Divakaranchya Natyachata - 3 books and stories free download online pdf in Marathi

दिवाकरांच्या नाट्यछटा - 3

साहित्यिक:दिवाकर

21 - वर्डसवर्थचें फुलपांखरुं (नाट्यछटा)

22 - चिंगी महिन्याची झाली नाहीं तोच (नाट्यछटा)

23 - बोलावणं आल्याशिवाय नाहीं ! (नाट्यछटा)

24 - शेवटची किंकाळी ! (नाट्यछटा)

25 - एका दृष्टीनें साहाय्यच केलें आहे ! (नाट्यछटा)

26 - पाण्यांतील बुडबुडे (नाट्यछटा)

27 - रिकामी आगपेटी (नाट्यछटा)

28 - ओझ्याखाली बैल मेला ! (नाट्यछटा)

29 - कोण मेलें म्हणजे रडूं येत नाही. (नाट्यछटा)

30 - एका नटाची आत्महत्या (नाट्यछटा)

***

२१. वर्डसवर्थचें फुलपांखरुं (नाट्यछटा)

ओ ! स्प्लेंडिड ! ब्यूटिफुल ! - छे ! वर्डसवर्थची कविता म्हणजे काय ! - मौज आहे ! फारच सुंदर, फारच उत्कृष्ट ! या महाकवीचें अंतःकरण किती प्रेमळ - अगदी मेणासारखें आहे नाहीं ? आनंदामध्यें इकडून तिकडे धिरट्या घालणार्‍या सूक्ष्म अशा किड्याला अगर मुंगीला, किंचित् कोणी अडथळा केला, तर या कवीच्या हदयाला लागलीच चटका बसून, अश्रूंनी डबडबलेले नेत्र त्याच्या कवितेंत ठिकठिकाणी कसे स्पष्ट दिसतात ! - हीच पहा की ' फूलपाखरुं ' ही कविता - किती बहारीची आहे ! ही एकच काय, वर्डसवर्थच्या सर्वच कविता गोड, मधुर, रसानें भरलेल्या आहेत ! - म्हणे माझी बहिण एमिलाईन आमच्या बागेंत बागडणार्‍या फूलपाखराला - त्याच्या पंखावर बसलेली धूळ प्रेमानें हळूच पुसावयालासुद्धां बोट लावीत नसे ! कां ? तर आपल्या नखाचा स्पर्श होऊन त्या बिचार्‍याचा नाजूक पंख कदाचित् दुखावेल - आणि त्याच्या आनंदाचा विरस होईल ! अहाहा ! वर्डसवर्थ कवीची सृष्टि, म्हणजे जिकडे तिकडे आनंद आहे ! धन्य तो कवि, आणी धन्य तो इंग्लंड देश ! खरोखर, अशा कवीच्या अघ्ययनानें खडक देखील मेण होऊन जाईल ! मग माणूस तर - अरे ! हें काय ? या पुस्तकांत हा ढेंकूण कोठून आला ? - हा थांब चोरा ! पळून जातोस काय ? अस्सा ! बरा सांपडलास ! आतां जा कसा पळून जातोस तो ! तरी म्हटलें सकाळी येवढें चावत काय होतें ! द्यावें याला खिडकीवाटें टाकून नाहीं ? - नको नाहीं तर, तसें नको !

कारण, हा पुनः घरांत येऊन चावेल !

चिरडून टाकूं ? इश ! हाताला उगीच घाण येईल अशानें ! मग ? - हां हां ! या दिव्यांतल्या चिमणीवाटें द्यावा आंत फेंकून ! म्हणजे चांगला भाजून मरेल ! पहा, पहा ! कसा चिकटून बसला आहे तो ! पडतो आहे का खालीं ? - स्स् ! हाय ! बोट जेवायची तयारी झाली ! - चला तर लवकर, - आपल्याला काय, जेवण झाल्यावर आणखी वर्डसवर्थ वाचूं !....

***

२२. चिंगी महिन्याची झाली नाहीं तोच (नाट्यछटा)

काळी आहें का म्हणावें मी ? कशी गोरी गोरीपान आहें ! - हो हो ! आतां आमच्या चिंगीला सरी करायची, बिंदल्या करायच्या, झालंच तर बाळे, साखळ्या, सगळे सगळे दागिने करायचे ते ! - कसा छानदार मग परकर नेसायचा, पोलकें घालायचें, अन् ठुमकत शाळेंत जायचें, नाहीं बाई ?

- शहाणी होईल बबी माझी !

मोठीं मोठीं बुकं वाचील ! अन् मग महाराज छोनीचं आमच्या लगीन ! - खरचं सोने, तुला नवरा काळा हवा, कीं गोरा ? - का..... ळा ! - नकोग बाई ! छबीला माझ्या कसा नक्षत्रासारखा, अगदी चित्रासारखा नवरा मिळेल हो ! - अस्से थाटाचें लगीन करीन, कीं ज्याचें नांव तें ! आहात कुठें ! हजार रुपये हुंडा देईन, हजार ! ताशे, वाजंत्री, चौघडा - हो हो तर ! बेंडबाजासुद्धां लावायचा ! वरात पण वरात निघेल म्हणावें ! नळे, चंद्रज्योती, झाडें यांचा काय लकलकाट होईल ! - पण खरेंच गडे चिंगे, तूं मग भांडायसवरायची नाहींस ना ? जर का घरांत भांडलीच, तर पहा मग ! माणसाला कसं मुठींत ठेवायला हवें बरं का ! संसार पण संसार झाला पाहिजे ! आणि हें बघ, आपलें आधींच सांगून ठेवतें, पहिलें तुझें बाळंतपण कीं नाहीं, इथें व्हायला हवें ! पुढची करा हवीं तर खुशाल आपल्या घरी ! - मोठी दैवाची होईल चिंगी माझी ! पुष्कळ मुलं होतील माझ्या बबीला !! - पण काय ग, तुला मुलं झालेली आवडतील, का मुली ? मुली ! - नको ग बाई, कारट्यांचा मेला तो जंजाळ ! एकापेक्षां एक, असे सगळे मुलगे होतील म्हणावें, मुलगे ! - तसेंच, गाडी - घोडे, कपडालत्ता, कश्शा कश्शाला म्हणून कांही कभी पडायचं नाहीं ! - बरं बरं ! इतक्यांत नको कांहीं चढून जायला ! मोठा दिमाख दाखवते आहे मला ! - पहा, पहा ! फुगते आहे पहा कशी ! - पण कार्टे, बोलूं तर नकोस माझ्याशीं कीं अस्सा हा गालगुच्चा .... अग बाई ! .... हें ग काय ! कसें सोन्यासारखें बोलतें आहें, अन् तुं आपली .... नाय .... नाय .... उगी, उगी माझी बाय ती ....

