Bharattarn Vinoba bhave books and stories free download online pdf in Marathi

भारतरत्न : विनोबा भावे

भारतरत्न : विनोबा भावे

'जिन दिनों मैं काशी मे था, मेरी पहली अभिलाषा हिमालय की कंदराओं में जाकर तप-साधना करने की थी। दूसरी अभिलाषा थी, बंगाल के क्रांतिकारियों से भेट करने की।

लेकिन इनमे से एक भी अभिलाषा पूरी न हो सकी। समय मुझे गांधीजी तक ले गया। वहां जाकर मैने पाया कि उनके व्यक्तित्व मे हिमालय जैसी शांति है तो बंगाल की क्रांति की धधक भी। मैने छूटते ही स्वयं से कहा था, मेरी दोनों इच्छाएं पूरी हुई।'

आचार्य विनोबा भावे.

कोकण प्रदेशातील रायगड जिल्हा! रायगड जिल्ह्यातील गागोदे या नावाचे गाव. गागोदे गावात नरहरी भावे या नावाचे एक गृहस्थ राहात होते. त्यांच्या पत्नीचे नाव रुक्मिणीबाई होते. नरहरी भावे हे बडोदा येथील संस्थानात नोकरीस होते. नरहरी-रुक्मिणीबाई यांना चार मुले होती. त्यापैकी एक मुलगा म्हणजे विनायक! विनायकचा जन्म ११ सप्टेंबर १८९५ यादिवशी गागोदे येथे झाला. विनायकला बालकृष्ण, शिवाजी, दत्तात्रेय हे तीन भाऊ होते. रुक्मिणीबाई विनायकला लाडाने 'विन्या' या नावाने बोलवत असत. त्या अत्यंत धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांचा आवाज अत्यंत मधुर होता. भक्तीगीते गाताना त्या अतिशय तन्मयतेने गात असत. सारे वातावरण भक्तिमय होत असे. दैनंदिन कामे करताना त्या ईश्वर चिंतनात मग्न होत असत. अशावेळी स्वयंपाक करताना कधी भाजीत मीठ कधी कमी तर कधी जास्त पडत असे. कधी वरणात हिंग टाकायचे राहून जात असे. परंतु घरात तिने जपलेल्या धार्मिक, भक्तीमय वातावरणात या गोष्टींचे कुणाला काही वाटत नसे. विनायकवरही धार्मिक संस्कार त्यांच्या आईकडूनच झाले होते. त्यासोबतच विनायक लहानपणी अनेक गोष्टी वडिलांकडून शिकला. गणितीय दृष्टिकोन, तर्कशास्त्र, विज्ञानवादी विचार, परंपरागत चालीरीतीची सांगड विज्ञानाशी घालणे इत्यादी अनेक चांगले संस्कार नरहरी भावे यांच्याकडून विनायक यांच्यावर झाले होते. असे असले तरीही विनायक हा वडिलांपेक्षा आईकडे जास्त आकर्षित होत असे. मनाने तो आईच्या अधिक जवळ होता. रुक्मिणीबाई दररोज रात्री झोपायला जाण्यापूर्वी समर्थ रामदास स्वामी यांच्या 'दासबोध' या ग्रंथाचे वाचन करीत असे. तिच्याजवळ असणारा विनायकही मन लावून ते ऐकत असे. रुक्मिणीबाई विनायकला संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, नामदेव आणि शंकराचार्य यासोबतच रामायण, महाभारतातील कथा ऐकवत असे. मोठमोठ्या व्यक्तींचे चरित्र ऐकवत असे. ती विनायकला सांगायची,

"विन्या, गृहस्थाश्रमाचे चांगल्या रीतीने पालन केल्याने आपल्या पित्रांना मुक्ती मिळते." परंतु त्याचवेळी विनायकाच्या मनात गुरू समर्थ रामदास, संत ज्ञानेश्वर आणि शंकराचार्य यांच्या वागणुकीचा, शिकवणीचा प्रभाव जाणवत होता. ते आईला म्हणायचे,

"आई, ज्याप्रमाणे समर्थ रामदास स्वामी हे लग्नसमयी 'सावधान' ऐकताच मंडपातून निघून गेले होते त्याप्रमाणेच मलाही तसेच करावेसे वाटते."

एखादी आई असती तर पोटच्या मुलाचे असे विचार ऐकून तिच्या काळजात चर्रर्र झाले असते. कृती तर दूर पण मुलाने काही करण्यापूर्वीच रडून गोंधळ घातला असता, अंथरूण धरले असते, काहीही करून मुलाच्या डोक्यातून ते विचार घालवायचा प्रयत्न केला असता कारण सर्वसाधारणपणे सामाजिक विचारसरणी अशी असते की, त्यागी, संन्याशी, महान व्यक्ती जरूर असाव्यात. सामाजिक सुधारणांसाठी अशा व्यक्तींची गरज असते परंतु अशा व्यक्तींनी आपल्या घरात जन्म न घेता तो शेजारच्या घरी घ्यावा. परंतु रुक्मिणीबाईंचे विचार वेगळे होते. विनायकला त्या पूर्णपणे जाणून होत्या. विनायकला त्या म्हणायच्या,

"विन्या, मुलाने गृहस्थाश्रम स्वीकारला, त्याचे पूर्णपणे पालन केले, कर्तव्यं निभावले की, माता-पिता यांचा उद्धार होतो परंतु ब्रम्हचर्याचे पालन केले की, एक नाही, दोन नाही तर बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होतो....."

आईचे असे विचार ऐकून विनायकाच्या मनातील विचारांना बळकटी प्राप्त होत असे.

लहानपणापासूनच विनायकचे भौतिक सुखाकडे जास्त लक्ष नव्हते. 'त्याग' हा विनायकचा फार मोठा गुण होता. शाळेत शिकत असतानाच विनायक एकांतप्रिय होता. घरातील एखाद्या कोपऱ्यात तो शांत बसून राही. मौन राहणे त्याला आवडत असे. म्हणायला विनायक घरी असे, कुटुंबासोबत असे परंतु त्याचे वागणे पाहून असे वाटायचे की, तो सर्वांबरोबर असून खूप दूर आहे. मात्र आईच्या अत्यंत जवळ असे. आईलाही तो खूप आवडत असे. विनायक अत्यंत हुशार असल्यामुळे आईला आलेली कोणतीही विशेषतः धार्मिक शंका ती विनायकला विचारत असे. विनायकही आईच्या शंकेचे निरसन करीत असे. एखादेवेळी पतीने तिची शंका दूर करण्यासाठी केलेल्या प्रयत्नापेक्षा तिला विनायकने केलेले निरसन योग्य वाटत असे. असे असले तरीही रुक्मिणीबाईंनी आपल्या मुलांसाठी काही नियम बनवले होते. विनायक लाडका असला तरीही त्याला ते नियम पाळावेच लागायचे. एक महत्त्वाचा नियम असा होता की, जेवायला बसण्यापूर्वी सर्वांनी अंगणातल्या तुळशीला पाणी घालायचे. अनेकदा असे होत असे की, जेवायची वेळ झाली की, विनायक धावत घरी येऊन म्हणायचा,

"आई, खूप भूक लागली आहे ग. लवकर जेवायला वाढ बरे."

"विन्या, जेवण तयार आहे. लगेच वाढते पण एक सांग, तुळशीला पाणी घातले का?"

"नाही ना. आई, खूप भूक लागलीय ग. वाढ ना ग..." असे लाडाने म्हणत विनायक तिच्या कमरेला मिठी मारायचा पण त्याची आई ठाम असे. ती म्हणायची,

"जमणार नाही. आधी तुळशीला पाणी मग जेवण....."

शेवटी विनायक तुळशीला पाणी घालून यायचा तोपर्यंत त्याची आई त्याचे ताट वाढून ठेवत असे.

विनायक अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचा होता. बडोदा येथे त्यांचे शिक्षण झाले. गणित हा त्यांचा अत्यंत आवडता विषय. शिवाय लहानपणापासूनच विनायकला कविता करण्याचा छंद होता. परंतु लिहिलेल्या कविता विनायक अग्नीच्या हवाली करून नष्ट करीत असे. त्यामागे विनायकची भूमिका अशी असे की, हे जग नाशवंत आहे, अस्थिर आहे. सर्व काही क्षणभंगुर आहे, सोबत काही येत नाही तर मग या जुळवलेल्या अक्षरांचा मोह कशासाठी धरावा? त्याची आई हे सारे पाहायची. मनोमन विचार करायची पण बोलत काही नसे. कदाचित विनायकाच्या मनात चाललेले विचार तिला समजत असत.

