युरोपियन हायलाईटस - भाग १ Vrishali Gotkhindikar द्वारा प्रवास विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

युरोपियन हायलाईटस - भाग १

युरोप पहाणे एक स्वप्न होते ..
युरोप पहायचं ठरवल तेव्हा आधी त्या विषयी थोडे वाचून घेतले होते .

युरोपला प्राचीन इतिहास आहे त्यामुळे इथल्या प्रत्येक गावात तुम्हाला जुन्या इमारती/राजवाडे पाहायला मिळतात .प्रत्येक गावात एक तरी म्युझियम असतेच .इथली प्राचीन संस्कृती आणि इतिहास याचे अत्यंत चांगल्या पद्धतीने जतन केलेलं पाहायला मिळते .

लंडन ..

आमची युरोप टूर सुरु झाली ती लंडन मधुन .लंडन पूर्वी पु ल च्या अपूर्वाई पुस्तकातून भेटले होते .

तेव्हापासून लंडन पाहिले पाहिजे असे वाटायचे .

मुंबई लंडन साडेनऊ तासाचा प्रवास ,तशात तेथील घड्याळ साडेचार तास मागे ..

एवढे असुन सुद्धा थंड हवामाना मुळे थकवा अजिबात जाणवत नव्हता .

लंडनला गेल्यागेल्या तिथल्या शिस्तबद्ध जीवनाचा लगेचच अनुभव आला .

हिथ्रो एअरपोर्टवर इमिग्रेशन च्या भल्या मोठ्या रांगेत तासनतास उभे राहायला लागले .

एअरपोर्ट वर अतिशय शांतता होती .अनेक प्रकारची अनेक देशातील माणसे रांगेत होती पण कोणाचा अजिबात आवाज नव्हता .साहेबाच्या देशाची शिस्त कडक होती .नाहीतर आपल्याकडचे एअरपोर्ट आवाजाने नुसते गजबजलेले असतात ,जणू एखादा मासळी बाजारच !

अवाढव्य हिथ्रो एअरपोर्ट बाहेर पडलो तेव्हा हवा एकदम स्वच्छ होती .एक सुखद गारवा हवेत होता .

लंडनचे पहिले दर्शन अविस्मरणीय होते .हिथ्रो एअरपोर्ट जगातील सर्वात मोठे एअरपोर्ट आहे . इथे प्रत्येक मिनिटाला एक विमान टेक ऑफ घेते अथवा उतरत असते .त्यामुळे सतत आकाशात विमाने दिसत असतात .

मागच्याच आठवड्यात इथे भरपूर पाउस व प्रचंड थंडी होती ,त्यामानाने तुम्ही लकी आहात असे टूर लीडर सांगत होता .

आमच्या बस ड्रायवरने आमचे सामान रुबाबात आत ठेवले .
इथे ड्रायवर ला “कॅप्टन” असे म्हणतात आणि मानाने वागवतात .

नंतर युरोपात फिरताना कष्टांची कामं रूबाबात करणारी अनेक गोरी लोकं दिसली .

इथं कष्टांची फार “किंमत” केली जाते.

मनुष्यबळ कमी असल्याने इथं माणसाच्या कष्टांना महत्व आहे .

बहुतेक बस ड्रायवर युरोपमधल्या आजूबाजूच्या उदा ..मोरक्को सैबेरिया अशा देशातून येत असतात.

इथं मार्च ते जुन पर्यटकांचा सीझन असतो. तेवढ्यात ते पैसा कमावून मग आपापल्या देशात जातात.

बसमधुन जाताना दिसणारी ती सुंदर चिमुकली देखणी घरं ,चित्रासारख्या इमारती , छोट्या बागा , सुरेख रस्ते देखण्या लाल बसेस आणि शहरभर तुफान फुललेला शुभ्र साकुरा सगळे सगळे मनमोहक वाटत होते .

प्रत्येक घरात फायरप्लेस असल्याने त्याची धुराडी प्रत्येक घरावर पाहायला मिळत होती .

घरासमोर लटकलेल्या कुंड्यातून रंगीत झाडे लावली होती .

चार मजल्याच्या वर कोणतीही घरे नव्हती .

घरांना लिफ्ट नसल्याने काही सामान आत न्यायचे असेल तर प्रत्येक घरावर एक हुक होते .

