तोतया वारसदार
पात्र परिचय-
सारंग - वकील, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य
निशांत - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी.
रंगनाथ आणि भास्कर – सखाराम पंतांची मुलं. प्रथम पुणे आणि मग नागपूरला
स्थायिक
कावेरी रंगनाथाची मुलगी. विश्वास देशमुख शी लग्न
श्रीरंग कावेरीचा मुलगा. दुसऱ्या महा युद्धाच्या वेळेस सैन्यात गेला.
सीता, सरिता जान्हवी – श्रीरंग च्या मुली.
भाग ८
भाग ७ वरून पुढे वाचा....
“कोण हवंय आपल्याला?” एका मध्यम वयाच्या बाईने दरवाजा उघडल्यावर विचारलं.
“मी निशांत, मी नागपूर वरून आलो आहे, आणि मला वसंतराव परांजपे साहेबांना भेटायचं आहे. आहेत न ते.”
“हो आहेत, पण काय काम आहे ते कळलं तर बरं होईल.” - वसंतरावांची सून.
“मला नागपूरला तुमच्या शेजारी, गोखले राहत होते, त्यांच्याबद्दल जरा माहिती हवी होती. प्लीज जरा बोलावता का त्यांना? मी खास तेवढ्यासाठी नागपूर वरून इथे आलो आहे.” निशांत म्हणाला.
“ठीक आहे, एक मिनिट थांबा बोलावते.” असं म्हणून वसंतरावांची सून त्यांना बोलवायला गेली.
“नमस्कार, मी वसंत परांजपे. काय काम आहे माझ्याकडे?”
“मी, निशांत, मी नागपूरहून आलो आहे. मी सारंग वकिलांकडे काम करतो. आपल्या शेजारी विनायकराव गोखले राहत होते, त्यांचं निधन झालं आहे म्हणून त्यांच्या चुलत बहिणींना कळवायचं आहे. आमच्याकडे त्यांचा कोणाचाच पत्ता नाहीये, म्हणून मी त्यांच्या जुन्या घरी गेलो होतो. तिथे श्री कुलकर्णी साहेबांनी सांगितलं की तुमचे आणि गोखल्यांचे घनिष्ट संबंध होते, म्हणून तुम्हाला विचारायला आलो आहे.”
“तुम्हाला त्यांचा पत्ता हवाय का?” - वसंतराव.
“हो, आणि काही माहिती मिळाली, तर ते ही हवंय.” निशांतनी सांगितलं.
“किती दिवस झालेत विनायकला जाऊन?” – वसंतराव
“तरी महिना झाला असेल.” – निशांत.
“म्हणजे महिना भर तुम्ही थांबला, मग आजच असं काय घडलं की तुम्ही पुण्याला एवढ्या तातडीने माझी भेट घ्यायला आला आहात?” – वसंतरावांचा प्रश्न.
“त्यांना ही बातमी कळवायची आहे म्हणून.” – निशांत.
“निशांत साहेब, इतक्या वर्षात कोणीच कोणाची विचारपूस केली नाही, मग आता ही बातमी त्यांना कळवून काय साधणार आहात तुम्ही? नाही, माझ्या मनाला काही हे पटत नाही.” वसंतरावांचा सुर आता बदलला होता.
“पण तुम्ही माहिती दिली नाही तर कळवणार कसं त्यांना?”- निशांत.
आता त्यांचा मुलगा पण तिथे येऊन बसला. त्यांनी सगळं बोलणं ऐकलं होतं. तो म्हणाला, “बाबा बरोबर बोलत आहेत. मला सुद्धा काही कारण दिसत नाही. त्यांना नाही कळलं तर काय बिघडणार आहे?”
निशांत थोडा वेळ चुलबुळत बसला, काय करावं हे त्याला समजत नव्हतं. त्यांना खरं सांगणं बरोबर आहे का हे त्याला कळत नव्हतं.
“या तुम्ही आता.” वसंतराव म्हणाले.
शेवटी मनात विचार पक्का करून निशांत म्हणाला, “काका, रागवू नका, खरं कारण सांगतो तुम्हाला.”
“आता काय सांगणार आहात तुम्ही? असं काय गुपित आहे?” – वसंतराव.
“विनायकराव शेवटी शेवटी अगदी एकटे पडले होते, त्यांची मुलं पण त्यांच्याजवळ नव्हती. त्यांना सर्वांची खूप आठवण यायची, शेवटची ८-१० वर्ष तर ते घराच्या बाहेर पण पडू शकत नव्हते. “वर्टीगो” चा प्रॉब्लेम होता त्यांना. त्यांची चूक त्यांना कळली होती. म्हणून त्यांनी सर्वांशीच पुन्हा संपर्क प्रस्थापित करायचा खूप प्रयत्न केला, पण जुन्या चुका खूप भोवल्या त्यांना. कोणीही प्रतिसाद दिला नाही. म्हणून जातांना त्यांनी एक इच्छापत्र केलं आणि त्यात नमूद केलं की “माझ्या वतीने सर्वांची माफी मांगा तरच मला मुक्ती मिळेल.” आता तुम्हीच सांगा, शेवटची इच्छा पूर्ण करणं आपलं कर्तव्य आहे की नाही?” निशांत ने त्यांना पटेल असं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला.
आता बाप लेक दोघंही विचारात पडले. थोड्या वेळाने वसंतराव म्हणाले, “ अशी जर परिस्थिती आहे, तर तुम्ही त्यांच्या दोन्ही मुलांशी संपर्क का करत नाही?”
“खरं आहे तुमचं म्हणण. आम्ही त्याचाही प्रयत्न करतोच आहोत. त्यांचे इंग्लंड मधले पत्ते माहीत नाहीत, म्हणून आमच्या साहेबांनी त्यांच्या एक दोन मित्रांना पत्र पाठवून तपास करायला सांगितलं आहे. कदाचित तिथल्या महाराष्ट्र मंडळात त्यांच्याबद्दल माहिती मिळू शकेल. कळल्यावर त्यांच्याशी आमचे साहेब, सारंग वकील संपर्क करतीलच.” निशांतनी त्याची भूमिका सविस्तर मांडली. निशांतच्या बोलण्याचा अपेक्षित असा परिणाम झाला.
“ठीक आहे. काय माहिती हवी आहे तुम्हाला?” वसंतरावांना निशांतच बोलणं पटलं होतं आणि ते आता बोलायला तयार झाले होते.
“जेवढी माहिती द्याल ती कमीच आहे. सगळीच द्या.” निशांत.
“मुळात तुम्हाला माहिती कशासाठी हवी आहे हेच कळत नाहीये, पत्ते घ्या आणि मोकळे व्हा. तुम्हाला फक्त बातमीच द्यायची आहे न?” – वसंतराव.
“काका, झालेल्या सर्व चुकांबद्दल माफी मागायची आहे. इच्छापत्रात तसंच लिहिलं आहे. आता माफी नेमकी कशा बद्दल मागायची, ते पण कळायला हवं ना, म्हणून म्हंटलं की सगळं सांगा.” निशांत घाई घाईने म्हणाला, विचार केला की न जाणो म्हातारा उलटला तर?
“हं. तुम्ही म्हणताय ते पटलं. जे माहीत आहे ते सगळं सांगतो.” - वसंतराव
संदीप आता वही आणि पेन घेऊन बसला. “सगळं एकदम माझ्या लक्षात राहणार नाही म्हणून मी ऐकता, ऐकता थोडी टिपणं काढीन, चालेल ना?”
“ठीक आहे. नो प्रॉब्लेम.” – वसंतराव म्हणाले, ते थोडा विचार करत होते, जुळवा जुळव करत होते, मग त्यांनी सांगायला सुरवात केली.
“साधारण १९४० च्या दरम्यान वसंतरावांनी श्रीरंगची बायको आणि त्यांच्या तिन्ही मुली यांना आपल्या घरी आणलं. श्रीरंग म्हणजे, रंगनाथरावांचा नातू. रंगनाथ म्हणजे वसंतरावांच्या वडीलांचा, भास्कररावांचा मोठा भाऊ. श्रीरंग त्यांच्या मुलीचा मुलगा. तो दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस सैन्यात भरती झाला. त्याचं यूनिट आफ्रिकेमध्ये रोमेल च्या सैन्याशी लढत होतं. तो पर्यन्त बातम्या मिळत होत्या, नंतर त्यांची काहीच खबर बात कळली नाही. नंतर या तीन मुलींची लग्न विनायकरावांनीच लावून दिलीत.”
निशांत मध्येच बोलला “जर एवढं सगळ विनायकरावांनी केलं, तर मग संबंध इतके खराब कशामुळे झालेत?”
“विनायकरावांनी त्यांच्यासाठी भरपूर केलं. घरदार, कुटुंब सगळं पाहून, पारखून दिलं, पण मोठ्या मुलीचा नवरा, बाहेरख्याली निघाला. बायकोचे दाग दागिने विकून दुसरीचं घर भरत राहिला. बायको बिचारी चुपचाप सहन करत राहिली, एक दिवस दारू पिऊन आला आणि गुरा सारखं बडवलं तिला, घाव वर्मी लागला, वैद्यांना बोलावलं पण काही उपयोग झाला नाही, आठवड्या भरातच तिने प्राण सोडला. हे विनायकरावांना कळल्यावर
त्यांनी पोलीसात तक्रार केली, पण जावयाचे वडील विनायकरावांच्या हाता पाया पडले आणि प्रकरण निपटवलं.” वसंतराव जरा थांबले.
“बापरे, हे फार भयंकर झालं. मग त्यांची मूलं?” – निशांत.
“नाही, मुलं व्हायच्या आधीच सगळं संपलं होतं. मग संबंध सुद्धा संपले.” वसंतरावांनी एक सुस्कारा सोडला. अशी कथा आहे.
“ऐकून सुन्न झालो. पण काका, बाकी दोघी जणी? त्यांचे संबंध का बिघडले?” – निशांत
“ती पण एक कहाणीच आहे. ती पण सांगतो.” – वसंतराव म्हणाले.
पण तेवढ्यात वसंतरावांची बायको आली आणि त्यांना म्हणाली, “अहो, फार उशीर झाला आहे, तुम्हाला शुगर आहे, जेवायला उशीर झाला तर त्रास होईल, बाकी गोष्टी उद्या बोलता येणार नाहीत का?”
निशांत लगेच उठला. म्हणाला ”सॉरी काका, माझ्या पण लक्षात आलं नाही, तुम्ही तब्येतीची काळजी घेणं आवश्यक आहे. खरंच उशीर झाला आहे, मी उद्या येतो. केंव्हा येऊ तेवढं सांगा.”
“चालेल. उद्या दहा - साडे दहा वाजता या.” – वसंतराव
“ओके” असं म्हणून निशांत निघाला.
निशांत विचार करत होता, उद्या वसंतराव काय सांगणार यांचा. मोठ्या मुलीच्या बाबतीत जे घडलं ते भयंकरच होतं. बाकीच्या दोघींबद्दल सुद्धा असाच काही तर घडलं नसेल ना, कदाचित म्हणूनच वसंतराव माहिती द्यायला आढे वेढे घेत असतील. काही असो, निशांतला बराच वेळ झोप आली नाही.
दुसऱ्या दिवशी बरोबर साडे दहा वाजता निशांत वसंतरावांच्या घरी पोचला.
“या, या निशांत साहेब, बसा. तुमचीच वाट पाहत होतो.” – वसंतरावांनी हसतमुखाने स्वागत केलं. निशांतनी पाहिलं की मुलगा समोर नव्हता, नक्कीच ऑफिस ला गेला असणार, मग तो पण निवांतपणे खुर्चीवर बसला. नोटपॅड काढून सरसावून बसला. तेवढ्यात त्यांच्या बायकोने चहा आणि पोह्याच्या बशा आणून ठेवल्या.
“घ्या, आधी चहा घेऊ, आणि मग निवांतपणे बोलू.” – वसंतराव.
चहा आणि पोहे झाल्यावर निशांत म्हणाला “ हूं, सांगा आता काका.”
“दुसरी मुलगी सरिता,” वसंतराव सांगत होते, “ तिचंही लग्न विनायकरावांनी मोठ्या थाटात लावून दिलं. सगळं छान चाललं होतं, पण बिचारीच्या नशिबी संसारसुख नव्हतं. वर्षभरातच तिचा नवरा सांप चावल्यामुळे मृत्यू पावला. मग काय, पांढऱ्या पायाची म्हणून हिच्यावर शिक्का बसला. तरी सुद्धा बिचारी सरिता, सासू, सासऱ्यांची सेवा करत राहिली. विनायकराव तिला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी गेले होते, पण तिच्या सासऱ्यांनी खूप उलट सुलट बोलून विनायकरावांचा अपमान केला आणि त्यांना जवळ जवळ धक्के मारूनच बाहेर काढलं.”
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com