तोतया वारसदार
पात्र परिचय-
सारंग - वकील, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य
डॉ प्रशांत - डॉक्टर, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य
किरीट - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य
निशांत - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी.
कावेरी रंगनाथाची मुलगी. विश्वास देशमुख शी लग्न
श्रीरंग कावेरीचा मुलगा. दुसऱ्या महा युद्धाच्या वेळेस सैन्यात गेला.
सीता, सरिता जान्हवी – श्रीरंग च्या मुली.
भाग ९
भाग ८ वरून पुढे वाचा....
“दुसरी मुलगी सरिता,” वसंतराव सांगत होते, “ तिचंही लग्न विनायकरावांनी मोठ्या थाटात लावून दिलं. सगळं छान चाललं होतं, पण बिचारीच्या नशिबी संसारसुख नव्हतं. वर्षभरातच तिचा नवरा साप चावल्यामुळे मृत्यू पावला. मग काय, पांढऱ्या पायाची म्हणून हिच्यावर शिक्का बसला. तरी सुद्धा बिचारी सरिता, सासू, सासऱ्यांची सेवा करत राहिली. विनायकराव तिला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी गेले होते, पण तिच्या सासऱ्यांनी खूप उलट सुलट बोलून विनायकरावांचा अपमान केला आणि त्यांना जवळ जवळ धक्के मारूनच बाहेर काढलं.”
“अरे, असं का? ते तर तिला घेऊन जायला आले होते ना?” – निशांत.
“त्यांना त्यांची सेवा करणारी हक्काची मोलकरीण घरात हवी होती, दुसरं काही नाही. आणि सरिता पण त्यांची मनोभावे सेवा करत राहिली. खूप वाईट वागणूक द्यायचे तिला ते. सतत घालून पाडून बोलायचे, तिच्या फुटक्या नशीबामुळेच त्यांचा मुलगा अकाली गेला, असं म्हणायचे. सगळी कामं करून घ्यायचे पण जेवायला सुद्धा धड द्यायचे नाहीत. आमच्याकडे यायची तेंव्हा आम्ही तिला जेवल्याशिवाय कधी सोडलंच नाही. खूप कीव यायची बिचारीची.” काकू, म्हणजे वसंतरावांची बायको म्हणाली.
“अरे देवा! असंही होतं का?” – निशांत.
“हो, मग विनायक रावांना आम्ही सांगितल्यावर, त्यांनी तिला दरमहा ३००० रुपये पाठवायला सुरवात केली, आणि ती नसतांना तिच्या घरी जाऊन त्यांना सज्जड दम भरला. मग त्याच्या नंतर तिला फारसा काही त्रास झाला नाही.” – वसंतराव
“पैसे कोण नेऊन द्यायचे?” – निशांत.
“बरीच वर्ष माझी मीच नेऊन द्यायची, नंतर माझा मुलगा किंवा सून. दहा वर्षा पूर्वी ती वारली. मग हा व्यवहार थांबला.” – काकू.
“बापरे काय ऐकतोय मी. काय एक एक लोकं असतात! सासू सासऱ्यांची एवढी मनोभावे सेवा करून काय फळ मिळालं तिला! पण काकू, चांगल्या माणसांच्याच नशीबी का असं यावं समाजत नाही. हे सगळं ऐकल्यावर मन विषण्ण झालं. सहनशक्तीच्या पलीकडचं आहे हे सगळं.”– निशांत.
“आहे खरं असं! पण आपण काय करू शकतो.” – काकू.
“आता तिसरी मुलगी जान्हवी, त्यांचं सगळं व्यवस्थित चाललं होतं, पण दैवाला पाहवलं नाही असंच म्हणावं लागेल.” – वसंतरावांनी एक सुस्कारा सोडला.
“का हो? असं का म्हणता?” – निशांत.
“जान्हवीच्या नवऱ्याचं किराण्याचं दुकान होतं, चांगलं चाललं होतं. तिची सासू पण चांगली होती. तिचा नवरा जेंव्हा सामान आणायला इतवारीत जायचा, तेंव्हा जान्हवी दुकानात जाऊन बसायची. त्या दिवशी तिचा नवरा सामान आणायला, इतवारीत गेला होता, म्हणून अशीच ती दुकानात बसली होती. तिचा नवरा सामान घेऊन आला आणि दोघं सामान आवरत असतांना मुसळधार पावसाला सुरवात झाली. जान्हवीला त्यामुळे घरी जाता आलं नाही, ती दुकानातच थांबली. दोघांचा मृत्यू त्या दिवशी दबा धरून बसला होता. संध्याकाळी शेजारची इमारत यांच्याच दुकानावर कोसळली. हे दोघंही ढिगार्यांत दबले गेले. दुसऱ्या दिवशी यांना बाहेर काढलं तेंव्हा सर्व संपलं होतं.” वसंतराव खूप भावुक झाले होते. ती आठवण खूप क्लेश कारक होती. त्यांना बोलणं अशक्य झालं होतं. त्यांनी डोळे पुसले.
निशांतला पण काय बोलावं हे सुचेना. तो गप्पच बसला. थोड्या वेळाने वसंतराव म्हणाले,
“तुम्हाला माफी मागायची जरूर नाहीये. कोणाची मागणार माफी?”
“हं” – निशांत.
“आता जर विनायकरावांच्या मुलांचा पत्ता लागला, तर, गोष्ट वेगळी. पण शक्यता किती आहे?” – वसंतराव.
“शक्यता आहेच. कारण ते इंग्लंडला गेले आहेत, वेळ लागेल पण पत्ता जरूर मिळेल. प्रश्न तिसऱ्या मुलाचाच आहे. तो सैन्यात होता आणि ७१ च्या युद्धात बंगलादेश सीमेवर लढतांना बेपत्ता झाला. त्याच्या बद्दल काही सांगणं अवघड आहे.” – निशांत.
“हं, बघा काय करता येतं ते.” – वसंतराव
“हो, बरं आता मी निघतो, तुम्हा दोघांचे खूप आभार. तुम्ही नागपूरला याल, तेंव्हा मी भेटायला येईन. आता इथे अजून काही काम नाहीये, तेंव्हा आजच नागपूरला प्रस्थान करतो.” निशांतने त्यांना नमस्कार केला आणि तो तिथून निघणारच होता, पण काही विचार मनात येऊन थांबला. काकांकडे वळून म्हणाला, “काका, अजून एक विचारू?”
“बस. बस. बसून विचार.” वसंतराव म्हणाले.
“व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश तर मुलं होती, मग त्यांच्याशी का फाटलं? म्हणजे इतकं की नंतर कोणी एकमेकांची खबरबात पण घेतली नाही.” निशांतनी विचारलं.
“नाही, त्यांची भांडणं वगैरे काही झाली नाहीत. व्यंकटेश इकनॉमिक्स मधे उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेला. विनायकरावांची त्यानी परदेशी जावं अशी काही इच्छा नव्हती, बरीच वादा वादी झाल्यावर त्यांनी परवानगी दिली. त्या वेळेस व्यंकटेशनी सांगितलं होतं की डिग्री घेतल्यावर, तो परत येईल. पण नंतर त्याला Phd करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली मग त्यामुळे त्याचा मुक्काम लांबला. विनायकराव, पत्रावर पत्र पाठवत राहिले. त्याचं उत्तर पण यायचं. मग, सौमित्रला एका कंपनीत नोकरी मिळाली. तो मुंबईला गेला. मुंबईला गेल्यावर एक दोन वर्षांतच, त्याला इंग्लंड मधल्या एका कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळाली, मग काय, तो पण गेला.
“पण व्यंकटेश तर वापस येणार होता न?” निशांतनी विचारलं.
“हो” वसंतराव म्हणाले, “पण त्याच्याबरोबर कोणी अल्पना नावाची मुलगी पण Phd करत होती. त्या दोघांच सूत तिथेच जमलं. ती मराठीच होती पण तिथेच वाढली होती. मग त्यानी विनायक रावांना कळवलं पण विनायकरावांच्या ते पचनी पडलं नाही. त्यांचा आग्रह होता की व्यंकटेशनी वापस यावं. पण ते त्याला शक्य झालं नाही. तो तिथेच राहिला. हळू हळू पत्र व्यवहार पण मंदावत गेला. नंतर तर संबंध पार तुटला होता.”
“बाप रे. पण मग सौमित्र? त्याचं काय?” निशांतनी विचारलं.
सौमित्र आणि विनायकरावांचं कधीच पटलं नाही. त्याला नागपूरला राहायचंच नव्हतं. त्यांनी इंग्लंडला गेल्यावर सगळं स्थिरस्थावर झाल्यावर, त्यानी व्यंकटेशला सांगितलं की आता बाबांना कळवून टाक की तो इंग्लंड ला आहे म्हणून. झालं. त्यानंतर संबंध राहिलेच नाहीत. आम्हाला जेंव्हा या गोष्टी कळल्या, तेंव्हा वाईट वाटलं, पण आम्ही काय करू शकणार होतो? वरतून विनायकरावांना वाटलं की आम्हीच त्यांना सपोर्ट केला म्हणून, मग आमचे पण संबंध दुरावले.” वसंतराव जरा हळवे झाले. त्यांनी डोळे पुसले. म्हणाले, “माझा सगळ्यात जवळचा मित्र गैरसमजामूळे दुरावला.”
आता बोलण्यासारखं काही उरलं नव्हतं निशांत तेथून निघाला. त्याचं सुद्धा मन विषण्ण झालं होतं. रात्रीच्या महाराष्ट्र एक्सप्रेस चं तिकीट काढायला स्टेशनवर गेला. नशिबाने त्याला त्याच रात्रीचं तिकीट मिळालं, मग हॉटेलवर जाऊन, सामान आणून तो स्टेशनवर येऊन बसला. नागपूर ला पोचायला दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ झाली. मग तो दिवस तसंच गेला. दुसऱ्या दिवशी निशांतनी सारंग सरांची वेळ मागून घेतली आणि संध्याकाळी ७ वाजता तो त्यांच्या ऑफिस मधे पोचला.
“ये निशांत, काय नवीन खबर?” सारंग सर म्हणाले. किरीट सर आणि प्रशांत सर पण आले होते. निशांतनी मग नागपूर आणि पुण्याला काय, काय घडलं आणि काय माहिती मिळाली ते सविस्तर सांगितलं.
“म्हणजे एवढा प्रयत्न करून, हातात काहीच पडलं नाही. मग आता पुढचं पाऊल कुठे टाकणार आहेस?” सारंग सर म्हणाले.
“व्यंकटेश आणि सौमित्राचे पत्ते मिळण्यात दोन एक आठवडे तरी जातील असं दिसतंय. मी असं ठरवतो आहे की एकदा दिल्लीला फेरी मारून यावं. अविनाशच्या बरोबर कोण होते त्यांचा काही ठाव ठिकाणा लागला तर बघावा.” निशांतनी आपले प्लॅन्स सांगितले.
“एकदम दिल्लीला? कामठीच्या अधिकार्याने सांगीतलं का दिल्लीला माहिती मिळेल म्हणून?” – किरीट सर.
“नाही त्यांनी तसं काही सांगीतलं नाही, ते म्हणाले की नागपूरला आर्मीचं वेलफेअर ऑफिस आहे, तिथे निवृत्त आणि बेपत्ता माणसांची माहिती ठेवल्या जाते.” – निशांत.
“मग आधी तिथे जा, दिल्लीला जाऊन काय करणार आहेस?” – सारंग.
“मी उद्या तिथेच जाणार आहे, पण तिथे फक्त जिल्ह्याचीच माहिती असते, अविनाशचे सहकारी नागपूरचेच असण्याची शक्यता नाहीये. त्यामुळे नागपूर ऑफिस मधून दिल्ली ऑफिस साठी चिठ्ठी घेऊन जायचं असा विचार आहे. तिथे देशभरातली माहिती असते असं कामठीच्या अधिकाऱ्याने सांगीतलं.” – निशांत.
सारंग सरांनी हिरवा कंदील दाखवला. “ठीक आहे गो अहेड”
“मी असं करतो, की उद्या, एकदा नागपूरच्याच आर्मी वेलफेअर ऑफिस मधे जाऊन, काही माहिती मिळते का बघतो, अविनाशच्या बरोबर कोण होते त्यांचा काही ठाव ठिकाणा लागला तर बघतो. त्यांचे पत्ते मिळाले तर त्यांच्याकडे विचारपूस करता येईल. नाही काही मिळालं तर दिल्लीला जायचं.” निशांतनी आपले प्लॅन्स सांगितले.
“ओके. बरोबर आहे. पण दिल्लीला जायची जरूर पडली तर आम्हाला सांगून जा. आणि तिथे काय माहिती मिळते ते कळवत जा.” – सारंग
“सर्व अपडेट वेळोवेळी तुम्हाला देत राहीन. या बाबतीत तुम्ही निश्चिंत रहा.” – निशांत.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com