तोतया वारसदार भाग 14
पात्र परिचय-
सुलतानी - अविनाश गोखल्यांचे बदललेले नाव.
सलमा - सुलतानीची बायको.
निशांत - शोधकर्ता.
भाग १४
भाग १३ वरून पुढे वाचा....
निशांतनी मग जास्त ताणून धरलं नाही, आणि म्हणाला “ठीक आहे.” आणि निघाला. निशांत विचार करत होता की असं काय सांगण्यासारखं आहे, की जे इतर कोणाला कळण्या सारखं नाहीये? पण त्याला काही समाधान कारक उत्तर सापडलं नाही. शेवटी त्यांनी ठरवलं की विचार करण्यापेक्षा उद्याची वाट पाहू.
दुसऱ्या दिवशी सुलतानी त्यांच्या हॉटेल वर आला. बरोबर त्यांची बायको होती. रूम मधे आल्यावर सुलतानीनी आपल्या बायकोची ओळख करून दिली. “ये सलमा है. मेरी बिवी.
निशांतने हात जोडून नमस्कार केला. सलमाने नुसतीच मान हलवली. कसलीच प्रतिक्रिया दिली नाही.
निशांतने चहा नाश्ता मागवला. चहा पिऊन झाल्यावर निशांत म्हणाला, “काय सांगणार होता काका तुम्ही?”
“निशांत, मी हिंदी मध्ये बोलणार आहे, म्हणजे मी काय बोलतो आहे हे सलमाला पण कळेल.” – सुलतानी.
“मला चालेल, पण यांना काही माहीत नाहीये का?” – निशांत.
“ना ना, तिला सगळंच माहीत आहे. माझ्याकडून जर काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या, किंवा मागे पुढे झाल्या तर, ती करेक्ट करेल म्हणून. म्हणूनच तर तिला पण मी घेऊन आलो आहे.” – सुलतानी.
आता निशांतची उत्सुकता वाढत चालली होती. अविनाशची बायको मुसलमान, वरतून तिला सगळं माहीत आहे म्हणतात. काकांनी पण नाव बदललेलं दिसतंय. त्यांच्याच घरात बोलायचं सोडून हॉटेल मधे बोलायला आलेत. सगळाच अनाकलनीय प्रकार होता. या सगळ्या प्रश्नांची उकल होणं जरुरीचं होतं. त्यानी टेप रेकॉर्डर काढला, म्हणाला, “काका, मी आपलं बोलणं रेकॉर्ड केलं तर चालेल ना? म्हणजे मी विसरलो तरी रेकॉर्डिंग वरुन करेक्ट करता येईल.”
“चालेल.” -सुलतानी.
निशांतनी नवीन कॅसेट घातली आणि रेकॉर्डर ऑन केला आणि मग सुलतानीनी बोलायला सुरवात केली.
“तुला माहितीच आहे की मी पॅरा रेजिमेंट मधे होतो म्हणून.” निशांतनी मान डोलावली. “लढाई च्या काही दिवस आधी आम्हाला पॅरश्यूट ने एकतरपुरच्या जंगलात उतरवलं. सगळे ठरलेल्या ठिकाणी पोचले, पण माझं पॅरश्यूट भरकटलं, सोसाट्याचा वारा सुटला होता त्यामुळे कुल्लापारा च्या जंगलात आल्यावर फाटलं. आणि मी वेगात खाली येऊन एका झाडावर आदळलो.” सुलतानी थोडा थांबला.
“बापरे, असं झालं? मग तुम्हाला खूप लागलं असेल.” निशांतनी प्रतिक्रिया दिली.
“हो, खूपच लागलं होतं. एक हात आणि एक पाय मोडला होता, आणि डोक्याला जबरदस्त मार बसला होता. मी बेशुद्ध झालो होतो, आणि झाडावर पॅरश्यूट अडकल्या मुळे लोंबकळत होतो. भल्या सकाळी सूर्योदय व्हायच्या पण अगोदर या सलमाचे वडील एक नावाजलेले हकीम होते, आणि काही कामा निमित्य जंगलातून चालले होते, त्यांना मी दिसलो. माझ्या अंगावरचा युनिफॉर्म आणि झाडाला अडकलेलं पॅरश्यूट, त्यांनी पाहीला आणि ओळखलं की मी भारतीय सैन्यातला माणूस आहे म्हणून. त्यांनी अजून दोन मित्रांना बोलावलं आणि मला घरी घेऊन गेले. मी पाकिस्तानी शिपायांच्या नजरेस पडू नये म्हणून पूर्ण खबरदारी घेतली.” सुलतानी सांगत होता, आणि निशांत लक्ष पूर्वक ऐकत होता.
“मग, मग काय झालं? त्यांनी आर्मीच्या लोकांशी संपर्क केला नाही का?” निशांतनी विचारलं.
“नाही, ते खूपच अफरातफरीचे, म्हणजे गोंधळाचे दिवस होते, सगळीकडे अराजक माजलं होतं. अश्या वेळेस भारतीय आर्मीच्या लोकांना भेटणं हे धोक्याचं ठरलं असतं. पुन्हा मी बेशुद्ध, मला घेऊन कुठे जाणं पण शक्य नव्हतं. म्हणून कोणी कोणालाच कळवलं नाही.” सुलतानीनी सलमाच्या वडिलांची अडचण सांगितली.
“बरं मग पुढे काय झालं” – निशांत
“मी जवळ जवळ दीड वर्ष बेशुद्ध होतो. कोमातच होतो. सलमाच्या वडिलांनी माझी खूप काळजी घेतली. ते एक निष्णात हकीम होते. परिसरात त्यांच्या तोंडीचा कोणी दूसरा हकीम नव्हता. त्यांच्या उपचारांमुळेच मी बरा झालो. खरं तर त्यांना हे फार अवघड होतं. त्यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा फारशी चांगली नव्हती. सलमाची आई तिच्या लहानपणीच गेली, आणि सलमा लहान होती जेमतेम १५ वर्षांची, तिने सुद्धा एका अनोळखी माणसांसाठी अपार कष्ट उपसले. ते अतिशय धार्मिक वृत्तीचे माणूस होते. सलमाची आबाळ होऊ नये म्हणून त्यांनी दुसरं लग्न पण केलं नाही. खरं तर त्यांच्या धर्मा प्रमाणे त्यांना चार लग्न करण्याची मुभा होती, पण सलमाचे अब्बा जरा वेगळेच होते. त्यांच्या इतका संत माणूस मी पाहिला नाही. त्यांना कुल्लापारा गावामध्ये खूप मान होता.”
“दीड वर्षा नंतर मला शुद्ध आली. मला काहीच आठवत नव्हतं अगदी माझं नाव सुद्धा. केंव्हा तरी एकदा एका डॉक्टरांना सलमाच्या वडिलांनी घरी आणलं. डॉक्टर म्हणाले हळू हळू सगळं आठवेल, पण वेळ लागेल. दिवस जात होते, माझ्या प्रकृतीत सुधारणा होत होती. तशातच आमचे प्रिय प्रेसिडेंट शेख मूजीब यांची हत्या झाली. संपूर्ण देशात गोंधळाचीच परिस्थिती होती. त्याच सुमारास सलमाच्या अब्बाजान चा मृत्यू झाला. आता घरात आम्ही दोघंच. मृत्यू पूर्वी त्यांनी सलमाकडून वचन घेतलं की, मी पूर्ण बरा होई पर्यन्त ती मला अंतर देणार नाही म्हणून. निशांत, अरे या पोरीने ते वचन पाळलं. मी पूर्णपणे तंदुरुस्त होई पर्यन्त १९८० साल उजाडलं. तिथे मी एक छोटासा व्यवसाय सुरू केला. हळू हळू जम बसत होता. इतकी वर्ष बरोबर राहिल्याने, माझ्या आणि सलमाच्या मधे वेगळेच बंध निर्माण झाले होते, आमची एकमेकांना इतकी सवय झाली होती की, आम्ही लग्न करायचं ठरवलं. सलमा हा देश सोडून जायला तयार नव्हती. तिचं बरोबर होतं, तिचं सगळं गणगोत इथेच होतं, मी सलमाला सोडून जाण्याचा विचारही करू शकत नव्हतो. मग मीच निर्णय घेतला, इथेच कायमचं राहण्याचा. म्हणून मी इस्लाम धर्म स्वीकारला. सलमाशी निकाह झाल्यावर कुल्लापाराहून सगळं गुंडाळून इथे एकतरपूरला आलो आणि इथेच मी तो छोटासा व्यवसाय वाढवला. आज आम्ही बऱ्या पैकी आर्थिक स्थितीत आहोत. आता तूच सांग मी घड्याळाचे काटे उलटे फिरवू शकतो का?” सुलतानीनी आपली व्यथा मांडली.
निशांतला काय बोलावं हेच कळेना. अविनाशचं म्हणण खरं होतं. पण असं गप्प राहून निशांतचं काम होणार नव्हतं. म्हणून तो म्हणाला “काका, आता तुम्हाला खरं काय ते सांगतो.”
“म्हणजे काय? आता पर्यन्त तू खोटं बोलत होतास?” – सुलतानी
“नाही काका, मी खरं तेच सांगितलं, पण काही गोष्टी, तुम्हीच अविनाश आहात, याची खात्री पटल्यावरच वरच सांगता येणार होत्या, म्हणून थांबलो होतो.” – निशांतनी सफाई दिली.
“सांग बाबा सांग, पण आता काही लपवू नकोस.” – सुलतानी.
“नाही लपवणार. तुमच्या वडिलांनी तुमचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला. वर्षा मागून वर्ष गेली पण तुमचा पत्ता लागलाच नाही. शेवटी ते जेंव्हा गेले, तेंव्हा त्यांच्याजवळ एकही मुलगा नव्हता.” – निशांत.
“अरे, असं कसं? लंडनहुन कोणीच आलं नाही?” – सुलतानी.
“नाही, कारण माहीत नाही, पण कोणीच जवळ नव्हते, इतकच काय, तेरवीला सुद्धा कोणी आलं नाही.”- निशांत.
“अरे, पण का?” सुलतानी म्हणाला. “ही गोष्ट फार वाईट झाली. मी हे समजत होतो आजपर्यंत की ते दोघं बाबांची काळजी घेत असतील म्हणून.”
“नंतरचं सगळं क्रिया कर्म सारंग वकिलांनी केलं. तुमच्या बाबांनी मृत्यूपत्र केल होत, आणि त्याच्यात लिहून ठेवलं, की त्यांच्या वारसदारांना शोधा आणि मालमत्ता त्यांच्या स्वाधीन करा म्हणून. सारंग सरांनी ती जबाबदारी घेतली आणि आमच्या कंपनीशी संपर्क साधला. आमचे सर, राव साहेब, यांची डिटेक्टिव एजन्सी आहे. सारंग वकिलांनी आमच्यावर सर्वांना शोधण्याचं काम दिल आहे. मी त्या कंपनीत काम करतो. राव साहेबांनी या कामासाठी माझी निवड केली आणि तुम्हा तिघा भावंडांना शोधायची जबाबदारी सारंग वकिलांनी माझ्यावर सोपवली.
त्यानुसार मी इथे आलो, पण तुमची भेट होईल यांची ५ टक्के सुद्धा खात्री नव्हती. अगदी योगायोगानेच तुमची भेट झाली. तुमचा पत्ता तर लागला, आता इंग्लंडला जाऊन त्या दोघांचा पत्ता शोधायचा आहे. काका, तुम्हाला कल्पना नसेल, पण सगळी मालमत्ता कोट्यावधी रुपयांची आहे. काका, माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही भारतात येण्याचा निर्णय घ्यावा. जी काही व्यवस्था करायची असेल, ती मी करेन. वेळ लागेल, पण होऊन जाईल.”
आता अविनाश थोडा अस्वस्थ झाला. कितीही म्हंटलं तरी करोडोचा मामला म्हंटल्यांवर थोडी तरी चल बिचल तर होणारच. अविनाशनी सलमाकडे पाहिलं. आता सलमाने आत्ता पर्यंत असलेला हिजाब उतरवून ठेवला. निशांत पहातच राहिला. एक स्वर्गीय सौंदर्य साक्षात त्याच्या समोर होतं. नवल नव्हतं अविनाशने इथेच राहण्याचा निर्णय घेतला ते.
सलमा दोन मिनिटं अविनाशकडे बघत होती मग हलक्या स्वरात अविनाशला उद्देशून म्हणाली “अविनाश, तुला जायचं असेल तर मी अडवणार नाही. शेवटी प्रत्येकाला आपला देश प्यारा असतोच.” निशांत ऐकतच राहिला, तिचा आवाज अत्यंत मंजुळ तर होताच पण तिचं मराठी सुद्धा अतिशय स्पष्ट होतं. अविनाश मग असं का म्हणाला की सलमाला मराठी येत नाही म्हणून, त्याचं डोकं फिरायची वेळ आली होती. त्यांनी अविनाश कडे पाहिलं, अविनाश आता गोंधळला होता. सलमा मराठी बोलेल असं त्याला वाटलंच नव्हतं.
“सलमा, तुला माहीत आहे, मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. जायचंच असेल तर दोघंही, नाही तर नाही.” – अविनाश आता मराठीवर उतरला होता.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com