आपली उपेक्षित राष्ट्रिय सौर दिनदर्शिका Leena Mehendale द्वारा नियतकालिक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आपली उपेक्षित राष्ट्रिय सौर दिनदर्शिका

आपली उपेक्षित राष्ट्रिय सौर दिनदर्शिका

आपल्या शालेय अभ्यासक्रमात कायमपणे अनुल्लेखित राहिलेल्या बऱ्याच गोष्टींपैकी
एक महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रिय सौर दिनदर्शिका. याची माहिती सर्वासामान्यांपर्यंत
पोचावी म्हणून हा लेख-प्रपंच.

रोज पहाटे सूर्योदय होतो व सायंकाळी सूर्यास्त होतो. या सूर्याच्या गतिमुळे सर्व
प्राण्यांच्या शरीरात बदल होत असतात. मुख्य म्हणजे झोप येणे ही क्रिया सूर्याशी निगडित
असते. त्यामुळे अनादिकाळापासून मानवाच्या कालगणनेत सूर्य हा महत्वाचा बिंदू होता हे
उघड आहे.

पृथ्वी अवकाशात स्वतः भोवती फिरते त्यामुळे दिवस-रात्र होतात. फिरणाऱ्या
पृथ्वीगोलाचा जो भाग सूर्याकडे असतो तिथे दिवस आणि जो भाग सूर्यापासून लपला जातो
तिथे रात्र असते. याखेरीज पृथ्वी सूर्याभोवती देखील एका दीर्घवर्तुळाकार मार्गावर फेरी मारते. याला
सूर्य व पृथ्वीमधील गुरूत्वाकर्षण कारणीभूत असते. या मार्गावर एक दीर्घवर्तुळ पूर्ण
करायला पृथ्वीला सुमारे ३६५ दिवस लागतात.

हे इतके दिवसांचे मोजण्याचे काम माणसाने कसे केले ? याचे सोपे उत्तर आहे -
रात्रीच्या आकाशाचे निरीक्षण करून केले. आपणही असे निरीक्षण केले तर लक्षात येते की रोज
सायंकाळी पूर्वेकडून उगवणाऱ्या चांदण्या वेगवेगळ्या असतात. मात्र त्यापैकी बहुतेक
सर्वांची एकमेकांच्या तुलनेतील अंतरे व स्थिती बदलत नाहीत. खरे तर सूर्य, चंद्र व इतर ६
चांदण्या, म्हणजे शुक्र, गुरू, शनि, मंगळ, बुध,व ध्रुव एवढ्या गोष्टी सोडल्या तर इतर
चांदण्यांची आपापसातील स्थिती सारखीच रहाते. शुक्र, गुरू, शनि, मंगळ, बुध यांना ग्रह असे नाव दिले गेले
आणि त्यांच्या भ्रमणाबद्दल माहिती गोळा करून प्रत्येकाचे वेगळे गणित पण मांडले. गणित
व खगोलशास्त्रांत पारंगत भारतियांनी हजारो वर्षांपूर्वीच या विषयीचा अभ्यास केला.

इतर चांदण्यांपैकी कांही विशिष्ट चांदण्या मिळून एखादा विशिष्ट आकार तयार होतो. त्या आधारे आकाशाचे २७
भाग पाडून प्रत्येक भाग ओळखता येईल अशी खूण असलेल्या चांदण्यांना एकेका नक्षत्राचे
नाव दिले. यावरून लक्षांत आले की सूर्य, चंद्र व शुक्र, गुरू, शनि, मंगळ, बुध या चांदण्या
वेगवेगळ्या नक्षत्रातून फिरत जातात.

पृथ्वी फिरते या शब्दांएवजी घटकाभर सूर्य फिरतो असे शब्द वापरले तर सूर्य
एखाद्या नक्षत्रापासून सुरूवात करून सर्व नक्षत्रांची फेरी पूर्ण करून पुनः पहिल्या जागेवर
येण्यासाठी सुमारे ३६५ दिवस घेतो. त्याला १ वर्ष किवा संवत्सर असे नाव पडले.
सूर्य कोणत्या नक्षत्रात आहे हे ओळखण्याकरिता त्याच्या बरोबर उलट बाजूला
असलेल्या नक्षत्राचा अधार घेतला जातो.

चंद्र देखील एका नक्षत्रापासून सुरूवात करून फिरतो आणि सर्व २७ नक्षत्रांची फेरी एका
दिवसात सुमारे १ नक्षत्र याप्रमाणे पूर्ण करतो. मात्र पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या गतिमुळे
एक फेरी संपवून पुनः पहिल्या जागी येण्यासाठी चंद्र सुमारे साडे एकोणतीस दिवस घेतो.
याप्रमाणे चांद्रमासाचे दिवस वाढतात. शिवाय चंद्रकोरीचा आकारही या
दिवसांमधे सदा बदलत रहातो. त्यामुळे चंद्रावरून तिथी मोजणे कधीही सोपे. या
मोजमापासाठी प्रतिपदा ते पंचदशी ( म्हणजे पौर्णिमा किंवा अमावस्या), कृष्ण व शुक्ल पक्ष
आणि सुमारे साडेएकोणतीस दिवसांचा एक चांद्रमास हे गणित मांडले गेले.

आता ध्रुवताऱ्याची गोष्टच वेगळी. हा आकाशात उत्तर दिशेला एकाच जागी स्थिर आहे.
आणि स्वतःभोवती गरगर फिरणाऱ्या पृथ्वीचा आस (किंवा अक्ष) याच्या दिशेत आहे
म्हणूनच इतर नक्षत्रे आकाशात फिरती दिसली तरी हा स्थिरच दिसतो.
इतकेच नव्हे तर पृथ्वी सूर्याभोवती ज्या लम्बवर्तुळाकार मार्गावर फिरते त्या मार्गाला
पृथ्वीचा अक्ष लम्बकोण करत नसून तो ध्रुवाकडे वळलेला असल्याने लम्बवर्तुळाकार
मार्गाशी २३ अंशाचा कोण करतो. त्यामुळे सूर्याची किरणे पृथ्वीवर येतात
तेंव्हा सगळीकडे लम्बरूपात न पडता कमी जास्त प्रमाणात पडतात. त्यामुळे एका वर्षाचे
सर्व दिवस-रात्र सारखे रहात नाहीत व त्यांच्या ऋतुमानातही फरक पडतो. वर्षांतील दोनच
दिवस असे असतात जेंव्हा संपूर्ण जगभर बारा तासांचा दिवस व बारा तासांची रात्र असते. इतर
दिवशी दिनमान व रात्रीमान सारखे नसते. या दोन दिवसांना वसंत संपात व शरद संपात
अशी नावे पडली. भारतातच या गणना झाल्या. वसंत संपातानंतर वसंत, ग्रीष्म, वर्षा असे
ऋतु येतात तर शरद संपातानंतर शरद, हेमंत, शिशिर असे ऋतु येतात. या प्रमाणे भारतात
सहा ऋतूंचा निसर्ग असतो.

ऋतुकाळाप्रमाणे वातावरणात शीतोष्ण असेही फरक होतात, धान्याची बीजे अंकुरित
होतात, फुले येतात, फळे येतात, धान्य पिकते, वगैरे. या सर्वांचे निरिक्षण करून सहा ऋतूंच्या
बारा महिन्यांना नावे दिली ती अशी -- वसंत ऋतूत मधु आणि माधव म्हणजे फुलांमधे
मधसंचय होऊन पुढे फळधारणेला सुरूवात होते. ग्रीष्म ऋतूतील दोन महिने हे शुक्र आणि
शुचि नावाने आहेत. त्यावेळी सूर्याची ऊष्णता वाढून जमीन खूप तापते. ती उष्मा धारण
करते ज्यायोगे पुढे बीज अंकुरण्यासाठी आवश्यक ती उर्जा मिळावी. नंतर येणाऱ्या मानसूनपूर्व
पावसामुळे धरती शुद्ध होण्यास सुरूवात होते. म्हणून ग्रीष्मातील महिने शुक्र व शुचि.

वर्षा ऋतुतील दोन महिने नभ आणि नभस्य. इथे नभस्य शब्दाचा अर्थ नभ मासातून उद्भवलेला
किंवा नभ मासातील फळापेक्षा पुढचे फळ देणारा असा आहे. शरद ऋतुतील मासांची नावे इष
व ऊर्ज अशी आहेत. इषचा अर्थ रस. तर शरद महिन्यात पिकांमधे रस भरण्यास आरंभ होतो.
हेमंतातील महिने सह आणि सहस्य तर शिशिरातील महिने हे तप आणि तपस्य हे होत. सह आणि
सहस्य मासात थंडीचा प्रभाव सर्वाधिक असतो. परन्तु तप व तपस्य महिन्यांमधे पुन्हा एकदा
पृथ्वीवरील उष्णता वाढायला सुरूवात होते व दिनमानही मोठे होते.याप्रकारे मधु-माधव, शुक्र-शुचि,
नभ-नभस्य, इष-ऊर्ज, सह-सहस्य, व तप-तपस्य अशी सूर्यावरून किंवा ऋतुचक्रावरून नावं पडली.
अर्थात् हे सर्व निरीक्षण वैदिक कालीन ऋषींनी केले असल्यामुळे ही नावे भारतीय
ऋतुमानाप्रमाणे आहेत हे उघड आहे.

आकाशातील नक्षत्रांना अनुक्रमे अश्विनी, भरणी, कृत्तिका –--- रेवती अशी नावे पडली व
त्या सर्वांचा स्वामी चंद्र मानला जातो. चंद्राचे तेज हे सूर्याच्याच तेजातून निर्माण होते अशा
अर्थाचा एक यजुर्वेदीय मंत्र आहे. मात्र चंद्रप्रकाशाचे वेगळे महत्व आहे. कारण ज्या प्रमाणे
वाढीसाठी सूर्याची ऊर्जा हवी त्याच प्रमाणे रस-उत्पत्तिसाठी चंद्रप्रकाश हवा असे कित्येक
ग्रंथांनी नोंदवून ठेवले आहे.


आता आपण चांद्रमासांची नावे देण्याची पद्धत पाहू या. ही नावे सौरमास म्हणजेच ऋतुमासांपेक्षा वेगळी आहेत हे महत्वाचे.


दर पौर्णिमेला चंद्र हा सूर्याच्या अगदी समोर असताना तो ज्या नक्षत्रात असेल त्या नक्षत्रावरून त्या महिन्याचे नाव पडते. २७ नक्षत्रांपैकी फक्त १२ नक्षत्रेच अशी आहेत जिथे चंद्र असताना पौर्णिमा येते. नक्षत्रांचा आकाशातील आकार लहान मोठा असल्याने तसे होते. या प्रमाणे येणाऱ्या चांद्रमासांची नावे चैत्र, वैशाख,ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्घशीर्ष, पौष, माघ व फाल्गुन अशी आहेत. याचाच अर्थ असा की भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुनर्वसु,आश्लेषा, पूर्वा, ह्स्त, स्वाति, अनुराधा, मूळ, उत्तराषाढा, धनिष्ठा, शततारका, उत्तर भाद्रपदा व रेवती या नक्षत्रांमधे पौर्णिमेचा चंद्र कधीच येत नाही.


आता सप्ताहाचे सात दिवस व त्यांची नावे कशी ठरली ते पाहू. पृथ्वीवरून फिरते दिसणारे ५ ग्रह, तसेच सूर्य, व चंद्र यांना त्यांच्या गति प्रमाणे मांडले तर ते असे येतात -- शनि हा सर्वात हळू, मग गुरु, मंगळ, सूर्य, शुक्र, बुध, आणि चंद्र हा सर्वात जलद. आता दिवसाचे (अहोरात्र) एकूण २४ होरा असे २४ भाग केले (अहोरात्र या शब्दातील मधली दोन अक्षरे घेऊन होरा हा शब्द बनला). सूर्योदयापासून पहिला तास सूर्याचा होरा मोजला त्या दिवसाला रविवार असे नाव दिले. पुढील एकेका तासाच्या होऱ्याची नावे शुक्र, बुध, चंद्र, शनि, गुरु, मंगळ, सूर्य …..... अशी चक्राकार पध्दतीने मोजली की दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला चंद्राचा होरा येतो - म्हणून तो सोमवार. त्याच्या पुढे दर दिवशीच्या सूर्योदयाला अनुक्रमे मंगळाचा होरा, बुधाचा, गुरुचा, शुक्राचा व शनिचा होरा येतो. अशा प्रकारे सप्ताहाच्या सात दिवसांची नावे ठरली. ती इतकी चपखल बसली की सर्व जगभर आजही तीच वापरली जातात. त्याचे गणित हे असे आहे.

अशा प्रकारे भारतियांनी सूर्याच्या गतिचे महत्व व त्यानुसार बदलणारे ऋतू ओळखून सौरपंचांग
तयार केले, शिवाय नक्षत्रमार्गावरील चंद्रची गति व त्याच्या कला सहज डोळ्यांना दिसण्यासारख्या
असतात त्यावरून चांद्रपंचांग तयार झाले. सामान्य माणसाला चंद्रावरून कालगणना सोपी होती.
अमावस्येला चंद्र व सूर्य आकाशात एकाच अंशावर उगवतात. त्याच्या पुढल्या दिवशी चंद्र १२
अंश किंवा ४८ मिनिटे मागे पडतो, व तिथून पुढे हे अंतर वाढतच जाते, त्याचबरोबर चंद्राचा आकारही
वाढतो त्यामुळे सामान्य माणसालाही तिथी ओळखणे अतिशय सहजपणे जमू शकते.
चांद्रपंचांगाची लोकप्रियता याच कारणासाठी असते. पुढे जेंव्हा भारतात फलज्योतिष हे
शास्त्र उदयाला आले तेंव्हा चांद्रपंचांगाचे महत्व अधिकच वाढले.

सारांश हा की भारतात अगदी वैदिक काळापासून चांद्रमास व सौरमासाची गणना, सप्ताहातील वार, महिने, त्यांची नावे, संवत्सराची नावे, ऋतूचक्र - त्याप्रमाणे शेतातील कामे असे सर्व पद्धतशीरपणे तयार होत गेले. ही पध्दत थेट अठराव्या शतकापर्यंत चालू राहिली. पुढे ब्रिटिश राजवटीनंतर देशात इंग्रजी कॅलेंडर लागू झाले. स्वातंत्र्यानंतर कॅलेंडरबाबत बराच खल होऊन एक भारतीय सौर पंचांग निश्चित करण्यात आले. त्याबद्दल पुन्हा कधीतरी.