***

२३. बोलावणं आल्याशिवाय नाहीं ! (नाट्यछटा)

सांगूं तरि आतां किती जणांना ? येतो तो हेंच विचारतो ! - असतील ! चार नाही छप्पन्न नोटिसा निघाल्या असतील ! करायचय काय मला त्यांच्याशीं ! जायचं असेल, त्यांनी जावं खुशाल ! मी थोडाच जातोंय तसा ! - अरे राह्यलं ! नाहीं, तर नाहीं ! इथं थोडंच माझं कांहीं अडलं आहे ! हपापलेली चार खतरुड पोरं गोळा करा, आणि हव्वं तें करा म्हणावं ! - नाही सगळ्या गॅदरिंगच्या नाटकाचा बट्याबोळ झाला, तर नांव कशाला ! - अबे जारे ! मोठा शाळेचा मला अभिमान सांगतो आहे ! आम्हांला तेवढा अभिमान असावा ! आणि शाळेला ? तिनं हवं तसं आम्हांला लाथाडावं होय ? - अलवत ! नाहींच भागायचं नुसल्या नोटिशीनं ! कांही थोडीथोडकी वर्ष नाहीं कामं केलेली मीं ! अन् तींही पुनः अशीं तशीं ? - चौथींत आल्याबरोबर धडाक्याला कॅन्यूटचं काम ! सारख्या टाळ्या ! तीच तर्‍हा दुसर्‍या वर्षी ! पुढें पांचवीत येतांच .... अश्वत्थाम्याचें काम ! जो कांहीं त्यांत माझा आवाज लागला, तसा अद्याप एकाचाहीं कोणाचा लागला असेल तर शपथ ! - दोन रे का ? पांचवीत तर ओळीनें तीन वर्ष कामं केली मीं ! अन् सहावीतली दोन ठाउकच आहेत तुम्हांला ! - नाहीं, संभाजीचं काम तें दुसर्‍या वर्षी ! वा ! त्या वर्षी तर किती जणांनीं आंत येऊन सांगितलं कीं, धंदेवाल्यापेक्षाही तुझं काम छान झालं ! ' - अरे त्या वर्षी तर स्पेशल पदक मिळालं मला ! - तेंच पुनः सातवींत आल्यावर ! पहिलंच अगदी सीझरचं काम - दुसर्‍याला चांगलं दिलेलं .... पण त्याचं काढून मुद्दाम मला दिलं ! नाटक पाह्यला कोणी युरोपियन आला होता, त्यानं काम पाहून .... विशेषतः ऍक्सेंटस ऐकून .... तोंडांत बोट घातलं म्हणतात ! - पुढं दुसर्‍या वर्षी ? - हां बरोबर ! धुंडिराजाचं काम ! - तेव्हां तर काय .... हंसता हंसतां पुरेवाट झाली लोकांची ! अन् सगळ्यांत बाबा कळस झाला गेल्या वर्षी ! - शॉयकॉलचं काम ! - पाहून लोक इतके चिडले कीं, एकनं तर चकचकीत घोंडा मारला स्टेजवर ! - तेव्हां बोला आतां ! इतका जिथं माझा अनुभव .... आणि दर्जा वाढलेला, तिथं असल्या फासक्याफुसक्या नोटिशीनं जायचं ! - साफ नाहीं यायचा तसा मी ! मास्तरचा जर येवढा ऐटा आहे .... सांगितलं ना ! मास्तरांवाच जर इतका तोरा आहे, तर साफ यायचा नाहीं मी बोलावणं आल्याशिवाय....

***

२४. शेवटची किंकाळी ! (नाट्यछटा)

