पुस्तक परिचय : हसरी किडनी अर्थात ‘अठरा अक्षौहिणी’ Ashwini Kanthi द्वारा पुस्तक पुनरावलोकने मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पुस्तक परिचय : हसरी किडनी अर्थात ‘अठरा अक्षौहिणी’

पद्मजा फाटक या लेखिका म्हणून आणि एके काळी दूरदर्शनवर सुंदर माझे घर सादर करणाऱ्या म्हणून बऱ्याच जणांना आठवत असतील. त्यांना वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी अचानकपणे ग्लुमेरेलो नेफ्रायटीस नावाच्या एका असाध्य रोगाला सामोरे जावे लागले. या आजारामध्ये किडन्या पूर्णपणे निकामी होतात. डायलिसीसवर किंवा किडन्या पुनर्रोपण करून आयुष्य वाढवता येते. पण ते असते सर्वसाधारणपणे २-३ वर्षाचे. अश्या अचानक उद्भवलेल्या जीवघेण्या आजाराशी त्यांनी १० वर्षे सर्व शक्तीनिशी झुंज दिली. या झुंजीची कहाणी त्यांनी ‘हसरी किडनी अर्थात अठरा अक्षौहिणी’ या पुस्तकात शब्दबद्ध केली आहे. पुस्तक लिहून झाल्यावरदेखिल त्या पुढे ४-५ वर्षे या आजाराशी सामना करतच होत्या. पुस्तकात त्यांचे आजारपण, त्याकरता पडताळून पाहिलेल्या इतर उपचार पद्धती, आजारात आलेल्या अनेकविध अडचणी, मानसिक उलघाल आणि त्या अनुषंगाने आलेले अनुभव याचा आलेख आहे. याच जोडीला हे पुस्तक आपल्याला लेखिकेच्या व्यक्तिमत्वाची,आयुष्याकडे बघण्याच्या दृष्टीकोनाची ओळख करुन देते.

पद्मजाताईंना जेव्हा पहिल्यांदा या आजाराचे वास्तव समजले तेव्हा त्यांना फार मोठा प्रश्न पडला की आता हि उणी पुरी वर्षे हताश होवून जमेल तशी घालवायची का या आजाराला निकराने तोंड द्यायचे? त्यांनी विचार केला की का म्हणून असे सहजासहजी निघून जायचे? “कौरवांनी जशी युद्धाकरता अठरा अक्षौहिणी सैन्यानिशी चाल करून जायचे ठरवले होते. तसेच मी पण या आजारावर माझ्या सर्व शक्तीनिशी मात करून जाईन” असा निर्धार त्यांनी केला. आणि ते देखिल त्यांनी केले हसतमुखाने. म्हणूनच त्यांनी या पुस्तकाचे नाव हसरी किडनी अर्थात ‘अठरा अक्षौहिणी’.

त्यांचा देवावर अथवा नशिबावर लहानपणापासूनच विश्वास नव्हता. या तोंडचे पाणी पळवणाऱ्या आजारातसुद्धा त्यांनी देव देव, पूजा, नवस असे कोणतेही उपाय केले नाही. जे काही करायचे ते स्वताच्या बळावर, प्रयत्नांनी, विवेकवादाने अशी त्याची धारणा होती. आजार बरा व्हायच्या जितक्या म्हणून शक्यता होत्या त्या सगळ्या पडताळून पाहिल्या.मात्र ज्या बुद्धीला पटतील अश्याच उपाय योजना प्रत्यक्षात आणल्या. त्यांचा “knowledge is power” या तत्वावर विश्वास होता. उपचार घेण्याच्या दृष्टीने आणि तसेच स्वतःला मानसिकरित्या खंबीर बनवण्याकरता त्यांनी वाचनाचा सपाटा लावला. धीराने आणि प्रयत्नपूर्वक स्वताच्या आजारावर जास्तीत जास्त माहिती गोळा केली.इतर सहरोग्यांना जर काही शंका असतील तर नर्सेस म्हणायच्या कि पद्मजा ताईना विचारा. मात्र पुस्तकात त्यांनी अॅलोपॅथी मध्ये जे उपचार घेतले त्याचे संयत भाषेत आणि आवश्यक तितकेच उल्लेख केले आहेत. अश्या गंभीर आजाराबद्दल वाचताना वाचकाला न घाबरवण्याचे कसब पद्मजाताईंच्या लेखनशैलीचे. तरीही शारीरिक आणि मानसिक परीक्षा पाहणारे ते क्षण वाचून आपल्या पोटात गलबलते.

आर्थिक पाठबळ उभी करताना त्यांची सगळ्यात जास्त मानसिक परीक्षा पाहिली गेली. आजारपणात भरपूर पैसा लागणार होता. चॅरिटीचा पैसा वापरायला त्यांचे मन तयार नव्हते. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर “सख्या आईने जर चिक्की दिली तर तिला आंबा बर्फी परत देण्याचा माझा स्वभाव”. इतरांचा पैसा किंवा कष्ट वापरून स्वतःचे आयुष्य वाढवणे त्यांना पटत नव्हतं. पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला या आजारावर मात करण्याची, त्याच्याशी झुंजण्याची इच्छा तीव्र होती. या मानसिक घालमेलीचे अनेक पदर त्या पुस्तकातून अलगदपणे उलगडून दाखवतात. स्वतःला, मित्रमंडळीना अनेक प्रकारचे तात्त्विक प्रश्न विचारून,समर्थने पडताळून पाहून,ठरवलेल्या मापदंडानुसार ठराविक ठिकाणाहूनच पैसे घ्यायचे त्यांनी ठरवले.गरजेपेक्षा अधिक आलेला पैसा ठामपणे नाकारून आणि इतर सहरोग्यांना देखील आर्थिक मदत मिळवून देण्याकरता धडपड करून त्या त्यांचा संस्कारित आणि संवदेनशील स्वभाव दाखवतात.

एवढ्या मोठ्या दुखण्याला सामोरे जाताना गरज असते “आत्मबळाची”. त्या एका ठिकाणी म्हणतात, “रोगी सोडून इतर सगळ्यांच्या पाळ्या असतात. रोग्याला मात्र सतत त्याच भावनेत जगायला लागते. अश्या वेळेस रेशमाचा किडा जसे स्वतःतून धागा काढतो तसे आपण आपल्यातूनच आत्मबळ शोधायचे असते”. स्वतःला आत्मबळ पुरवताना त्यांनी स्वयंमोपचार पद्धत वापरली. ही पद्धत असे सांगते कि नकारात्मक गोष्टींचा विचार करायचा नाही, भेटायला येणाऱ्या अनेकविध स्वभावाच्या माणसांच्या वाक्यांनी दुखीकष्टी न होता चांगला भागच लक्षात ठेवायचा. “चिंतारोगाला विचारयोगाने आणि मनक्षोभाला हास्ययोगाने परतवून लावायचे हा माझा बाणा आहे”. त्यांच्या भाषेत ही त्यांची आनंदोपचारपॅथी होती. त्यांच्या या स्वभावाची अनेक उदाहरणे पुस्तकात पानोपानी भेटतात.तसेच उत्तमोत्तम साहित्य वाचून,आजूबाजूच्या लोकांच्या वागण्याचे निरीक्षण करून त्यांनी स्वताचे आत्मबळ वाढवले. हे सगळे वाचता वाचता आपणदेखील समृद्ध होत जातो.

याच्या जोडीला त्यांचे मनोबळ वाढवले ते घरच्या मंडळींनी आणि मित्र परिवारानी. या पुस्तकात आई-वडील, नवरा, जवळच्या मैत्रिणी अश्या सगळ्यावर लेख आहेत. मात्र यात विशेष उल्लेख आहे या आजारात सतत सावली सारख्या उभ्या असणाऱ्या त्यांच्या एका मैत्रिणीचा – दीपा गोवारीकर यांचा. लोकांचा पैसा कसा घ्यायचा याची चर्चा असो वा कोणाच्या वक्तव्याने दुखावल्या गेलेल्या मनातील प्रश्न असोत त्या म्हणतात, “दिपावणीचा एखादा band-aid मला पुरे”.

तसेच त्यांना अनेक नामवंत लोकांनी मानसिक आधार दिला. आजारपणात देखील त्यांचा विनोदी मिस्कील स्वभाव डोके वर काढे, त्यावर काही लोकं विस्मयाने, नाराजीने बघत. पद्मजाताईंना पण प्रश्न पडे कि माझे वागणे abnormal नाही ना? अश्या संवेदनशील आणि तरल मनाला पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर द्यायला ना. ग. गोरे दिलासा देत. “देहाचे भोग देहाकडे, मनाचे भोग मनाकडे”. त्यांच्या भाषेत “अशी महामेंदु असलेली अनेक थोर माणसे” त्यांना आत्मबळ वाढवायला मिळाली. विजय तेंडूलकर, श्री. पु. भागवत, दिलीप प्रभावळकर, वसंत गोवारीकर असे कितीतरी नामवंत लोकं त्यांना भेटायला येत, पत्रे पाठवत, फोन करत. या लोकांची वाक्ये त्या एका वहीत लिहून ठेवत आणि ही वही आणि त्यांची पत्रे दवाखान्यात जाताना, तिथे मनाची उमेद टिकावी म्हणून घेवून जात. वसंत गोवारीकर यांनी आधाराकरता दिलेली वाक्ये तर पद्मजाताईच्या मते प्रत्येक हॉस्पिटलमध्ये लावली गेली पाहिजेत.

