तोतया वारसदार
भाग १२
भाग ११ वरून पुढे वाचा....
निशांत त्याच रात्री विमानाने नागपूरला आला. दूसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सारंग सरांना फोन केला. सारंग सरांना जरा आश्चर्यच वाटलं.
“अरे निशांत? परवाच दिल्लीला गेला होतास न? काम झालं? एवढ्या सकाळी कसा काय फोन केलास?” – सारंग.
मग निशांतने दिल्लीला काय झालं ते सांगीतलं. सगळं शांत पणे ऐकून घेतल्यावर सारंग सर म्हणाले “ओके. आज दिवसभरात मी सगळी कागद पत्र तयार करून घेतो.
तू संध्याकाळी ७ वाजता ये ऑफिसला.”
संध्याकाळी निशांत सारंगच्या ऑफिस मधे पोचला. सारंगने सर्व कागद तयार ठेवले होते. “हूं, बोल आता नेमकं काय झालं ते.”
मग निशांतने सर्व कहाणी पुन्हा सांगितली. ती ऐकल्यावर सारंग म्हणाला,
“मला हे कळायला हवं होतं, आणि ही कागदपत्र आधीच तुला द्यायला हवी होती, पण ठीक आहे. उद्या तू जा, आणि बघ काय माहिती मिळते ते.”
दुसऱ्या दिवशी निशांत सकाळच्या फ्लाइटने निशांत दिल्लीला गेला. आर्मी ऑफिस मधे पोचल्यावर त्याने सर्व पेपर त्या अधिकार्यासमोर ठेवली. ती पाहून व्यवस्थित आहेत याची खात्री करून घेतल्यावर तो म्हणाला,
“आता सांगा तुम्हाला आमच्या कडून काय माहिती हवी आहे ते.”
“अविनाशला शोधण्यासाठी जी टीम गेली होती, त्या टीमच्या सदस्यांची माहिती हवी आहे. म्हणजे नावं आणि सध्याचे पत्ते.” – निशांत.
“तुम्हाला त्यांना भेटायचं आहे का? भेटून काय साध्य होणार आहे? आमची चौकशी झाली आहे आणि त्यातून काय निष्पन्न निघालं आहे, ते तुम्हाला माहीत आहे. आमच्या नागपूर ऑफिस ने ते सर्व तुम्हाला सांगीतलं आहेच. मग आता तुम्ही त्या लोकांना भेटले तरी ते काय वेगळं सांगणार आहेत?” – आधिकारी.
“सर, मामला प्रॉपर्टीचा आहे. त्याचं हस्तांतरण योग्य तऱ्हेने व्हायला हवं, आणि हे सर्व कोर्टाच्या निगराणी खाली होणार आहे. आम्ही वारसदार शोधण्यासाठी काय प्रयत्न केले, याचं सविस्तर विवरण आम्हाला कोर्टा समोर ठेवावं लागणार आहे.”- निशांत
अधिकार्याचं समाधान झालं. त्यांनी पुन्हा सर्व पेपर वर नजर फिरवली, पूर्ण समाधान झाल्यावर, तो म्हणाला ,”ही सर्व माहिती मी काढून ठेवतो, ३० वर्षांपूर्वीची गोष्ट असल्याने, रेकॉर्डस शोधून त्यातून तुम्हाला हवी असलेली माहिती काढायला थोडा वेळ लागेल. तुम्ही असं करा २ दिवसांनी या.”
दोन दिवस काहीच काम नव्हतं मग निशांत दोन दिवस दिल्ली फिरला. दिल्लीला येण्याची निशांतची ही काही पहिलीच वेळ नव्हती, पण कामाच्या दबावामुळे त्याला दिल्ली निवांत अशी फिरायला मिळालीच नव्हती. या वेळेस त्याला दोन दिवस मिळाले, मग त्याचा त्याने पुरेपूर उपयोग करून घेतला.
दोन दिवसांनी तो तो आर्मी ऑफिस मधे गेला. अधिकार्याने त्याला दोन नाव दिली. एक जण सध्या रोहतक मधे राहत होता, तर दूसरा कडप्पा गावात राहत होता. ही माहिती मिळायला आठ दिवस लागले, पण उपयुक्त माहिती मिळाली.
माहिती मिळाल्यावर, रात्री निशांतने फोन करून सारंग सरांना अपडेट दिलं, आणि सांगीतलं की तो उद्या रोहतकला जाऊन त्या माणसाला म्हणजे दुर्गादासला भेटणार आहे.
दुसऱ्या दिवशी, निशांत, रोहतकला गेला. दुर्गादासजींना भेटला. ७० वर्षांचे दुर्गादासजी या वयात पण एकदम फिट होते. उंच भरदार देहयष्टि, चेहऱ्यावर बेफिकिरी आणि हसतमुख भाव, असे दुर्गादासजी निशांतला सहजच आवडून गेले. निशांतनी त्यांना भेटण्याचं कारण सांगितलं. ऐकल्यावर, दुर्गादासजी एकदम इतिहासात शिरले. बराच वेळ ते तसेच बसून होते. स्पष्टच होतं की ते जुन्या आठवणीत रमले होते. निशांत स्वस्थ बसून त्यांची वाट पाहत होता.
थोड्या वेळाने ते भानावर आले, सरसावून बसले आणि सांगायला सुरवात केली. “अविनाश हमारे यूनिट का सबसे होणहार लडका था. लढाईला सुरवात होण्याच्या आधीच, काही दिवस आम्हाला बॉर्डर वरच्या कॅम्प मधे, शिफ्ट केलं होतं. आमची पॅरा रेजिमेंट असल्याने, एक दिवस रात्रीच्या गडद अंधारात आम्हाला पॅरश्यूटने एकतरपूरच्या जंगलात उतरवलं. खाली उतरल्यावर, आपापली पॅरश्यूट गोळा करून एका ठरलेल्या ठिकाणांवर जमायचं होतं. तिथे जंगलात एक खड्डा करून त्यात दिवसभर लपून राहायचं होतं. प्लॅन प्रमाणे, रात्र झाल्यावर, एका विवक्षित ठिकाणी मुक्ती बाहिनीला जाऊन सामील व्हायचं होतं. सकाळपर्यंत, यूनिट मधले, सगळे तिथे पोचले पण अविनाश पोचला नाही. धोका पत्करून, युनिट मधले, दोन जवान त्याच्या शोधार्थ निघाले. नुकताच पावसाळा संपला होता, घनदाट जंगल, त्यात ठिकठिकाणी दलदल, अनोळखी प्रदेश त्यामुळे शोधणं एक अवघड काम होतं. बाकी सगळे पुढच्या मुक्कामाला निघाले, पण आम्ही तिघ मागे थांबलो होतो. दोन दिवस असा शोध चालू होता, पण अविनाश सापडला नाही, शेवटी आम्ही सुद्धा युनिटला जाऊन मिळालो. खूपच दुर्दैवी घटना होती ती. युद्धात वीरगती प्राप्त झाली असती तर, आम्हाला सर्वांनाच त्याचा अभिमान वाटला असता. बडा जाँबाज फौजी था वह. अशी वेळ कधीच सैनिकांच्या वाट्याला येऊ नये.” दुर्गादासजी खूप भावुक झाले होते.
निशांत पण त्यांचं बोलणं ऐकून खूप भारावला होता. थोड्या वेळाने आतून जेवणाची वर्दी आली, निशांतने बरेच आढेवेढे घेतले, पण तो हरियानवी माणूस, आदरातिथ्याला कमी पडणारा नव्हता. निशांतला जेवावच लागलं. बोलता, बोलता एकतरपूर गावाचं, आणि आजूबाजूच्या जंगलाचं वर्णन त्यांनी निशांतला ऐकवलं. आजूबाजूच्या प्रदेशाची बरीच माहिती घेतल्यावर निशांतने विचारलं, “आता तुम्ही सांगीतलं की शोधायला तिघं गेले होते, मग हा तिसरा माणूस कोण?”
“एक मैं था, दूसरा नारायण राव, आणि तिसरा प्रकाश निंबाळकर. प्रकाश साताऱ्या वरुन आला होता. माझी ७३ साली बदली झाली आणि मग त्यांच्याशी काही संपर्क राहिला नाही. आत्ता कुठे असेल ते माहीत नाही.” – दुर्गादास.
माहितीत थोडी भर पडली होती. मग निशांत निरोप घेऊन निघाला. संध्याकाळी दिल्लीला पोचला. हॉटेल वर गेल्यावर जेवण वगैरे झाल्यावर त्याने सारंग सरांना अपडेट दिलं.
“मग आता पुढचं पाऊल काय?” सारंग सरांनी विचारलं.
“आता मी उद्या इथं दिल्ली ऑफिस मधे जाणार आणि प्रकाश निंबाळकर चा पत्ता घेणार आणि मग थेट कडप्पा गाठणार. तिथे नारायणराव यांना भेटणार आणि मग सातारा.” – निशांत.
“ठीक आहे.” – सारंग सर.
दुसऱ्या दिवशी तो रिजर्वेशन काऊंटरवर गेला आणि संपर्क क्रांति गाडीचं कडप्पाचं तिकीट काढलं. तिकीट दोन दिवसानंतरचं मिळालं. मग निशांत आर्मी ऑफिस मधे गेला. तिथे निंबाळकरचा पत्ता घेतला. तो साताऱ्यालाच स्थायिक झाला होता. त्याचा फोन नंबर पण मिळाला. निशांतने मग PCO वर जाऊन त्या नंबरवर फोन केला. फोन त्यांच्या मुलाने उचलला. सर्व ऐकून घेतल्यावर त्याने सांगीतलं की त्यांचे वडील दुसऱ्या मुलाकडे मद्रासला गेले आहेत, त्याने मद्रासचा पत्ता पण दिला. दोन दिवसांनंतर निशांत कडप्पाला गाडीत बसला.
कडप्पाला पोचल्यावर हॉटेल मधे सामान टाकून निशांत, आर्मी ऑफिसने दिलेल्या पत्त्या वर पोचला. नारायण राव टिपिकल ब्राह्मण होते. कपाळभर भस्माचे पट्टे, आणि गंभीर चेहरा. निशांत पोचला तेंव्हा ते पंचांग उघडून काही आकडे मोड करत होते.
त्यांच्याकडून दुर्गादासजींनी आधीच दिलेल्या माहितीत, काही विशेष भर पडली नाही. त्यामुळे निशांत हात हलवतच हॉटेल वर पोचला. तिथून तिरूपति जवळ होतं म्हणून तो तिरूपतीला गेला आणि दर्शन करून मग मद्रास च्या गाडी बसला.
प्रकाश निंबाळकरांच्या घरी निशांत पोचला तेंव्हा संध्याकाळ झाली होती, फोन वरुन आधीच बोलणं झालं असल्याने, निंबाळकर घरीच होते.
आम्ही त्या दिवशी रात्री बरीच शोधाशोध केली. पण अंधार आणि सगळीकडे चिखल होता, झाडी पण घनदाट होती. सगळं दलदलीचा प्रदेश, टॉर्च लावायची मनाई होती, त्यामुळे खूप अडचणी येत होत्या. तशाही परिस्थितीत दोन तीन मैलांचा परिसर आम्ही पिंजून काढला पण अविनाश काही सापडला नाही. मग धाडस करून दुसऱ्या दिवशी दिवसा पण शोधायचा प्रयत्न केला, पण यश आलं नाही. शेवटी त्याचं पॅराशूट लांबवर भरकटत गेलं असेल असा निष्कर्ष काढून आम्ही शोध मोहीम थांबवली. आमच्या जवळ वेळ पण नव्हता, मोहीम ताबडतोब सरू होणार होती, त्यामुळे आम्ही ठरलेल्या वेळेस मुक्तीवाहिनीला जाऊन मिळालो. पढे काय झालं ते माहीत नाही. पण त्याचा नंतर कधीच पत्ता लागला नाही.” निंबाळकरांनी त्यांना जेवढं माहीत होतं ते सांगीतलं
निशांत परतला. माहितीत काहीच भर पडली नव्हती. संध्याकाळी सारंग सरांना फोन करून तिघांच्याही भेटीचा वृत्तांत सांगीतला. दुसऱ्या दिवशी निशांत नागपूरला जाण्यासाठी गाडीत बसला.
नागपूरला पोचल्यावर, दुसऱ्या दिवशी निशांत सारंग वकिलांना भेटला. प्रशांत आणि किरीट पण हजर होते. आता सगळा घटनाक्रम जरा गंभीर होत चालला होता. त्यामुळे सगळ्यांनाच त्याची उत्सुकता होती. निशांतनी दिल्लीला आणि कडप्पा ला काय माहिती मिळाली ते सविस्तर सांगितलं. मद्रासच्या भेतीबद्दल पण सांगीतलं. ऐकल्यावर किरीट म्हणाला,
“मला असं वाटतं की अविनाशचा पत्ता मिळत नाही अशी नोंद करून त्याचं नाव बाजूला सारावं. सारंग तू बाकी दोघा मुलांबद्दल चौकशी चालू ठेव., आणि नंतर किंवा मधल्या काळात निशांतला गोकर्णला जाऊ दे.”
“हूं, मलाही असंच वाटतंय. अविनाश चा चॅप्टर आता बंद करावा.” सारंग सरांनी आपलं मत व्यक्त केलं. बाकीच्या दोघांनी माना डोलावल्या.
“सर,” निशांत म्हणाला, “मला थोडं वेगळं बोलायचं आहे. बोलू का?”
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com