सामान त्या हुकद्वारे खिडकीतून आत घ्यायचे .

इतकी छान घरे पण माणसे अथवा कपडे घराबाहेर अजिबात दिसत नव्हते

पहिल्या आणि दुसर्या महायुध्धात ज्यांनी आपले आयुष्य पणाला लावले त्यांची स्मारके बसमधुन पाहायला मिळाली .अनेक सरकारी इमारती असलेल्या भागात ही स्मारके होती .

त्या स्मारका पाशी रस्त्याच्या कडेला असंख्य पुष्प गुच्छ ठेवलेले होते .

नंतर लागलीच लंडन आय पाहायला गेलो .

अतिशय भारी प्रकार आहे हा ! एका प्रचंड गोल चक्रातील भल्या मोठ्या क्युबिक मध्ये बसुन आपल्याला संपूर्ण लंडन शहरचे विहंगम दर्शन होते . या गोल चक्राला वेग नसतो त्यामुळे भिती वाटत नाही. अत्यंत मंद गतीने तुम्ही अफाट उंचीवर जाता आणि लंडन पहाता.

यानंतर या लंडन आय निर्मितीचा एक दहा मिनिटाचा फोर डी चष्मा घालून पहायचा शो पण दाखवला जातो .खुप रोमांचक शो असतो हा .!

थेम्स नदीच्या तीरावर असलेले बिग बेन नावाचे घड्याळ पाहिले .

हॉटेलमध्ये पोचत होतो तेव्हा भुरभुरू पाउस पडत होता .

हॉटेल मध्ये सगळीकडे शेकायला शेगड्या होत्या ज्याला फायरप्लेस म्हणतात .

संध्याकाळी जेवायला चला असे गाईड म्हणाला तेव्हा बघितले तर घड्याळात आठ वाजले होते .

अतिशय भक्क उजेड अजूनही होता .

युरोपमध्ये दिवस सकाळी साडेचारला उगवतो व रात्री दहापर्यंत चांगला उजेड असतो .

दुसर्या दिवशी लंडन फिरताना या शहरात जगणे कसे प्रचंड महाग आहे आणि कौटुंबिक आयुष्य कसे विस्कटलेले आहे हे आमच्या गाईड कडून समजले .

लंडनच्या मुख्य रस्त्यावर भारतीय वकिलातीवर आपला तिरंगा फडकत होता.

गाईड म्हणाली बघून ठेवा ही तुमचा फ्लॅग असलेली इमारत, पासपोर्ट हरवला तर इथंच यायचंय.

गाईड सोबत ट्रॅफल्गार स्क्वेअर, लंडन ब्रीज/टॉवरब्रीज बघितले .

बकींगहॅम पॅलेसमधला चेंजिंग ऑफ गार्डस सेरिमनी पाहिला.

अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात दररोज हा सेरेमनी साजरा केला जातो .

देश विदेशातून आलेल्या असंख्य पर्यटकांनी परिसर भरून गेलेला असतो

पिकॅडली सर्कस , अल्बर्ट हॉल , हाईड पार्क हे सारे बस मधुन पाहिले

रस्त्यात मोठमोठी अवाढव्य स्टोअर्स हॅरोडस/ सेल्फ्रीजेस डोळे थक्क करणारी होती .

लंडन हे जगातील आर्थिक व सांस्कृतिक गोष्टींचे एक महत्वाचे केंद्र आहे .

यानंतर जगप्रसिध्ध मादाम तुसाद हे मेणाच्या पुतळ्यांचे म्युझियम पाहायला गेलो .

पर्यटकांच्या प्रचंड गर्दीत जमेल तसे या सेलेब्रेटी सोबत फोटो काढुन घेतले .

देश विदेशातील जानेमाने असे असंख्य लोक येथे मेणाच्या पुतळ्याच्या रुपात उभे आहेत .

शिवाय एका छोट्या रेल मधुन इंग्लंडच्या जुन्या इतिहासाचा प्रवास पण घडवला जातो.

मादाम तुसाद म्युसियम पाहून बाहेर पडलो

आणि समजले की पुढच्याच चौकात शेरलॉक होम्सचा पुतळा आहे .

माझ्या आवडत्या रहस्य कथांचा हा नायक..

त्याच्या कथांची कॉलेज जीवनापासून अनेक वेळा पारायणे केलीत

सर ऑर्थोर कानन डायल यांच्या लेखणीतून उतरलेल्या कथांचा हा नायक शेरलॉक होम्स हा एक डिटेक्टिव्ह होता

या कथा लेखकाने 1887 ते 1927 दरम्यान लिहिल्या होत्या पण त्या अजूनही ताज्या वाटतात

त्याने एकंदर ५६ च्या आसपास लघुकथा लिहिल्या शिवाय दोन तीन कादंबर्या पण ..

ज्यात शेरलॉक होम्स या प्रायवेट डिटेक्टिवच्या बुद्धिचातुर्याच्या कथा आहेत .

या कथा होम्सचे मित्र डॉक्टर जॉन वाटसन यांच्या तोंडुन सांगितल्या जातात .

या घराची मालकीण मिसेस हडसन यांचाही या कथेत उल्लेख असतो .

होम्स ही व्यक्तिरेखा या कथा द्वारा इतकी सजीव केली गेली होती

की कित्येक वर्षे लोकांना वाटत होते की अशा नावाची एक जिवंत व्यक्ती आहे .

हे काल्पनिक पात्र आहे हे जेव्हा सर्वाना समजले तेव्हा सर्व थक्क झाले .

अतिशय बुद्धिमान ,चतुर आणि छोट्या छोट्या गोष्टीत रहस्य हुडकून काढणारा हा डिटेक्टिव

आपल्या चिरूट व एका विशिष्ट टोपी द्वारा ओळखला जात असे .

एलेमेंटरी डॉक्टर वाटसन ...ही त्याच्या वाक्याची सुरवात असे .

अनेक रहस्यांचा खुबीने पर्दाफार्श करणारा हा डिटेक्टिव सर्व जगात लोकप्रिय झाला .

जवळच शेरलॉक होम्स म्युझियम पण आहे .

आमच्या लंडन च्या दुसर्या दिवसाच्या मुक्कामात चक्क सूर्यदर्शन झाले .

इथे कायम थंडी व भुरभूर पाउस चालूच असतो त्यामुळे सूर्यदर्शन झाले की इथल्या लोकांना खुप आनंद होतो .

त्याची मजा घेण्यासाठी लोक घरातून चौकाचौकात येऊन गप्पा मारत अथवा निवांत लंच घेत बसतात .

या सुंदर शहराची ही दोन दिवसाची भेट अगदीच चुटपूटती वाटली .

खरेतर अजून फिरायला हवे किंबहुना इथे राहायलाच हवे असे वाटले .

पण लंडन मधुन निघताना पाय जड झाले होते

अतिशय देखण्या, शांत शहराच्या आम्ही प्रेमात पडलो होतो
यानंतर ताबडतोब युरोस्टार रेल्वे गाठून आमचे प्रस्थान पॅरिसला व्हायचे होते .
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पॅरिस

पॅरिस मी चित्रपटातून अनेकदा पाहिलं होतं आणि अर्थातच आवडलं होतं. अॅमिली, मिडनाईट इन पॅरीस ,आणि काही वर्ल्ड सिनेमातून . चित्रकार ,चित्र याविषयी वाचतालिहिताना पॅरीस सतत येतंच असत .शम्मीचा An Evening इन Paris तर अनेक वेळा पाहिलेली आणि मोहिनी पडलेला चित्रपट .

त्यामुळे उत्सुकता होतीच ..

लंडनच्या सेंट पँक्रा स्टेशनवर सोपस्कार पार पाडून युरोस्टारची वाट बघत बसलो. इथलं वायफाय खुप छान आहे त्यामुळे वाट पाहताना बरीच डोकी मोबाईल मध्येच होती .

स्टेशन सुंदर आहे पण बसण्याची व्यवस्था बर्याच खुर्च्या असुन सुध्धा अत्यंत अपुरी वाटते .

आतमध्ये असंख्य दुकाने ब्रांडेड कपड्याच्या शोरूम्स आहेत .पॅरिसच्या फॅशनची सुरवात या रेल्वे स्टेशन पासून होते .

युरोस्टार रेल्वेने आमचा लंडन ते पॅरिस प्रवास सुरु झाला .

युरोस्टार ही ताशी तीनशे किलोमीटर वेगाने धावणारी रेल्वे आहे .