कसें कोंवळे ऊन पडलें आहे पण ! अश वेळेला नाचण्याबागडण्यानें जिवाला किती आनंद वाटतो ! - हो, हा माझा देह सडलेला असला म्हणून काय झालें ? जीव कोठें सडला आहे, आणी या कुत्र्याच्या आयुष्याला कंटाळला आहे ? - अरे ! आज असें छातींत धसके बसल्यासारखें काय होत आहे ! मघाशी त्या माणसानें हंसत हंसत माझ्यापुढें काय बरें खायला टाकले होतें ? - असेल काही तरी ! गोड होतें ना ? झालें तर ! - रात्रभर या देहाला ओरबडून - कुरतडून - खाणार्‍या यातना जर आतां अमळ थकून भागून निजल्या आहेत, तर आतां मजेनें इकडे तिकडे फिरायला काय हरकत आहे ? - चला ! जरा त्या बाजूला धांवत धांवत जाऊं ! - क्या ! क्या !! - अरे, सोड मला, इतक्या जोरानें - कडकडून - चाबूं नकोस ! सोड मला !! - हंसत आहे कोण ? मला कासावित होऊन ओरडतांना ऐकून, कोणाचें बरें राक्षसी हदय खिदळलें हें ! - अरे ! हा तर रस्त्यांतून खरडत - खरडत - गांवांत भीक मागात फिरणारा तो महारोगी ! काय रे ए ! पांगळ्या - सडक्या - महारोग्या ! माझें ओरडणें ऐकून तूं का रे असा खदखदां हंसलास ? काय ? - काय म्हटलेंस ? मला गोळी - विष - घातलें आहे ? आणि मी आतां मरणार ? अस्सें ! - पण मी - आ ! माझ्या मस्तकावर व छातीवर उभें राहून कोण बरें मला एकसारखें दडपतो आहे ? - पण मी कोठें आधीं मरायला तयार होतों ? माझी इच्छा नसतांना मला कां मारलें रे ? - तुम्ही माणसांनीं माझा कां जीव घेतला रे ! काय ? - थांब ! पुनः - पुनः बोल ! माझा त्रास होतो म्हणून मला मारले ? आपल्या वेदनांनीं विव्हळ होऊन मी रात्रभर रडत होतों - तुम्हांला त्रास देत होतों - म्हणून मला विष घातलें ? मी पिसाळेन ? तुम्हांला चावेन ? म्हणून माझा जीव घेतला ? होय ! - आणखी काय म्हटलेंस ? माझ्या जिवाला होत असलेल्या यातना तुम्हांला पाहवत नाहींत म्हणून मला विष चारलें ? बरें तर ! आपल्या जगण्यानें जर इतरांना त्रास होतो तर कशाला उगीच जगा ? - पण हो ! कायरे महारोग्या ! माझ्याप्रमाणें तूंही सडलेला नाहींस का ? माझ्याप्रमाणें तूंही नाहीं का आपल्या रडण्यानें - गागण्यानें - जगाला त्रास देत ? आपल्या मटकण्यानें तूं नाही का गांवांत महारोग पसरीत ? तुझ्या यातनांची नाहीं जगाला कीव येत ? आणि माझ्या यातनांची तेवढी येते काय ? - आ ! आ !! मला भाजलें ! मला जाळलें ! हा ! - दुष्टा ! चल, नीघ येथून ! - अरेरे ! या जगांत देहानें तडफडून सडणारी - मनानें पिसाळलेलीं - एकमेकांचें हंसत हंसत गळे कापणारी - भयंकर माणसें - किती ! - कितीतरी सांपडतील ! - कां नाहीं ? त्यांना कां नाहीं गोळी घालून - विष घालून - जाळून पोळून मारीत ? - नाहीं ! तसें नाहीं ! अरे कुत्र्या ! तीं माणसें ! - ईश्वराचीं लाडकी शहाणी माणसें आहेत ! जग त्यांचें आहे ! तुम्हां कुत्र्यांचें नाहीं ! समजलास ! नाहीं सोसवत मला या यातना ! देवा ! मला लवकर तरी मरुं देरे ! अरेरे ! नासलेलीं कुत्री जशी मारतात - तशीं नासलेलीं माणसे गोळ्या घालून कां नाही ठार करीत ! - दाबला ! माझा गळा कोणी दाबला ! - अरे कुतरड्या ! माणसाशीं बरोबरी करुं नकोस ! बरोबरी करुं नकोस ! - अरे ! मनुष्यदेहांत प्रत्यक्ष परमेश्वरानें अवतार घेतलेले आहेत ! तुम्हां कुत्र्यांमध्यें कधी - कधीं तरी त्यानें अवतार घेतला आहे का ? मग ! आदळ ! आपट आपलें टाळकें एकदांचें या दगडावर ! - जिवाला त्रासून जर आपण होऊन कोणी माणूस मेलें, तर परमेश्वर त्याला अनंत काल नरकांत लोटतो - नरकांत ! इतकी मनुष्यानें आपल्या जिवाची - आपल्या वर्तनानें ! - ईश्वराजवळ किंमत वाढवून ठेवलेली आहे ! ठाऊक आहे ! - अहा ! कसा तडफडत आहेस आतां ! - नासलेलींच काय ! - पण चांगलीं - चांगली कुत्रीसुद्धां मारुन टाकूं ! हो ! - नासलेली माणसेंसुद्धा नाही मारायची आम्हांला ! मग ! - ओरड ! लागेल तितका ओरड ! - मनुष्याची शारीरिक असो ! - किंवा मानसिक असो ! ती घाण - तो गाळ - आम्हांला काढायचा नाहीं ! तर ती जतन करण्याकरितां आम्ही अनेक संस्था काढूं ! लागतील तितके आश्रम काढूं ! पण ती जपून ठेवूं ! जपून ! हें जग कुत्र्यांसारख्या भिकार प्राण्यांकरिता नाहीं ! निवळ माणसांकरितां आहे ! - माणसांकरितां ! - जा ! चालता हो ! - असें काय ? आम्हां कुत्र्यांकरिता हें जग नाहीं काय ? ठीक आहे ! ठीक आहे ! प्रत्येक गोष्टीला अंत आहे ! तर याद राखून असा - याद राखून ! कीं आम्ही कुत्रींही कधीं तरी जगाचे मालक होऊं ! क्या ! क्या !! आणि मग तुमचीं हदयें फाडून - नरड्यांचा कडकडून चावा घेऊन रक्त पिऊं - रक्त ! कधींधी सोडणार नाहीं ! - क्या !! .....

***

२५. एका दृष्टीनें साहाय्यच केलें आहे ! (नाट्यछटा)

कान फुटले आहेत का रे तुमचे ? मघांपासून सारख्या मी इकडे हाका मारतों आहे, कुठें होतास रे तूं ? घरांत काय झोपा घेतां सगळें ? जा, आतांच्या आतां गाडी जोडून तयार ठेवायला सांग ! पेन्शन् आणायला जायचें आहे, लवकर मला गेलें पाहिजे ! - हें काय ? आपण कां उठलांत ? अहो, दोघे आपण बरोबरच गाडींत जाऊं. तुम्हांला घरी सोडतों आणि मग मी - आहो कंशाचा राग अन् काय ! चालायचेंच ! भाऊसाहेब, आमचें आपलें हें असें आहे. बोलूनचालून कच्च्या दिलाची माणसें आम्ही ! कितीसा टिकाव लागणार ! झालें, केली बडबड ! पुनर्विवाह करावा, पुनर्विवाह करावा ! अशी हवी तितकी वटवट केली ! मोठ्या दिमाखानें मारे लांबलचक व्याख्यानेंसुद्धा झोडलीं ! पण शेवटीं ? स्वतः वर पाळी आली, तेव्हां घातलें शेपूट ! आणि केलें काय ? तर बारातेरा वर्षाच्या पोरीशीं लग्न ! - नाहीं, तसें नाहीं ! मी आपला स्पष्ट बोलणारा माणूस आहे ! अहो, काय वाटेलतें करा, आमच्यासारखीं ही असायचींच ! आणि खरें आहे ! बोलल्याप्रमाणें सगळेच वागायला लागले, तर उद्यां जगाचा कारभारच आटपेल ! नाहीं का ? ह्यः ह्यः ! - गाडी तयार आहे ? - चला ! - अरे थांब, हा टाइम्सचा अंक, आणि तो स्पेन्सरचा व्हॉल्यूम, हे गाडींत नेऊन ठेव - बाकी भाऊसाहेब, तुम्ही कांही म्हणा, खरें आणि स्पष्ट बोलावयाचें, म्हणजे मीं स्वतः पुनर्विवाह केला नाही म्हणून काय झालें ? काय तेवढें बिघडलें ? अहो, आमच्यापैकी लवकरच कोणी तरी - काय, आलें का लक्ष्यांत ? म्हणजे तुमच्याकरितां सामुग्री तयार करुन ठेवलीच आहे ! अहो तसें नाही असें ! एका दृष्टीनें मी तुमच्या कार्याला साहाय्यच केलें आहे ! हीः हीः हीः - चला ! ....

