Niyati - 1 books and stories free download online pdf in Marathi

नियती - 1

नियति

भाग - 1

(१)

आज आभाळ काहीसं ढगाळलेलं होतं, चारी बाजूंनी काळेकुट्ट ढग एका ठिकाणी जमू पाहत होते ... संध्याकाळच्या सायंछायेवरती .. या नभांचं जनु काही सावट साचलं होतं, स्वच्छ नितळ मनात अचानक जणु दुःखाचं वादळ तुटून पडावं तसं ढगही क्षणांपुर्वीच्या नितळ आभाळावर तुटून पडले अन क्षणात सारं अंधारून आलं. बाल्कनीच्या खुर्चीत बसुन सुमन सारं काही शांतपणे पाहत होती, जनु काही तिच्या मनातलं काहूर.. तिच्या मनातील दगदग तो निसर्ग त्या आभाळात चितारू पहात होता. आज घरीही कोणी नव्हतं, निखिल कालच सुट्टीसाठी म्हणून गावी आजीकडे निघून गेला होता ...तसं त्याचा हट्ट होताच की आईनेही त्याच्यासोबत यावं, पण कामाचा एवढा काही पसारा होता की त्यातून मान वर काढणं अवघड, म्हणून त्याला एकट्यालाच जावं लागलं, तरी दादा ( सुमनचे वडील ) म्हणत होते...,

“ अगं सुमन ... काम काम .. काम ... काम तर काय तुझ्या पाचवीलाच पुजलेलं ... अगं कधीतरी ... माणसांत.. आपल्या माणसांत थोडं मिसळ ... निदान या निखीलसाठी तरी ... बघ किती खट्टू झालाय तो .. सहा वर्षाचं लेकरू ते .... त्याला नाही कागं वाटत ... आपल्या आईसोबत खेळावं .. बागडावं , नाहीतरी या एवढ्या मोठ्या घरात .. या विठोबा अन यशोदेशिवाय आहे तरी काय कोण त्याला ... बघ त्याच्यासाठीतरी.. अगं तिकडे आई वाटेकडे डोळे लावून बसलीय ... किती दिवस झाले ... तुम्हां माय लेकरांची भेट नाही .......”

दादा आपले उर भरून भरून बोलतच होते, सुमन मात्र सारं काही ऐकूनही शांतच ... थोडं थांबून दादाही ... शेवटी निरोपाच्या भाषेतच म्हणाले ......

“ ठीक आहे बाई .... मी म्हातारा तरी काय वेडा आहे ... अरे मी विसरलोच होतो , तु तुझ्या आयुष्याचे निर्णय स्वतःच घेतेस नव्हे .... पण मी तरी काय करू, तिकडे तुझ्या आईची तगमग बघवत नाही म्हणून जीव तुटतो ... बाकी काय आता येतानाही मागे लागली होती ... मी येते म्हणून .. पण दोन पावलं चालण्याची ताकत नाही अंगात ... अन कशी आणायची तिला इथं .... जावू द्या ... कोणाला काय सांगायचं अन कोणाला काय बोलायचं ....”

डोळ्यांना रुमाल लावूनच दादांनी शेवटचा शब्द उच्चारला, सुमनलाही वाईट वाटलं पण आता ... आसवं पाहून दुःख वाटण्याइतपत तिचं मन हळवं राहिलं होतं कुठं ...... जीवनाच्या वाटेवर असंख्य वादळांनी, खवळलेल्या लाटांनी या किनारीच्या खडकांवर इतके आघात केले होते की आता मुळात आघातांची वेदनाही जाणवत नव्हती , अन न आघातांचा स्पर्शही.

निखीलची बॅग आवरून विठोबा तेथे आला , दादांनी डोळे पुसले .... आतापर्यंत गप्प असलेली सुमन काहीशा गंभीर स्वरातच म्हटली ,

“ विठोबा ... तुही जा हो दादांसोबत ... म्हणजे त्यांनाही प्रवासात सोबत होईल .... अन निखीलकडेही लक्ष ठेवता येईल .... आई एकटीच असेल नाही तिथे ... यशोदेला इथेच राहू दे म्हणजे मलाही होईल सोबत ......”

