Poladi Purush - Sardar Patel books and stories free download online pdf in Marathi

पोलादी पुरुष : सरदार पटेल!

पोलादी पुरुष : सरदार पटेल!

गुजरात राज्यातील करमसद या गावात जव्हेरभाई पटेल हे गृहस्थ राहात होते. त्यांचा शेती हा प्रमुख व्यवसाय होता. जव्हेरभाई यांच्या पत्नीचे नाव लाडाबाई होते. लाडाबाईंचा स्वभाव प्रेमळ, परोपकारी होता. घरातील कामे सांभाळून त्या शेतीच्या कामातही लक्ष देत असत. त्या दोघांना चार मुले आणि एक मुलगी होती. ३१ ऑक्टोबर १८७५ यादिवशी या कुटुंबात अजून एक पुत्ररत्न जन्माला आले. या बाळाचे नाव वल्लभभाई असे ठेवण्यात आले. करमसद याच गावी वल्लभभाईंचे बालपण फुलले. शाळेत शिकताना त्यांना शेतात जाऊन काम करायला आवडू लागले. त्यांना शेतातील छोटीमोठी कामे करताना पाहून त्यांच्या आईवडिलांना खूप आनंद होत असे. बालपणी वल्लभभाईंचा स्वभाव विनोदी होता. शाळेत शिकताना आणि शेतात काम करताना ते प्रत्येकाची फिरकी घेत असत. एकेदिवशी वल्लभभाईंचे वडील शेतात नांगर चालवत असताना वल्लभ तिथेच काही तरी काम करीत होता. काम करताना शाळेतील अभ्यास मुखपाठ घोकणे हा वल्लभचा छंद होता. त्यादिवशीही वल्लभ काही तरी घोकत-घोकत कामही करीत होता. त्या दोन्ही कामांमध्ये वल्लभ एवढा दंग झाला होता की, त्याच्या पायात काटा घुसला हेही त्याला समजले नाही. पायातून

रक्त येत असल्याचीही जाणीव त्याला होत नव्हती. नांगर हाकत असलेल्या जव्हेरभाईंच्या लक्षात ती गोष्ट आली. काम थांबवून ते वल्लभजवळ जाऊन म्हणाले,

"अरे,वल्लभ, तुझे लक्ष कुठे आहे? तुझ्या पायातून रक्त येत आहे. थांब...." असे म्हणत जव्हेरभाईंनी

वल्लभच्या पायात घुसलेला काटा ओढून बाहेर काढला. परंतु रक्ताची जणू धार लागली होती. जव्हेरभाईंनी शेतातील औषधी गुण असलेल्या वनस्पतींची पाने तोडून आणली. ती पाने एका दगडावर रगडून जखमेवर बांधली. जव्हेरभाई म्हणाले,

"वल्लभा, अरे, थोडे लक्ष देऊन काम करावे. एवढी मोठी जखम होऊनही ते तुझ्या लक्षात आले नाही. कारण तू अत्यंत एकाग्रतेने हाती घेतलेले काम करीत होतास. ही एकाग्रता, तन्मयता जीवनात अत्यंत महत्त्वाची आहे. अशा छोट्यामोठ्या संकटांकडे दुर्लक्ष करून जो सारे लक्ष स्वतःच्या कामावर केंद्रित करतो तो जीवनात नक्कीच यशस्वी होतो."