***

२६. पाण्यांतील बुडबुडे (नाट्यछटा)

अग यमे ! इकडे, इकडे ये ! बघ कशी इथं गंमत दिसते आहे ! - ये, या हौदाच्या कांठावर बसूं अन् थोडा वेळ मौज तर पाहूं ! - अबब ! किती तरी बुडबुडे हे ! तोटीचें पाणी हौदांत पडतेंच आहे, नवे बुडबुडे निघत आहेत, जुने फुटत आहेत, सारखा चालला आहे गोंधळ ! - कायग ! इथं आपण बसल्यापासून किती बुडबुडे निघाले असतील, अन् किती फुटले असतील ? शंभर, पांचशें का हजार ? - किती सांग कीं ? - काय, नाहीं सांगतां येत ? हेट् ! फजिती झाली तुझी ! - हः हः हः केवढा बुडबुडा आतां कांठाजवळ येऊन फुटला ग ! चांगला लिंबायेवढा होता कीं ! - पण येवढा मोठा व्हायला किती तरी लहान, निदान तीसचाळीस तरी, एकमेकांत मिसळावें लागले असतील नाहीं ? - गंमतच आहे ! पहिल्यानें कसा अगदी बारीक असतो ! आणि हळूहळू पुढें जायला लागला कीं, येईल त्याला ममतेनें आपल्यांत मिसळूं देतो ! शेवटी तोच बुडबुडा - बरें का यमे ? - रुपयायेवढा, नाहीं तर उगवणार्‍या सूर्याइतका किंवा चंद्रायेवढासुद्धां मोठा होतो ! - हो, सगळेच मोठे होत आहेत ! आतां तूंच बध कीं, निघाल्यापासून कांठाला येऊन फुटेपर्यत जस्सेच्या तसे - मोठे नाहींत अन् लहान नाहींत - अगदी तिळायेवढाले बारीक किती तरी निघत आहेत अन् फुटत आहेत ! अग, आतांपर्यत लाखों निघाले असतील ! पण त्यांत मोठे होऊन कांठावर शांतपणें डोकें ठेवून फुटलेले किती होते ? एक, नाहीं तर दोन ! संपलें ! - बाकीचे काय ? लडबड लडबड करतात, घाईनें मोठे होतात, अन् फटाफट फुटतात ! - आणि कांहीं तर भारीच वाईट ! एखादा बिचारा कुठें चांगला मोठा व्हायला लागला कीं, त्यांत हे हळूच शिरतात, आणि त्यालाही फोडून टाकतात, अन् आपणही फुटतात ! - पहा, पहा, यमे, आतां नीट पहा अं ! कसा बुडबुडा एकसारखा मिसळत आहे तो ! - अरे वा ! चांगला रुपयायेवढा झाला कीं ! चालला, बघ, कांठाकडे चालला ! मिसळले ! आणखी तीनचार येऊन मिळाले ! ओहो ! कसा खिशांतल्या घड्याळायेवढा झाला आहे ग ? - आला कांठाकडे - अहा ! पाहिलेंस यमे ! - कसा सूर्यानें त्याच्या डोक्यावर हिर्‍यांचा मुकुट घातला आहे तो ? - आला, टेकला कांठाला येऊन !...

***

२७. रिकामी आगपेटी (नाट्यछटा)

हायरे दैवा ! सत्तर मुलें ! - पण सगळीं मला टाकून गेलीं ना ! बाळांनो ! अरे माझ्या छबकड्यांनो ! या ! जेथें असाल तेथून धांवत येऊन मला - आपल्या आईला - एकदां तरी कडकडून भेटारे ! - काय ! काय म्हणतां ? माझी सगळी लेंकरें मरुन पडलीं आहेत ! - हाय ! अहो आणा ! मी आपल्या पायां पडतें ! पण कसेंही करुन त्यांची व माझी एकदां तरी भेट करवा ! त्यांच्या मुखाचें मला शेवटचें चुंबन घेऊं द्या ! - मरायच्यापूर्वी त्यांचे दोन गोड शब्द तरी माझ्या कानी पडूं द्या ! - हाय ! त्यांची व माझी आतां मुळीच भेट व्हायची नाहीं ? ते स्वर्गाला जायला निघाले आहेत ? कोठें आहेत ? अरे बाळांनो ! थांबा ! आपल्या आईशीं जातां जातां दोन शब्द तरी बोला ! - अगबाई ! एकाएकी कसला बरें गोंगाट सुरु झाला ? काय ? माझीं मुलें आली ? कोठें आहेत तीं ? मला नाहीं का - हो दिसायची तीं ? नुसतें त्यांचें बोलणेंच मला ऐकूं येईल ? थांबा ! बाळांनो ! अरे, असा गलका करुं नका ! एक एक जण बोला ! - काय म्हटलेंत ? जगामध्यें गेलां होतां ? अस्सें कां ? जगामध्यें काय पाहिलें ? कसें आहे जग ? बाळांनो ! अशी गर्दी करुं नका ! - सांगा ! नीट सांगा !

' १ - जग कसें आहे म्हणतेस ? अग बाई ! जग म्हणजे भयंकर काळोख आहे काळोख ! आणि काय सोसाट्याचा वारा तो ! अरे राम ! नको रे बुवा पुन्हा आपल्याला तें जग !