“ व्हय मालकीण बाय .... यशोदी थांबल इथं ... मी जाईन निखील भैया संगं ...”

सारं सामान आधीचं गाडीत भरून ठेवलेलं होतं, सारे गाडीत बसले अन सुमन त्यांना रेल्वे स्टेशनवर सोडून आली ... निखील तसा थोडा हिरमुसलाच होता, आता आईशी बोलायचंच नाही म्हणुन एकदाही तिच्याकडे त्यानं पाहिलं नाही.. सुमनच्या लक्षात आलं होतं सारं.... तो तरी काय करणार बिचारा ... हे हिचं दरवेळीचंच होतं ...... नेहमी उन्हाळी सुट्टी लागली की आजोबा गावाला घेवून जातात पण आई एकदाही आपल्यासोबत येत नाही इवलंस मन ते ... नाराज होणारचं......

स्टेशनवर गेल्यावरही.... एका कोपऱ्यात जावून निखील बसला... गाडी सुटायला अजून अवकाश होता .... सुमनही थांबली त्यांच्यासोबत ... थोडावेळ इकडे तिकडे पाहून ती हळूच त्याच्याजवळ जावून बसली ....

“ आज काय बुवा एक माणुस आमच्यावर फारच रुसला आहे जणु .... काय राग तर बघा ... बघायचं देखील नाही आमच्याकडे काय करायचं या रागाला पण आमच्याकडे न या रागावर एक औषध आहे ...”

म्हणत म्हणत तिने ... पर्समधून छान कॅडबरीचं पाकीट काढलं ....

“ ...हे बघा ... पण नको... जाऊ दे आता हे थोडीच कोणी घेणार आहे आमच्याकडून ... सारेच रागावलेत ना आमच्यावर... जाऊ दे बुवा ... हे देतचं नाही आम्ही कोणाला......”

म्हणता म्हणता अचानक निखील पट्कन तिच्याकडे वळला अन हातातलं पाकीट काढुन घेत म्हंटला ...

“ जा ....... तु नेहमी असचं करतेस, कधी कधी माझ्याबरोबर येत नाहीस .... कधी नाही ..”

“ नाही रे बाळ मला का येऊ वाटत नाही तुझ्यासोबत .. पण काय करू रे ..., तुझ्या आईला कामं असतातनां फार ... मग कशी येणार सांग ती .... पण माझं काम संपलं ना मी नक्की येईन अगदी तुझ्या मागोमाग .... मग तर झालं ....”

“ नक्की येशील ....”

“ हो ... हो .. अगदी नक्की ....”

निखील तसाच आईला बिलगला ... तेवढ्यात गाडी निघण्याची बेल झाली .... सुमनने दादांचा निरोप घेतला अन तीही गाडीच्या बाहेर पडली......

(२)

कामासाठी म्हणून सुमन थांबली खरी पण आजचा दिवस मात्र ... का कुणास ठाऊक फारच विचित्र होता ..... सकाळी सकाळीच सारं काही आवरून ती ऑफिसला गेली खरी पण कामातही काही मन लागेना .... का कुणास ठाऊक पण पुन्हा पुन्हा ... निखिलचा निरागस चेहरा डोळ्यांसमोर येत होता. खरंतर आजवर कधी कामाच्या व्यापातुन तिला त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळालाच नव्हता आज मात्र ... सारचं काहीसं ... अजब वाटत होतं ... माझं आयुष्य तर अर्धं सरलं ... पण ... निखीलचं भविष्य काय ? ... मनावर असंख्य यातनांचं ओझं वाढत चालतं होतं ... जुना अल्बम उघडावा अन ... आयुष्य जणु ... एकएक पानाबरोबर ... मागे मागे उलटत जावं ... तसा गत जीवनाचा सारा चित्रपट .... डोळ्यांसमोर दिसु लागला ...... अजुन आठवत होता तो कॉलेजचा पहिला दिवस .... ती मजा .... तो उस्ताह ... अन मनिषा .... ती देखील आठवत होती ... होय मनिषा .... सुमनची लहान बहिण .... फार सुखी कुटुंब होतं .... दादा, आई, सुमन ... अन मनिषा ....दोन्ही बहिणींचा एकमेकींवर फार जीव .... अन फरक तो एक वर्षांचा दोघींच्या वयात त्यामुळे जवळ जवळ दोघी मैत्रिणीच ..... अगदी जीवाच्या .... आईही नेहमी म्हणायची.....

“ इतक्या नका हो प्रेम करत जावू एकमेकींवर ..... नाहीतर ... माझीच मेलीची नजर लागायची......”

शाळेत नाव घालतानाही दोघींची गट्टी तुटायची नाव नाही... त्यामुळे नाईलाजाने सुमनलाही , एक वर्ष उशिरा .... म्हणजे मनिषा बरोबरच..... शाळेत जावं लागतं .... त्यामुळे पहिल्यापासुनच एक वर्ग, अन एक बाक हे समीकरण काही कधी बदललं नाही.

कॉलेजातही .... अगदी ... दोघी एकमेकींना पुऱ्या असत त्यामुळे जास्त मैत्रिणींचा कधी संबंध आलाच नाही ... वा कधी .... तेवढा संबंध ठेवावा असं दोघींनाही वाटलं नाही .... हां एक दोन मैत्रिणींचा अपवाद होता तेवढाच .... छान चाललं होतं कॉलेज .... दोघींनाही वाचनाची भयंकर आवड त्यामुळे कधीही .... गप्पांना विषयाची उणिव भासायची नाहीच ... अगदी ... तत्त्वज्ञानापासून ... मिष्कील विनोदापर्यंत सारं काही असायचं त्यात ... खरचं एकमेकांना केवळ जीव देणाऱ्या बहिणी नव्हत्याच त्या, तर खरचं एकमेकांचे जीवच जणु एकमेकांत अडकले होते... दिवस असेच मजेत चालले होते..... घर ते कॉलेज .... कॉलेज ते घर ..... अशातच एके दिवशी लेक्चर संपल्यानंतर ..... कॉलेजमधुन बाहेर पडत असतानाच ... ग्रंथालयाच्या समोर..... काहीशी गर्दी दिसली .... काय चाललंय या उत्सुकतेपोटी ... दोघीही तिथे गेल्या ... अन गर्दीचा भाग झाल्या......

तिथे ..... मधोमध एका गोल कट्टयावर उभं राहुन एक तरुण काहीसा उच्च स्वरात बोलत होता ... अन सारेजण त्याभोवती गोल कडे करून त्याला मनपुर्वक ऐकत होते... नकळत दोघीही .... त्या बोलण्यात गुंतुन गेल्या .... तो बोलतच होता...

“ केवळ शब्दच्छल करून अन कुणाचे तळवे चाटुन... प्राध्यापक नावाच्या पवित्र पदावर मांड देवुन बसलेल्या .... या विषारी भुजंगांना आता धडा शिकवलाच पाहिजे .... ज्या उदात्त हेतुने ..... स्वातंत्र्याचा सुर्य या भारतमातेच्या भुतलावर ज्या महात्म्यांनी खेचुन आणला .... त्या महात्म्यांनाही क्षणभर .... डोळे मिटुन घ्यावे ... इतकी लाज वाटावी .. असे हे ... कुपमंडूक वृत्तीचे शिक्षक ... जोवर या शिक्षण व्यवस्थेत आहेत .... तोपर्यंत कुठलाही बदल केवळ अशक्य आहे.... अन मित्रांनो त्याकरताच .... मानमरातबाच्या झुलीत ... मिरवणाऱ्या तथाकथित प्राध्यापकांना धडा शिकवणं ... अन त्या जागी ... विरक्त भावनेने अविरत ज्ञानज्योत तेवत ठेवण्याचे जे पवित्र कार्य पुर्ण निष्ठेणे करीत आहेत... किंबहुना ज्यांचा असा प्रयत्नदेखील आहे... अशांचे हात सबळ करणे .. अशा व्यक्ती पुढे आणणे अन नालायकांस त्यांची लायकी दाखवुन देणं हे आपल्या संघटनेचं मुख्य ध्येय आहे.... क्षेत्र कुठलही असो... शैक्षणिक, सामाजिक , आर्थिक .... मातृभूमीसाठी सर्वस्व पणाला लावणं ... हे या मातीतल्या सुपुत्रांचं वैशिष्ट्य आहे.... या मातीसाठी ... भगतसिंग, सुखदेव , ........ राजगुरू अन नजाणे कित्येक पवित्र आत्म्यांनी आपले देह .... लीलया स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात झोकुन दिले .... त्यांचं काम त्यांनी केलं ... पण आता वेळ आपली आहे मित्रांनो या शिक्षण क्षेत्राला लागलेली वाळवी ...... लागलेली कीड जर आपल्या घामाने ........ वेळप्रसंगी रक्ताने ... दुर होणार असेल तर यासाठी आपली तयारी हवी .... माझी तर आहेच ... अन तुमची ..... खरंच .... काय आहे का तयारी ? ”

........ अन सभोवताली नकळतच आवाज आला “ हो .....! ” नकळत का होईना ...... सुमन आणि मनिषा दोघीही तशाच काहीसं म्हणुन गेल्या ..... “ हो नक्कीच ....”

(३)

तो दिवस खरंच अगदी मंतरल्याप्रमाणे गेला ..... गर्दीत पुन्हा ... त्या तरुणाशी बोलायचं धाडस ना सुमनचं झालं ना मनिषाचं किंबहुना काही बोलायच्या मनःस्थितीत त्या होत्याच कुठे ........ ते शब्द, तो आवेष ... आग .... आग लावुन देत होतं सारं .... ऐकणाऱ्यांच्या काळजात .... दोघीही त्या व्यक्तिमत्त्वाने फारच भारावून गेल्या ...... आता आपणही असंच काहीतरी करायला हवं अशी नकळत का होईना कुणकुण सुमन अन मनिषा दोघींच्याही मनात घर करून गेली ... पण दोघीही ... थोड्या बिचकत होत्या .... का कुणास ठाऊक पण त्या दिवसापासुन त्यांचं बोलणंही बरंच कमी झालं होतं ....... कदाचित ... आपण काही बोललो तर .... पुढच्याला काय वाटेल ........ त्याचा गैरअर्थ तर निघणार नाही ना ..... या भीतीने अगदी बहिणी असुन देखील ..... तो अन त्या प्रसंगाची आठवण दोघीही आवर्जुन टाळत होत्या किंबहुना विषयच टाळत होत्या, आज आठवडा झाला असेल त्या छोट्या सभेला... परंतु त्यानंतर ..... दोघींच्याही आतुर नजरेला ...... त्या रूपाचं दर्शन काही घडलंच नाही ........ आता सारं काही नॉर्मल होत चाललं होतं ..... कदाचित कोणी पक्षनेता वगैरे असेल ...... लहानपणापासुन सभेचं बाळकडू मिळत असेल ... अन म्हणुनचं एवढं व्यक्तित्व खुललेलं असावं ...... पण नेते म्हणजे काय एकसाथ सगळे सारखेच यांचे दाखवायचे दात वेगळे अन खायचे निराळेच .... सुमन स्वतःलाच समजावत होती ...... अन बऱ्यापैकी ती .... तो प्रसंग विसरत देखील होती ........ पण मनिषा ... ती मात्र दिवसेंदिवस अधिकच अस्वस्थ होत चालली होती... खाण्यापिण्याकडे तर लक्ष नव्हतंच पण लेक्चर्समधेही आजकाल मन रमेना ...... पुन्हा पुन्हा ती त्या अनोळखी जमावात तो ओळखीचा चेहरा शोधात होती अन तो तिला गवसत नव्हता ... अन जीव ... पुन्हा पुन्हा नवीन झेप घेवून अनोळखी अशा त्या उंच तटबंदीवरून पलीकडचं काही ओळखीचं पाहु पाहत होता. पण कितीही प्रयास केला तरी .... त्याला ते जमत नव्हतं ... दिवस जसे मागे मागे जात होते .... तसतसं मन अजुनचं खिन्न होत चाललं होतं.....

आजचा दिवसही असाच काहीसा ..... अकौंटसचा तास चालू होता ...... नेहमीप्रमाणे ..... मनिषा ... शरीराने फक्त तिथे होती .... परंतु मन मात्र कुण्या निराळ्याच जगात .... निराळेच ... झुले झुलवण्यात मग्न त्याला या साऱ्याची .... सभोवतालच्या विश्वाची ...... काहीच संवेदना नव्हती ... अशातच बेलचा आवाज झाला ... लेक्चर संपलं सुमन अन मनीषाचा बाक ... अगदी पहिल्या रांगेत त्यामुळे ... एकदा लेक्चर सुरु झालं की तसा मागील वर्गाचा अन त्यांचा काहीच संबंध उरत नसे... लेक्चर संपलं अन दोघीही बाहेर पडण्यासाठी मागे वळल्या तर ... अचानक अंगातून सरकन शहरा उभा राहिला ... कारण समोरचं तो तरुण ... ती व्यक्ती उभी होती ... अन ती त्यांच्यासाठी काही बोलत होती .... सुमन तशी स्थिरस्थावर त्यामुळे ... तिला काही असले भ्रामक भास झाले नाहीत.

तो बोलत होता......

“ नमस्कार ... कदाचित आपण मला ओळखत नसालचं .. मी शिरीष ... याच वर्गात शिकतो .... परंतु जॉब मुळे रेगुलर लेक्चर करायला जमत नाहीत .... त्यामुळे असा अधुन मधुनच उगवतो ... बरं सांगायचा मुद्दा असा की कदाचित आपणास ठाऊक असेलच की आम्ही सारी मुलं म्हणजे .... आपल्याच महाविद्यालयातील .. मिळून एक नविन संघटना बांधायचा विचार करतोय ... अन त्यासाठीच .. आपलं मत ... अन जमल्यास आपला सहभाग ... मिळेल तर ... संघटनेस मजबुती येईल ... अर्थात तडकाफडकी हा निर्णय घ्यायचाय असं नाही ... हि काही पत्रकं आहेत ... ज्यात, आपण काय करायचं आहे व आपल्याला काय काय करता येण्यासारखं आहे ... या सर्व गोष्टी नमूद केलेल्या आहेत ... हे आपल्याकडे ठेवा ... अन दोन दिवसांत ... आपला निर्णय मग तो काहीही असो आवर्जुन कळवा ... खाली ... तेथे माझा मोब. नंबर आहेच........ बरं चला जातो....जास्त वेळ घालवुन चालायचं नाही अजुन बरंचं फिरायचं आहे....”

असं अचानकच एखादा नभ भरून यावा धोधो बरसावा अन क्षणात निघुन जावावा ... त्याप्रमाणे तो आला ... तो बोलला .. अन निघुन गेला ... अन बोललाही असं जणु ..... बऱ्याच वर्षांची अगदी जुनी ओळख असावी तसं .... अगदी आपुलकीनं ..... अगदी नजरेला नजर भिडवुन जणु काही नजरेतुन तो भासवत असावा की .... हे जे सांगतोय ते तुम्हाला करायचंच आहे ......

तो निघुन गेला अन काहीशा गंभीर अन बऱ्याचशा शहारलेल्या अशा त्या दोघीही घराकडे परतल्या ... अर्थात या भेटीत शहारण्यासारखं मुळी नव्हतचं काही ... पण अजुनही आठवड्याभरापुर्वीचं त्याचं आवेशपूर्ण बोलणं डोळ्यासमोरून हटत नव्हतं .... अन कदाचित त्यामुळेच ... त्याचं साधं बोलणही ... अगदी मनात .... अन काळजात आत आत जात होतं ......