रुक्मिणीबाईंचे एक व्रत होते, एक नियम असा होता की, ती दर महिन्याला एक लाख तांदुळाचे दाणे दान करत असे. दरमहा एक लाख बारीक बारीक दाणे मोजणे म्हणजे किती कष्ट पडत असतील, किती वेळ जात असावा. तिचे पती नरहरी भावे पत्नीची होणारी तारांबळ मोठ्या कौतुकाने बघत असत परंतु त्यांना एक भीती वाटत होती की, या अशा बारीक कामामुळे बायकोचे डोळे लहानवयातच कमकुवत होतील. दुसरीकडे त्यांचा गणितीय दृष्टिकोन त्यांना स्वस्थ बसू देत नसे. एकदा ते पत्नीला म्हणाले,

"एक-एक दाणा मोजायचे कष्ट घेताना, वेळेचा अपव्यय करण्यापेक्षा पावकिलो तांदूळ मोजून घे. त्यात किती दाणे येतात ते मोजायचे. पुढे एक लाख दाण्यासाठी किती किलो तांदूळ लागतील तितके तांदूळ दान करायचे. यामुळे तुझा वेळ वाचेल आणि हा वाचलेला वेळ दुसऱ्या कामाला देता येईल." पतीचा हा विचार रुक्मिणीबाईंना पटत असला तरी मन तयार होत नव्हते. परंतु तिला विनायकचे विचार पटत असत. एक दिवस तिने ते सारे विनायकला सांगितले आणि विचारले,

"विन्या, तुला काय वाटते ते सांग बरे....."

ते ऐकून विनायकने थोडा विचार केला आणि तो आईला म्हणाला,

" आई, बाबांचा विचार बरोबर आहे. त्याला गणिताचा आधार आहे. पण दान देण्यासाठी तू जी तांदळाच्या दाण्याची मोजणी करतेस ते केवळ मोजमाप नाही तर प्रत्येक दाण्यासोबत तुझ्या मुखात देवाचे नाव येते. त्यावेळी आपण ईश्वराशी जोडल्या जातो. ही सुद्धा एक साधना आहे, ती तू स्वतःच्या नकळत करत असतेस." विनायकचे ते विचार ऐकून रुक्मिणीबाई मनोमन म्हणाल्या,

'अरे, बाप रे! विन्या, किती खोलवर जाऊन तू विचार करतोस रे. मोजणीतून साधना हा विचार माझ्या मनाला कधी शिवलाच नाही.'

१९१५ यावर्षी विनायक मॅट्रिकची (हाईस्कुल) परीक्षा उत्तीर्ण झाला. तेंव्हा पुढे कोणते शिक्षण घ्यावे ही चर्चा सुरु झाली. वडिलांच्या इच्छा होती की, विनायकने 'फ्रेंच' शिकावे तर आई म्हणाली,

"संस्कृत! ब्राह्मणाच्या मुलाने संस्कृतच शिकले पाहिजे."

विनायकसमोर मोठा पेच निर्माण झाला. शेवटी विनायकने सुवर्णमध्य असा काढला की, इंटरच्या शिक्षणासाठी त्याने फ्रेंच निवडले आणि सोबतच संस्कृतचे शिक्षण स्वतःच घरी शिकू लागला. त्याकाळात फ्रेंच ही भाषा ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रात क्रांतिकारी भाषा समजली जात असे. बडोदा येथील वाचनालयात अत्यंत दुर्मिळ पुस्तके होती. शाळा सुटली रे सुटली की, विनायक त्या पुस्तकालयात जाऊन विविध पुस्तकांचा अभ्यास करीत असे. त्यातून ज्ञानलालसा वाढली. अभ्यास वाढला परंतु मनातून हिमालयाचे आकर्षण, संन्यास घेण्याची इच्छा जात नव्हती.

रुक्मिणीबाईंचे शिक्षण तसे फारसे झाले नव्हते. संस्कृत भाषा समजत नव्हती. परंतु गीतेतील ज्ञान समजून घेण्याची इच्छा प्रबळ होत होती. एकेदिवशी त्या विनायकला म्हणाल्या,

"विन्या, गीतेतील विचार समजून घ्यायचे आहेत पण संस्कृत समजत नाही."