करमसद या गावी प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वल्लभभाई आणि त्याचे काही मित्र पुढील शिक्षणासाठी पेटलाद या गावी गेले. तिथे सर्वांनी मिळून एक खोली किरायाने घेतली. सारे जण तिथे आनंदाने राहू . पेटलाद येथील शाळेत वल्लभभाईंनी इंग्रजी पाचवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले परंतु तिथे पुढील शिक्षणाची सोय नव्हती. त्यामुळे वल्लभभाईंनी वडिलांशी चर्चा करून नडीयाद येथील शाळेत जाण्याचे ठरवले. नडीयाद येथील शाळेची शिक्षण आणि शिस्त अत्यंत कडक होती. या शाळेत इंग्रजी शिक्षणावर जास्त भर होता. वल्लभभाई त्या शाळेत मन लावून, एकाग्रतेने शिकू लागले. काही दिवसातच त्यांनी आंग्ल भाषा आत्मसात केली, प्रभूत्व मिळवले. परंतु केवळ अभ्यासातच गुंतून न पडता वल्लभभाई शाळेत होणाऱ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागले. त्यातही वादविवाद हा त्यांचा आवडता विषय. वादविवाद स्पर्धेत घेऊन त्यांनी अनेक बक्षिसे मिळवली. या शाळेत असताना वल्लभभाईंचा एक गुण प्रामुख्याने पुढे आला तो म्हणजे नेतृत्व! मित्रांच्या, इतरांच्या मदतीला वल्लभभाई स्वतः होऊन धावून जात. सर्वांसोबत मिळून मिसळून राहणे हे त्यांचे वैशिष्ट्य असल्यामुळे त्यांच्या भोवती नेहमी मित्रांचा घोळका असे. विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे असे समजताच वल्लभ त्या विद्यार्थ्याच्या पाठी खंबीरपणे उभे राहत. त्याला न्याय मिळवून देण्यासाठी ते शिक्षकांच्या आणि शाळेच्या विरोधात लढा देत असत.

नडीयादच्या शाळेतील एक शिक्षक अतिशय कडक होते. एखाद्या विद्यार्थ्याची चूक झाली की, ते हातातल्या छडीचा पुरेपूर वापर करीत असत. त्या शिक्षकाने एकदा एका विद्यार्थ्याला खूप मारले. सोबत आर्थिक दंडही केला. गरीब असल्यामुळे तो मुलगा दंड भरु शकला नाही. त्यामुळे ते शिक्षक जास्तच चिडले. त्यांनी त्याला वर्गाच्या बाहेर काढले. हे सारे वल्लभला आवडले नाही. त्याने वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना बाहेर नेले. ते पाहून इतर वर्गातील विद्यार्थीही बाहेर पडले. शाळेसमोर पटांगणात सारे जण बसले. अशा प्रकारे वल्लभभाई पटेल यांनी शिक्षकाच्या विरोधात रणशिंग फुंकले. विद्यार्थी अत्यंत शांतपणे बसून होते. तो दिवस आणि दुसराही तसाच गेला. शालेय व्यवस्थापन आणि शिक्षकांना वाटत होते की, मुले लहान आहेत. ती असा कितीसा तग धरणार. लवकरच आपापल्या वर्गात येतील. परंतु वल्लभभाई आणि त्यांचे सहकारी माघार घ्यायला तयार होत नाहीत हे पाहून शिक्षक घाबरले. संप मिटत नाही हे गावात समजले आणि गावकरी जाब विचारायला आले तर काय उत्तर द्यावे? या काळजीने मुख्याध्यापकांनी पुढाकार घेऊन वल्लभला कार्यालयात बोलावून घेतले. वल्लभभाईंनी अत्यंत आदराने, संयमाने परंतु जोरदारपणे विद्यार्थ्यांची बाजू मांडली. ते ऐकून मुख्याध्यापकांनी यापुढे विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही असे आश्वासन दिले. त्यांचा मान राखून वल्लभभाईंनी आंदोलन मागे घेतले. जीवनातील पहिल्याच यशस्वी आंदोलनामुळे वल्लभभाईंचा आत्मविश्वास दुणावला.....

