तोतया वारसदार - भाग 11 Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तोतया वारसदार - भाग 11

  तोतया वारसदार

भाग  ११   

भाग १०   वरून पुढे  वाचा....

 

“साहेब, अशी जर परिस्थिती आहे, तर त्यांच्या यूनिट मधे जे लोकं असतील, त्यांचे पत्ते मिळू शकतील का? दुसरं काही नाही, आमच्या मनाचं समाधान हौईल.” निशांतनी विनंती केली.

“हे बघा, अविनाश नागपूरचे होते, म्हणून या ऑफिस मधे त्यांची माहिती तुम्हाला मिळू शकली. त्यांचे सहकारी कुठल्या गावाचे असतील हे कसं सांगणार? आमच्या कडे ती माहिती नसते. तुम्हाला हवंच असेल तर दिल्लीच्या आर्मी हेड क्वार्टर मधे जाऊन चौकशी करावी लागेल.”

“ठीक आहे साहेब. खूप खूप धन्यवाद तुमचे. पण ते आम्हाला माहिती देतील का? तुम्ही एखाद पत्र देता का? कारण त्यांनी ऐकलं नाही तर आमची दिल्ली वारी फुकट जाईल. प्लीज आमच्या नावाचा उल्लेख असलेलं असलेलं पत्र द्या.” – निशांत.

“नाही, त्यांची काही जरूर पडणार नाही. तुम्ही मला जे कागद पत्र दाखवले ते पुरेसे आहेत.”- अधिकारी.

“ठीक आहे.” असं म्हणून निशांत बाहेर पडला. श्रीरंगचा प्रश्न सध्या तरी निकालात निघाला होता. आता दिल्लीला गेल्याशिवाय अविनाश बद्दल काही कळणार नव्हतं. नंतर काहीच करण्या सारखं नव्हतं म्हणून तो राव साहेबांना भेटायला गेला.

“अरे ये ये निशांत, मी आत्ता तुझाच विचार करत होतो. कसं चाललंय तुमचं शोध कार्य?” राव रावसाहेबांना खूप कुतूहल होतं, म्हणून चौकशी करत होते.

निशांतनी मग आता पर्यंतची सारी प्रगती सांगितली. राव साहेबांना समाधान वाटले म्हणाले “वा वा, निशांत तू तर अल्पावधीतच खूप प्रगती केली आहेस. छान  छान, अशीच प्रगती ठेव.”

त्यांनी दिलेल्या शाबासकीने निशांतला फार बरं वाटलं. तेवढ्यात राव साहेबांचा फोन वाजला. थोडं बोलून त्यांनी फोन निशांतला दिला “घे, तुझ्याकरिता आहे.”

फोन पासपोर्ट वाल्या एजंटचा होता त्यांनी दुसऱ्या दिवशी तीन वाजता बोलावलं होतं.

निशांतनी ते रावसाहेबांना सांगितलं आणि तो तेथून निघाला.

दुसऱ्या दिवशी निशांत दुपारी तीन वाजता पासपोर्ट ऑफिस मधे पोचला. तो एजंट त्यांची वाटच पाहत होता. त्यांनी दोघांच्या पासपोर्टच्या कॉपी निशांतच्या हातात दिल्या. निशांतनी त्याला उरलेले ५०० रुपये दिले. एवढं झाल्यावर त्याला वाटलं की आता सारंग सरांशी बोलावं लागेल. त्यांना सगळं अपडेट देऊन झालं की ते इंग्लंड चा विषय ते हातात घेतील. सारंग सरांशी आधी दिल्ली बद्दल बोलावं लागेल आणि मग गोकर्ण आणि मग कानपूर असा प्लॅन सांगून त्याचं अनुमोदन मिळवावं लागेल. म्हणून मग त्यांनी पुन्हा सारंग सरांना फोन लावला आणि ७ वाजता येतो म्हणून सांगितलं.

संध्याकाळी ७  वाजता निशांत सारंग सरांच्या ऑफिस मधे पोचला. किरीट सर आणि प्रशांत सर पण आले होते. त्यांना चांगलच कुतुहल वाटलं, की आठ दिवसांपूर्वीच मीटिंग झाली होती मग इतक्या लवकर असं काय घडलं की तातडीने बोलावलं असेल? त्यांनी सारंगला या बाबतीत विचारलं पण सारंगला पण, काही माहीत नव्हतं म्हणून त्यांनी फक्त खांदे उडवले. म्हणाला “निशांत आल्यावरच कळेल.” तेवढ्यात निशांत पोचला.

“निशांत, अरे आठच दिवसांपूर्वी आपण भेटलो होतो, खूप काही कळलं आहे का?” सारंग सरांनी अधीर होऊन विचारलं.

“हो, बरीच माहिती हातात आली आहे.” मग त्यांनी श्रीरंग आणि अविनाश बद्दल जे काही समजलं होतं, ते सविस्तर सर्वांना सांगितलं.

“म्हणजे श्रीरंगचं नाव शोध कार्यातून  बाजूला करायचं. बरोबर न?” – सारंग सर.

“हो, म्हणजे, सद्य परिस्थितीत असंच दिसतंय. कारण केनया सारख्या अनोळखी देशात जाऊन आपण कसं शोधणार?” – निशांत.

“अविनाश बद्दल बरीच माहिती मिळाली आहे, पण पुढे काय? त्याचे सहकारी कोण होते त्यांचा शोध घेणार आहेस का?” – प्रशांत सर.

“हो, तो घ्यावाच लागेल, त्याशिवाय, तो शर्यतीत आहे की नाही हे कसं ठरवणार आपण?” निशांत म्हणाला.

निशांतनी मग त्यांना व्यंकटेश आणि सौमित्र च्या पासपोर्ट कॉपी दाखवल्या. म्हणाला “सारंग सर आता हे काम इंग्लंडचं असल्यामुळे, तुम्हालाच करावं लागणार आहे. तेंव्हा त्याचं प्लॅनिंग तुम्हीच करा.”

सरांग सरांनी किरीट आणि प्रशांत कडे पाहिलं आणि म्हणाले “ठीक आहे, अजून काही सांगायचं आहे का?”

“हो.” मग त्यानी विश्वनाथ बद्दल माहिती दिली, आणि म्हणाला की “मला गोकर्ण महाबळेश्वरला  जाऊन विचार पुस करावी लागेल.” आणि मग त्यांनी रेवती बद्दल पण सांगितलं आणि म्हणाला, “याच्या साठी सांगलीला जावं लागेल. तिथे किती वेळ लागेल ते सांगता येत नाही, कारण आपल्या जवळ जी माहिती आहे, ती दीडशे वर्षांपूर्वीची आहे.”

थोडा वेळ कोणीच बोललं नाही. मग किरीट म्हणाला की, “सारंग, तूच म्हणाला होतास की विनायकरावांची मुलं, ही क्लास १ श्रेणी मधे येतात म्हणून, मग या तिघांची ओळख पटल्यावर बाकीच्या लोकांचा शोध घेण्याची काय जरूर आहे? आपण फक्त व्यंकटेश सौमित्र आणि अविनाशचा विचार करू.”

“असं आहे किरीट, आधीही सांगीतलं होतं, पण पुन्हा सांगतो, ही विनायकरावांची इच्छा आहे आणि त्यांनी ते तसं नमूद करून ठेवलं आहे, इच्छापत्र केलंच नसतं, तर सर्वच काम सोप होतं. या तिघा जणांचा शोध घेऊन संपत्तीचं वाटप करता आलं असतं. पण तसं नाहीये त्यामुळे सर्वांचा शोध घ्यावाच लागेल. प्रत्येकाच्या वाट्याला किती संपत्ती येईल ते कोर्ट ठरवेल. तुझ्या म्हणण्या प्रमाणे आपण करून मोकळे झालो, आणि मालमत्ता हस्तांतरण झाल्यावर जर कोणी उपटला, तर खूप प्रॉब्लेम येतील. तसंही आपल्याजवळ ५ वर्षांचा काळ आहे आणि शोध कार्य जसं चालू आहे, त्यांच्या सर्व नोंदी मी ठेवतो आहे. कोणी वारसदार आपल्याला मिळो अथवा ना मिळो, आपल्याला देशातल्या प्रमुख वर्तमानपत्रात जाहिरात पण द्यावी लागणार आहे.” सारंग म्हणाला. “अजून एक गोष्ट, जर कोणी वारसदार नाहीच मिळाला, आणि आपण व्यवस्थित छानबीन करून, कुठल्या धर्मादाय संस्थेला पैसे दिले, आणि जर कोणी, आपला त्यांच्याशी आधीपासूनच संबंध होता आणि ही सगळी मिलिभगत आहे, असा आरोप केला तर, ते सुद्धा निस्तरावं लागणार आहे. म्हणून याकरिता कोर्टाच्या संमतीनेच सर्व करायचं आहे.

“मग आता आपण काय करायचं? तुमचा निर्देश असेल तसं करू.” निशांतनी विचारलं.

“मला या बाबतीत किरीटचं  म्हणण पटतेय, मी विचार करतो आहे की आपण आधी या तिघा जणांचे शोध घेऊ. हे क्लास १ श्रेणी मधे येतात. त्या नंतर गोकर्ण आणि सांगलीचा विषय हातात घेऊ. आणि सगळ्यात शेवटी पुणे, कारण प्लेग १९२० साली आला आणि त्यानंतर नर्मदा आणि गोदावरी दोघींचाही पत्ता नाहीये, त्यामुळे हे काम पण फार अवघड आहे. त्यामुळे ते नंतर बघू.” सारंग सर म्हणाले 

“म्हणजे निशांतनी आता दिल्लीला कूच करावं असंच ना?” प्रशांत सर प्रथमच बोलले.

“हो, असंच. तिथे जाऊन काय माहिती मिळते ते बघावं म्हणजे पुढे काय करायचं ते ठरवता येईल.” सारंग सरांनी निर्णय दिला. “मधल्या काळात मी माझ्या इंग्लंड मधल्या काही मित्रांना मेल पाठवून, व्यंकटेश  आणि सौमित्रची काही माहिती मिळते का ते बघतो. निशांत तू उद्याच दिल्लीला निघ. मला वेळोवेळी अपडेट देत जा ओके?”

“ओके सर, निघतो मी आता. उद्याचं दिल्लीचं तिकीट मिळतं का ते बघतो.” निशांत म्हणाला आणि तेथून निघाला. गाडीचं २० दिवसांचं आरक्षण फूल होतं म्हणून त्यांनी फ्लाइट चं तिकीट काढलं.

दिल्लीला पोचल्यावर हॉटेल मधे सामान टाकून तो आर्मी हेडक्वार्टर ला पोचला.

“तुम्हाला अविनाश गोखले यांची माहिती हवी आहे म्हणता, तुम्ही त्यांचे कोण? काय रिलेशन आहे तुमचं?” – आर्मी ऑफिसर.

“मी सारंग वकिलांचा प्रतिनिधी म्हणून आलो आहे. ही माहिती मिळणं आमच्या साठी फार महत्वाचं आहे.” – निशांत.

“सारंग वकील कोण? त्यांचा काय संबंध?” – आर्मी ऑफिसर.

“अविनाश गोखल्यांचे वडील श्री विनायकरावांचा मृत्यू झाला. त्यांची बरीच इस्टेट आहे. त्यांना तीन मुलं आहेत. त्यापैकी दोघं इंग्लंड मधे असतात. अविनाश तिसरा. विनायकरावांनी मृत्युपत्रात सारंग वकिलांना सर्व वारसदारांना शोधून काढण्याची जबाबदारी दिली आहे. म्हणून मी चौकशी करायला आलो आहे. नागपूरच्या वेलफेअर  ऑफिस मधून ते बेपत्ता आहेत एवढीच माहिती मिळाली. त्यांनीच तुमच्या ऑफिस मधे चौकशी करायला सांगीतलं.” – निशांत एका दमात बोलला.

“विल ची सर्टिफाईड कॉपी दाखवा.” – आर्मी ऑफिसर

निशांतने विल ची कॉपी दाखवली.

“ही साधी झेरॉक्स आहे. प्रमाणित कॉपी द्या.” – आर्मी ऑफिसर. “आणि हो तुम्ही ज्या वकिलांच्या कडून आला आहात, त्यांना सनद मिळाली असेल त्याची प्रमाणित कॉपी लागेल आणि तुम्ही त्यांचे प्रतिनिधी आहात हे पत्र पण लागेल. ही सर्व कागदपत्र घेऊन या, मगच तुम्हाला माहिती देऊ शकू. या. तुम्ही.” आर्मी ऑफिसरने विषय संपवला. निशांत बाहेर.

निशांत त्याच रात्री विमानाने नागपूरला आला. दूसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सारंग सरांना फोन केला. सारंग सरांना जरा आश्चर्यच वाटलं.

“अरे निशांत? परवाच दिल्लीला गेला होतास न? काम झालं? एवढ्या सकाळी कसा  काय फोन केलास?” – सारंग.

मग निशांतने दिल्लीला काय झालं ते सांगीतलं. सगळं शांत पणे ऐकून घेतल्यावर सारंग सर म्हणाले “ओके. आज दिवसभरात मी सगळी कागद पत्र तयार करून घेतो.

तू संध्याकाळी ७ वाजता ये ऑफिसला.”

 

 

 

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com