अत्यंत सुंदर बैठक व्यवस्था पुर्णपणे एसी असणारी ही आरामदायक रेल्वे तुम्हाला सव्वा दोन तासांत

थेट पॅरिसला घेऊन जाते .

ह्या रेल्वेचा अंतर्गत फोटो पाठवला तेव्हा फोटो पाहुन माझी मैत्रीण म्हणाली अग ही रेल्वे आहे का विमान ?

यातुन जाताना युरोपचा नयनरम्य हिरवागार परिसर नजरेस पडत होता .

छोटी छोटी गावे नजरेआड होत होती .

पॅरिसच्या रेल्वे स्टेशन बाहेरचा परिसर अत्यंत बकाल होता .

आमची बस बाहेर पडताच अडकली ती तुडुंब ट्रॅफिक मुरंब्यामधे. ड्रायवरने मोठ्या शिताफीने बस ट्रॅफिकमधून बाहेर काढली. पॅरिस ट्रॅफिक जॅमने वेढलेलंय.

दुसर्या दिवशी सकाळी निवांत पहुडलेलं आळशी पॅरिस पाहिलं. एकट्या दुकट्या म्हातार्या बायका तो Baguette- नावाचा लांबलचक पाव घेऊन जाताना दिसत होत्या .खायची दुकानं ,कॅफे आणि रेस्टॉरंट सुरू होते पण बहुतेक दुकानं बंद होती.

सध्या तिथं चालू असलेला यलो प्रोटेस्ट यामुळे शहरात बराच तणाव होता.

नंतर दिवस वर येऊ लागला तशी पोलिसांची फौजच दिसू लागली. Champs-Élysées हा रस्ता अर्धा बंद झाला, बरेच रस्ते मधेच बंद झाले , ऑपेराहाऊस, प्रेस द ला काँकर्ड , सैनिकांची ज्योत फडकत राहते त्या स्मारकाला'Arc de Triomphe' ला पोलिस कार्सने वेढा घातला होता. या सगळ्या प्रकारात बस फक्त चर्च ऑफ इनवॅलिडला थांबवता आली.

त्यामुळे बरेचसे दर्शन बस मधुन करावे लागले .

पॅरिस हे फॅशनचे केंद्र असल्याने सिटी टूर करताना असंख्य कपड्याची ,कॉस्मेटिकची ,पर्सेसची इतर वस्त्र प्रावर्णाची सुबक मांडणी केलेली दुकाने दिसत होती .

तुमच्या पसंती प्रमाणे कपडे शिवून देणारी डिझायनर दुकाने पण डोळ्यांचे पारणे फेडत होती .

इथली जीवनशैली निवांत असल्याने रस्त्यात निरनिराळ्या हॉटेल्स मधुन अनेक तोकड्या कपड्यातले स्त्री पुरुष निवांत वाईनचा आस्वाद घेताना दिसत होती .

इथे पण रस्त्यावरील घराघरातून लटकलेल्या रंगीत फुलांच्या कुंड्या दिसत होत्या .

रस्त्यावर अनेक जण प्याडल पुश सायकल वरून हिंडत होते .

सुदैवाने आयफेल टॉवरवर जाणारे रस्ते खुले झाल्याने आम्ही तिकडे निघालो

इतर सर्व ठिकाणे बंद असल्याने आयफेल टॉवर बघायला प्रचंड गर्दी होती. टॉवर बघायला आधी दोन सिक्यूरिटी चेकअप आणि मग अत्यंत मंद गतीने सरकणारी लाईन होती. आयफेल टावर खूप जवळून पाहिला तर कुरूपच वाटला.

या टॉवरचे सामान्यपणे तीन मजल्याचे भाग केले आहेत .

पहिला दुसरा व तिसरा तिन्ही मजल्यासाठी वेगवेगळ्या मोठमोठ्या लिफ्ट आहेत .

एका वेळेस वजनानुसार त्या चाळीस ते सत्तर लोकांना सामावून घेऊ शकतात .

याच्या दोन पायातून वर जाण्यासाठी लिफ्ट आहे व दोन पायातून खाली जाण्यासाठी .

पहिल्या मजल्यावर गेल्यावर तुम्ही इच्छा असल्यास आरामात जिन्यावरून चालत येऊ शकता .

दुसर्या व तीसर्या मजल्यावरून मात्र फक्त लिफ्टने खाली उतरू शकता .

