संपूर्ण बाळकराम - 1

  • 12.6k
  • 2
  • 6.6k

वसंत ऋतूत आपल्या सृष्टीमध्यें केवढाले फेरफार घडून येतात हे नव्याने कशाला सांगावयाला पाहिजे? झाडांना पालवी फुटते, आंब्याला मोहोर येतो, वेलींना फुले येतात, ठिकठिकाणच्या वक्त्यांना शब्द फुटतात, पांढर्‍या सशांना पोरे होतात, मेंढयावरची लोकर कातरतात, कोकिळेला कंठ फुटतो, छत्र्यांवर नवे अभे्र चढतात, शहरबाजारांतून खेडेगांवच्या पाहुण्यांना ऊत येतो, मोराला नवा पिसारा फुटतो, कुत्र्यांना लूत लागते, तोरणा-करवंदांचे पेव फुटते, कलिंगडे विकावयास येतात, वगैरे हजारो घडामोडींनी चराचरसृष्टी अगदी गजबजून जाते. या चमत्कारसृष्टीतच आणखी एका चमत्कारमय फेरफाराची गणना करावयास पाहिजे. वसंतोत्सवाच्या सुमारास अनेक फेरफारांप्रमाणेच नवर्‍या मुलांची व त्यांच्या आईबापांची माथी फिरत असतात! पिसाळलेले कुत्रे चावलेला मनुष्य ज्याप्रमाणे आंगोठीच्या मेघांचा गडगडाट ऐकताच पुन्हा पिसाळतो, त्याप्रमाणेच मुंजीच्या वाजंत्र्यांचा कडकडाट कानी पडताच 'उपवधू' मुलांच्या व त्यांच्या वाडवडिलांच्या अंगी भिनलेले अहंपणाचे विषही तडाक्यासरशी उचल खात असते. क्षणार्धात त्यांना आपल्या स्थितीचा, आपल्या किमतीचा, आपल्या योग्यतेचा, किंबहुना आपल्या स्वत:चाही विसर पडून ते अंकगणिताचे पुस्तक रचणार्‍या संख्या-पंडिताप्रमाणे सरसहा मोठमोठाल्या रकमा बडबडू लागतात, आणि बिचार्‍या मुलीच्या बापांना ही अवघड उदाहरणे सोडवावी लागतात. ईश्वराच्या दयेने मला स्वत:ला मुलगी नाही! परंतु काही स्नेह्यासोबत्यांबरोबर करमणुकीखातर खेटे घालून या बाबतीत मी जो अनुभव मिळविला आहे, त्याचा फायदा मी उदार बुध्दीने वाचकांना देण्याचे योजिले आहे.