(४)

आता दुसऱ्याच दिवशी कॉलेजच्या प्रांगणात भरलेल्या मुलांच्या सभेत त्या आवर्जुन सामील झाल्या .. हे वेगळ सांगायला नको ... त्यांना पाहुन ....... शिरीषही खुष झाला ... पण एकदाच त्यानं त्या दोघींकडे पाहिलं अन बाकी वेळ मात्र ... संघटनेचं स्वरूप ... कार्य यांसारख्या विषयांवर ... चर्चा करण्यात .. तो आकंठ बुडाला ... आता दोघीही संघटनेच्या सदस्य झाल्या ... सुमनला ... तो जे काही बोलत होता ... जे काही मांडत होता ते अगदी पटत होतं ... तर मनिषा मात्र तो काय बोलतोय यापेक्षा ... तो कसा बोलतो ... तो कसा हसतो ... तो कसा वागतो .. या गोष्टींतच अडकली ... अर्थातच साऱ्यांच्या धडाडीमुळे संघटना चांगली बांधली गेली .... आंदोलनं, मोर्चे ... धरणे वेळ पडलीच तर उपोषणे यांसारखे नाना मार्ग वापरून ... विद्यार्थ्यांच्या बऱ्याचशा प्रश्नांचा सोक्ष मोक्ष लावण्याचं काम या संघटनेनं अगदी धडाडीनं केलं ... त्यामुळे अल्पावधीतच साऱ्यांच्या प्रशंसेस पात्र ठरलेली संघटना ... कॉलेज, विद्यापीठ सोडुन ... इतर सामाजिक प्रश्नांत अथवा समस्यांबाबतही विचार करू लागली .. अन या साऱ्या प्रवासात सुमन अन मनिषा होत्याच ... सुमनचं वाचन ... अन सामाजिक प्रश्नांची, समस्यांची तिची जाण यामुळे नकळत ती ... या सामाजिक कार्यात ओढली गेली अन पुढे पुढेच सरकत गेली .... अन आजमितीला संघटनेच्या स्त्री विषयक विभागाची ती प्रमुख बनली होती ... मनीषाही... संघटनेत होतीच पण ...समाज कार्यासाठी असणारी तळमळ मात्र तीत नव्हती ... ती येत होती पहात होती .... सहभाग अगदी प्रत्येक गोष्टीत पण कुण्या भलत्याच कारणासाठी ... जवळ जवळ दोन वर्ष उलटुन गेली आता शेवटचं वर्ष शेवटचे काही महिने ... मग मात्र ... कॉलेज संपणार ... जो तो आपापल्या मार्गाने जाणार ..अशातच ... संघटनेची सभा घेण्याचं ठरलं ... अर्थात विषय हाच की यापुढं संघटना कशी जिवंत ठेवायची ... कोणी कसा .. आपापला वाटा या कार्यात उचलायचा.

या सर्व धामधुमीत शिरीष ...सुमन अन मनिषा ... हे जणु या संघटनेचे ताईत बनुन गेलेले... त्यामुळे ... संघटनेची जवळ जवळ सारी जबाबदारी यांच्यावरच ... सुमन जरी स्त्रीविभागाची धुरा सांभाळत असली तरी ... निर्णय प्रक्रियेत नसेल कदाचित परंतु ... कोणत्याही कार्याची योजना आमलात आणण्याचं ... अक्चुअल ग्राउंड वर्क सारं मनीषाच पाहत होती .... त्यामुळे शिरीष अन तिचा तसा बराच संबंध यायचा ... त्यामुळे दोघांत चांगली मैत्री झाली होती ... शिरीषला सुमाविषयी फार आदर वाटायचा पण मनिषा मात्र ... चांगली मैत्रीण वाटायची ..तिची कामाची चिकाटीही त्याला थक्क करून जायची ...

सभा झाली ... विविध विषयांवर चर्चा केल्यानंतर अंती असा निर्णय घेण्यात आला की ...आता .. कॉलेज संपल्यानंतर साऱ्यांना एकाच शहरात .... एकाच ठिकाणी वारंवार जमणं शक्य होणार नाही ... त्यामुळे मोजके जे काही सभासद आहेत ... जे स्वतंत्रपणे एखाद्या ठिकाणी नव्याने संघटना उभारू शकतात अशा लोकांनी निरनिराळ्या ठिकाणी ...संघटनेच्या शाखा उभ्या करायच्या अन विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी वेळ प्रसंगी एकत्र येऊन अथवा स्वतंत्रपणे .. लढा द्यायचा आता शिरीष मुळी या शहरातला नव्हताच .... मुंबई शहर त्याच्यासाठी नव्हतंच..... तो मुळचा खेडेगावातला ... दुर चंद्रपुर जिल्ह्यातील .... आदिवासी पाड्यांप्रमाणे असणारं त्याचं छोटसं गाव .... बरेच काबाडकष्ट करून ... कसातरी तो तिथुन मेट्रिक झाला अर्थात त्यासाठी दुर शहरात येण्यासाठी किती धडपड किती कष्ट पडले यांचा काही हिशेबच नव्हता ... पण त्यानं सारं जिद्दीनं पुर्ण केलं ...त्याच जिद्दीनं प्रथम चंद्रपुरात बी. कॉम. करून तो ... पुढील शिक्षणासाठी .... म्हणजेच एम. कॉम. करण्यासाठी मुंबईला आला .... कारण नोकरी अधिक शिक्षण हे मुंबई शिवाय इतर ठिकाणी तितकसं सुलभ नव्हतं ... अन दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई विषयी वारंवार वाटणारं आकर्षण ....

हि सारी हकीकत मनिषालाही ठाऊक होती... अन हे देखील ठाऊक होतं की ...याने आकंठ समाजसेवेचं व्रत घेतलंय ... अन एकदा का तो .... आपल्या गावी गेला की तिथले प्रश्न तिथल्या समस्या यात तो असा गुंतेल की पुन्हा कसली भेट अन कसलं काय ... ती अस्वस्थ झाली ... आता लवकरात लवकर या गोष्टीचा निकाल लावायला हवा ... मनोमन ती निग्रह करत होती ... अन बऱ्याच विचाराअंती ... आता तिच्या मनानं पक्क केलं की .... हो आता त्याला विचारायाचचं ... भले आता काहींही होऊ दे...

(५)

बऱ्याच म्हणजे जवळ जवळ आठ एक दिवसानंतर आज शिरीष कॉलेजला आला होता ... कामात दोन शिफ्ट कराव्या लागतात त्यामुळे .... कॉलेजकडे दुर्लक्षच झालं होतं खरं ... पण पर्याय नव्हता स्वतःचं भागवुन ... गावी काही पैसे पाठवायचे तर हे कष्ट अपरिहार्यच होते ... त्यांना काही पर्याय नव्हताच ....

मनिषा अगदी वेड्यासारखी शिरीषची वाट पाहत होती ... दररोज कॉलेजला एकाच धुंदीत यायचं की ... आज तो येईल ... मग मी त्याला असं म्हणेन ... मी त्याला तसं म्हणेन ... पण... पण तो काही यायचाच नाही ... एवढी जीवाची बहिण ...पण वर्षभरात मनिषा सुमनशी बरीचशी हातचा ठेऊन वागत होती .... अर्थात तिची शिरीष विषयची भावना ... ती ... ओढ ..तिने सुमनला कधीच जाणवु दिली नाही ... ना कधी ... तसा संशय देखील सुमनच्या मनात आला... पण आज ठरल्याप्रमाणे मनिषा अगदी .... सारा धीर एकवटून आली होती.... शिरीष देखील... आला होताच ... आज सुमनची तब्ब्येत ठीक नसल्यामुळे तिला काही यायला जमलं नव्हतं त्यामुळे जवळ जवळ साऱ्याच गोष्टी जुळून आलेल्या ... त्यामुळे आजची संधी दवडण .... मनीषाला परवडणारं नव्हतंच ... नेहमीप्रमाणे ... लेक्चर्स संपली ... अन शिरीष वर्गाबाहेर पडणार तोच मनीषाने त्याला आवाज दिला ... तो हसुनच मागे वळला ....

