मुळशी पॅटर्न ? - एका तालुक्याची नाही तर आख्ख्या देशाची गोष्ट?? - म कुणाल चव्हाण द्वारा मूव्ही पुनरावलोकने मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मुळशी पॅटर्न ? - एका तालुक्याची नाही तर आख्ख्या देशाची गोष्ट?? - म

?मुळशी पॅटर्न?                           ⭐⭐⭐ ⭐
   
एका तालुक्याची नाही तर आख्ख्या देशाची गोष्ट????

नुकताच प्रविण विठ्ठल तरडे दिग्दर्शित मुळशी पॅटर्न चित्रपट पाहिला. जागतिकीकरण व सेज यामुळे इंडस्ट्रीज, कंपन्या उभारण्यासाठी शेतकर्यांच्या जमीनी  बळकावणे व पुढे त्यातून निर्माण झालेली गुन्हेगारी यावर भाष्य करणारा  हा वास्तववादी चित्रपट आहे. चित्रपट अडीच तासाचा असला तरी प्रेक्षकांना तो अखेरपर्यंत खिळवून ठेवतो. एका सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट असल्याने चित्रपटाबाबत सर्वांनाच खूप उत्सुकता होती.मराठी चित्रपटासाठी यंदाचे वर्ष सुवर्ण वर्ष ठरले असून डॉ. काशिनाथ घाणेकर,नाळ ,मुंबई पुणे मुंबई ३ यांसारखे दर्जेदार चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच गाजत आहेत.दरम्यान सुरूवातीच्या ११ दिवसातच ११ करोडहून अधिक कमाई करून मुळशी पॅटर्न बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. 
 
 गावचे पाटील व एकेकाळचे महाराष्ट्र केसरी असलेले सखा पाटील(मोहन जोशी) यांना थोडीफार आर्थिक रक्कम देऊन, धमकी देऊन त्यांच्याकडून जमीन हिसकावली गेली. एकेकाळचे पाटील पण संसार चालवण्यासाठी त्यांच्यावर वॉचमन व्हायची नामुष्की आली.   यामुळे राहुल (ओम भुतकर) व त्यांच्यात अधूनमधून वारंवार खटके उडायला लागले. कालांतराने त्यांना आपले राहते घरही सोडावे लागले. मग संपूर्ण कुटुंबासह ते पुण्याला आले व राहुल व ते हमालाचे काम करू लागले.  तेथे हमालांची होणारी  पिळवणूक पाहून राहुल्याचा मनात रागाची भावना निर्माण होत होती. तेथूनच त्याच्या भावनांचा उद्रेक होतो. व पुढे त्याचा गुन्हेगारी विश्वाशी संबंध येतो.  गुन्हेगारी जगतातील एका मोठ्या टोळीला तो सामील होतो. अनेक जणांना धमकावून जमीनी बळावतो.पुढे त्याच टोळीच्या प्रमुखाचा खून करून तो गुन्हेगारी क्षेत्रात अधिराज्य गाजवू लागतो. व इथूनच चित्रपटाचा  खरा नाट्यमय थरार सुरू होतो. 

चित्रपटाचा नायक राहुल्या म्हणजेच ओम भुतकर याने  भूमिकेत  आपला प्राण ओतून अतिशय जबरदस्त अभिनय केला आहे. देऊळ, फास्टर फेने यामध्ये सह कलाकाराची भूमिका पार पाडणार्या ओमसाठी 'मुळशी पॅटर्न' हा मैलाचा दगड ठरू शकतो. आपल्या भूमिकेला याने पुरेपूर न्याय दिला असून, लालबुंद डोळे,भेदक नजर, धारदार संवादशैली व उत्कृष्ट अभिनयाच्या आधारे चित्रपटाच्या अखेरर्यंत तो  प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो.चित्रपटातील काही प्रसंग भावनिक करतात. दरम्यान चित्रपटाला थोडीशी प्रेमाची किनारही असून काही प्रसंग खूपच भावतात. उपेंद्र लिमये, सविता मालपेकर, मोहन जोशी, महेश मांजरेकर, आदि कलाकारांनी आपल्या भूमिकेला पूरेपूर न्याय दिला आहे. दरम्यान प्रविण तरडे यांचा चित्रपटात  छोटा रोल असला तरी त्यांनी जबरदस्त भूमिका बजावली असून, चित्रपटगृहातून बाहेर पडताना प्रेक्षकांना अरारारा खतरनाक म्हणायला भाग पडते. 

पुण्यामध्ये साधारण १९९० च्या दशकात आयटी पार्क बांधण्यासाठी मुळशी तालुक्यातील शेतकर्यांच्या जमीनी उद्योगपतींनी, राजकारणी लोकांनी आर्थिक रक्कम देऊन हस्तगत केल्या. जे सांगूनही जमिनी देत नाहीत अशांना मारहाण करून त्यांच्याकडून जमिनी हिसकावल्या. मुळशी  झपाट्याने औद्योगिकीकरण वाढणाऱ्या पुणे व मुंबई या दोन्ही शहरांच्या मध्ये असलेला तालुका. त्यामुळे जागतिककरणामध्ये कंपन्या उभारण्यासाठी येथील शेतकर्यांच्या जमिनी घेतल्या गेल्या. पुढे यातूनच फोफावलेली गुन्हेगारी यावर आधारित हा चित्रपट आहे. आजही पुणे व आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी बोकाळलेली दिसून येते. हत्यारे बाळगणे, मारामारी करणे, हत्या करणे, तलवारीने केक कापणे असले प्रकार पुणे भागात आजही दिसून येत आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात श्रीमंत वर्गातील तरूणवर्ग दिसून येतो. 

चित्रपट गुन्हेगारी विश्वावर आधारीत असला तरी गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणे चित्रपटाचा मानस नाही. चित्रपटात शेवटच्या टप्प्यात तरूण पिढीला गुन्हेगारी क्षेत्रापासून परावृत्त करण्याचे भाष्य करणारा संवाद आहे. भविष्यात प्रगतीपथावर जायचे असेल तर पोरांनी मेहनत, उद्योग, शिक्षण घेणे आवश्यक आहे. दादा, भाईलोकांच्या नादी लागला तर  भविष्यात अंत निश्चित आहे. 

चित्रपटाने सर्वच क्षेत्रात बाजी मारलेली आहे. जबरदस्त संवाद, धारदार डायलॉग, गीत,कथा, सर्वच बाबतीत चित्रपट सरस ठरतो. प्रविण तरडे यांचे लेखन व दिग्दर्शन लाभलेला हा दुसरा चित्रपट त्यामुळे सर्वांनाच याबाबत उत्सुकता लागून होती.

चित्रपट गुन्हेगारी, जमिन, शेतकरी, आदिवर भाष्य करतो. खूप मोठा सामाजिक विषय चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आला असून, चित्रपटाचा शेवट पाहून मन सुन्न होते. व मनात अनेक विचारचक्रे सुरू होतात.दरम्यान चित्रपटातील नायक राहुल्या गुन्हेगार क्षेत्रात अधिराज्य गाजवताना पुढे त्याच्याबाबतीत काय होते, चित्रपटाचा शेवट काय होतो हे पाहण्यासाठी प्रत्येकाने हा चित्रपट पाहायलाच हवा. 

लेखक - कुणाल चव्हाण,  सातारा