विनायक बाजारात गेला आणि मराठीत अनुवाद असलेली काही पुस्तके त्यांनी खरेदी करून आईला आणून दिली. परंतु त्या पुस्तकांमधून लेखकांनी स्वतःच्या ज्ञानाचेच अधिक प्रदर्शन मांडले होते. तशी पुस्तके आईच्या हाती देताना विनायक उदास होते. त्यांनी आईला तसे सांगितले. त्यावर आई अचानक म्हणाली,

"असे आहे तर विन्या, तु का नाही करत अनुवाद?"

आईच्या तशा प्रश्नाने विनायक गोंधळला. तो म्हणाला, "मी? मी करु शकेल?"

परंतु आपल्या मुलाच्या ज्ञानावर, अभ्यासावर विश्वास असलेली माता ताडकन म्हणाली,

"होय! विन्या, तू हे करु शकशील....." कदाचित आईच्या मुखातून निघालेला तो आशीर्वाद होता. विनायकलाही गीतेची आवड होती. पण आवड असणे वेगळे आणि त्यावर भाष्य करणे वेगळे परंतु आईचा शब्द खाली पडू द्यायचा नाही अशी मनाशी पक्की खूणगाठ बांधलेल्या विनायकने आईचा शब्द वरचेवर झेलला. त्यांनी गीतेचा अभ्यास आणि भाषांतर सुरू केले. हळूहळू त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला. परंतु हे कार्य उत्तरार्धात जात असताना एक फार दुर्दैवी घटना घडली. ज्या मातेला गीता समजून घ्यायची होती, जिच्या इच्छेखातर विनायक गीतेचा अनुवाद करीत होते ती त्यांची माता, त्यांचे सर्वस्व रुक्मिणीबाई हे जग सोडून गेल्या......तरीही विनायकने गीतेचा मराठी भाषेत अनुवाद करण्याचे काम पूर्णत्वास नेले.

इंटरची परीक्षा देण्यासाठी त्याकाळात मुंबईला जावे लागे. त्याप्रमाणे विनायक रेल्वेने मुंबईला निघाले. परंतु मन बेचैन होते, अस्वस्थ होते. चिंता परीक्षेची नव्हती. इंटर परीक्षा उत्तीर्ण होऊ हा त्यांना विश्वास होता. रेल्वे जरी मुंबईच्या दिशेने धावत होती तरी विनायकचे मन दुसरीकडेच धावत होती. मनात एक विचार घोंघावत होते की, 'केवळ पदव्या घेणे एवढेच जीवनाचे ध्येय आहे का? जीवनात मला जे काही करायचे आहे ते अशा पदव्यांच्या औपचारिक अभ्यासातून गाठणे शक्य नाही.....' तितक्यात रेल्वे सुरतेच्या स्थानकावर थांबली आणि विनायक एक निर्णय घेऊन खाली उतरले. समोर काशीला जाणारी दुसरी रेल्वे उभी होती. विनायकने मागचा पुढचा कोणताही विचार केला नाही आणि दुसऱ्याच क्षणी ते त्या रेल्वेत शिरले.

काशीला आल्यावर विनायक विविध प्राचीन ग्रंथ, शास्त्र यांचा अभ्यास करु लागले. गीता अभ्यास चालूच होता. काशीला असतानाच विनायकने गांधीजींचे प्रवचन ऐकले. त्या विचारांनी विनायक फार प्रभावित झाले. विनायकने गांधीजींना पत्र लिहिले. गांधीजींनीही ताबडतोब उत्तर दिले. असा पत्रव्यवहार सुरु असताना महात्मा गांधींनी विनायकला अहमदाबाद येथील आश्रमात बोलावले. विनायकला अतिशय आनंद झाला. विनायक ताबडतोब अहमदाबाद येथे गेले. आश्रमात जाऊन त्यांनी गांधीजींची भेट घेतली. गांधीजीसोबत झालेल्या भेटीने, त्यांच्या विचारांनी विनायक आनंदी झाले. आश्रमात विनायक अध्ययन-अध्यापन, सुतकताई, शेती अशी कामे मन लावून करु लागले. थोड्याच दिवसात त्यांनी गांधीजींचे मन जिंकले. गांधीजींही विनायकाच्या कामावर प्रसन्न होते, खुश होते.गांधीजी विनायकला प्रेमाने 'विनोबा' या नावाने बोलावू लागले. गांधीजी म्हणत असत, 'अधिकतम लोक येथे काही ना काही घेऊन जायला येतात परंतु विनोबाला पाहून असे वाटते की, ही पहिली व्यक्ती आहे, जी येथे काही तरी द्यायला आली आहे.'

