संपूर्ण बाळकराम - 10

  • 6.7k
  • 2.2k

पूर्वार्ध काही वर्षांपूर्वी 'केसरी' पत्रात एका पुस्तकाबद्दल विनोदात्मक, परंतु मनन करण्यासारखा अभिप्राय आला होता. त्या पुस्तकाचे नाव 'जेवावे कसे' हे होते. केसरीकारांनी त्या पुस्तकाच्या बरेवाईटपणाकडे फारसे लक्ष न देता त्याच्या अकालदर्शनाबद्दल मात्र अभिप्राय दिला होता. सध्या लोकांपुढे 'जेवावे कसे' हा प्रश्न नसून 'जेवावयाचे मिळवावे कसे' हा आहे. अशा आधाराने केसरीकारांनी त्या पुस्तकाच्या अप्रयोजकतेचा उल्लेख केला होता. कधी कधी अनुभवी मनुष्याकडून वरील लेखकाप्रमाणे मौजेच्या चुका घडून येतात. 'रंगभूमी'च्या संपादकांनी 'ग्रंथसार' या नात्याने हीच चूक केली आहे. 'नाटक कसे पाहावे?' या प्रश्नाचा ऊहापोह करण्यासाठी त्यांनी सबंध एक पुस्तक लिहिण्याचे श्रम घेतले आहेत पण दिलगिरीची गोष्ट आहे की, त्यांनी या प्रश्नाची केवळ उत्तरार्धाचीच बाजू घेतली आहे आणि मूळ महत्त्वाची बाजू तशीच ठेविली आहे.