प्रतिबिंब भाग १० जाईला सर्वच गोष्टींचा प्रथमपासून विचार करून पाहणे गरजेचे वाटू लागले. सर्व घटनांमधले कच्चे दुवे शोधून, त्यातील अर्थ समजावून घेणे गरजेचे होते. शेवंताचा पुढचा घाव कसा आणि कुठे असेल हे आता ओळखणे गरजेचे होते. हातात वेळ फार उरला नव्हता. कुठल्याही क्षणी काहीही घडण्याची शक्यता होती. तिचा जीव धोक्यात होता, होता का? वाड्याच्या इतर सुनांमधे आणि आपल्यामधे काय फरक आहे? आता सर्व गत इतिहास आपल्याला कळलाय, खरंच कळलाय का? अचानक तिला आपले सासरे आठवले. त्यांनी एवढ्या अजिजीने आपल्याला वाड्यावर जाण्यास का सांगितले? ते ही स्वत:च्याच पत्नीची झालेली भीषण अवस्था स्वत:च्या डोळ्यांनी पाहून? खरंच त्यांना बायकोच्या मृत्यूमधे काहीच अनैसर्गिक वाटले