२ - नाहीं ग आई ! हा कांही तरीच सांगत आहे झालें ! मी सांगूं का तुला जग कसें आहे तें ? जग म्हणजे निव्वळ चंद्रप्रकाश आहे चंद्रप्रकाश ! काय ती रमणीय बाग ! अहाहा ! पुष्पांच्या मधुर सुवासानें माझा जीव कसा अगदी आनंदानें गुंग होऊन गेला होता !

३ - खरेंच ! जगांतल्या विड्यांच्या धुरानें व शौचकुपांतील नरकाच्या घाणीनें माझा जीवसुद्धां अगदीं गुंग होऊन गेल होता ! ओकून ओकून माझी कोण पुरे वाट झाली ! आणि हा म्हणतो जग मधुर सुवासानें भरलेलें आहे !

४ - कांही नाहीं ! सगळें खोटें आहे ! जिकडे तिकडे पाणीच पाणी ! आणि मध्यें एक दीपगृह ! याशिवाय जगांत दुसरें तिसरें कांहीसुद्धां नाहीं !

५ - अरे काय सांगत आहांत तरी काय तुम्ही ! आई, यांचें तूं कांहीसुद्धं ऐकूं नकोस ! अबब ! काय ती लक्षावधि माणसांची धांवपळ ! सारख्या आगगाड्या येत होत्यां आणि जात होत्या ! त्यांच्या त्या कर्कश ओरडण्यानें व माणसांच्या गोंगाटानें ती प्रचंड इमारत कशी अगदीं गुदमरुन गेली होती ! छे ! छे ! माझें डोकें तर अगदी फिरुन गेलें होते !

६ - ठेवलीं आहेत लक्षावधि माणसें ! जगामध्यें काय तो एकच मनुष्य आहे ! आई, जगांत जिकडे तिकडे डोंगरच डोंगर आहेत ! अहाहा ! काय तें सुंदर व लहानसें देऊळ ! प्रत्यक्ष शांततादेवीच तेथें वास करीत आहे !

७ - कांहीं नाही ! जग म्हणजे निवळ सडकी घाण आहे घाण ! अनंत रोगांनीं कुजविलेल्या देहांतील घाण उपसणें किंवा प्रेतें फाडणें येवढेंच काय ते जगामध्यें आहे !

८ - नाही - नाहीं ! जग म्हणजे दारु आहे दारु ! बिभत्स गाणीं, हसणें - खिदळणें - नाचणें -

९ - अरे वा ! हा तर नाचायला लागला की ! अरे वेड्या ! जगांत तुरुंगाशिवाय दुसरें तिसरें कांहींसुद्धा नाही ! अरे बापरे ! काय तो आरडाओरडा ! आणि काय ते रक्ताच्या चिळकांड्या उडविणारे - व उघड्या देहावर तडातड उडणारे भयंकर फटकारे ते ! नको रे बुवा ! आठवण झाली कीं कसे शहारे येतात अंगावर !

१० - आई ! जग म्हणजे नाटक आहे नाटक ! पोटाची खळगी भरण्याकरितां हंसणें खोटें - रडणें खोटें - आणि प्रेम करणेंही पण खोटें ! समजलीस !

११ - छे ! छे ! भलतेंच कांहीं तरी ! सुस्वर वाद्यें - मधुर गायन आणि शुद्ध पतिपत्नीप्रेम - यांनीच सर्व जग व्यापले आहे ! हार्मोनियम वाजविणार्‍या पतीच्या मानेभोंवती प्रेमानें आपला उजवा हात टाकून व डाव्या हातानें मुलाला कडेवर घेऊन, मधुर कंठांतून सकल विश्वावर गायनामृत सिंचन करणार्‍या त्या प्रेमळ पत्नीला पाहून मला किती आनंद झाला म्हणून सांगूं तुला ! आई ! -

१२ - संपलें कीं नाहीं चर्‍हाट अजून तुझें ? खून ! विश्वासघात ! यांनी सगळें जग भरलें आहे ठाऊक आहे ! अरे, मॅकबेथ नाटकाच्या दुसर्‍या अंकांतील दुसरा प्रवेश वाचून पहा, म्हणजे समजेल मी काय म्हणतो तें ।

१३ - कांही नको वाचायला ! अरे भाऊ, श्रीरामचंद्राशिवाय या जगांत दुसरें कांहीं तरी आहे का ? अहाहा ! काय तें भव्य देवालय ! हजारों स्त्रीपुरुषांच्या हदयांतून बाहेर पडलेला केवढा तो रामनामाचा प्रचंड गजर !

१४ - निवळ कत्तलखाना ! निर्दय खाटकांनी - रक्तांनी भरलेल्या मोठमोठ्या सुर्‍यांनीं - व दुष्ट मांसाहारी लोकांनी सर्व जग व्यापले आहे ठाऊक आहे ! नको ! माणसाच्या तीव्र क्षुधेवर कापायला आणलेल्या निरुप्रदवी पशूच्या आत्म्यांनी काढलेला भयंकर रुदनस्वर ऐकणें नको !

..... हायरे दैवा ! सत्तर मुलें ! - पण सगळीं मला टाकून गेलीं ना ! बाळांनो ! अरे माझ्या छबकड्यांनो ! या ! जेथें असाल तेथून धांवत येऊन मला - आपल्या आईला - एकदां तरी कडकडून भेटारे ! - काय ! काय म्हणतां ? माझी सगळी लेंकरें मरुन पडलीं आहेत ! - हाय ! अहो आणा ! मी आपल्या पायां पडतें ! पण कसेंही करुन त्यांची व माझी एकदां तरी भेट करवा ! त्यांच्या मुखाचें मला शेवटचें चुंबन घेऊं द्या ! - मरायच्यापूर्वी त्यांचे दोन गोड शब्द तरी माझ्या कानी पडूं द्या ! - हाय ! त्यांची व माझी आतां मुळीच भेट व्हायची नाहीं ? ते स्वर्गाला जायला निघाले आहेत ? कोठें आहेत ? अरे बाळांनो ! थांबा ! आपल्या आईशीं जातां जातां दोन शब्द तरी बोला ! - अगबाई ! एकाएकी कसला बरें गोंगाट सुरु झाला ? काय ? माझीं मुलें आली ? कोठें आहेत तीं ? मला नाहीं का - हो दिसायची तीं ? नुसतें त्यांचें बोलणेंच मला ऐकूं येईल ? थांबा ! बाळांनो ! अरे, असा गलका करुं नका ! एक एक जण बोला ! - काय म्हटलेंत ? जगामध्यें गेलां होतां ? अस्सें कां ? जगामध्यें काय पाहिलें ? कसें आहे जग ? बाळांनो ! अशी गर्दी करुं नका ! - सांगा ! नीट सांगा !

