तोतया वारसदार
भाग १०
भाग ९ वरून पुढे वाचा....
“मी असं करतो, की उद्या, एकदा नागपूरच्याच आर्मी वेलफेअर ऑफिस मधे जाऊन, काही माहिती मिळते का बघतो, अविनाशच्या बरोबर कोण होते त्यांचा काही ठाव ठिकाणा लागला तर बघतो. त्यांचे पत्ते मिळाले तर त्यांच्याकडे विचारपूस करता येईल. नाही काही मिळालं तर दिल्लीला जायचं.” निशांतनी आपले प्लॅन्स सांगितले.
“ओके. बरोबर आहे. पण दिल्लीला जायची जरूर पडली तर आम्हाला सांगून जा. आणि तिथे काय माहिती मिळते ते कळवत जा.” – सारंग
“सर्व अपडेट वेळोवेळी तुम्हाला देत राहीन. या बाबतीत तुम्ही निश्चिंत रहा.” – निशांत.
दुसऱ्या दिवशी निशांत, आर्मी वेलफेअर ऑफिस मधे गेला. तिथल्या अधिकाऱ्याला, तो कोणाबद्दल माहिती विचारायला आला आहे हे सविस्तर सांगितलं. तो अधिकारी म्हणाला,” हे 30 वर्षांपूर्वीचं रेकॉर्ड आहे, ते काढून चेक करावं लागेल. याला थोडा वेळ लागेल, पण माहिती नक्की मिळेल. तुम्ही 2-3 दिवसांनंतर येता का? मी फाइल काढून ठेवतो.”
निशांत अजूनही थोडा घुटमळत होता, अधिकाऱ्यांच्या ते लक्षात आलं, त्याने विचारलं, “आणखी काही बोलायचं आहे का?”
“साहेब,” निशांत म्हणाला, “दुसऱ्या महायुद्धात या अविनाशचा काका श्रीरंग गोखले हा पण सैन्यात गेला होता, त्यांच्या बद्दल काही माहिती मिळू शकेल का? त्यांची पोस्टिंग आफ्रिकेत झाली होती एवढंच माहीत आहे, त्यांची पण नंतर काहीच माहिती मिळाली नाही. तुम्ही काही मदत करू शकाल का?”
“श्रीरंग गोखले, जवान म्हणूनच सैन्यात गेले असतील बहुधा, कोणची रेजिमेंट होती त्यांची?” अधिकारी म्हणाला.
“त्यांच्या बद्दल जेवढी माहिती आम्हाला आहे, तेवढी सांगितली, यापेक्षा जास्त काही माहीत नाही.” – निशांत.
“अवघड आहे काम, पण प्रयत्न करून बघतो. या तुम्ही दोन तीन दिवसांनी.” त्या अधिकाऱ्याने मीटिंग संपवली. निशांत घरी आला.
आता दोन तीन दिवस काहीच काम नव्हतं, म्हणून निशांत वंशावळी उघडून बसला.
दोन गोष्टी त्याच्या लक्षात आल्या. एक म्हणजे, विश्वनाथ, जो गोकर्ण महाबळेश्वरला जाऊन तेथेच स्थायिक झाला होता, त्यांच्या वंशजांची अजून माहिती नाहीये, ती मिळवावी लागेल. दुसरं म्हणजे, नर्मदा आणि गोदावरी या दोघींच्या कुटुंबाची पुण्याच्या प्लेग मधे वाताहत झाली होती, त्यांच्या बद्दल माहिती मिळणं अशक्य होतं. तिसरं म्हणजे, दिनकर, जो पेशव्यांच्या बरोबर कानपूरला गेला होता त्यांच्या बद्दल काही कळतं का, हे बघावं लागेल. निशांत मग बराच वेळ या बाबत विचार करत होता, नंतर मनाशी काही ठरवून तो बाहेर पडला. एका जवळच्याच PCO मधे जाऊन त्यांनी टेलीफोन ऑफिस च्या चौकशी चा फोन नंबर फिरवला, आणि गोकर्ण महाबळेश्वर मंदिराचा फोन नंबर मागीतला. थोडं थांबावं लागलं पण नंबर मिळाला. निशांतनी लगेच मंदिराला एसटिडी कॉल लावला. समोरून कोणी तरी कानडीत बोललं. निशांतनी त्यांना आपण नागपूरहुन बोलत असल्याचं हिंदीत सांगितलं. गोकर्ण मंदिराच्या माणसांनी मराठी येतं का असं विचारलं. मग काय प्रश्नच मिटला. निशांतनी विचारलं “ तिथे मंदिरात कोणी गोखले गुरुजी आहेत का?”
“हो आहेत, पण ते सकाळी असतात, आत्ता नाहीयेत. तुम्हाला कोणाशी बोलायचं आहे? काही अनुष्ठान वगैरे करायचं आहे का? तुम्ही माझ्याशी बोलू शकता. मी उद्या त्यांना सांगेन.” फोनवरच्या गुरुजींनी सांगितलं.
“मला गोकर्णला यायची खूप इच्छा आहे, जागृत स्थान आहे, शिवलीलामृत वाचताना याची प्रचिती येते. कोणी तरी सांगितलं की तिथे गोखले गुरुजी आहेत, म्हणून त्यांना फोन केला. आम्हाला कळलं की तिथे गोखल्यांच्या गेल्या ४ पिढ्या तिथे पुजारी म्हणून कार्यरत आहेत, खरं आहे का हे?” –– निशांत.
“हो हो तुम्हाला मिळालेली माहिती अगदी बरोबर आहे. तमचे कोणी जवळचे नातेवाईक आहेत का ते?” – गुरुजी.
“हो म्हणजे तसा बरेच वर्ष काही संपर्क नव्हता, पण ते तिथे असतील तर दर्शनही होईल आणि संबंध सुद्धा पुन्हा स्थापित करता येतील, हा उद्देश.”
“चांगली इच्छा आहे महाबळेश्वर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील. या तुम्ही.” – गुरुजी.
“तिथे राहण्याची काही व्यवस्था आहे का?” – निशांत म्हणाला.
“तुम्हाला अभिप्रेत आहे, तशी हॉटेलं इथे नाहीयेत, मुर्डेश्वरला आहेत. पण इथे घरगुती अशी राहण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे, ते चालत असेल तर, तशी काळजी नाहीये. तुमचा फोन नंबर देऊन ठेवा म्हणजे गोखल्यांना सांगता येईल.” गुरुजी म्हणाले.
मग निशांतने त्यांना राव साहेबांच्या ऑफिसचा नंबर दिला. आणि म्हणाला, “ठीक आहे, मग मी तिथे येण्याच्या तयारीला लागतो.” निशांत म्हणाला.
घरी आल्यावर, निशांत पुन्हा वंशावळी उघडून बसला. त्यांच्या लक्षात आलं की भास्कर ची बहीण रेवती लग्न झाल्यावर सांगलीला गेली, पण वंशावळी मधे तिच्या नवऱ्याचं नाव किंवा आडनाव काहीच दिलं नव्हतं. तिचं आडनाव कळल्याशिवाय तिला शोधणं केवळ अशक्य होतं. तिचं लग्न १८६९ मधे झाल्याचा उल्लेख होता, पण नावाचा नव्हता. मग निशांतनी विनायकरावांनी जो इतिहास लिहून ठेवला होता, तो पुन्हा डोळ्याखालून घातला. त्यात त्याला आढळलं की रेवतीचं लग्न हरीहर साने नावाच्या मुलांशी झालं होतं, आणि तो एका पेढीवर काम करत होता. आता निशांतच्या समोर प्रश्न उभा राहिला की पेढी कशाची, सराफाची की सावकाराची का घाऊक धान्य विक्रेत्याची? उत्तर कठीण होतं कारण दीडशे वर्षांपूर्वीची माहिती काढणं हे अत्यंत जिकिरीचं काम होतं. तरी पण सांगलीला जाऊन ठाण मांडून शोध घेतला, तर काही सुगावा लागू शकेल असं निशांतला वाटलं. गोकर्ण मंदिर प्रख्यात होतं त्यामुळे त्यांचा फोन नंबर मिळू शकला, पण मुळात पेढी कोणची हेच माहीत नसल्याने, सांगलीला गेल्या शिवाय काही कळण्याचा मार्ग नव्हता. तो दिवस आणि दूसरा दिवस निशांतनी घरीच राहून, विचार करण्यात घालवला. पदरात फारसं काही पडलं नाही, पण थोडा मेंदूला आणि शरीराला आराम मिळाला. अपडेट देण्यासाठी तो सारंग सरांच्या ऑफिस मधे संध्याकाळी पोचला.
सारंग कडे पक्षकार मंडळी बसली होती. एका गुंतागुंतीच्या केस वर बरीच चर्चा चालली होती, त्यामुळे निशांतला बराच वेळ थांबावं लागलं. ती मंडळी गेल्यावर मग निशांत आतमध्ये गेला. इतक्या लवकर निशांत येईल अशी सारंग सरांना अपेक्षाच नव्हती. त्यांना जरा आश्चर्यच वाटलं.
“अरे निशांत! इतक्या लवकर काम झालं? सांग बाबा सविस्तर.” – सारंग सर.
“नाही, तसं काही विशेष घडलं नाही, पण माझ्या मनात काय आहे ते तुम्हाला सांगावसं वाटलं म्हणून आलो.” – निशांत.
“काय आहे तुझ्या मनात?” – सारंग.
मग निशांतने गोकर्ण बद्दल सांगीतलं, आणि म्हणाला की मधे जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा गोकर्णला जावं लागेल, जे कोणी गोखले आहेत, ते खरंच याच गोखल्यांशी संबंधित आहेत की अजून दुसरे कोणी गोखले आहेत का, हे बघावं लागेल.” – निशांत
“बरोबर आहे निशांत तुझं. गोकर्णला जावून चौकशी करावीच लागेल. पण वेलफेअर ऑफिस मधे काय झालं?” – सारंग.
“३० वर्षांपूर्वीचं रेकॉर्ड असल्याने वेळ लागेल असं म्हणाले. परवा बोलावलं आहे. ते काय सांगताहेत त्यावर दिल्लीला जायचं की नाही हे ठरेल. ते तर परवा कळेलच, पण महादेवरावांच्या दोन मुली नर्मदा आणि गोदावरी यांचा ठाव ठिकाणं मिळतो का हे पुण्यात जावून बघावं लागेल. आणि सखारामपंतांची मुलगी रेवती, जीचं लग्न झाल्यावर सांगलीला गेली, तिच्या वंशजांचा पण शोध घ्यायचा आहे. या सगळ्या गोष्टी जसा वेळ मिळेल तश्या करायच्या आहेत. तुम्हाला काय वाटतं सर?” – निशांत.
“परफेक्ट. तुझी आखणी बरोबर आहे. आपल्याला जे जे शक्य असेल, ते ते सर्व करायचंच आहे. तू नक्की यशस्वी होशील यांची मला खात्री आहे.” – निशांत.
तिसऱ्या दिवशी निशांत पुन्हा आर्मी वेलफेअर ऑफिस मधे गेला.
“श्रीरंग गोखले, युद्ध संपल्यानंतर केनया मधल्या यूनिट मधे होते. त्यांनी तिथे स्वखुशीने निवृत्तीचा अर्ज केला, आणि त्यांचा अर्ज स्वीकृत झाला. यांच्या नंतरची काहीच माहिती आमच्याकडे नाहीये.” त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. निशांत विचार करत होता, हा माणूस केनया मधे का राहिला? भारतात वापस का आला नाही? पण या प्रश्नांची उत्तरं मिळणं शक्य नव्हतं. त्यानी तो विषय बाजूला सारला. आणि विचारलं की, “अविनाश बद्दल काय कळलं?”
“अविनाश पॅरा रेजिमेंट मधे होता, प्रत्यक्ष लढाई सुरू होण्याच्या काही दिवस आधी, त्यांच्या युनिटला पॅरश्यूट मधून बंगला देशात ड्रॉप करण्यात आलं होतं. खाली पोचल्यावर सगळे ठरलेल्या स्थानी पोचले, पण अविनाश नाही पोचला. रात्रभर त्यांची टीम त्याला अख्खं जंगल भर शोधत होती, पण त्याचा पत्ता लागला नाही, बहुधा त्याचं पॅरश्यूट भरकटलं असावं आणि तो भलत्याच ठिकाणी उतरला असावा. कदाचित पाकिस्तानी सैन्याच्या नजरेस पडला असावा, आणि त्यांनी त्याला कैद केलं असेल किंवा त्यांच्याशी लढून विरगती प्राप्त झाली असावी. मी युद्ध कैद्यांची जी अदलाबदल झाली, त्यात त्याचं नाव आहे का बघितल, पण नाही, त्यात त्याचं नाव नाहीये. यांचा अर्थ, तो जर जीवंत असेल, तर बांग्लादेश मध्येच असेल किंवा या जगातच नसेल.” अधिकाऱ्याने जेवढी त्याला मिळाली तेवढी सर्व माहिती दिली.
“साहेब, अशी जर परिस्थिती आहे, तर त्यांच्या यूनिट मधे जे लोकं असतील, त्यांचे पत्ते मिळू शकतील का? दुसरं काही नाही, आमच्या मनाचं समाधान हौईल.” निशांतनी विनंती केली.
“हे बघा, अविनाश नागपूरचे होते, म्हणून या ऑफिस मधे त्यांची माहिती तुम्हाला मिळू शकली. त्यांचे सहकारी कुठल्या गावाचे असतील हे कसं सांगणार? आमच्या कडे ती माहिती नसते. तुम्हाला हवंच असेल तर दिल्लीच्या आर्मी हेड क्वार्टर मधे जाऊन चौकशी करावी लागेल.”
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com