तिसर्या मजल्यावर जाणे मात्र हवामानावर अवलंबुन असते .

आम्ही गेलो तेव्हा हवा बरी होती थोडा भुरभूर पाउस मात्र होता

आम्हाला वरपर्यंत जाता आले .वरून वेगवेगळ्या कोनातून पॅरिसचे विहंगम दर्शन होते .

खुप लांबवर पाहण्यासाठी तिथे दुर्बिणींची पण सोय आहे .

आयफेल टॉवरच रात्री अकरा वाजता इल्यूमिनेशन असतं- चमकत्या टॉवरवर अजूनच चमचमणारं नाचरं लायटिंग करतात .

ते पाहण्यासाठी रात्री पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणाहून येत असतात व त्याचा आनंद घेत असतात .

रात्रीचे पॅरिस पाहणे हे कित्येक लोकांचे स्वप्न असते आम्हीही ते अनुभवले व पॅरिसच्या गल्ल्यातून एक वाजेपर्यंत मनमुराद भटकलो .
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

चॉकलेटी बेल्जियम ..

पॅरिस मधुन बाहेर पडल्यावर आमचा पुढचे डेस्टिनेशन होते बेल्जियम.

बेल्जियम सुप्रसिध्ध चित्रकार रेने माग्रिटेचा देश.

हुशार डिटेक्टीव टिनटिनचा हा देश .एका बिल्डींगवर “टिनटिन” रंगवलेला सापडलाही.

खुप दंगेखोर पोरांमधे एक बिचारं लहानसं साधं पोरगं असतं तसं हे चिमुकलं बेल्जियम आहे. इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी या तिन्ही भांडकुदळ दांडगट पोरांमधलं बारकं पोरगं म्हणजे बेल्जियम . बेल्जियमची जागा हाच त्याचा प्रोब्लेम आहे . अशी सोयीची जागा की हे सगळे लोकं भांडायला मध्यवर्ती पडते म्हणून इथं येत असत. Battlefield of Europe म्हणत बेल्जियमला. नेपोलिअन हरला ते वाटर्लु इथलंच. इतक्या वर्षांची सर्वांची दादागिरी पचवून बेल्जियम आता प्रगती करतेय .

ब्रसेल्स बेल्जियमची राजधानी.

ब्रसेल्स फार छान टुमदार शहर आहे. गजबजलेल्या फॅशनेबल पॅरिसमधून या ब्रसेल्स गावात आल्यावर फार छान आणि शांत वाटलं. आमच्या जेवणाच्या हॉटेलच्या आसपास सुंदर रेसिडेन्शिअल बंगलो असलेली कॉलनी होती. वीकएंड असल्याने सुट्टीचा दिवस होता आणि लखलखीत सुर्य असल्याने लोकं स्वतःला भाजून घेत होते. आपल्यासारख्या अतिउष्ण देशातून आलेल्या लोकांना सूर्यस्पर्शाचं हे “अप्रूप” समजणं अवघड जाते .

ब्रसेल्स छान नीटनेटकं गाव आहे. काचेरी इमारतींचा काही भाग आयटी एरिया असल्यासारखा वाटला. जुना परिसर देखणा आहे आणि तो तसाच जपलाय त्या लोकांनी .

नव्या हायक्लास चकचकीत बिल्डींग्जना इथं मज्जाव आहे .

ब्रसेल्समधे अॅटोमियम नावाची अणूच्या स्ट्रॅक्चरची प्रतिकृती असणारी एक भारी चकचकीत स्टेनलेस स्टीलची प्रचंड मोठी इमारत उभारली आहे. 1958 साली ती उभारली आहे . झकास दिसते एकदम !!
इथे सुंदर असा भला मोठा बगीचा आहे ज्यातील झाडे कलात्मक प्रकारे वाढवली आहेत .

येथून जवळच बृपार्क येथे मिनी युरोप वसवलेले आहे .इथे युरोपमधील प्रत्येक शहरातील महत्वाच्या स्थळांची मिनिएचर प्रतिकृती बनवलेली आहे .

युरोपात प्रत्येक शहरात एक चौक असतो. त्याच्या अवतीभवती बाजार भरतो. मोठी आणि जुनी दुकानं असतात. लोकं भेटतात. कॉफी आणि बिअर पितात. गप्पा गोष्टी आणि टवाळक्या करतात, लायनी मारतात,नाच गाणी पण करतात .

ब्रसेल्सच्या रस्त्यावर फ्रेंच फ्राईज खात मुलाला घेऊन भीक मागत बसलेली भिकारीण सुध्धा दिसली .

ब्रसेल्सचा ग्रँड स्क्वेअर युरोपातील सर्वात सुंदर चौकांपैकी एक आहे. इथं असलेलं विशाल कॅथेड्रल , बिअर म्यूझियम, टाऊन हॉल आणि इतरही इमारती अप्रतीम सुंदर आहेत .दिवसभर इथे जणु लोकांची जत्रा भरलेली असते “खाओ पिओ मजा करो बस्स!! गये कलकी चिंता नही आनेवाला कल किसने देखा है ?
यहाँ बस आज है उसे जिओ “ हा इथला फंडा आहे .

ब्रसेल्सच्या ग्रँड स्क्वेअर मधल्या संतीणीच्या पुतळ्यावर हात फिरवला असता परत इकडे यायची संधी मिळते असे म्हणतात .अनेक प्रवासी इथे गर्दी करून पुतळ्याला हात लावत होते .

ग्रँड स्क्वेअर जवळच इथे ब्रसेल्सचं प्रसिद्ध शिल्प आहे : 'मॅनेकन पीस'
शू करणार्या छोटू मुलाचं शिल्प.
या विषयी अनेक दंतकथा आहेत . यातली एक दंतकथा अशी की तेराव्या किंवा चौदाव्या शतकात या गावातल्या एका छोटू मुलानं शत्रूच्या छावणीत जाऊन स्फोटकांवर शू करून शत्रू जर्मनीची फसगत केली ,म्हणून गावकर्यांनी त्याचा शू करतानाचा पुतळा उभारला.
मग त्याची शू वाहून जायला छोटी पुष्करणीही बांधली .
हा शू करणारा छोटू एरव्ही नंगू असतो पण कधीकधी त्याला कपडेही घालतात.
वेगवेगळ्या देशांचे पोषाख त्याला आहेत.
त्याला भारतीय पोषाख पण आहे. हा शू करणारा छोटू एकप्रकारे या ब्रसेल्स गावचा जणु देवच आहे .

इथे फोटो काढायला लोकांची गर्दी लोटते .
बेल्जियमची वॅफल्स तर जगप्रसिद्ध आहेत.

ही वॅफल्स अक्षरशः शेकडो चवीची आणि प्रकारची मिळतात .

गरम गरम वॅफल्स आणि आईस्क्रीम थंड हवेत खायला खुप मजा येते .

इथे अनेक प्रकारची चॉकलेटस मिळतात त्यात वाईन भरलेली चॉकलेटस खुप प्रसिध्द आहेत .

नंगू शू करणाऱ्या छोट्याच्या पुतळ्याच्या शेपमधली चॉकलेटस पण मिळतात.

युरोपात मोठ्या प्रसिद्ध दुकानात चायनीज विक्रेत्यांनी आक्रमण केले आहे. ब्रसेल्स असो की कलोन की ल्यूसर्न . त्यामुळे शक्यतो ती दुकानं सोडून इतर ठिकाणी फिरावं.स्वस्त खरेदी होते.

बेल्जियम होजिअरी पण सुरेख असते. शुभ्र नाजुक लेसचं काम तर होतंच पण पिकासो , व्हिन्सेंट व्हॅन गॉग , गुस्ताव क्लिम्त , जॉन मिरो सगळे कुशन कव्हर्स, चादरी , पोंचो , चष्मा केस , बॅग्ज वर हजर होते. किंमती मात्र अतिशय महाग . मग फक्त फोटो काढून समाधान मानलं आणि भरपूर बेल्जियम चॉकलेटस मात्र घेतली.

ब्रसेल्स हे चॉकलेटी शहर मोठं झालंय खरं पण आतून त्या शू करणार्या छोटू मुलाचं कौतुक करणारं भाबड्या लोकांचं , सुगरण चॉकलेटियरनी भरलेलं साधं गाव आहे.

बेल्जियम चा निरोप घेताना अवधड गेले ..असे वाटले त्या संतीणीच्या पुतळयाची ती कथा खरी ठरावी

आणि पुन्हा पुन्हा इथे यायला मिळावे .
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------