' १ - जग कसें आहे म्हणतेस ? अग बाई ! जग म्हणजे भयंकर काळोख आहे काळोख ! आणि काय सोसाट्याचा वारा तो ! अरे राम ! नको रे बुवा पुन्हा आपल्याला तें जग !

२ - नाहीं ग आई ! हा कांही तरीच सांगत आहे झालें ! मी सांगूं का तुला जग कसें आहे तें ? जग म्हणजे निव्वळ चंद्रप्रकाश आहे चंद्रप्रकाश ! काय ती रमणीय बाग ! अहाहा ! पुष्पांच्या मधुर सुवासानें माझा जीव कसा अगदी आनंदानें गुंग होऊन गेला होता !

३ - खरेंच ! जगांतल्या विड्यांच्या धुरानें व शौचकुपांतील नरकाच्या घाणीनें माझा जीवसुद्धां अगदीं गुंग होऊन गेल होता ! ओकून ओकून माझी कोण पुरे वाट झाली ! आणि हा म्हणतो जग मधुर सुवासानें भरलेलें आहे !

४ - कांही नाहीं ! सगळें खोटें आहे ! जिकडे तिकडे पाणीच पाणी ! आणि मध्यें एक दीपगृह ! याशिवाय जगांत दुसरें तिसरें कांहीसुद्धां नाहीं !

५ - अरे काय सांगत आहांत तरी काय तुम्ही ! आई, यांचें तूं कांहीसुद्धं ऐकूं नकोस ! अबब ! काय ती लक्षावधि माणसांची धांवपळ ! सारख्या आगगाड्या येत होत्यां आणि जात होत्या ! त्यांच्या त्या कर्कश ओरडण्यानें व माणसांच्या गोंगाटानें ती प्रचंड इमारत कशी अगदीं गुदमरुन गेली होती ! छे ! छे ! माझें डोकें तर अगदी फिरुन गेलें होते !

६ - ठेवलीं आहेत लक्षावधि माणसें ! जगामध्यें काय तो एकच मनुष्य आहे ! आई, जगांत जिकडे तिकडे डोंगरच डोंगर आहेत ! अहाहा ! काय तें सुंदर व लहानसें देऊळ ! प्रत्यक्ष शांततादेवीच तेथें वास करीत आहे !

७ - कांहीं नाही ! जग म्हणजे निवळ सडकी घाण आहे घाण ! अनंत रोगांनीं कुजविलेल्या देहांतील घाण उपसणें किंवा प्रेतें फाडणें येवढेंच काय ते जगामध्यें आहे !

८ - नाही - नाहीं ! जग म्हणजे दारु आहे दारु ! बिभत्स गाणीं, हसणें - खिदळणें - नाचणें -

९ - अरे वा ! हा तर नाचायला लागला की ! अरे वेड्या ! जगांत तुरुंगाशिवाय दुसरें तिसरें कांहींसुद्धा नाही ! अरे बापरे ! काय तो आरडाओरडा ! आणि काय ते रक्ताच्या चिळकांड्या उडविणारे - व उघड्या देहावर तडातड उडणारे भयंकर फटकारे ते ! नको रे बुवा ! आठवण झाली कीं कसे शहारे येतात अंगावर !

१० - आई ! जग म्हणजे नाटक आहे नाटक ! पोटाची खळगी भरण्याकरितां हंसणें खोटें - रडणें खोटें - आणि प्रेम करणेंही पण खोटें ! समजलीस !

११ - छे ! छे ! भलतेंच कांहीं तरी ! सुस्वर वाद्यें - मधुर गायन आणि शुद्ध पतिपत्नीप्रेम - यांनीच सर्व जग व्यापले आहे ! हार्मोनियम वाजविणार्‍या पतीच्या मानेभोंवती प्रेमानें आपला उजवा हात टाकून व डाव्या हातानें मुलाला कडेवर घेऊन, मधुर कंठांतून सकल विश्वावर गायनामृत सिंचन करणार्‍या त्या प्रेमळ पत्नीला पाहून मला किती आनंद झाला म्हणून सांगूं तुला ! आई ! -

१२ - संपलें कीं नाहीं चर्‍हाट अजून तुझें ? खून ! विश्वासघात ! यांनी सगळें जग भरलें आहे ठाऊक आहे ! अरे, मॅकबेथ नाटकाच्या दुसर्‍या अंकांतील दुसरा प्रवेश वाचून पहा, म्हणजे समजेल मी काय म्हणतो तें ।

१३ - कांही नको वाचायला ! अरे भाऊ, श्रीरामचंद्राशिवाय या जगांत दुसरें कांहीं तरी आहे का ? अहाहा ! काय तें भव्य देवालय ! हजारों स्त्रीपुरुषांच्या हदयांतून बाहेर पडलेला केवढा तो रामनामाचा प्रचंड गजर !

१४ - निवळ कत्तलखाना ! निर्दय खाटकांनी - रक्तांनी भरलेल्या मोठमोठ्या सुर्‍यांनीं - व दुष्ट मांसाहारी लोकांनी सर्व जग व्यापले आहे ठाऊक आहे ! नको ! माणसाच्या तीव्र क्षुधेवर कापायला आणलेल्या निरुप्रदवी पशूच्या आत्म्यांनी काढलेला भयंकर रुदनस्वर ऐकणें नको !

१५ - हा ! हा ! हा ! अरे वेडयांनो ! जग म्हणजे एक सर्कस आहे सर्कस ! पशूंनीच काय, पण माणसांनींसुद्धां, त्या लहानशा वर्तुळामध्यें जगाच्या नियमाप्रमाणें वावरलें पाहिजे ! जरा कोठें चुकायचा अवकाश, कीं बसलेच चाबकाचे फटकारे अंगावर ! तेथें स्वच्छंदीपणाला यत्किंचितसुद्धां वाव नाहीं ! हो !

१६ - कांहीं तरी सांगत आहेस झालें ! सद्गुणी आत्म्यांचा छळ आणि आत्महत्या, यांनींच सगळें जग भरलें आहे ! ' नाहीं रे देवा आतां मला हा छळ सोसवत ! ' असें रडत रडत म्हणून त्या गरीब बिचार्‍या बालविधवेनें कशी धाडकन् विहिरीमध्यें उडी टाकली पण ! जग म्हणजे छळ, निराशा -

१७ - आग ! आग ! अरे बाबा, सगळें जग आगीमध्यें होरपळून - भाजून - मरत आहे ! मनाला - जिवाला - शेवटी देहालासुद्धां आग लागते आग ! शिव ! शिव ! केवढा तो भयंकर अग्नीचा डोंब ! - चार - पांचशे माणसें कशी ओरडून - ओरडून - तडफडून - अखेरीं मेलीं पण !

१८ - नाहींग आई ! ईश्वरभक्तीशिवाय जगांत दुसरें कांहीसुद्धां नाही ! महात्मा ख्राइस्टच्या तसबिरीजवळ गुडघे टेकून - हात जोडून - आणि नेत्र मिटून बसलेली व शांत अशा ईश्वरी प्रेमामध्यें बुडून गेलेली ती चौदा - पंधरा वर्षाची बालिका मीं पाहिली मात्र ! - अहाहा ! त्या वेळेस मला केवढी धन्यता आणि किती आनंद झाला म्हणून सांगूं तुला ! आई -

१९ - अहो धांवा ! डेस्डिमोनेचा खून झाला ! कॉडेंलिया फांसावर चढली ! पांखरें मेलीं - वणवा पेटला ! धांवा ! धांवा !! हाय ! जगांत अन्याय ! अन्याय ।

२० - हा ! हा ! हा ! अरे वेडयांनो ! जग मुळीं नाहींच आहे ! हं ! कसला अन्याय ! आणि कसची ईश्वरभक्ति !

इतर मुलें - नाहीं ! तूं खोटे बोलतोस ! जग आहे ! आम्ही सांगतों जग कसें आहें तें ! ऐका ! ऐका ! गलका करुं नका ! ऐका ! '

आगपेटी - बाळांनो ! अरे थांबा ! असा गोंगाट करुं नका ! हं ! सांगा ! नीट पुनः एक एक जण सांगा ! कसें आहे म्हटलेंस जग ? - सगळाच गोंधळ ! एकाचेंही सांगणें दुसर्‍याच्या सांगण्याशीं मुळींच जुळत नाहीं ! खरें तरी कोणाचें मानूं ! - आणि खोटें तरी कोणाचें समजूं ! काय म्हटलेंस ? तूं सांगतोस खरें जग कसें आहे तें ? बरें तर, सांग पाहूं - आई ! मेलें ! मेलें ! कोणी चांडाळानें मला पायाखाली चिरडली ! मी मेलें !!.....

***

२८. ओझ्याखाली बैल मेला ! (नाट्यछटा)

ओ ! आग लागो त्या महत्त्वाकांक्षेला ! आणि त्यांत तळमळणार्‍या, तडफडणार्‍या या जीविताला ! - अरे हा गळफांस काढा - खुंटी नरड्यांत शिरली ! जूं दूर करा - मी मेलों ! - या बैलानें, चांडाळानें छळून किं हो शेवटी मला असें मारलें ! - नको ! ही यातनांची तीव्र ओढाताण ! देवा ! सोडीव आतां लवकर ! आयुष्याचा डोलारा कोसळला ! सोसाट्याच्या झंझावातांत जग गिरक्या घेऊं लागलें ? - विक्राळ अंधकारानें झडप घातली ! जीवा ! जिभेचा अडसर बाजूला काढ, - पहातोस काय ! - कानावर लाथ मारुन, नाही तर डोळे फोडून बाहेर नीघ लवकर ! हा ! नरकांतल्या धडधड पेटलेल्या आगींत अनंत काल उभें राहणें पुरवलें, - पण अंगांत शक्ति नसूनही, मोहक, कामुक अशा महत्त्वाकांक्षेच्या पुरें नादी लागून, कर्रर - कर्रर ओरडून रक्त ओकणार्‍या हाडांच्या सांपळ्यावर प्रचंड ओझीं लादून, तोंडाबाहेर दुःखांनी चघळून चघळून, जिवाचा फेंस काढीत, फरकटत ओढीत नेणारें, देवा ! हें जगांतलें बैलाचे जिणें नको ! अरे मूर्खा, अजागळा, रोडक्या बैला ! ' माझ्या इतर सशक्त सोबत्यांप्रमाणे मी आपल्या मानेवर मोठमोठी ओझीं घेऊन डौलाने, गर्वानें छाती फुगवून - जगांत कां मिरवूं नये ? ' असें पुनः एकदां वर मान करुन मला विचार पाहूं ? आ वासून रस्त्यांत धूळ चाटीत, मरणाशीं ओढाताण करीत कारे बाबा असा लोळत आहेस ? - हाय ! असा हंबरडा फोडून रडूं नकोस ! माझी चूक झाली - राग मानूं नकोस ! ये, मला एकदां कडकडून शेवटची मिठी मारुं दे । मग मी आनंदानें जाईन बरें ?....