“ काय .... काय म्हणताय बाईसाहेब...”

मिश्कीलपणे तो उद्गारला ...

“ ऐ हे असलं बाईसाहेब वगैरे काही म्हणायचं नाही मला सांगुन ठेवतेय..”

“ बरं बाबा नाही म्हणत... आता मला सांगाल का आपण का बोलावलं ते ....”

“ ... तुझ्याशी बोलायचं होतं थोडं ...”

“ माझ्याशी अन बोलायचं होतं ... काय बुवा ... असं काय आहे बोलण्यासारखं.... ”

“ आहे काहीतरी ... पण आता इथेच असा शुंभासारखा उभा राहणार आहेस का? ... चल तिकडे बागेत बसु ... थोडं महत्वाचचं आहे ....”

“ ठीक आहे .... चला ....”

दोघेही नजीकच्याच लॉनमध्ये गेले .. अन लगेचच शिरीष म्हणाला ....

“ बरं ... चल बोलुन टाक काय बोलायचं ते ... मला की नाही ... बिलकुल वेळ नाही ... आधीच काल एक दांडी पडलीय फुकट, आज गेलो नाही तर सुपरवायझर माझ्या नावाने शिमगाच करेल....”

“ अरे ... बसं झालं, ते तुझं काम.... ती शिफ्ट तो सुपरवायझर ... तुला दुसरा विषयच नसतो नाही बोलायला....”

“ बरं राहिलं .... नाही बोलत आम्ही काही ..... मग तुम्ही तरी बोला तुमचे आवडते विषय....”

“ हो बोलणारच आहे मुळी.....”

म्हणत म्हणत ती थोडीशी ओशाळली .... तरीही तसाच धीर करून ती पुढे म्हणाली ....

“ शिरीष .... मला न तुला एक सांगायचंय ....”

“ होना ... ! मग सांग ना ......”

“ नाही तसं नाही ... पण मला असं सांगायचय की ....”

“ झालं ..... तुला जसं सांगायचंय .... जेवढं सांगायचंय... अगदी तसं तसं सगळं सांग ... पण बाई लवकर सांग ....”

“ जा रे असं रे काय ते ... तुला तर सारखी थट्टाच सुचते ... जा नाहीच सांगायचय काही तुला ... जा ... तुझं काम ... ते महत्वाचं आहे ना .... जा तिकडेच जा ....”

“ झालं झालं .... फुगले गाल ...झाला शेंडा लाल ... अरे काय ... इथे बोलायलाही चोरी ... बरं ए बाई ... चुकलं माझं .. हे बघं ... शांत बसतोय इथं .... हि हाताची घडी ... अन हे तोंडावर बोट ...”

... अन खरोखरच तोंडावर बोट ठेवुन तो तिला हुंकारानेच खुणावत होता...

“ हं बोल ....”

मनीषालाही आता हसु आवरतचं नव्हतं अन हसत हसतच ती म्हणाली ....

“ माझं की नाही .... तुझ्यावर प्रेम आहे .... तु मला फार आवडतोस .... तुला ... तुला काय वाटतं माझ्याबद्दल ..”

क्षणातच शिरीषचा चेहरा बदलला .... हाताची घडी सुटली काहीसा अस्वस्थ झालेला तो ... त्याला काही बोलायलाही सुचेना .... तो चटकन जागेवरून उठला ... तशी मनीषाही तिथुन उठली ...पाठमोऱ्या शिरीषला साद देत ती म्हणाली ....

“ का रे ... तु बोलला नाहीस काही ... तुला नाही का आवडत मी ....”

“ तसं नाही .... पण ....”

“ ... मग काय रे ... बोल ना ....”

...... पण शिरीषला काही बोलायचं जणु भानचं नव्हतं.... त्याने तोंड वळवलं ... अन तिच्याकडे न पाहताच .... तो जाता जाता पुटपुटला .....

“ आपण ... परत बोलु यावर .....”

To be continue ....

इतर रसदार पर्याय