गांधींजींच्या इच्छेनुसार विनोबा भावे १९२१ यावर्षी महाराष्ट्रातील वर्धा येथील आश्रमात पोहोचले. त्यांना एक दिशा मिळाली होती. एक दृष्टी प्राप्त झाली होती. अस्वस्थ मनाला एक मार्ग सापडला होता. इतर अनेक सामाजिक कार्यासोबत विनोबांनी एक अतिशय मोलाचे समाजोपयोगी कार्य हातात घेतले. त्यांचे हे कार्य इतिहासात 'भूदान आंदोलन' नावाने अजरामर झाले. या आंदोलनाच्या माध्यमातून ते गावोगावी पदयात्रा काढत असत. गावातील ज्या धनाढ्य जमीनदाराकडे भरपूर जमीन असेल अशा जमीनदारांना ते त्यांच्याकडे असलेल्या जमिनीपैकी सहावा हिस्सा दान मागत. दानात मिळालेली जमीन विनोबा त्याच गावातील गरीब, भूमीहीन शेतकऱ्यांना दान देत असत.

विनोबांच्या या कामाला पहिले दान तेलंगणा भागात पोचमपल्ली या गावात मिळाले. पुढे तेलंगणा भागात विनोबांनी दोनशे गावातून पदयात्रा काढून भूदानाचे आवाहन केले. विनोबांच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्रीमंत शेतकऱ्यांनी बारा हजार दोनशे एक्कर जमिनीचे दान केले. नंतर विनोबांनी आपले लक्ष बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांकडे वळवले. अशा रीतीने विनोबांच्या जन आंदोलनाने देशव्यापी रुप धारण केले. अवघ्या पाच वर्षात चाळीस लाख एक्कर जमीन दान म्हणून मिळाली. या आंदोलनात 'सारी भूमि गोपाल की' हा त्यांचा नारा विशेष लोकप्रिय झाला.

जनहितार्थ सर्वस्व देताना विनोबांनी खूप खूप सामाजिक कामे केली. पाच नोव्हेंबर १९८२ यादिवशी विनोबांना ताप आला. सोबतच ह्रदयविकाराचा त्रासही सुरु झाला. विनोबांची तब्येत खूप खालावली. उपचार सुरू झाले. परंतु आराम पडत नाही हे पाहून डॉक्टरांनी मुंबईला जाण्याचा सल्ला दिला परंतु विनोबांनी स्पष्ट नकार दिला. शेवटी मुंबईचे जसलोक हॉस्पिटलचे डॉक्टर मेहता पवनार आश्रमात आले. परंतु विनोबांनी औषधासोबत अन्नपाणी वर्ज्य केले.... प्रायोपवेशन सुरु केले. त्यांचे बंधू, मित्र त्यांना अन्नपाणी घ्या, औषध घ्या. अशी विनवणी करत होते पण विनोबाजी कुणाचेही ऐकत नव्हते. भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी ह्या स्वतः आश्रमात आल्या. त्यांनीही विनोबांना तसे न करण्याची विनंती केली. पण विनोबा ठाम होते. शेवटी विनोबा भावे यांनी

श्री त्र्यं. गो. देशमुख यांना जवळ बोलावले. ते म्हणाले,

"आता देह आत्म्याला साथ देत नाही. रखडत जगण्यात अर्थ नाही. जराजर्जर शरीर टाकणेच ठीक!"

शेवटी १५ नोव्हेंबर १९८२ या दिवशी सकाळी ९-४० वाजता विनोबाजींनी पवनार आश्रमात शेवटचा श्वास घेतला. त्यावेळी त्यांचे वय ८८ वर्षांचे होते....

१९५८ यावर्षी विनोबा भावे यांना आंतरराष्ट्रीय मॅगेसेस पुरस्कार देण्यात आला.

१९८३ यावर्षी विनोबाजींना भारताचा सर्वोच्च पुरस्कार 'भारतरत्न' मरणोत्तर देण्यात आला.

नागेश सू. शेवाळकर

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED