Entebbe 1976 books and stories free download online pdf in Marathi

Entebbe 1976

एन्टेबी १९७६

नेहा

मानवतावाद आणि दहशतवाद नेहमीच एकमेकांचे शत्रू बनून राहिले आहेत.जगाच्या इतिहासात अनेक उदाहरणांनी ते वेळोवेळी सिद्ध केलय. युद्ध लहान असो वा मोठे, प्रत्येक डावपेचात वेठीस धरले जातात, ते तेथील स्थानिक रहिवासी. धर्माच्या, जातीच्या, भाषेच्या विळख्यात अडकवून या लोकांना नेहमीच ओलीस ठेवले जाते. वर्षानुवर्षे होणारी मानसिक कुचंबणा हा तर वेगळाच विषय आहे. एखाद्या धर्माबद्दल, जातीबद्दलचा द्वेष बाळगून संबंधित वर्गाला एक नाही, दोन नाही तर सुमारे २००० वर्षे अत्यंत क्रूरपणे वागवले जाते, लाखोंच्या संख्येत कत्तल केली जाते, हे अत्यंत भीषण वास्तव ज्यांनी जगलय, तो ज्यू समाज. त्यांच्यावरील अत्याचाराच्या कहाण्या संपूर्ण जगाने अनंत वेळा ऐकल्या आहेत. त्यांच्या अत्याचाराची धग इतकी प्रखर होती किंबहुना आजही आहे. एखाद्याची पिळवणूक होत असेल तर अगदी सहज उपहासात्मक वाक्य बाहेर पड़ते की, हा तर ज्यूंसारखा अत्याचार चालू आहे. अशीच एक कहाणी सांगत आहे. ज्यूंच्या संघर्षातील अनेक लढ्यांपैकी एक- ‘एन्टेबी १९७६’

२७ जून १९७६ ची सकाळ. तेल अवीव वरुन निघालेले ‘एअर फ़्रान्स 139’ हे विमान सकाळी ६.१५ वा अथेन्स ला थांबले. तिथे ४० मिनिटांचा स्टॉप ओव्हर होता. विमानतळावर सगळीकडे बरीच शांतता होती. सुरक्षेची व्यवस्थाही तुलनेने शिथिलच होती. अशातच ६ दहशतवादी विमानात शिरले आणि एकच गोंधळ उडाला. त्यातील ४ हे अरबचे आणि २ जर्मनचे दहशतवादी होते. एक स्त्री व एक पुरुष असलेले जर्मनचे हे २ दहशतवादी बाडर माइनहॉफ या दहशतवादी संघटनेचे सदस्य होते. ते आणि अरब हे एकमेकांचे मित्र. ज्यूंचा द्वेष तसेच इस्राईल टिकू द्यायचा नाही आणि आम्ही तो भूमध्य समुद्रात बुडवू यांवरच यांचे एकमत होते.

दहशतवादी शिरल्यानंतर बरोबर सकाळी ६.१७ मिनिटाला विमानाने टेक ऑफ घेतला. आकाशामध्ये एका उंचीवर विमान स्थिरावल्यावर हे ६ जण उठले आणि प्रवाशांना काही कळायच्या आतच या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर बंदूक रोखून धरली. विमानामध्ये २४५ प्रवासी आणि एअर फ़्रान्सचे १२ व्यवस्थापक असे एकूण २५७ जण होते. या दहशतवादयांनी प्रवाशांना सांगितले, ‘आम्ही तुम्हाला काही करणार नाही, त्या बदल्यात तुम्ही आम्हाला सहाय्य करा.’ तसे सगळे प्रवासी गप्प झाले. वेळ निघून जात होती. दहशतवाद्यांपैकी एकजण कॉकपिट मध्ये गेला आणि वैमानिकावर बंदूक रोखून आम्हाला हव्या त्या दिशेला विमान फिरव असा आदेश दिला. ट्रांसपोंडरचा स्वीच त्यांनी ऑफ केला. विमान कोणत्या दिशेला चाललयं, काहीच कळत नव्हते. या सगळ्या गोंधळात सीट नं 21C वर बसलेल्या एका १८ वर्षाच्या ज्यू विद्यार्थ्याने विमान तिकिटावर या सर्व घटनांची नोंद करायला सुरुवात केली. विमान आता नेमकं कुठे आलय याच विचार करत असतानाच खाली त्याला वाळवंट दिसले. त्याने बसल्या बसल्या अंदाज बांधला की पूर्वेकडच्या दिशेला निघालेले हे विमान आता मात्र दक्षिणेकडे चाललयं, म्हणजे विमान लीबिया मध्ये उतरणार. काही तासांनंतर विमान बेंगाझीवर उतरले. बेंगाझी-ही लीबिया ची राजधानी. इथे प्रवाशांना खाण्या-पिण्यासाठी देण्यात आले. अशी बातमी होती की एका अरब नेत्यांनी दहशतवाद्यांना बँकिंग दिलं, त्यामुळे हे विमान लिबियामध्ये उतरवण्यात आले.

इथे इस्राईल मध्ये धावपळ सुरु होती. त्यावेळचा पंतप्रधान यितज़ाक राबिन याच्यापर्यंत ही बातमी पोहोचली. हे दहशतवाद्यांच कृत्य आहे आणि त्या बदल्यात त्यांच्या काही मागण्या असणार इथपर्यंत राबिनला पक्की खात्री होती. फार आक्रमक नाही अशा मताचा राबिन- त्याने लष्कर आणि सिनेट यांना बोलावून ट्रैक A आणि ट्रैक B वर एकावेळी काम चालू ठेवण्याची सूचना दिली.

विमानातील ९२ प्रवासी धर्माने ज्यू होते, इस्राईलचे नागरिक होते. त्यांच्या तर हृद्याचा ठोकाच चुक्ला. त्यांना कल्पना होती, काय घडतय आणि पुढे काय होणार आहे याची. प्रवशांमधील एका गर्भवती स्त्रिला तिच्याकडे पासपोर्ट आहे हे बघून सोडण्यात आले. परंतु टी स्त्री ज्यू होती, दहशतवाद्यांच्या ते लक्षात न आल्याने केवळ पासपोर्ट बघून त्यांनी तिल सोडले. रात्र होत होती. विमान बेंगाझीवरुन निघून काही तासांनी युगाडांची राजधानी कंपाला येथील विमानतळ एन्टेबीला थांबले. राजधानीपासून २२ किमी अंतरावर हे विमानतळ होते. युगांडाचा त्यावेळचा हुकुमशहा इदी अमीन आणि कर्नल वोरका- ज्याने एन्टेबी विमानतळ बांधणीतील अधिकारी म्हणून काम पाहिले व आता तेल अवीव मध्ये व्यापारी म्हणून काम करत होता. हे दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. इस्राईल सरकारने कर्नल वोरकाला इदी अमीनशी संपर्क करावयास सांगितला. तसा इदी अमीन पळवून आणलेल्या प्रवाशांना भेटण्यासाठी विमानतळावर आला. मी तुमचा मित्र आहे. माझं तुमच्याशी शत्रुत्व नाही. मी या दहशतवाद्यांना बैकिंग नाही फ़क़्त त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य करा, अशा शब्दात त्याने प्रवाशांना समजावलं. इदी अमीन याच्या व्यक्तिमत्वाचा विचार करता तो स्वतःला काळा हिटलर समजत असे. ज्यूंचा द्वेष करण्यामध्ये तो अरबांच्या तोडीस तोड होता.

एन्टेबीवर उतरल्या उतरल्या काही वृद्ध व स्त्रिया अशा एकूण ४७ जणांना सोडवण्यात आले. पुढील जे ब्रिटिश एअरवेचे विमान येईल त्यात बसून तुम्ही पुढे तुमच्या ठिकाणी जा, अशी सूचना देऊन त्यांची सुटका करण्यात आली. विमानातील त्या ज्यू विद्यार्थ्याचे त्याच्या डायरीमध्ये घटनांची नोंद करणे चालूच होते. ‘इस्राईलच्या सरकारला तुमची किती काळजी आहे हेच बघायची ही वेळ आहे’ इदी अमीनच्या या आव्हानाला इस्राईल कशाप्रकारे सामोरे जाते, हा परीक्षा पाहणाराच क्षण होता.

एन्टेबीच्या विमानतळावर एका तळघरवजा मोठ्या हॉलमध्ये सर्व प्रवाशांना ठेवण्यात आले. अर्थातच तेथे सैनिकांचा मोठा पहारा होता. यात आणखी भर म्हणून कंपालामधून ६ दहशतवादी सामील झाले. विमानतळावरील चारही कंट्रोल टॉवर वरुन सर्चलाईट सोडण्यात आले. त्या टावर्सवर हेव्ही मशीनगन्स बसवल्या होत्या. हा पहारा अपुरा पडावा की काय म्हणून संभाव्य छापा पडलाच तर तो रोखता यावा म्हणून राशियाने पुरवलेली मिराज विमाने आणून ठेवली होती. खूप रात्री उशिरा PFLP या संघटनेच्या डॉ.वादी हदार या नेत्याने या घटनेची जबाबदारी पत्कारली आणि इस्राईलला संपर्क करून आपल्या मागण्या सांगितल्या. ताब्यात असलेल्या ५३ दहशतवाद्यांना सोडावं, त्यातील ४० तर इस्राईलच्याच कैदेत होते. बाकी १३ दहशतवादी ज्या देशात असतील तेथून त्यांची सुटका करा, अशी मागणी करण्यात आली. पासपोर्ट पाहुन, नाव-धर्म विचारुन प्रवाशांचे वर्गीकरण करण्यात आले. अशा ९२ ज्यूईश प्रवाशांना वेगळे केले आणि उरलेल्यांना सोडण्यात आले. या सर्व ज्यूंना वर्षानुवर्षे झालेले अत्याचार, पिळवणूक यांची वाईट आठवण पदोपदी येत होती. दहशतवाद्यांचा इस्राईल आणि अमेरिकेवर दबाव होता की बाकीच्या देशाच्या कैदेतील दहशतवाद्यांना सोडावं. या ५३ मध्ये अल-फताह चे अनेक जण होते. यांनी अनेक बॉम्बस्फोट घडवून आणले, तेल अवीवच्या बारमध्ये हल्ले घडवून आणले होते.

दरम्यान विमानतळावर घडलेल्या काही घटना फारच बोलक्या होत्या. एअर फ़्रान्सचे १२ व्यवस्थापक, त्यांनी माघारी जाण्यास नकार दिला. सर्वांसोबतच राहून जे होईल ते होईल हा विचार करून तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला. आणखी एक घटना अशी की एका मध्यमवयीन महिलेस रक्ताच्या उलट्या होत होत्या तेव्हा तिला जीपमध्ये बसवून कंपालाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

प्रवाशांच्या सुटकेसाठी इस्राईलच्या मंत्रीमंडळाची बैठक झाली. ती चालू असतानाच तेल अवीव मधील ९२ प्रवाशांच्या नातेवाईकांनी पंतप्रधान राबिनच्या बंगल्यात शिरुन मागणी केली की, ‘काहीही करा, आमच्या नातेवाईकांना परत आणा.’ परंतु एन्टेबीला परिस्थिति उलट होती. तेथील प्रवाशांची मनोमन इच्छा होती की आपल्या सरकारने दहशतवाद्यांना शरण येऊ नये. वेळोवेळी इदी अमीन त्यांना येऊन बातमी देत होता की सरकारने याबाबतीत अनुकूलता दर्शवत दहशतवाद्यांना झुलवत ठेवले आहे. ५२ नाही तर ४०, ४० नाही तर ३५ किंवा पहिले टॉप टेन दहशतवाद्यांना सोडतो, अशाप्रकारे मोलभाव चालू होता. लवकरात लवकर हां तिढा सोडवणे खूप गरजेचे होते. अनेक खलबतं झाली, क्लृप्त्या करुन विचार चालू ठेवून ती लांबवत ठेवणे हे अधिक गरजेचे होते. हाच होता ट्रैक A चा मामला.

२८ जूनच्या सकाळी पंतप्रधान राबिनने लष्कर आणि एअर फ़ोर्स चा प्रमुख जनरल शामेरोन याला बोलावून सांगितले की, ‘कमांडोसचा छापा घालायचा आहे. त्यासाठी एकीकडे सराव चालू ठेवा. आदेश आले की छापा घालायचा.’ या ट्रेजडीला नाव देण्यात आले ट्रैक B. ९२ प्रवाशांचे नातेवाईक सोडले तर संपूर्ण इस्राईल, मीडिया, मंत्री यांचे हेच म्हणणे होते की सरकारने तडजोड करू नये. इकडे दहशतवादी अधिकच टेढ़ निर्माण करू लागले. ३ जुलै १९७६ च्या रात्रिपर्यंतची वेळ होती. ५३ दहशतवाद्यांना मुक्त केले नाही तर दर ५ मिनिटाला एकेका प्रवाशाला बाहेर आणून त्याला मारण्यात येईल, अशी धमकी एव्हाना मिळाली होती. परिस्थिति अत्यंत बिकट होती. ९२ ज्यूईशांचे प्राण पणाला लागले होते. इस्राईल सरकार हे सर्व कशाप्रकारे निभावून नेतयं याकडेच सर्वांचे लक्ष होते. शुक्रवार संपला. राबिनने घेतलेल्या कैबिनेट मीटिंगमध्ये ठरले की कमांडोज़ने छापा घालायचा.यानंतरची पुढील पायरी म्हणजे संसदेची मान्यता. शनिवारी दुपारी २ वा संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. ही चर्चा पुढे खूप वेळ चालू राहिली. सरकारला मुदत रात्री १२ पर्यंतचीच होती. त्यामुळे लवकरात लवकर निघून छापा घालणे महत्वाचे होते. वेळ पाळायची असेल तर विमाने निघा, असा आदेश एअर फ़्रान्सच्या प्रमुखाने दिली. संसदेच्या निर्णयाची वाट न बघता हा धाडसी निर्णय घेतला गेला. कमांडोज़ना कळविण्यात आले की जर संसदेने मान्यता नाकारली तर वाटेत रेडियो सिग्नल्स देऊ, असाल तेथून निघून या.जनरल शामेरोनने स्वतःच्या जबाबदारीवर हा निर्णय घेतला.

ठरल्याप्रमाणे पहिल्या २ विमानांसोबत शामेरोंन निघाला. ती विमाने होती बोईंग 707. योजना ठरली. विमानांनी जाताना वाटेत केनियाचे विमानतळ नैरोबी येथे इंधन भरण्यासाठी उतरायचं. तशी बोलणी इस्राईल आणि केनिया सरकार यांमध्ये झाली. युगांडा आणि केनिया यांचे एकमेकांशी शत्रुत्व होतेच. पुढे केनियाच्या सरकारला विश्वासात घेऊन सांगण्यात आले की आणखी ४ विमाने Hercules C 130 या जातीची असतील. या विमानांचा एक मोठा फायदा म्हणजे यांना सतत बेसशी संपर्क ठेवण्याकारिता रेडियो सिग्नल्स देण्याची आवश्यकता नसते. १० मजली उंच बिल्डिंग एवढं त्याच आकारमान असते. चारही विमानांचा उपयोग चपखल रित्या करण्यात आला. एका विमानात हॉस्पिटल तयार करण्यात आले, तर दुसऱ्या विमानात इदी अमीनच्याच काळ्या मर्सिडीज़ सारखी मर्सिडीज़ आणि सारख्याच दिसेल अशा एका ज्यू स्त्रीला इदी अमीनप्रमाणे पेहराव करून व तोंड रंगवून त्यात बसवले होते. दोन विमानांमध्ये इस्राईली जवान बसले होते. संसेदेतील चर्चा दुपारी ४.०० वाजता संपली आणि त्यांनी मान्यताही दिली. पहिली दोन विमाने ३.३० वा तर नंतरची दोन दु. ४.०० वा निघाली. लालसमुद्र-इथियोपिया-केनिया-नैरोबी या मार्गाने विमानांचा प्रवास ठरला. फ्लाइंग टाईम ६ तासांचा होता. युगांडाची वेळ इस्राईलच्या १ तास पुढे असल्यामुळे विमानांना पोहचायला रात्री ११ वाजणार होते आणि दहशतवाद्यांनी दिलेली वेळ होती रात्री १२. या आधी विमानतळावर सातत्याने छाप्याचा सराव करण्यात आला होता. विमानतळावर विमान उतरवणे, त्यातील प्रवाशांना घेऊन टेक ऑफ करणे या सगळ्याला ६० मिनिटे लागत होती. याला नाव देण्यात आले ‘Operation Thunderbolt.’ या ऑपरेशनचा कमांडींग ऑफिसर योनाथन नेत्यान्हऊ हा होता. त्याने शामेरोनला सांगितले की या संपूर्ण सरावाला ६० मिनिटे लागतात. शामेरोनने आदेश दिला की हे संपूर्ण काम ५५ मिनिटांमध्ये संपवा.

