आणखी प्रश्नच प्रश्न तुझ्यासोबत उभे राहिल. त्यापेक्षा तुझं मन आणि तुझे विचार, यात इतर व्यक्तींच्या मनाचा व समाज मनाचा विचार करू नको. बघ! तुला काय वाटते. थोडा क्षणभर थांबून स्वतःलाच विचार. तुझे मन या प्रश्नाचे उत्तर देईल आणि तेच कर, समाज व्यवस्थेकडे लक्ष देऊ नकोस. “प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळे “.
                          भूतकाळाचा पश्चाताप करू नकोस व भविष्याची चिंता करू नकोस. वर्तमानाचाच विचार कर. कधी कधी आपण भूतकाळ व भविष्यकाळाच्या विचारात वर्तमानाला विसरून जातो. काही वेळेस भूतकाळ विसरायचा असतो आणि भविष्यकाळाची चिंता करायची नसते. ते विधी लिखित असते. फक्त आपण प्रयत्न करीत राहायचे. स्वतःच्या मनाला विचारूनच. जसे रामदास स्वामी म्हणतात, “विचारी मना, तुची शोधूनी पाहे”. 
                         काय करायचे हे निश्चित झाले की, ध्येय निश्चित कर. ध्येय माणसाला जगण्याची दिशा देते. या जगात कोणतेच क्षेत्र असे नाही की ते माणूस, त्यात यशस्वी होऊ शकत नाही. प्रत्येक क्षेत्रात मार्गदर्शन हॆ आपोआपच मिळते. फक्त आपल्याला मार्ग निश्चित करावा लागतो. 
                         माझ्याकडे एक विद्यार्थी असाच नेहमी यायचा. तो नेहमी माझ्या सानिध्यात राहायचा. पण तो खूप गरीब होता की त्याला संध्याकाळी जेवण मिळणे त्याच्यासाठी कठीण होते. त्याचे वार लागून असायचे कारण घरी कोणी कमावणार नव्हतं. तो व त्याची आई व लहान भाऊ, एवढेच ते कुटुंब होतं. पण तो गणेशजींचा निस्सीम भक्त होता. तो नेहमी गणेशभक्ती करायचा. एक दिवस त्याने अमळनेर येथे बी. एड. साठी अर्ज केला. त्याचा नंबर लागला. बी. एड. पूर्ण केल्यावर तो ज्युनिअर कॉलेजला पार्ट टाइम सर्विस करू लागला. थोडेच दिवसात त्याने जळगाव जिल्ह्यातील एका शहरात अर्ज केला. त्याची नियुक्ती झाली, पण देणगीसाठी पैसा नव्हता. पण त्या संस्थेनेच त्याला मदत केली. तो आता ज्युनिअर कॉलेजला प्राध्यापक आहे. त्याचे प्रयत्न, त्याचे स्वप्न पूर्ण झालेत. प्रयत्नांती परमेश्वर. 
                         एकदा असेच मी वर्गात तासिके मध्ये “व्यवसाय आणि त्यावरील मार्गदर्शक तत्वे” या मॅनेजमेंट विचारधारेवर आपले मत उदाहरणाद्वारे देत होतो. त्यात काही व्यवसाय करणारे विद्यार्थी होते. त्यांनी बरोबर त्याच उदाहरणाचे अनुकरण माझेच बाबतीत केले. मी त्याला सहजच उदाहरण दिले की “व्यवसाय करताना ग्राहकांकडे दैवत म्हणून पाहिले पाहिजे. त्यांच्या खिशातील पैसे हा आपला नफा असतो. त्यांचा आनंद व त्यांच्या आवडीनिवडींचा विचार करून, आपण त्यांना विक्री केली पाहिजे. विशेषतः सोबत असलेल्या व्यक्तीचा (पत्नीचा) अधिक आदर केला पाहिजे. विक्री ही कला आहे.” असा काहीसा संदर्भ होता याचा आधार घेऊन पुढे तो आमच्याच कॉलनीत पैठणी घेऊन आला, आमच्या पश्चात. सर्व प्राध्यापकांच्या घरी पैठणी दिली. पैसे कुणाकडूनही घेतले नाही, ते पैसे कुठे जातात म्हणून तो निघून गेला. कालांतराने आम्हाला कळले की, हा माझ्यापेक्षा पत्नीशी अधिक बोलून विक्री करायचा. विक्रीची ही खरी कला त्याने अवगत केली होती. तसा व्यवसाय आपोआपच व्यवहारातून मार्गदर्शन करीत असतो. एकंदरीत व्यवसाय कशाप्रकारे करायचा आहे, हॆ त्याला उत्तम समजलेले होते. प्रयत्न केले की सर्व गोष्टी शक्य होतात. फक्त समज हवी. दूरदृष्टी हवी. 
                          माझ्या सेवानिवृत्तीनंतर माझ्या मुलीला मी व्यवसाय उघडून दिला होता. तशी तिची ही इच्छाच होती. एक उपजीविकेचे व वेळ निघून जाण्यासाठी म्हणून व्यवसाय सुरू केला होता, कारण उच्च शिक्षण घेतल्यानंतर काहीच न करणे आणि केवळ कुटुंबात वेळ घालवणे योग्य नव्हते. तो विचार मलाही पटत नव्हता. या विचाराने हा व्यवसाय सुरू केला होता, पण नंतर त्यात ती दरबेज झाली. व्यवसायिक लोकांनी देखील प्रत्येक खरेदीच्या वेळेस मार्गदर्शन केले होते. कमालीचे व्यावसायिक मार्गदर्शन तिला मिळालेले होते. त्यामुळे ती पूर्वीपेक्षा कमालीची धीट झाली होती. आपल्या शिक्षणाचा फायदा म्हणून, तिच्या वर्गमित्रांचा सल्ला स्वीकारला होता. आमचे कॉलेजमध्ये प्राध्यापिकेची नोकरी कर आणि जर शक्य होत नसेल तर तुझे सर्टिफिकेट्स पाठव. तुला न येताच पैसे नियमित तुला मिळत जाईल, असे तिच्याशी मित्राचा संवाद झाला असेल. कारण कॉलेजला याची गरज होती. असे दोन वर्षे चालले होते, पण आता मात्र एक दिवस तिला प्रत्यक्ष संधी चालून आली. आपल्याच शहरात तिच्या धाडस व धीट स्वभावाने तीची मुलाखतीतून तिची निवड झाली. स्व-प्रयत्नाने व स्वतःच्या परिश्रमाने यशस्वी झालेली दिसली. नौकरी करीत असतांनाच ती सध्या पुण्याला एका नामांकित आंतरराष्ट्रीय विद्यापीठात पीएच. डी. करीत आहे. एवढे सांगण्याचे तात्पर्य एवढेच की स्वतःच्या मनाचे व त्या दृष्टीने उचललेले पाउली, हे यशस्वी ते कडेच घेऊन जाते. कधी खचून जायचे नाही. माझ्याच्याने होणार नाही, असे मनातही विचार आणायचे नाहीत. “केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे “.
                            कोणतेही क्षेत्र कमी नाही. आपली आवड व आपले प्रयत्न, हे नेहमी प्रामाणिक असले पाहिजे. आपल्या मनाची आवड व छंद जोपासले पाहिजे. माझा एक जिवलग प्राध्यापक मित्र आहे. तो जरी वाणिज्य शाखेचा असला तरी प्रचंड वाचन व अभ्यास हा त्याचा ज्ञानेश्वरीवर आहे. तो सेवानिवृत्तीनंतर छंद आवड म्हणून भागवत कथा, प्रवचने करीत असतो. तो कवी मनाचा आहे. कविता करणे हा त्याचा छंद आहे. मनासारखे करायला वयाचे बंधन नसते. ते कोणत्याही वयामध्ये आपण ते करू शकतो. हेच मला सांगायचे आहे. 
                 म्हातारपण आले असे समजू नये, उलट नवीन जीवन जगण्याची ती सुरुवात असते, हे समजले पाहिजे. स्वतःसाठी आणि शक्य होईल तेवढे समाजासाठी काही केले पाहिजे, तेच खरे जीवन आहे. आपल्या आयुष्यातील अनुभव ही कुणाचे तरी भविष्य उजळू शकते, हे लक्षात घेतले पाहिजे. 
                        आम्ही प्राध्यापक लोक पैसा कमवू शकलो नाही, आमच्याजवळ इतरांसारखा पैसा नसेल, इतरांसारखे श्रीमंत होऊ शकलो नाही, तरी मनाने मात्र आम्ही श्रीमंती भोगत आहोत. हे विशेष नाही कां? जीवनात आणखी काय हवे. पैशाची श्रीमंती म्हणजे खरी श्रीमंती नव्हे. 
                          आयुष्यात दुसऱ्याच्या यशाचे कौतुक करावयास हवे. पण त्यांच्याशी स्वतःची तुलना करू नका. “पुढे काय करायचे?” याचा निर्णय आपल्या गरजा, क्षमता आणि मूल्यांवर आधारित असावयास पाहिजे. 
                           पुढे जाताना अपयश येणारच हे गृहीत धरावे. पण खचून जाऊ नका. अपयश म्हणजे शेवट नसते. प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी शिकवीत असते. ज्याला यातून समजून उभे राहता येते. तोच खरा यशस्वी होतो. कितीही वाटचालीत अडथळे आले तरी, थांबायचे नाही. 
                            आयुष्यात वेळेचे नियोजन करायला हवे. पैसा गेला तर तो पुन्हा मिळवता येतो. पण वेळ गेली की ती पुन्हा मिळवता येत नाही. म्हणूनच ‘पुढे काय करायचे?’ यासाठी वेळेचे नियोजन करणे फार आवश्यक असते. एक लक्षात ठेवले पाहिजे की रिकामे वेळेतही मनाला समृद्ध करणारे काम करता येते. 
                             ‘पुढे काय करायचे?’ या प्रश्नापेक्षाही ‘पुढे कसे जगायचे?’, फक्त पैसेच कमवीत बसायचे कां? मला इतरांपेक्षा कसे पुढे जाता येईल की, शांतपणे, समाधानाने आणि प्रेमाने व अर्थपूर्ण पद्धतीने कसे जगता येईल, याचाही विचार करायला हवे.
                             आयुष्य किती मोठे आहे, हे आपल्या हातात नाही, पण ‘आयुष्य जगायचे कसे?’ हे काही प्रमाणात आपल्या हातात आहे. 
                             सारांश, ‘पुढे काय करायचे?’ हा प्रश्न प्रत्येक आयुष्याच्या वळणावर पडतो. त्याचे उत्तर शोधावे लागतात. तारुण्यात शिक्षण आणि नोकरी, मध्यम वयात कुटुंब आणि जबाबदारी आणि निवृत्तीनंतरचे जीवन, या प्रत्येक वयात एक गोष्ट समान आहे ती म्हणजे दिशा होय. 
                              जीवनात कितीही वळणे आलेत, संकटे आलेत, अडथळे आलेत, कदाचित स्वप्ने अधुरे राहिलीत, काही माणसे दूर गेलीत किंवा निर्णय चुकले असतील, तरी देखील माझ्याकडे वेळ आहे, अनुभव आहे व काही करण्याची इच्छा अजूनही आहे आणि मी काहीतरी निश्चित करीत राहणार, ही जिद्द असलीच पाहिजे. त्याकरिता मन शांत करून ऐकण्याची सवय लावून घेतली पाहिजे कारण मनुष्य प्रत्येक क्षणाचा स्वतःचा भाग्यविधाताच असतो, हे लक्षात घेतले पाहिजे. यात शंका नाही. 

 दिनांक 21 सप्टें., 2026 
                         –प्रा. डॉ. विनोद राऊत,  
              सेवानिवृत्त प्राध्यापक (वाणिज्य)  
                                          अमरावती.

इतर रसदार पर्याय