तोतया वारसदार - भाग 13 Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तोतया वारसदार - भाग 13

  तोतया वारसदार

पात्र परिचय-

सुलतानी              - अविनाश गोखल्यांचे बदललेले नाव.

भाग  १३    

भाग १२   वरून पुढे  वाचा....                               

निशांतनी दिल्लीला आणि कडप्पा ला काय माहिती मिळाली ते सविस्तर सांगितलं. मद्रासच्या भेतीबद्दल पण सांगीतलं. ऐकल्यावर किरीट म्हणाला, “मला असं वाटतं की अविनाशचा पत्ता मिळत नाही अशी नोंद करून त्याचं नाव बाजूला सारावं. सारंग तू बाकी दोघा मुलांबद्दल चौकशी चालू ठेव., आणि नंतर किंवा मधल्या काळात निशांतला गोकर्णाला जाऊ दे.”

“हूं, मलाही असंच वाटतंय. अविनाश चा चॅप्टर आता बंद करावा.” सारंग सरांनी आपलं मत व्यक्त केलं. बाकीच्या दोघांनी माना डोलावल्या.

“सर,” निशांत म्हणाला, “मला थोडं वेगळं बोलायचं आहे. बोलू का?”

“अरे बोल ना, इथे आपण चर्चाच करायला बसलो आहोत.” सारंग सर म्हणाले.

निशांतनी बोलायला सुरवात केली. “सर आधीच्या मीटिंग मधे तुम्ही म्हणाला होता की जर कोणी भलत्याच माणसांनी काही आरोप केला, तर त्याचं पण उत्तर द्यावं लागणार आहे. कारण मामला कोटी, कोटींचा आहे.”

“मग? तुला नेमकं काय सुचवायचं आहे?” प्रशांत सरांची विचारणा.

“सांगतो ना.” निशांत म्हणाला. “मला असं वाटतं की हे टाळायचं असेल तर आपल्याला फूल प्रूफ प्लॅन करावा लागेल. म्हणजे असं की तुमच्या पैकी कोणी तरी बांग्लादेशला जायचं, विसा, एयर टिकिट जपून ठेवायचं, अगदी एकतरपूरला जाऊन तिथल्या हॉटेलच्या आठ दिवसांच्या पेमेंट रीसीप्ट जपून ठेवायच्या. शोध करा किंवा करू नका पण या सगळ्या गोष्टींचे पुरावे जर आपल्या जवळ असतील, तर कोणी असं म्हणू शकणार नाही की आपण अविनाशला शोधायचा प्रयत्नच केला नाही. आपण हलगर्जी पणा केला, किंवा मुद्दाम कोणाचा तरी फायदा करून दिला, असा कोणी ठपका ठेवू शकणार नाही.”

सारंग सर विचार करत होते. म्हणाले, “निशांत बोलतो आहे त्याच्यात नक्कीच अर्थ आहे. बरोबर बोलतोय तो. मला असं वाटतं की निशांत, तूच का जात नाहीस एकतरपूरला? आमच्या पैकी कोणी जायचं म्हणजे, आमची सगळीच कामं खोळंबतील. तुझं हेच काम आहे, त्यामुळे तुझ्या करता हे सोप आहे. किरीट, प्रशांत तुम्हाला काय वाटतं? काय विचार आहे?”

“एकदम बरोबर. तसंही खर्च तर होणारच आहे, आपल्या पैकी कोणी गेलं, किंवा निशांत गेला तरी, मग काय फरक पडतो?” किरीट सर म्हणाले.

“आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे, निशांत शोध कार्यात वाकबगार आहे. आपण त्याच कामा साठी त्याची नेमणूक केली आहे, त्यामुळे त्यानेच जाणे सय्युक्तिक आहे. आपल्याला या गोष्टींचा अनुभव नाहीये. उद्या जर कोणी म्हंटलं की निशांतला डावलून तुम्ही का बांगलादेशात गेला? तुमचा काय हेतु होता? तर या प्रश्नाचं आपल्या जवळ  उत्तर नाहीये. त्यामुळे निशांतनेच जाणे योग्य आहे.” – प्रशांत

“ठरलं तर मग, निशांत तू उद्याच विसा साठी काय करावं लागतं ते बघ. नाही तरी, पासपोर्ट ऑफिस मधला तो एजंट तुझ्या ओळखीचा झालाच आहे, तो तुझं काम पटकन करून देईल.” सारंग सरांनी निर्णय दिला. “तो पर्यन्त इंग्लंड मधून सुद्धा काही माहिती मिळेल. तुझं बांग्लादेश मिशन आटोपलं की तू गोकर्ण फाइल हातात घे.”

“ठीक आहे, मी उद्याच पासपोर्ट ऑफिस मधे जातो आणि एजंटला भेटतो.” असं बोलून निशांत सारंग सरांच्या ऑफिस मधून बाहेर पडला.

पंधरा दिवसांतच त्या एजंटनी विसा आणि तिकीट निशांतच्या हातात ठेवलं. भरपूर पैसे मोजावे लागले, तो भाग वेगळा. निशांतनी सारंग सरांना अपडेट दिलं, आणि दिल्लीहून ढाक्याची फ्लाइट पकडली. हॉटेल मधे पोचल्यावर, दुसऱ्या दिवशी, फ्रंट डेस्क ऑफिसरला सांगून एकतरपूरच्या प्रवासाची व्यवस्था करून घेतली. एकतरपूरला पोचल्यावर, हॉटेल च्या लाउंज मधे डेस्क ऑफिसरशी गप्पा मारतांना निशांतनी सांगितलं की  तो एक लेखक आहे आणि मुक्तीबाहिनी चा जो संग्राम होता, त्यावर तो एक पुस्तक लिहीत आहे. जे कोणी त्यावेळी मुक्तीबाहिनी मधे असतील, अश्या  काही लोकांना जर भेटता आलं तर पुस्तक जास्त वास्तव होईल म्हणून तो इथे आला आहे.

“मी स्वत: काही माहिती देऊ शकणार नाही, पण मला काही लोकं माहीत आहेत की जे त्या संग्रामात होते, मी तुमची आणि त्यांची गांठ घालून देऊ शकतो.” डेस्क ऑफिसर म्हणाला.

“तुम्ही केलेली मदत मी नक्कीच वाया जाऊ देणार नाही. चिंता करू नका, मला  मदत केल्याचं तुम्हाला दु:ख होणार नाही, ही काळजी मी घेईन.” निशांतने  स्पष्ट सांगितलं. हे ऐकल्यावर, त्या ऑफिसरचा चेहरा खुलला. दोन दिवसांनी त्या माणसांनी दोन पत्ते आणून दिले. म्हणाला, “ ही माणसं त्या स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय होती. बऱ्याच सत्य घटनांचे साक्षीदार आहेत हे लोकं. मी त्यांना तुमच्याबद्दल सांगितलं आहे आणि मुक्ती  संग्रामाच्या गोष्टी बोलायला ते नेहमीच तयार असतात.”

दुसऱ्या दिवशी, ठरलेल्या वेळेला, निशांत, असलम चाचांना भेटायला गेला. निशांत त्यांच्याबरोबर युद्धांतल्या गोष्टी ऐकत होता. त्यांच्या बोलण्यातून, अविनाशचा कसलाही सुगावा लागत नव्हता. थोड्या वेळाने त्यांनी त्यांच्या साथीदाराला, सुलतानीला पण बोलावून घेतलं. म्हणाले “हा माझा मित्र माझ्याबरोबर नव्हता, पण तो पण दुसऱ्या यूनिट मधे होता आणि लढत होता. आम्ही स्वतंत्र झाल्यावर बऱ्याच वर्षांनी हा इथे रहायला आला. माझा चांगला मित्र आहे. पन्नाशी पार केलेला माणूस आहे, तो पण तुला बरीच माहिती देऊ शकेल. थोड्या वेळाने सुलतानी आला.  

निशांत त्यांच्याकडे बघतच राहिला. निशांतनी विनायकरावांचे फोटो पाहिले होते. सुलतानी आणि त्यांच्यामध्ये विलक्षण साम्य होतं. अगदी बाप लेका मधे असतं तसं.  निशांतनी फोल्डर मधे जो अविनाशचा फोटो होता, तो पाहीला होता. अर्थात तो ३० वर्षांपूर्वीचा फोटो होता, पण निशांत डिटेक्टिव होता, आणि त्याच्या  अनुभवी आणि  चाणाक्ष नजरेने चेहऱ्यावरचे तपशील ओळखले. म्हणजे, डोळे नाक कान ओठ यांची ठेवण वगैरे. त्याची जवळ जवळ खात्रीच झाली की आपण ज्याला शोधायला आलो आहोत, तो हाच.

हा एक विलक्षण योगायोग होता. निशांत, केवळ लोकांना कसलाही संशय येऊ नये म्हणून मीटिंग मधे ठरल्या प्रमाणे, एकतरपूरला आठ दिवस राहून परत जाण्याच्या विचाराने आला होता. बांग्लादेश मधे जाऊन आपण अविनाशला शोधण्याचे कष्ट घेतले यांचे पुरावे असावेत म्हणूनच त्याचा हा दौरा होता. एवी तेवी आठ दिवस मुक्काम करायचाच आहे, तर चौकशी केल्याचं नाटक तरी पार पाडू, याच विचाराने तो लोकांशी बोलत होता. पण म्हणतात ना” दैव जाणिले कुणी” दैवाच्या मनात काही वेगळच होतं. अविनाशचा शोध लागला होता. निशांत त्यामुळे खुशीत होता. अचानक शोध मोहिमेला यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती.     

निशांत असलम  आणि सुलतानीशी बोलत होता, पण त्याच्या डोक्यात वेगळेच विचार चालू झाले होते. सगळी माहिती बोलून झाल्या नंतर निघायच्या अगोदर निशांतनी सुलतानीच्या घराचा पत्ता मागितला. “कशाला?” सुलतानीनी   विचारलं. काय आहे न, चाचा आज रात्री मी सगळं नीट लिहून काढणार, जर असं वाटलं की यात काही त्रुटि आहेत, मग तुमच्याशी बोलावं लागेल, म्हणून. म्हणजे जर जरूर वाटली तरच तुम्हाला त्रास देईन. सुलतानीला पटलं आणि त्यांनी पत्ता दिला. निशांतनी दुसऱ्या दिवशी जरा नोट्स काढल्या. तो दिवस तसाच जाऊ दिला. तिसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता निशांतनी सुलतानीच्या घराचं दार ठोठावलं.

“अरे, या या निशांतजी.” सुलतानीनी निशांतचं स्वागत केलं.

थोडावेळ इकडचं तिकडचं बोलणं झाल्यावर, निशांत मुद्द्यावर आला. त्यांनी विचारलं. “चाचा, तुम्ही आर्मीत केंव्हा जॉइन झालात?”

“मी आर्मीत कधीच नव्हतो. मी मुक्ती बाहिनीत होतो.” – सुलतानी.

तुम्ही आर्मीत कधीच नव्हते?” – निशांतनी यावेळी मराठीत प्रश्न विचारला. आतापर्यंतचं  सर्व संभाषण हिंदीतून चाललं होतं. 

“नाही, पण तुम्हाला असं का वाटलं?” सुलतानिनी मराठीतूनच प्रतीप्रश्न केला. निशांत हसला, म्हणाला. “अविनाश काका, कशाला ही लपवी छपवी?”

सुलतानीनी कपाळाला हात लावला, त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी माती खाल्ली आहे, आता निस्तरणं भाग होतं. मग ते उठले, निशांतचा हात धरला आणि त्याला बाहेर अंगणात घेऊन गेले.

“का रे बाबा, कोण आहेस तू, कुठून आला आहेस?” -सुलतानी

“मी निशांत, मी नागपूर हून खास तुम्हाला भेटायला आलो आहे. मला तुमच्या वडि‍लांनी, म्हणजे विनायकरावांनी पाठवलं आहे. तुमचा शोध घेण्याची माझ्यावर जबाबदारी टाकली आहे.” निशांत एका दमात बोलला.

निशांतचं बोलणं ऐकून सुलतानी भूतकाळात हरवला. थोडा वेळ तसाच गेला. निशांत शांत बसून होता. कामगिरी यशस्वी झाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.

“हे बघ, याचा आता काही उपयोग नाही. सगळं विसरून जा आणि आल्या पावली परत जा. ऐक माझं.” – सुलतानी.

“मी तुम्हाला भारतात परत नेण्या साठी आलो आहे. तुम्ही माझ्याबरोबर नागपूरला चला.” – निशांत.

“नाही, हे शक्य नाहीये.” सुलतानी

“का? का शक्य नाही? मी करतो ना सगळी सगळी व्यवस्था.” – निशांत.

“हे बघ, आत्ता इथे बोलणं शक्य नाही. मी उद्या तुझ्या हॉटेलवर येतो, तिथे मी सविस्तर सांगीन, का शक्य नाही ते.” – सुलतानी.

निशांतनी मग जास्त ताणून धरलं नाही, आणि म्हणाला “ठीक आहे.” आणि निघाला. निशांत विचार करत होता की असं काय सांगण्यासारखं आहे की जे इतर कोणाला कळण्या सारखं नाहीये? पण त्याला काही समाधान कारक उत्तर सापडलं नाही. शेवटी त्यांनी ठरवलं की विचार करण्यापेक्षा उद्याची वाट पाहू.

दुसऱ्या दिवशी सुलतानी त्याच्या हॉटेल वर आला. बरोबर त्यांची बायको होती. रूम मधे आल्यावर सुलतानिनी आपल्या बायकोची ओळख करून दिली. “ये सलमा है. मेरी बिवी.

 

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com