रात्री ११ वाजता पाहिले Hercules विमान एन्टेबी विमानतळावर पोहोचले. ठरल्याप्रमाणे ते विमानतळावर घिरट्या घालत फिरत होते. आवाज होऊ नये म्हणून बाकीच्या विमानांच्या चाकाची हवा कमी ठेवली होती. या गडबडीत एखादे चाक पंक्चर झाले तर ते रोखण्याकरीता काही राखीव विमाने ठेवली होती. एव्हाना गुप्तहेर खात्याकडून माहिती मिळाली की इदी अमीन आधीच येऊन पोहचला आहे. विमानतळापासून साधारण १ १/२ मैलावर त्याचे घर होते. योजनेप्रमाणे एक विमान धावपट्टीच्या अर्ध्यावरच उतरणार आणि मुख्य बिल्डिंग समोर जाऊन थांबणार. दुसऱ्या विमानाने त्याच धावपट्टीवर थोडं पुढे जाऊन उजव्या बाजूला असलेल्या कण्ट्रोल टॉवरला ताब्यात घ्यायचं आणि तेथील सैनिकांना मारायचं. २० जणांच्या टीमने जीपमध्ये बसून कंपालाकडून एन्टेबीला येणारा रस्ता अडवायचा, कारण तेथून युगांडीयन सैनिकांचा ताफा येण्याची शक्यता होती. अशाप्रकारे प्लान तयार झाला. इतकेच नाही तर छाप्याची वेळ कोणती आणि कशाप्रकारे निवडायची याचाही अभ्यास झाला. Hercules विमानांच्या उड्डाणासाठी त्याच्या अलीकडे किंवा पलीकडे कोणत्याही आंतरराष्ट्रीय विमानचं लैंडिंग किंवा टेक ऑफ़ असणार नाही अशी वेळ निवडण्यात आली. एन्टेबीवर शेवटचं विमान दुपारी १२ वाजताचं होतं आणि त्यानंतर ब्रिटिश एअरवेच रात्री २.०० वाजता विमान होते. तसेच आकाशातून जी विमाने निघाली होती त्यांना सूचना होती की त्यांनी कोणतेही रेडियो सिग्नल्स द्यायची नाहीत. चार Hercules विमानांनी एकमेकांशी आणि बेसशी सुद्धा संपर्क ठेवायचा नाही असे ठरले. कारण ही सिग्नल्स स्पाय सैटेलाइट्स पकडतात. स्पाय सैटेलाइट्स हे अमेरिकेचेच नव्हे तर रशियाचे सुद्धा असू शकतात, असा अंदाज वर्तवत रशियाने ही संशयास्पद हालचाल पकडली असती तर अरबांद्वारे विमानतळावर सगळेच मारले गेले असते, यासाठी ही संपूर्ण खबरदारी होती.

चारही विमाने एन्टेबीवर पोहोचली. चौथे विमान घिरट्या घालत होते. पहिले विमान प्रवासी होते तेथे थांबले. दुसरं विमान कंट्रोल टॉवरच्या इथे, तर तिसऱ्या विमानचं काम होत जुन्या धावपट्टीवर उतरायचं. त्या विमानामध्ये कमांडोज़ आणि हॉस्पिटल होते. पलीकडे उतरलेल्या कमांडोज़ने सूचनेप्रमाणे मिराज विमानं जमिनीवरच उद्ध्वस्त केली. याच्या आवाजाने युगांडाचे सैनिक खडबडून जागे झाले. एका विमानातून मर्सिडीज़ उतरली व त्यात योनाथन नेत्यान्हाऊ होता. सैनिकांनी त्याला सल्यूट केले. युगांडन सैनिकांना काही कळायच्या आतच फायरिंग चालू झाले. सर्व धोक्याचे क्षण होते. परंतु कमीतकमी वेळामध्ये आतमधील झोपलेल्या प्रवाशांना जागं करुन घेऊन यायचं आणि दहशतवाद्यांना प्रतिसादाची संधीही द्यायची नाही अशा दोन्ही गोष्टी सांभाळायच्या होत्या. ते साधण्यासाठी कमांडोज़ने ठरवलं की हिब्रू ज्यू भाषेमध्ये ‘टेस्काऊ’ असे ओरडायचे, म्हणजे ‘पडून रहा.’ पहिल्या विमानातून कमांडोज़ उतरले आणि प्रवासी झोपले होते त्या हॉल मध्ये गेले, तिथे ‘इस्राईल इस्राईल, टेस्काऊ’ असे ओरडले, तसे ते प्रवासी पडून राहिले. त्यानंतर कमांडोज़ने कमरेच्या उंचीवरुन फायरिंग करायला सुरुवात केली. त्यामध्येच ४ दहशतवादी मरून पडले. दुर्दैवाने एकच मूळचा फ्रेंच असलेला आणि आता तेलअवीव मध्ये सेटल झालेला एक विद्यार्थी, ज्याला अर्धवट झोपेमध्ये काय घडतय ते कळाले नाही आणि तो मशीनगन्सच्या झडतीत आला. एकमेव तो मारला गेला. त्याला वाचवण्यासाठी म्हणून गेलेले त्याचे वडीलही गंभीररित्या जखमी झाले. परंतु बाकीच्या ९० प्रवाशांच्या केसालाही धक्का लागला नाही.

सर्व प्रवासी विमानात बसले आणि निघाले. विमानांना सूचना होती की आहात तेथूनच टेक ऑफ करा. खरं चैलेंज तर पुढे होते. C 130 या मोठ्या विमानासाठी त्याच्या अर्धीच धावपट्टी तेथे होती व पुढे पाणथळ, दलदलीचा परिसर. या सर्वांचं सूत्रसंचालन योनाथन नेत्यान्हऊ करत होता. कंट्रोल टॉवरवर हेव्ही मशीनगन्स घेऊन बसलेल्या सैनिकाची नजर नेत्यान्हऊ वर पडली. एकूणच त्याच्या देहबोलीवरुन कळत होते की या ऑपरेशनचा CEO हाच आहे. सैनिकाने बंदूक रोखली, नेत्यान्हऊचा वेध घेतला आणि तो पडला. ते बघून इस्राईलचे सैनिक, इतर कमांडोज़ बिचकले नाहीत की घाबरले नाहीत. कारण त्यांच्या नियोजनात याचा विचार झाला होता की योनाथन पडला तर सेकंडरी कमांडोने नेतृत्व करायचं. योनाथनला उपचारासाठी हॉस्पिटल असलेल्या विमानात नेण्यात आले. कमांडोजने पूर्ण कंट्रोल टॉवर उद्ध्वस्त केले. कंपालाच्या रस्त्यावरून ३-४ जीप्स भरून युगांडाचे सैनिक येत होते, त्यांना कशाचाही अंदाज नसताना त्यांच्यावर फायरिंग झालं आणि सर्व सैनिक जागचे मेले.

आता विमानाच्या शास्त्राच्या दृष्टीने अतिशय अवघड गोष्टीला सामोरे जाण्याची वेळ होती, ती म्हणजे निम्म्या धावपट्टीवरुन टेक ऑफ घेणे. विमाने सज्ज झाली. निम्म्या धावपट्टीवरुन निघाली. विमानात हवा कमी होती. फुल थ्रोटल म्हणजे पूर्ण ताकद देत, हलत हलत जसं विमान त्या पाणथळाशी आले तसे वैमानिक ब्रेकवर उभे राहिला आणि फुल थ्रोटल एक्शन मध्ये ब्रेक सोडला. जसा तोफेतून गोळा बाहेर पडतो, तशी विमाने आकाशामध्ये झेपावली. ही सगळी घटना ५३ मिनिटांमध्ये घडली. सगळी विमाने सुरक्षित पोहोचली. सर्व ज्यू प्रवासी व एअरफ्रान्सचे व्यवस्थापक सुखरूप पोहोचले. तेलअवीव मधला व्यापारी कर्नल वोरका याला निरोप होता की इदी अमीनला कळव की तुझ्या सहकार्याबद्दल धन्यवाद. अजून इदी अमीनलाही पत्ता नव्हता की काय घडलयं. त्याने झोपेतून खडबडून जागे होत वोरकाला विचारलं की कशाबद्दल धन्यवाद? वोरकाने उत्तर दिले,”कळेलच तुला लवकर, पण तू जे काही सहकार्य केलेस त्याबद्दल तुझे आभारी आहोत.”

एक सावध राष्ट्र, शतकानुशतकांच्या अत्याचारातून शिकलेले, ज्यांनी २००० वर्षापूर्वी प्रार्थना केली होती ‘Next year we will meet in Jeruselam’ आणि ती टिकवून ठेवली. नीती, धर्म सांभाळून ठेवले आणि राष्ट्रीय सुरक्षितता जपली, असे ते इस्राईल राष्ट्र. इस्राईल सरकारने दाखवलेली हुशारी, आपल्या नागरिकांवरचे प्रेम आणि नागरिकांचाही सरकारवर असलेला विश्वास या सर्व गोष्टींमुळेच ७ दिवसांमध्ये एन्टेबी वरील प्रवाशांची सुटका झाली.

इतर रसदार पर्याय