नडीयाद येथे शिकत असताना वल्लभभाईंच्या जीवनात एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली. वल्लभभाई यांनी सोळाव्या वर्षात प्रवेश केला आणि१८९३ या वर्षी त्यांचा विवाह झावेरबा यांच्याशी झाला. शिक्षणासोबतच वल्लभभाई यांचा संसाररथही दौडू लागला. १८९७ साली वल्लभभाई मॅट्रीकची परीक्षा उत्तीर्ण झाले. वकील होण्याची त्यांची इच्छा होती. त्याचबरोबर इंग्लंडमध्ये जाऊन तिथली बॅरिस्टर ही पदवी घेण्याची त्यांची महत्त्वकांक्षा होती. त्यासाठी भरपूर खर्च लागणार होता. त्यामुळे त्यांनी असे ठरवले की, अगोदर वकिलीची पदवी घेऊन भारतात वकिली सुरू करावी आणि मग आवश्यक तेवढा पैसा जमला की, मग आपले बॅरिस्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करुया. त्याप्रमाणे त्यांनी तीन वर्षे खूप मेहनत, भरपूर अभ्यास करून वकिलीच्या परीक्षेत यश

मिळवले. त्यांनी गोध्रा येथे वकिली सुरू केली. उसनवारी करून स्वतःचे कार्यालय स्थापन केले. विठ्ठलभाई हे त्यांचे मोठे बंधू. विठ्ठलभाई यांनीही वकिलीची पदवी मिळवली. त्यांनीही गोध्रा येथेच वकिली व्यवसाय सुरु केला.

वल्लभभाई यांच्याजवळ सुक्ष्म दृष्टी, बेडरपणा, रोखठोक वक्तव्य आणि बुद्धीचातुर्यासह संवाद कौशल्याची जाणीव सर्वांना होत होती. त्यामुळे त्यांच्याकडे दिवसेंदिवस अशिलांची संख्या वाढत होती. हळूहळू त्यांचा व्यवसायात चांगला जम बसला. त्यांचे उत्पन्नही चांगलेच वाढले. तीन वर्षांचा कालावधी संपला आणि पुन्हा बॅरिस्टर होण्याचा विचार डोक्यात घोळू लागला. सर्वांशी चर्चा करून त्यांनी इंग्लंडला जाण्याची तयारी सुरू केली. कागदपत्रांची जुळवाजुळव झाली. पासपोर्ट मिळाला. आवश्यक पोशाख शिवून झाला. जहाजाने जायचे म्हणून जहाजाचज तिकीटही काढले परंतु इथेच थोडा गोंधळ झाला.वल्लभभाईंचे तिकीट पोस्टाने आले. त्यावर 'व्ही. जे. पटेल' हे नाव असल्याने

पोस्टमनने ते पाकीट विठ्ठलभाईंना दिले. पाकिटातील इंग्लंडचे तिकीट पाहून विठ्ठलभाई गमतीने वल्लभभाईंना म्हणाले,

"भाई, बघ. मी बॅरिस्टरची पदवी घेण्यासाठी इंग्लंडला जातोय. तिकीटही आले आहे. असे करु मी अगोदर जातो. तू नंतर जा."

भाई आपली चेष्टा करीत आहेत हे वल्लभभाई यांच्या लक्षात आले नाही. विठ्ठलभाईंची इंग्लंडला जाण्याची तीव्र इच्छा आहे तेव्हा त्यांनाच पाठवूया. अशा उदात्त विचाराने त्यांनी मोठ्या भावाला

इंग्लंडला पाठवले.

१९०४ हे वर्ष वल्लभभाई यांच्या कुटुंबात फार मोठा आनंदाचा क्षण घेऊन आले. वल्लभ- भाईंच्या पत्नी झावेरबा यांनी एका गोंडस कन्येला जन्म दिला. त्या मुलीचे नाव मणिबेन ठेवण्यात आले. तिच्या बाललीलांमध्ये सारे दंग झालेले असताना १९०५ या वर्षी तशीच एक आनंददायी घटना घडली. झावेरबा यांना मुलगा झाला. मणिबेनच्या छोट्या भावाचे नाव 'दहया' असे ठेवण्यात आले. तिकडे इंग्लंडमध्ये बॅरिस्टर ही पदवी घेऊन विठ्ठलभाई भारतात परत आले. वल्लभभाई यांना खूप आनंद झाला. त्यानंतर वल्लभभाई यांनीही इंग्लंडला जाण्याची तयारी सुरू केली. १९१० साली वल्लभभाई पटेल यांनी स्वतःच्या स्वप्नपूर्तीसाठी इंग्लंडला प्रयाण केले. तिथे पोहोचल्यावर त्यांनी एका नामांकित विद्यापीठात प्रवेश घेतला. अभ्यासक्रम तीन वर्षांचा असला तरीही तो त्यांनी कठोर परिश्रम करून केवळ दीड वर्षात पूर्ण केला. त्यांनी एक ध्येय गाठले. त्यांची इच्छा पूर्ण झाली. विद्यादेवीची खडतर तपश्चर्येचे फळ त्यांना बॅरिस्टर पदवीच्या स्वरुपात मिळाले. एका वेगळ्या समाधानात वल्लभभाई भारतात परत आले. त्यांनी नव्या जोमाने वकिली सुरू केली. अत्यंत चाणाक्ष, अभ्यासू, हुशार, हजरजबाबी वकील अशी त्यांची ख्याती पसरली. पक्षकारांची बाजू मांडताना, होणारा अन्याय न्यायदेवतेसमोर सादर करताना त्यांच्या शब्दांना वेगळीच धार चढत असे. वल्लभभाई स्वतःच्या व्यवसायाशी आणि कर्तव्याशी अत्यंत प्रामाणिक होते, कठोर होते. 'भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ' ही विचारसरणी त्यांनी अंगीकृत केली होती.

एकदा वल्लभभाई न्यायासनासमोर पक्षकाराची बाजू जोरकसपणे मांडत असताना कुणी तरी त्यांच्या हातात पोस्टाने आलेली तार ठेवली.भाईंनी क्षणभर तो मजकूर वाचला आणि निर्विकारपणे कागद खिशात ठेवून दिला. नंतरचे दोन तास ते न्यायमूर्तींसमोर त्याच आत्मविश्वासाने बाजू मांडत होते.भाईंच्या पत्नी झावेरबा ह्या अत्यंत आजारी होत्या. त्यांचे निधन झाल्याची दु:खकारक बातमी घेऊन तार आली होती. भाईंचे विवेचन संपेपर्यंत ती बातमी सर्वत्र पोहोचली. ती बातमी समजताच

न्यायमूर्तींनी विचारले,

"भाई, एवढी मोठी दु:खाची बातमी वाचूनही आपण थांबला नाहीत? आपण सुनावणी थांबवली असती. पत्नीची अवस्था एवढी गंभीर असताना तुम्ही यायलाच नको."

"महोदय, आजारी असलेल्या पत्नीनेच मला माझ्या कर्तव्याची आठवण करून दिली. तिच्या मते एका निरपराध अशिलाला न्याय मिळवून देण्यासाठी तुमची गरज आहे. न्यायाधीश महाराज, भावना आणि कर्तव्य या ल दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अशिलाला न्याय मिळवून देण्यासाठी त्याने मला पैसे दिले आहेत. त्यामुळे मी त्याच्याशी बेइमानी करू शकत नाही....." असे म्हणून वल्लभभाई पटेल जड अंत:करणाने खाली बसले.....

न्याय क्षेत्रात जशी वल्लभभाईंची यशस्वी घोडदौड सुरू होती त्याचप्रमाणे त्यांचे सामाजिक कार्य विशेषतः शेतकऱ्यांसाठीची लढाईही जोरदार सुरू होती. स्वतः शेतकरी असल्यामुळे, शेतीची सारी माहिती असल्याने ते शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अग्रेसर असत. प्रसंगी आंदोलने करत असत. तत्कालीन गुजरात सरकारने असा एक कायदा केला होता की, त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना नेहमीपेक्षा तीस टक्के जास्त कर भरावा लागत होता. त्या निर्णयामुळे राज्यातील शेतकरी नाराज झाले. प्रचंड असंतोष माजला. वल्लभभाई पुढे आले. त्यांनी सरकारच्या विरोधात आंदोलनाचे रणशिंग फुंकले. असंतुष्ट शेतकरी वल्लभभाईसोबत एकवटले. भाईंच्या आंदोलनाला मिळत असलेला मोठा प्रतिसाद पाहून सरकार संतापले. ते आंदोलन चिरडून टाकण्याचा सरकारने प्रयत्न केला परंतु वल्लभभाई आणि शेतकरी नमले नाहीत, मागे हटले नाहीत. आंदोलकांची ठाम भूमिका पाहून सरकार नमले. वाढवलेला तीस टक्के कर विनाशर्त मागे घेतला. शेतकऱ्यांचा आणि वल्लभभाई यांच्या पदरी फार मोठा विजय पडला. ते यशस्वी आंदोलन इतिहासात 'बारडोलीचा सत्याग्रह' म्हणून अजरामर झाले. केवळ वल्लभभाई यांच्यामुळेच अवाजवी करातून शेतकऱ्यांची सुटका झाली हे जाणून गुजरात राज्यातील शेतकरी महिलांनी वल्लभभाई पटेल यांना 'सरदार' ही पदवी बहाल केली.

सरदार पटेल यांनी स्वातंत्र्य संग्रामातही मोठी कामगिरी बजावली. १५ ऑगस्ट१९४७ या दिवशी देश स्वतंत्र झाला. आपले सरकार सत्तेत आले. सरदार पटेल यांना गृहमंत्री हे पद आणि उप-पंतप्रधान ही जबाबदारी मिळाली. त्यावेळी देशात साडेपाचशेपेक्षाही जास्त संस्थाने होती. वल्लभभाई पटेल आणि भारत सरकारने असा निर्णय घेतला की, ही सर्व संस्थाने खालसा करून भारतीय प्रजासत्ताकात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. संस्थानिकांनी या निर्णयाला विरोध केला. परंतु सरकारपुढे सरकारचे काही चालले नाही. केवळ तीन संस्थानं सोडली तर इतर सर्व संस्थानं भारतात विलीन झाली. अशा क्रांतिकारी निर्णयाची अंमलबजावणी करताना कुठेही मनुष्यहानी किंवा रक्तपात झाला नाही. जुनागढ येथील नबाब हा दुसऱ्या देशात पळून गेल्याने ते संस्थान आपोआप भारतात सामील झाले. दुसरे संस्थान हैद्राबादचे! संस्थानातील जनतेचा प्रचंड विरोध असतानाही तो भारतात समाविष्ट होत नव्हता. वज्राहुनी कठोर अशी ख्याती असलेल्या सरदार पटेल यांनी 'ऑपरेशन पोलो' या नावाची मोहिम आखून तिथल्या संस्थानिकाला शरण यायला लावले.

विलीनीकरणासाठी प्रचंड विरोध असणारे तिसरे संस्थान म्हणजे काश्मीर! जो अजूनही पूर्णपणे

भारतात समाविष्ट झालेले नाही. गृहमंत्री सरदार पटेल यांनी धाडसाने आणि कणखरपणे घेतलेल्या विलीनीकरणाच्या निर्णयामुळे त्यांना 'पोलादी पुरुष' ही पदवी मिळाली. वल्लभभाई नेहमी म्हणत,

'या जगाला आधार देणारे दोन वर्ग आहेत. शेतकरी आणि मजदूर! दुर्दैवाने सर्वात जास्त जुलूम आणि अन्याय याच दोघांवर होत असतो. काहीही न बोलता हे दोघेही ते निमूटपणे सहन करतात. यामागील कारण असे की, ते हताश झालेले आहेत. त्यांच्या मनात एक विचार पक्का ठाण मांडून बसला आहे की, सरकारची शक्ती फार मोठी आहे. सरकारच्या विरोधात आपण काहीही करू शकत नाहीत.

अशा या कणखर, धाडसी आणि पोलादी व्यक्तीमत्त्वाचा १५ डिसेंबर १९५० या दिवशी मृत्यू झाला. सारा भारत शोकसागरात बुडाला. १९९१ यावर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च बहुमान मरणोत्तर प्रदान करण्यात आला.

नागेश सू. शेवाळकर

९४२३१३९०७१

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED