तोतया वारसदार
पात्र परिचय-
सारंग - वकील, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य
निशांत - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी.
रंगनाथ आणि भास्कर – सखाराम पंतांची मुलं. प्रथम पुणे आणि मग नागपूरला
स्थायिक
विनायक भास्कर चा मुलगा वसंत त्याचा मुलगा विनायक
व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.
कावेरी रंगनाथाची मुलगी. विश्वास देशमुख शी लग्न
श्रीरंग कावेरीचा मुलगा. दुसऱ्या महा युद्धाच्या वेळेस सैन्यात गेला.
सीता, सरिता जान्हवी – श्रीरंग च्या मुली.
भाग ७
भाग ६ वरून पुढे वाचा....
निशांतने पासपोर्ट ऑफिस कडे मोर्चा वळवला. तिथे त्याला फारशी माहिती तर मिळाली नाही, पण एक माणूस भेटला. तो एक एजंट होता, म्हणाला, “मी बघतो, काही माहिती मिळाली तर.” त्यांनी दोन तीन दिवसांनंतर भेटायला सांगितलं. “पण साहेब, मी काम करण्याची फी घेतो. सर्विस चार्ज.” निशांतला काहीच प्रॉब्लेम नव्हता, म्हणाला,
“ठीक आहे न, तुम्ही माहिती गोळा करा, मी तुमची जी काही फी असेल ती देईन. चिंता करू नका. हे शंभर रुपये ठेवा, अडवांस म्हणून. मी केंव्हा येऊ? आणि कुठे भेटू तुम्हाला?”
“आज सोमवार आहे, तुम्ही मला गुरूवारी दुपारी तीन वाजता याच ठिकाणी भेटा. मी शक्य तेवढी सर्व माहिती काढून ठेवतो. मी इथेच तुमची वाट पाहीन.” एजंट म्हणाला.
निशांत जेवून घरी आला, आणि वंशावळी उघडून बसला. बराच वेळ विचार केल्यावर त्यांनी सारंग सरांचा फोन फिरवला, आणि संध्याकाळी, ७ वाजता येऊ का विचारले.
७ वाजता सारंग सर निशांतची वाटच पाहत होते.
“हं बोल निशांत, काय खबर?” सारंग सरांनी विचारलं.
मग निशांतनी गेल्या दोन – दिवसांतल्या घडामोडी सविस्तर सांगितल्या. आणि मग म्हणाला की “आता तसंही दोन तीन दिवस काही कळणार नाहीये, वेळ आहे, तर विचार केला की श्रीरंगच्या तिन्ही मुलींचा शोध घ्यावा. ह्या बद्दल तुम्हाला काही माहीत आहे का? म्हणजे लग्न केंव्हा झाली, कुठे झाली, आणि कोणा बरोबर?”
सारंग सर जरा विचारात पडले, म्हणाले, “नाही या बाबतीत विनायकराव काही बोलल्याचं काही स्मरत नाही. तु काही अंदाज बांधला आहे का?”
“माझा अंदाज असा आहे की त्यांची लग्नं साधारण १९५० ते १९५८ या दरम्यान झाली असावीत. त्यावेळेस गोखले कुटुंब कुठे रहात असावेत?” – निशांत म्हणाला.
“साधारण १९६० च्या दरम्यान हे लोकं नवीन घरात शिफ्ट झालेत, त्याच्या अगोदर सर्व महालातल्या घरात राहत होते. त्या घराचा पत्ता आहे माझ्या जवळ. पण ते घर केंव्हाच विकलं आहे.” सारंग वाकिलांनी त्यांना होती ती सर्व माहिती निशांतला दिली.
“ठीक आहे.” निशांत म्हणाला, “आता पुढचा तपास कसा करायचा ते बघतो. मी निघतो आता.” निशांतनी किती वाजले हे बघितलं, आठ वाजले होते, नागपूरच्या जुन्या शहराला महाल म्हणतात. त्यांनी सरळ तिकडे जायचं निर्णय घेतला. निशांत, सारंग सरांनी दिलेल्या पत्त्यावर पोचला. कॉल बेल दाबल्यावर एका तिशीतल्या गृहस्थाने दार उघडलं. दारावर कुलकर्णी अशी पाटी होती.
“कोण हवे आपल्याला?” – कुलकर्णी.
“मी निशांत, सारंग वकिलांकडून आलो आहे. थोडी माहिती हवी आहे.”
“वकिलांकडून? काय भानगड आहे?” – कुलकर्णी.
“काळजी नका करू, भानगड काहीच नाहीये. ३५-४० वर्षांपूर्वी या ठिकाणी गोखले राहत होते, त्यांच्या चुलत बहीणींबद्दल जरा माहिती हवी होती.” – निशांत.
“आम्ही हे घर गोखल्यांच्या कडूनच विकत घेतलं आहे, पण ही ३०-३५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आत्ता त्याचं काय?” – कुलकर्णी जरा गोंधळात पडले होते.
“विनायकराव गोखल्यांचं निधन झालं आहे आणि, ही बातमी मला त्यांच्या बहिणींना द्यायची आहे. त्यांचा नेमका पत्ता माहीत नाही म्हणून आमच्या साहेबांनी त्यांचा पत्ता शोधायला सांगितलं आहे, तुम्हाला माहीत आहे का?” निशांतनी आपली बाजू स्पष्ट केली.
“नाही, माझा जन्मच या घरात झाला आहे, त्यामुळे इतक्या पूर्वीची मला काही माहिती नाही.” – कुलकर्णी.
“कदाचित आपल्या वडिलांना किंवा आजोबांना माहीत असेल, विचारता का त्यांना.” निशांतनी विनंती केली.
“ओके. या बसा, मी बोलावतो त्यांना.” – कुलकर्णी.
कुलकर्णींचे वडील आले, त्यांना निशांतनी पुन्हा एकदा, त्याला काय माहिती हवी आहे, हे सांगितलं.
“हो, विनायकरावांना मी ओळखतो, आमची त्यांच्याशीच या घराबद्दल सगळी बोलणी झाली होती. पण त्यांच्या कुटुंबाबद्दल काही माहिती नाही. आम्ही तेंव्हा अमरावतीला होतो, माझ्या वडिलांची इथे बदली झाली त्यामुळे आम्ही हे घर घेतलं.” – कुलकर्णींचे वडील.
“मग, मला ही माहिती कोण देऊ शकेल? तुम्ही कोणाचं नाव सुचवू शकता का?” निशांत आता मुद्दा सोडायला तयार नव्हता.
“आमच्या शेजारी, परांजपे राहतात, पण आता त्यांचं वय झाल्यामुळे ते अधून मधून पुण्याला मुलाकडे जातात. आता सुद्धा ते पुण्याला गेले आहेत. पण त्यांचे गोखल्यांशी घनिष्ठ संबंध होते, त्यांना नक्कीच माहिती असेल.” - कुलकर्णींचे वडील.
निशांत जरा विचारात पडला मग विचारलं की, “त्यांचा पुण्याचा पत्ता आहे का तुमच्या कडे? किंवा फोन नंबर?”
फोन नंबर तर नाहीये, पण पत्ता कदाचित माझ्या बायकोला माहीत असेल, विचारतो, एक मिनिट ” कुलकर्णींचे वडील.
पांच मिनिटांनी कुलकर्णी पत्ता लिहिलेला कागद घेऊन आले.
“निशांत साहेब, पत्ता तर मिळाला, पण तुम्हाला तो का द्यायचा? आम्ही तुम्हाला ओळखत पण नाही, उद्या जर परांजपे म्हणाले की काय जरूर होती अनोळखी माणसाला पत्ता द्यायची, तर?” कुलकर्णी आजोबा म्हणाले.
“तुमच्याकडे डायरेक्टरी असेल न, त्याच्यात सारंग वकिलांचा फोन नंबर असेल, फोन करून खात्री करून घ्या ना, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. नंबर माझ्याकडे पण आहे, पण डायरेक्टरी बघून त्या नंबर वर सारंग सरांशी तुम्ही बोललात, तर तुमच्या मनात मुळीच शंका राहणार नाही.” निशांत म्हणाला. ते कुलकर्णी बाप लेक दोघांनाही पटलं. त्यांनी फोन करून खात्री करून घेतली आणि मगच निशांतला पत्त्याचा कागद दिला.
निशांत घरी आला तेंव्हा रात्रीचे साडे नऊ वाजले होते. तो विचार करत होता की उद्या कामठीला जायचं होतं आणि दोन दिवसांनी पासपोर्ट ऑफिस मधे, म्हणजे दोन दिवस काही पुण्याला जाता येत नाही. मग सगळं गुंडाळून ठेवलं आणि झोपायला गेला.
दुसऱ्या दिवशी निशांत कामठीच्या आर्मी हेड क्वार्टर ऑफिस मधे गेला. आणि त्या संबंधित अधिकाऱ्याला भेटला. “साहेब, मिळाली का काही माहिती?” निशांतनी विचारलं.
“थोडी माहिती मिळाली आहे, म्हणजे आमच्याजवळ जेवढी आहे तेवढी तुम्हाला देतो. Mr. अविनाश हे पॅरा रेजिमेंट मधे होते आणि त्यांचं बांग्लादेश सीमेवर पोस्टिंग झालं होतं. त्यांना बंगला देश मधे पॅराशूट ने उतरवलं होतं, पण नंतर त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. आमच्याकडे एवढीच माहिती आहे.” अधिकारी म्हणाला.
मिळालेली माहिती अगदीच त्रोटक होती, म्हणून निशांत म्हणाला की, “साहेब, त्यांच्या बरोबर आपल्याच सैन्यातले त्यांचे सहकारी असतील, त्यांचे पत्ते मिळाले तर आम्हाला त्यांच्याकडे विचारपूस करता येईल.” तो अधिकारी निशांतच्या बोलण्यावर विचार करत होता, तो म्हणाला की, “या बाबतीत अधिक माहिती हवी असेल, तर तुम्ही एक काम करा, नागपूरला डिस्ट्रिक्ट आर्मी वेलफेअर ऑफिस आहे, त्यांच्याकडे, निवृत्त आणि आर्मीची बेपत्ता झालेली माणसं, यांचे सर्व रेकॉर्ड असते. त्यांच्याकडे जाऊन चौकशी केलीत तर कदाचित, आणखी काही माहिती तुम्हाला मिळू शकेल.” निशांत नागपूरला परत आला. मिळालेल्या माहितीमुळे, परिस्थितीत काहीच फरक पडला नव्हता.
दुसऱ्या दिवशी तीन वाजता निशांत, पासपोर्ट ऑफिस मधे पोचला. एजंट तिथेच उभा होता. हाय, हॅलो झाल्यावर त्यांनी जी माहिती गोळा करून आणली होती ती सांगायला सुरवात केली.
व्यंकटेशचा पासपोर्ट १९६० चा आहे आणि सौमित्रचा १९६५ चा. १९८० मधे दोघांनीही ब्रिटिश पासपोर्ट घेतला आहे. मी पासपोर्ट ची झेरॉक्स कॉपी मागितली आहे, पण त्याला थोडा वेळ लागेल असं दिसतंय. ती हातात आल्यावर तुम्हाला त्यांचा तिथला पत्ता मिळू शकेल.”
“साधारण किती वेळ लागेल कॉपी मिळायला?” – निशांतनी विचारलं.
“सांगता येत नाही, पण एक-दोन हप्ते लागतील, आणि थोडे पैसे पण लागतील.” एजंटनी तेवढ्यात पैश्यांची मागणी केली. निशांतला या सगळ्याची सवय होती, तो म्हणाला, ठीक आहे, हे ५०० रुपये ठेवा. हा माझा फोन नंबर आहे, काम झालं की ह्या नंबर वर मला फोन करा. निशांतनी राव साहेबांचा फोन नंबर दिला. निशांतनी मग रेल्वे स्टेशन वर जाऊन दुसऱ्या दिवसाचं महाराष्ट्र एक्सप्रेसचं पुण्याचं तिकीट काढलं.
“कोण हवंय आपल्याला?” एका मध्यम वयाच्या बाईने दरवाजा उघडल्यावर विचारलं.
“मी निशांत, मी नागपूर वरून आलो आहे, आणि मला वसंतराव परांजपे साहेबांना भेटायचं आहे. आहेत न ते.”
“हो आहेत, पण काय काम आहे ते कळलं तर बरं होईल.” - वसंतरावांची सून.
“मला नागपूरला तुमच्या शेजारी, गोखले राहत होते, त्यांच्याबद्दल जरा माहिती हवी होती. प्लीज जरा बोलावता का त्यांना? मी खास तेवढ्यासाठी नागपूर वरून इथे आलो आहे.” निशांत म्हणाला.
“ठीक आहे, एक मिनिट थांबा बोलावते.” असं म्हणून वसंतरावांची सून त्यांना बोलवायला गेली.
“नमस्कार, मी वसंत परांजपे. काय काम आहे माझ्याकडे?”
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com