***

२९. कोण मेलें म्हणजे रडूं येत नाही. (नाट्यछटा)

कोण हो कोण ? - काय ! अवचितराव करकर्‍यांची सून ? आणि ती एकाएकी कशानें हो मेली ? - वाख्यानें का ? बरें झालें हो ! सुटली एकदांची आपल्या दुःखांतून ! बिचारीचा नवरा वारल्याला दोन वर्षे व्हायला आलीं असतील नाहीं ? - बाई ! बाई !! केवढा आकांत माजला होत्या त्या वेळेला या घरांत ! घरांतल्या बायकांच्या ओरडण्यानें सगळी आळी किं हो गर्जून गेली होती ! आणि आतां ? या सोळा - सतरा वर्षाच्या मुलीकरतां - आनंदीच नाहीं का हिचें नांव ? - बिचारीकरतां या घरांतलें एक चिटपांखरुं तरी आता ओरडत आहे का ? - बरोबरच आहे ! नवरा मेलेली पोर ! हिच्या मरणाबद्दल हो कोणाला वाईट वाटणार आहे ! उलट जें तें हेंच म्हणणार कीं, ' विधवा मेली ना ? बरें झालें चला ! सुटली एकदांची ! ' इतकेंच काय, पण कितीएक तर असेंसुद्धां म्हणायला कमी करीत नाहींत कीं, ' बरें झालें ! आमच्या घरांतला अपशकुन - बरेच दिवस खिळलेली अवदशा लवकरच नाहींशी झाली ' म्हणून ! नवरा मेलेल्या बायका गेल्या, तर त्यांच्याबद्दल हें अशा तर्‍हेचें दुःख जगाला होत असतें ! - सवाष्ण मेली तर ? अहो कशाचें आलें आहे ! तिची लहान मुलेंबाळें जी काय रडतील, गागतील तेवढींच ! बाकी जग तर हेंच म्हणतें, ' सवाष्ण मेली ? भाग्यवान् आहे ! बरोबर कायमचें - अखंड ! - सौभाग्य घेऊन स्वर्गाला गेली !! ' - हं: , पाहिलें तर तें ' अखंड सौभाग्य ! ' नदींत तिच्या प्रेताची पुरती राख विरघळेपर्यतसुद्धा टिकत नाहीं ! लागलीच दुसरी कोणी तरी पाठीमागून धांवत येऊन, झिंज्या धरुन, पाठींत लाथ मारुन, तें ' अखंड सौभाग्य ! ' बिचारीच्या हातांतून हिसकावून घेऊन, पुनः जगांत परत येतेही ! - खरेंच तर काय ! बायकाचें जगणे आणि मरणें, सारखेंच ! - जगल्यास जगा ! मेल्यास मरा ! अहो नाहीं तर, या आनंदीच्या नवर्‍यासाठी, तिच्या सासूसार्‍यांनी कसा पाण्यासारखा पैसा खर्च केला होता ना ? आणि आतां ? नाहीं, तुम्हींच समक्ष पाहिलें आहे म्हणून विचारतें ? अहो ! आनंदीचा नवरा जगावा म्हणून जशी यांनी खटपट केली, तशीच ही एकदांची मरावी म्हणून यंनी निष्काळजीपणाची खटपट केली असेल बरें ! - ती पहा ! ती पहा ! तिला बाहेर आणली आहे ! आई ! आई !! कशी कोंवळी पोर ! कायरे देवा हिला जगांत आणून हिची हौस पुरवलीस ? - तिला पाणी घेतलेली तिची प्रत्यक्ष आईच ना हो ती ? - जावयाकरितां कशी ऊर बडवून किं हो रडत होती ? आणी आतां ? - अहो हिच्या पोटचा गोळा ना तो ? - पण नाहीं, ही मेली म्हणून तिला - प्रत्यक्ष आईलासुद्धां - मनांतून बरें वाटत असेल ! ....

***

३०. एका नटाची आत्महत्या (नाट्यछटा)

ओढ ! जगा, असेल नसेल तितकी शक्ति खर्च करुन ओढ ! - हं चालूं दे ! दांतओंठ खाऊन अगदी जोरानें - अस्सें ! चालूं दे ! - आलों, आलों ! थांबा, भिऊं नका ! - अरे वेडया जगा, कां उगीच धडपडत आहेस ? हं ! नको आपल्या जिवाला त्रास करुन घेऊंस ! माझें ऐक. सोड मला. एकदां दोनदा तूं मला परत फिरविलेंस - काय सांगितलेंस ? काय माझें समाधान केलेंस रे तूं ? निव्वळ आरडाओरडा ! ' वाहवा, वाहवा ! भले शाबास ! खूप बहार केलीस ! ' - बेशरम ! हंसतोस काय ? - अरेरे ! तुझ्या नादीं लागून आजपर्यत या तोंडाला रंग फासला काय - नाचलों काय - रडलों - हंसलों ! - हाय ! जिवाची चेष्टा - या जिवाची विटंबना केली ! नको ! नको !! मला ओढूं नकोस !!! - काय वार्‍याचा सोसाटा हा ! जिकडे तिकडे धूळ आणि पाचोळाच - पाचोळा उडाला आहे ! - अबब ! केवढा प्रचंड सर्प हा ! घाल, खुशाल माझ्या अंगाला विळखा घाल ! अरे जारे ! कितीही जोरानें तूं मागें ओढलेंस, तरी मी थोडाच आतां मागें फिरणार आहे ! खुपस, मस्तकांतून अगदीं पायापर्यत तूं आपला - अस्सा हा ! चालूं दे ! - दंत खुपस ! नाहीं ! मी परत फिरणार नाही जा ! - ओरडा ! मोठमोठ्यानें आरोळ्या मारा ! टाळ्या वाजवा ! नाटकी - ढोंगीपणानें सगळें जग भरलें आहे ! अरे जगायचें तर चांगलें जगा ! नाही तर - चला दूर व्हा ! अरे नका ! माझ्या तोंडाला चुना - काजळ - फांसूं नका ! कोण ? कोण तुम्ही ? मला फाडायचें आहे ? तें कां ? मी कशानें मेलों तें पाह्यचें आहे ? सलफ्यूरिक ऍसिड ! - अहाहा ! काय गार - गार - वारा सुटला आहे हा ! जिकडे तिकडे बर्फच - बर्फ ! अनंतकाल झोंप - चिरकाल झोंप ! - हः हः ! वेडया जगा ! माझीं आंतडी आपल्या कमरेभोंवती गुंडाळून मला मागें खेचण्यासाठीं कां इतका धडपडत आहेस ? अरेरे ! बिचारा रडकुंडीस आला आहे ! काय काय ? माझें आतां गूढ उकलणार ? अहाहा ! - उलथलें ! जग उलथून पडलें ! ओहो ! ....

***

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED