Amol goshti - 13 books and stories free download online pdf in Marathi

अमोल गोष्टी - 13

अमोल गोष्टी

पांडुरंग सदाशिव साने

१३. बुद्ध आणि बेटा

सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीची गोष्ट. भगवान बुध्द त्या काळी अवतरले होते, व सर्व लोकांस सदुपदेश करून सन्मार्ग दाखवीत होते.एकवीस वर्षे वयाचा एक तरुण ब्रह्मचारी होता. त्याच्या तोंडावर अग्नीसारखे तेज होते. तो विद्वान व बुध्दिमंत होता. लोकांनी आपल्या हुषारीची तारीफ करावी म्हणून त्यास अधिकाधिक शिकण्याची इच्छा असे. त्याने देशोदेशी नवीन ज्ञान मिळविण्यासाठी प्रवास केले. तक्षशिला, राजगृह, कौसंबी, उज्जयिनी वगैरे तत्कालीन सर्व विद्यापीठांतून तो निरनिराळया शास्त्रांत पारंगत होऊन आला. जे जे नवीन पाही, ते ते स्वतःस यावे असे त्याला वाटे, ते शिकण्याचा तो प्रयत्न करी व त्यास ते प्राप्त होई.एक दिवस बाण तयार करणारा बाणकार त्याने पाहिला. लगेच तो बाण करण्यास शिकला; दुस-या एकाजवळ ठाण मांडून बाण मारण्यास शिकला; एका देशात गलबते बांधावयास शिकला; अन्यत्र घरे बांधावयास शिकला; तो भिल्लविद्या शिकला; तंतुवाद्यकला शिकला; चर्मवाद्य-विशारद झाला; गायनातही निष्णात झाला. दोळा देशांत प्रवास करून अनेक कला हस्तगत करून स्वारी परत स्वदेशी आली. ''माझ्याइतका हुशार, अनेककलाभिज्ञ जगात कोण आहे ?'' असे गर्वाने तो ज्याला त्याला विचारी.भगवान बुध्दांनी त्या ब्रह्मचा-यास पाहिले व ब्रह्मचारी जे काही शिकला होता, त्याहून अधिक मौल्यवान असे काही त्यास शिकवावे. असे त्यांच्या मनात आले. वृध्द यतीसारखा वेष घेऊन हातात भिक्षापात्र व कमंडलू घेऊन बुध्ददेव त्या तरुण मनुष्याचे समोर येऊन उभे राहिले. ब्रह्मचारी विचरता झाला, ''तू कोण आहेस ?''वृध्द म्हणाले, ''आपल्या शरीरावर व मनावर स्वामित्व चालविण्यास शिकलेला मी आहे.''ब्रह्मचारी म्हणाला, ''तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय?''बुध्दानी उत्तर दिले, ''बाणकर बाण तयार करतो; धनुर्धारी बाण मारतो; नाखवा गलबत बांधतो; सुतार लाकूड तासतो; गाणारा गातो; वाजवणारा वाजवतो; विद्वान वादविवाद करतो; परंतु खरा ज्ञानी पुरुष स्वतःवर सत्ता चालवितो.''ब्रह्मचारी म्हणाला, ''ज्ञानी कशा रीतीने स्वतःवर सत्ता चालवितो?''बुध्द म्हणाले, ''लोकांनी स्तुतिसुमने वाहिली किंवा निंदेच्या निखा-याची आग पाखडली तरी त्या ज्ञानी पुरुषाचे मन अचल राहते, समाधानातच असते. सद्वर्तन, सच्छील, भूतदया व विश्वप्रेम याच गोष्टींवर त्याचे मन अनुरक्त असते आणि त्यामुळे त्याचे मन शांत असते.''तो ब्रह्मचारी हतगर्व झाला. ज्ञानाचे खरे स्वरूप समजून बुध्ददेवांच्या पाया पडला व नम्र झाला. बुध्ददेव म्हणाले, ''आता तू खरा शिकावयास आरंभ केलास. नम्रता हा ज्ञानाचा आरंभ आहे, समजलास बेटा ?''

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED