तोतया वारसदार भाग 15 पात्र परिचय- सुलतानी - अविनाश गोखल्यांचे बदललेले नाव. सलमा - सुलतानीची बायको. भाग १५ भाग १४ वरून पुढे वाचा.... सलमा दोन मिनिटं अविनाशकडे बघत होती मग हलक्या स्वरात अविनाशला उद्देशून म्हणाली “अविनाश, तुला जायचं असेल तर मी अडवणार नाही. शेवटी प्रत्येकाला आपला देश प्यारा असतोच.” निशांत ऐकतच राहिला, तिचा आवाज अत्यंत मंजुळ तर होताच पण तिचं मराठी सुद्धा अतिशय स्पष्ट होतं. अविनाश मग असं का म्हणाला की सलमाला मराठी येत नाही म्हणून, त्याचं डोकं फिरायची वेळ आली होती. त्यांनी अविनाश कडे पाहिलं, अविनाश आता गोंधळला होता. सलमा मराठी बोलेल असं त्याला वाटलंच नव्हतं.