"किल्ले रायगड " खूप वेळा हा किल्ला मी वाचला आहे...शरीराने फक्त ३ ते ४ वेळाच गेलो आहे..पण जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा मनाने मी तिथेच मुक्कामी असतो...हाच किल्ला आम्ही का निवडला ?? कसे गेलो ?? ते आता मी सांगणार आहे...
मी,प्रसाद कदम, भिवाजी कदम आणि किरण काडगे एप्रिल २००८ ला एकाच कंपनीत १५ ते २० दिवसाच्या अंतराने कामाला लागलो...नवीनच असल्यामुळे...चौघेही जरा उशिराच जेवायला जायचो...हळू हळू मैत्री वाढत होती..एकमेकांचा अंदाज घेणे चालू होते...सर्वांत कॉमन गोष्ट एकच निघाली... राजे आणि आम्ही वाचलेले बाबासाहेब पुरंदरे यांचे " राजा शिवछत्रपती " ची केलेली पारायणे... मग त्यात उल्लेख असलेले किल्ले...मग त्यात एकदा प्रसाद बोलून गेला...मी रायगड एकदाच पहिला आहे...मग काय एक हक्काचा गाईड मिळाला आम्हाला...रोज चर्चा असायची आमची...कधी जायचे ?? कसे जायचे ?? कुठून जायचे ?? पण तारीख मात्र ठरत नव्हती...आणि ठरली तरी किरण नाही नाही करत होता...असे करता करता नोव्हेंबर उजाडला...आणि त्याच महिन्यात ... स्टार प्रवाहावर.... राजा शिवछत्रपती हि मालिका नोव्हेंबर मध्ये प्रसारित होणार होती...त्यामुळे त्या मालिकेचे प्रोमो १ ते २ मिनिटांचे चॅनेल वर दाखवणे चालू होते.. त्या मालिकेचे शीर्षकगीत ऐकताना अंगावर सरसरून काटा यायचा .....
इंद्रजीमी जंभू पर ,वादव सुअंभ पर
रावण सदंभ पर,रघुकुल राज है ॥
पौन बारी बाह पर,संभु रति नाह पर ।
ज्यो सहसबाह पर,राम द्विजराज है ॥
ह्र्दयात माऊली,रयतेस सावली ।
गडकोट राऊळी,शिवशंकर हा ॥
मुक्तीची मंत्रणा,युक्तीची यंत्रणा ।
खल दुष्ट दुर्जना,प्रलयंकर हा ॥
सुष्टांसी रक्षितो,शत्रू विखंदतो |
भावंड भावना,संस्थापितो ॥
ऐसा युगे युगे,स्वर्णीय सर्वदा ।
माता पिता सखा,शिवभूप तो ॥
दावा द्रुमदंड पर,चिता मृग झुंड पर ।
भूषण वितुंड पर,जैसे मृगराज है ॥
तेज तव अंस पर,कान्हा जभी कंस पर ।
त्यो म्लेंछ बंस पर,सेर सिवराज है ॥
॥ जय भवानी, जय भवानी ॥
॥ जय शिवाजी, जय शिवाजी ॥
॥ जय भवानी, जय शिवाजी ॥
गीत: कवी भूषण
संगीत: अजय अतुल
मग ठरवता ठरवता १५ नोव्हेंबर २००८ शनिवार तारिक नक्की केली आम्ही...परेल S. T. स्टँडवरून शेवटची महाड गाडी पकडायचे आमचे ठरले...शुक्रवारी रात्री...१४ नोव्हेंबर २००८ निघालो...मस्त कडकडीत थंडी पडली होती...आणि घरात आईने कांदा-भजी चा बेत केला होता...एकवेळ वाटले प्रसाद आणि भिवाजी दोघे येणार नाहीत आणि त्या दोघांनापण आमच्याबद्दल असेच वाट्त होते...तरी प्रसादने रात्री १०. ३० ला कॉल केला अरे निघूया का रे ?? माझ्या तोंडात तेव्हा नाहीच आले होते..पण कोणास ठाऊक... त्या रायगडाच्या ओढीने मी हा बोलून टाकले... आणि मग मी,प्रसाद कदम, भिवाजी कदम परेल S. T. स्टँडवर ११. १५ ला जमलो... (म्हणजे १५ नोव्हेंबर २००८ शनिवार.... ऑफिस ला टांग )...महाड S. T ठरलेल्या वेळेत आली...जवळ जवळ भरली होती..पण आमच्या सुदैवाने आम्हाला तिघांनीही बसायला जागा मिळाली....शेवटच्या सीटवर... महाड S. T परेल S. T. स्टँडवरून ५ मिनिटात निघाली...सगळे कसे शांत शांत होते...थंडी मी म्हणत होती...उघडया खिडकीतून...सीटखालून...दरवाजातून...कशीही वेडीवाकडी आतमध्ये शिरत होती...S. T. लय लाईट बंद झाल्या...सर्व कुडकुडून झोपले होते...मधल्या काही S. T. स्टँडवर काही तुरळक प्रवाशी चढले....प्रसाद आणि भिवजीला S. T च्या शेवटच्या सीट चा अनुभव होता.. आणि सर्व आयुष्यात मिळून हा माझा पहिलाच प्रवास...प्रथम काही वाटले नाही..मग नंतर मात्र पोटातलं पाणी हलणे म्हणजे काय हा अनुभव येत होता...कसेबसे तोंड गच्च मिटून बसलो होतो...कधी डोळा लागला ते समजलंच नाही....आणि एकाएकी S. T खड्डयांतून उडाली का उडवली... आणि ब्रेक मारून थांबली... आणि आवाज आला .... "महाड महाड महाड" उतरून घ्या पटापट....
आम्ही तिघेच उतरलो.. महाड डेपोला तेव्हा सकाळचे ३. ३० वाजले होते... डेपोवर कोणीही नव्हते...सर्व महाड गुलाबी थंडीत शांत झोपले होते..."रायगड पायथा" (गाडीचे नाव) यायला अर्धा तास होता...पटकन फ्रेश झालो....आणि डेपोच्या बाहेर असणाऱ्या टपरीवर...अस्सल गावरान चवीचा गुळाचा गरम गरम चहा घेतला...४. ०० वाजता S. T आली आणि उभे रहायला नको म्हूणन धावत धावत S. T पकडली...पण पोपट झाला S. T तशीही खालीच होती...प्रसाद आणि भिवाजी दोघेही बसल्या बसल्या झोपून गेले..मी मात्र जागाच होते... एका मित्राला भेटीला चाललो होतोना....आणि आमची स्वारी सुरु झाली…गुडुप अंधार,वाऱ्याच्या झोताने येणारा गुलाबी थंडीचा सुगंध,सळसळणारी सोनपिवळी शेती अन आमच्या डोळ्यावर येणारी झापड..आणि अधून मधून दर्शन देणारे "टकमक टोक ".. जवळ जवळ अर्धा ते पाऊण तासाने ५. ३० ते ६.०० च्या सुमारास आम्ही रायगडाच्या पायथ्याशी उतरलो.आणि समोर पाहतो तर काय हा रायगड दोहो बाजूंनी आम्हाला मिठीत घेण्यासाठी तयार होता. टकमक टोक... थंडी सहन न झालेल्या सूर्याच्या किरणे हळूहळू आपला चेहरा दाखवत होते...रायगड अजुन पूर्ण जागा झाला नव्हता..पटकन तिथेच रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या " हाटेलात " पेटपूजा करून घेतली आणि निघालो...
आणि रायगड किल्ला चढायला सुरुवात केली...पहिल्या पायरीवर पाऊल ठेवले आणि तेव्हाच तिथे जाणवले...हे ट्रेकिंग चे भूत काही आता खाली उतरणार नाही कायमचे मानगुटीवर बसले हे आता..आम्ही खुबलढा बुरूज समोर ठेवून पायऱ्या चढायला सुरुवात केली...तिथे त्या बुरुजाच्या शेजारी दरवाजा होता त्याला "चित्त दरवाजा " से नाव होते.. काळाच्या ओघात तो आता पूर्णपणे नष्ट झाला आहे...या पायऱ्या तुम्हाला अगदी वर महादरवाजा पर्यंत घेऊन जातात आम्ही जेव्हा २००८ ला गेलो तेव्हा..दरवाजा नव्हता पण आता गेल्याच वर्षी २०१७ ला .. जुन्या काळ्यातल्या दरवाजा प्रमाणे मोठा दरवाजा काही वेड्या दुर्गमित्रांमुळे उभारला आहे.. प्रथम दिसले ते "जय-विजय " बुरुज आणि त्यात बेमालून दडलेला महादरवाजा..पुढे तसेच आम्ही वर गेलो...तिथे समोर आले " हत्तीतलाव" आणि गंगासागर तलाव".. नगारखाना पाहत राजवाड्या परेंत आलो. संपुर्ण राजवाडा पहाण्यास तब्बल २ तास लागले, अष्टप्रधान वाडा ,कामकाजाचे ठिकाण,मेणा दरवाजा,राण्यांनासाठी असणारे वाडे,पालखी दरवाजा, टांकसाळ,मनोरा.
काय मंतरलेली...थंडीने भरून टाकलेली ती गुलाबी पहाट होती ती...जवळ जवळ तीन तास आम्ही तिघेच होतो आणि सोबत सह्याद्री...दमत..धापा टाकत .. झोपत कसे तरी वर चढून गेलो आम्ही..मग ३ ते ४ तास वेडयासाखे फिरत होतो आम्ही... एक स्वर्गीय अनुभव हाताशी होता...सर्व आटपून २ वाजता खाली आलो ...तिथे मात्र पटकन S. T मिळाली...गाडीतून पाठी बघताना रायगड आमच्याकडे बघून मस्त हसत होता महाड डेपो ला परत यायला ४ ते ५ वाजले होते... सकाळचा डेपो आणि आताचा डेपो जमीन-अस्मानाचा फरक होता...पूर्ण डेपो गजबजला होता...मुंबई कडे जाणारी S. T पकडली आणि शरीराने आम्ही तिघे रात्री ९ ते १० वाजता घरी आलो...पण मनाने मात्र अजूनही आम्ही तिथेच आहोत.....