तोतया वारसदार - भाग 15 Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तोतया वारसदार - भाग 15

    तोतया वारसदार भाग 15

पात्र परिचय-

सुलतानी              - अविनाश गोखल्यांचे बदललेले नाव.

सलमा                - सुलतानीची बायको. 

भाग  १५      

भाग १४   वरून पुढे  वाचा....

सलमा दोन मिनिटं अविनाशकडे बघत होती मग  हलक्या स्वरात  अविनाशला उद्देशून म्हणाली “अविनाश, तुला जायचं असेल तर मी अडवणार नाही. शेवटी प्रत्येकाला आपला देश प्यारा असतोच.” निशांत ऐकतच राहिला, तिचा आवाज अत्यंत मंजुळ तर होताच पण तिचं मराठी सुद्धा अतिशय स्पष्ट होतं. अविनाश मग असं का म्हणाला की सलमाला मराठी येत नाही म्हणून, त्याचं डोकं फिरायची वेळ आली होती. त्यांनी अविनाश कडे पाहिलं, अविनाश आता गोंधळला होता. सलमा मराठी बोलेल असं त्याला वाटलंच नव्हतं.

“सलमा, तुला माहीत आहे, मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. जायचंच असेल तर दोघंही नाही तर नाही.” – अविनाश आता मराठीवर उतरला होता.

“काका, मी तुम्हाला एकट्याला चला म्हणतच नाहीये. मी दोघांसाठीच म्हंटलं होतं.” निशांत म्हणाला.

“निशांत, तुला वाटतं तितकं  सोप नाहीये ते. माझा व्यापार आहे इथे. सगळी कडे माझं नाव दर्ज आहे. माझ्याकडे पासपोर्ट नाहीये, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, मी सलमाला सोडून थोड्या पैशया साठी भारतात येऊ शकत नाही.” अविनाशनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. “मी मुसलमान झालो आहे माझं नाव सुलतानी आहे. त्यामुळे बाबांच्या संपत्ती वर तसाही माझा हक्क पोचत नाही. तूच विचार कर, आणि आला आहेस, तसाच परत जा. अविनाश सापडलाच नाही असंच सर्वांना सांग.”

पण मी असं कसं सांगू, आपण सर्व कायदेशीर बाबी हाताळूनच पुढे जाऊ, आमचे साहेब वकील आहेत, ते काहीतरी मार्ग काढतीलच. बंगला देशातून कितीतरी लोक भारतात येतात आणि त्यांना काही काळानंतर नागरिकत्व पण मिळतं. तुम्ही तर तिथलेच आहात. आणि ते सिद्ध करणं काही अवघड नाहीये.” – निशांत.

“निशांत,” आता सलमा बोलली, “हे तू माझं मराठी ऐकून बोलतो आहेस न! तुला असं वाटतं आहे, की मी पण हिंदुस्तानी आहे म्हणून, होय ना? पण मी मराठी अविनाश साठी शिकले. त्याच्या सुरवातीच्या काळात, त्यांची बुद्धी धड काम करत नव्हती, बंगाली सोड, हिन्दी आणि इंग्लीश पण त्याला नीट बोलता येत नव्हतं. अरे, त्याचं नाव सुद्धा विसरला होता तो. मग त्याच्याशी संवाद कसा साधणार होते मी? म्हणून मग मीच मराठी शिकले. आणि ते ही अविनाश कडूनच. आम्ही घरात मराठीच बोलतो. पण हे लक्षात घे की, मी बंगाली मुस्लिम आहे. आणि मला माझा देश सोडून जाण्याची अजिबात इच्छा नाहीये. पण मी अविनाशला रोखणार नाही. त्याचा निर्णय त्यानी स्वतंत्रपणे घ्यावा.”

सलमा एवढं बोलल्या वर अविनाशनी घसा साफ केला आणि म्हणाला “निशांत, आता तूच विचार कर, अरे ज्या मुलीनी एका अनोळखी माणसाची, काहीही हातचं न राखता सेवा केली, ते ही तो माणूस त्यांच्या धर्माचा, जातीचा नसतांना. माझ्या सारख्या माणसाशी, ज्याच्या अंगावर जखमांचे छप्पन डाग असतांना सुद्धा, माझ्याशी लग्न केलं. कोणी काही म्हणो पण आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. गेली पंधरा वर्ष आम्ही सुखाने संसार करत आहोत.

हा प्रेमाचा धागा तोडून निव्वळ पैशांसाठी तुझ्याबरोबर येणं मला शक्य नाही. तू मला शोधण्यासाठी बरीच मेहनत घेतलीस, त्याचं मला खूप कौतुक वाटतंय. आणि त्यासाठी मी तुझा अत्यंत आभारी आहे. पण तू आता परत जावस असं मला वाटत. माझ्याशी भेट झाल्याचा चुकूनही कोणाकडे उल्लेख करू नकोस. एवढी कृपा कर माझ्यावर, आमचा सुखाचा संसार विस्कटून जाईल, असं काहीही करू नको, माझी आयडेनटिटी जर उघडकीला आली, तर आमचं काय होईल हे सांगणं कठीण आहे. त्यामुळे माझी भेट झाली होती, हे कोणालाही सांगू नकोस. वाईट गोष्टी वाऱ्या सारख्या पसरतात.” असं म्हणून अविनाशनी हात जोडले, आणि तो जाण्यासाठी उठला.

निशांतची मतीच गुंग झाली होती. यावर काय बोलावं हेच त्याला कळत नव्हतं. तो म्हणाला “काका, आता मी काय बोलणार? करोडोची संपत्ती सहजा सहजी मिळत असतांना तुम्ही नाकारता आहात, नतमस्तक झालो मी तुमच्या एकमेकांवरच्या प्रेमापूढे.” आणि निशांतनी अविनाशला आणि सलमाला वाकून नमस्कार केला. त्याचा गळा भरून आला. त्यांनी बोलायचा प्रयत्न केला पण आवाज फुटला नाही. अविनाशच्या लक्षात त्याची अवस्था आली, त्यांनी काही न बोलता, निशांतच्या पाठीवर थोपटलं. आणि ती दोघं निघाले. आता निशांतला कंठ फुटला, म्हणाला” काका निदान जेवून तरी जा. मला फार बरं वाटेल. प्लीज.”

त्यांची विनंती ऐकून सलमा हसली, म्हणाली “अविनाश थांबूया आपण, एवढ्या प्रेमाने बोलावतो आहे हा मुलगा, त्याचा मान राखायला पाहिजे. पण निशांत या खोलीच्या बाहेर आपण हिंदीतच बोलायचं आहे, हे पक्क लक्षात ठेव.” निशांतनी हसून मान डोलावली पण म्हणाला “काका, दोन प्रश्न मला पडले आहेत, त्याचं उत्तर मिळालं तर मला बरं वाटेल.”

“अरे  माझ्या मते तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुला मिळाली आहेत मग आता आणखी काय?” अविनाश म्हणाला.

“काल मी तुमच्या घरी आलो होतो, तेंव्हा तुम्ही मला म्हणाला की इथे बोलण्यापेक्षा मी हॉटेल वर येतो, तिथेच बोलू, असं का?”

उत्तरा दाखल सलमाच बोलली. “सांगते, पण हे तू कोणालाच सांगू नकोस. आम्ही अडचणीत येऊ. असं आहे, इथे कोणालाच अविनाशच्या पूर्वायुष्याबद्दल माहीत नाहीये. अगदी कुल्लापारात सुद्धा कोणाला माहीत नाहीये. सर्वांना हेच सांगितलं आम्ही, की हा अब्बाजान च्या दूरच्या नात्यातला आहे आणि वाघाच्या हल्ल्यात जखमी झाला म्हणून उपचारासाठी त्याला आमच्याकडे ठेवून घेतलं आहे म्हणून. अब्बा चांगले हकीम होते म्हणून कोणालाच संशय आला नाही. हे कारण आहे. झालं समाधान?”

“पण असं का सांगितलं?” – निशांत

“कारण त्यावेळेस इतकं अराजक माजलं होतं, की एक इंडियन आर्मी ऑफिसर आमच्या घरी आहे हे कळलं असतं तर पुढे काय घटना झाल्या असत्या, हे सांगणं कठीण होतं म्हणून.” सलमा म्हणाली.

“हूं, पण काका, इथे आल्यावर तुम्ही म्हणाला की सलमा काकुला मराठी येत नाही म्हणून, ते का?”

“मी न खरं तर एकटाच येणार होतो, पण सलमा म्हणाली की मी पण येते. मग मी तिच्याकडून कबूल करून घेतलं होतं की ती काही बोलणार नाही म्हणून. पण ती बोलली, पण बरं झालं ती बोलली ते कारण तिने  जास्त चांगल्या तर्‍हेने तुला समजावून सांगितलं. झालं का तुझं शंका समाधान? आता जाऊया जेवायला?”  अविनाश म्हणाला.

“निशांत तुला पाहिल्यावर आणि बोलल्यावर, मला माझ्या मुलाचीच आठवण झाली, तुझ्या सारखाच गोड बोलायचा रे तो. आम्हीच कमनशिबी, एका छोट्याशा आजाराचं निमित्त होऊन गेला बिचारा. म्हणून तुझ्याशी बोलायची आणि डोळे भरून पाहायची इच्छा झाली. सुखी आणि आनंदी रहा बेटा. आमचा आशीर्वाद आहे. कधी वाटलं तर  तर जरूर आठवण काढ आमची.” सलमानी डोळे पुसले. तिने हिजाब चढवला आणि ते जेवण्यासाठी खाली उतरले.

जेवण झाल्यावर निशांतनी त्यांचे आभार मानले. म्हणाला “या परक्या देशात इतक्या आपुलकीची वागणूक मिळेल, अशी कल्पनाही केली नव्हती. मला आई नाहीये, पण तुमच्या मधे मला माझ्या आईचाच भास झाला. काकू, तुम्ही इतक्या थोड्या वेळात इतकी माया लावली, कसे आभार मानू तुमचे.” त्याचा गळा भरून आला, बोलणं अशक्य झालं त्याला. सलमानी त्यांच्या पाठीवरून  हात फिरवला थोडं थोपटलं आणि म्हणाली “ आम्हाला पण तुझी सारखी आठवण येत राहील.” तिने हिजाब, चेहऱ्यावरून  हटवला, तिचे डोळे भरून आले होते. आणखी काही न बोलता, तिने डोळे पुसले आणि ते दोघं चालू पडले. निशांत बराच वेळ ते लोकं गेले त्या दिशेने बघत राहिला.

********

सारंग, किरीट आणि प्रशांत तिघंही सारंगच्या ऑफिस मधे बसले होते. निशांत कामगिरीवर जाऊन जवळ जवळ महिना उलटून गेला होता. सगळेच आतुरतेने निशांतची वाट पाहत होते. तिघांच्याही चेहऱ्यावर कमालीची उत्सुकता दिसत होती. निशांतचा फोन आल्यावर सारंगनी दोघांनाही बोलावून घेतलं होतं. निशांत ७  वाजता येणार होता पण हे सगळे ६  वाजल्यापासूनच त्यांची वाट पाहत होते. शेवटी ठरलेल्या वेळी निशांत आला.

“निशांत, आता आमची उत्सुकता जास्त ताणू नकोस. नीट काय काय घडलं ते सगळं सविस्तर सगळं सांग” सारंग सर म्हणाले.

मग सारंगने पूर्ण रिपोर्ट द्यायला सुरवात केली. एक एक बारीक सारिक गोष्ट सुद्धा, तो त्यांनी काढलेल्या नोट बघून सांगत होता. सगळं सविस्तर सांगे पर्यन्त रात्रीचे  साडे नऊ वाजले. नंतर तिघांच्याही मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते.

सारंगनेच प्रथम बोलायला  सुरवात केली. “म्हणजे अविनाशचं नाव स्पर्धेतून बाद झालं असा निष्कर्ष काढायचा का ?”

“हो, म्हणजे या सर्व घटना क्रमातून दूसरा अर्थ निघतच नाहीये.” – निशांत.

“पण मला समजत नाहीये की, एवढ्या कोट्यावधीच्या मालमत्तेकडे कोणी इतक्या सहज पाठ फिरवू शकतो का?” प्रशांत सरांची शंका.

 

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com