आजारपणातदेखील पद्मजाताई शारीरिक थकवा आणि अस्वस्थता बाजूला ठेवून सतत काम करत राहिल्या. आपला आजार, पथ्यपाणी, ओषाधोपचार संभाळून कामाचा रेटा चालूच ठेवायचा त्यांनी चंगच बांधला. त्या सतत लिहित राहायच्या, वाचत राहायच्या, कविता करत राहायच्या. उत्साहाने जगत राहण्याची, समाजातल्या घटनांबरोबर स्वतःला updated ठेवण्याची वृत्ती हे सगळे वाचून आपण आश्चर्य चकित होतो. मेंदू थकला तर नोट्स काढून त्यांनी त्या प्रश्नावर देखील मात केली. जेव्हा आजार वाढतच होता, डायलिसीसने त्रास होत होत्या तेव्हा त्रास सुसह्य होण्याकरता त्या स्वतःच्या छंदाकडे वळल्या आणि पाकक्रियेची एक वही तयार केली.स्वतःच्या आजूबाजूला सकारात्मक वृत्तीचे एक अभेद्य कवच त्यांनी उभारून घेतले. स्वतः वाचलेल्या पुस्तकांचा, केलेल्या व्यासंगाचा उपयोग करून त्यांनी स्वताच्या आजारपणाचे अनेक आघाड्यांवर लागणारे नियोजन वेगवेगळ्या management theories वापरून कश्या केल्या किंवा विवेकवादाने वागताना rational emotive theory चा कसा वापर करून घेतला हे वाचून त्यांचे विचारी मन दिसून येते. आत्मपरीक्षण करणे हा त्यांचा आवडीचा छंद. या आजारातही तो अविरत चालू राहिला. स्वतःला त्रयस्थपणे पहात, दर नव्या संकटाच्या वेळी, मानसिक त्रास होत असताना त्या स्वतःला बदलवत होत्या आणि आपण स्वतःला कसे बदलवत आहोत हे त्या सतत तपासत होत्या. या सगळ्या मानसिक घडामोडींची नोंद ठेवत होत्या.मनाशी सतत बोलत होत्या. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर कडक लक्ष्मी जशी स्वतःला फटकारते, तसे त्या स्वतःला फटकारत होत्या.

त्यांचा मुळचा आनंदी आणि मिस्कील स्वभाव या आजाराशी झुंज द्यायला खूप बळ देऊन गेला. प्रत्येक क्षणा कणातून सुख अंगी लावून घेणे हा त्यांचा जन्मजात स्वभाव होता.आयुष्यात वाईट घटना घडणारच. “आपण joy of existence गमवायचा नाही” हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. त्या सदैव आनंदी, हसतमुख असायच्या. दवाखान्यात वेटिंग रूम मध्ये बसल्यावरदेखील त्यांना हसायला कारण मिळत असे.

आजारपणाच्या अनुभवाचे वर्णनसुद्धा त्या त्यांच्या मिस्कील शैली मध्ये करतात. असिस्टंट डॉक्टर कधीकधी पटकन येवून जात, त्याला त्या म्हणतात “उपचारकांच्या उड्त्या तबकड्या आकस्मिकपणे येवून जात”. हि त्यांची मिस्कील शैली संपूर्ण पुस्तकभर जाणवते आणि आपण क्षणभर विसरून जातो कि आपण एका गंभीर आजार पेलणाऱ्या व्यक्तीचे अनुभव वाचत आहोत. त्यांनी बनवलेली रूपके वाचताना मजा वाटते. उदाहरणार्थ त्यांच्या धावपळीच्या जगण्याला त्या म्हणतात “आमची जीवनशैली म्हणजे पळती झाडे पाहू या पद्धतीची” बरेचदा त्यांची भाषा ही मागच्या पिढीची भाषा आहे हे जाणवते. म्हणजे त्यात ओळखीचे शब्द येतात पण हल्ली रोजच्या वापरात नसलेले. उदाहरणार्थ सांगोवांगी, भलावण, कुमक ….. तसेच बऱ्याच इंग्रजी शब्दांना त्यांनी स्वताचे मजेशीर पर्यायी मराठी शब्द वापरले आहेत. जसे कि डॉक्टर ला उपचारक,व्हिजिटर्स करता भेटक.

अनेक ठिकाणी त्या अनुभवाचे बोल आपल्याला सांगतात, मोलाचा सल्ला देतात… “आपल्या हाती जी सामग्री येते त्यातून सुंदर कलाकृती निर्माण करणे म्हणजे अर्थपूर्ण जगणं”. किंवा “तुम्हाला आलेल्या अनुभवातून तुम्ही कसे कितपत सुजाण, घट्ट, नम्र होवून बाहेर पडता हे महत्वाचे”. त्यांची अशी प्रगल्भ आणि तरतरीत बुद्धी या पुस्तकाला एकमेकाद्वितीय स्थान देते ते यामुळेच.

हे पुस्तक अनेक अंगानी खिळवून ठेवते. वेळोवेळी केलेल्या तात्त्विक चर्चेतून, साहित्यिक संदर्भातून, विवेकवादाने संकटाला सामोरे जाण्याच्या वृत्तीमधून वाचक बरेचदा अंतर्मुख बनतो, थक्क होतो, विचारांनी समृद्ध होतो. जोडीला एक अतिशय महत्वाचा धडा आपल्याला मिळतो आणि तो म्हणजे गंभीर स्वरूपाच्या आजारातदेखील माणूस त्याचं आयुष्य लांबवू शकतो. फक्त हवी वृत्ती सर्व शक्तीनिशी मत करून जाण्याची, आनंदाने जगण्याची आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याची.

खूप काही दिलेत पद्मजाताई…..