निकालाची परीक्षा – १
वेळ दुपारचे तीन. स्थळ कुलकरण्यांचा फ्लॅट.सदाशिव कुलकर्णी धापा टाकत घरी पोचले होते.
"आला का तो? काही कळले का?"
सदाने उपस्थित सर्वांकडे एकदा आशेने नजर फिरवली आणि सर्वांची शांतताच त्याला योग्य ते उत्तर देऊन गेली. हताशपणे त्याने त्याचे सामान बाजूला ठेवले आणि सोफ्यावर बसलेल्या गंगाधर कुलकर्णी अर्थात सदाचे वडील यांच्या शेजारी जाऊन बसला.
वडिलांचा हात पाठीवर फिरताच तो स्वतःच्या भावना आवरू शकला नाही.
"सदा, अरे असा रडतोस काय? येईल तो इतक्यात." - सदाचे वडील
प्रसंगच तसा बाका होता. सदाशिव कुलकर्णी यांचे जेष्ठ सुपुत्र म्हणजेच निनाद कुलकर्णी शाळेतून अजून परत घरी आले नव्हते. शाळा आणि घर यातील जेमतेम दहा मिनिटांचे अंतर त्याने चार तास झाले तरी पार केले नव्हते. सौ. कुमुद सदाशिव कुलकर्णी मागील तीन तास त्याची आतुरतेने वाट पाहत होत्या. सोसायटीमधील त्याच्या शाळेतील इतर मुले कधीच घरी परतली होती.
एरवी निनाद अतिशय आज्ञाधारक सुपुत्र होता. आई-वडिलांचे ऐकले नाही असे प्रसंग अपवादानेच घडले असावेत, नेहमीच शाळेतून थेट घरी यायची अतिशय चांगली सवय आईने त्याला बोलून-ओरडून लावली होती. त्यामुळे शाळा सुटल्यावर जास्तीत जास्त पंधरा मिनिटात त्याला घरी पाहण्याची सगळ्यांनाच सवय लागली होती आणि आज चक्क चार तास झाले तरी तो घरी परतला नव्हता. आता नक्की काय करायचे असा प्रश्न साहजिकच सगळ्यांना पडला होता. असे प्रसंग क्वचितच अनुभवल्यामुळे सगळे चिंतेत असणे सहाजिक होते.
"तुम्ही कुठे शोधाशोध केलीत का?" - सदाशिव
"नाही, फार काळजी वाटली म्हणून पहिला फोन तुम्हालाच केला. तुम्ही घरी येत आहात म्हणल्यावर आम्ही तुमची वाट बघायचे ठरवले." - कुमुद
सदा ते उत्तर ऐकून जरा नाराजच झाला.
"अरे अशा वेळी माझी वाट बघायचे सोडून तुम्ही काही हालचाल का नाही केलीत. तुम्हाला प्रसंगाचे गांभीर्य समजत नाही का?" - सदा चढ्या आवाजात ओरडला आणि परिणामस्वरूप कुमुदच्या डोळ्यातून आतापर्यंत थोपवून धरलेल्या अश्रूंच्या धारा मुक्तपणे वाहू लागल्या. सदाच्या आईने प्रसंग सावरून घ्यावा अशी सदाची अपेक्षा असावी, म्हणून त्याने अत्यंत आशेने आईकडे बघितले परंतु तेथील परिस्थितीपण फार वेगळी नव्हती. आईच्या डोळ्यातून बाहेर येऊ पाहणारे अश्रुंचे दोन थेंब सदाने त्याच्या चष्म्यामागून लगेच हेरले आणि हताशपणे वडिलांकडे बघितले.
"एक काम करा, त्याच्या जवळच्या मित्रांकडे फोन करून बघा. गेला असेल कोणाकडे तरी खेळायला." - सदाचे वडील.
"माझा निनाद असे करणार नाही." - कुमुद अतिशय खात्रीने म्हणाली.
सदा मात्र तिच्या बोलण्यामुळे अजूनच चिडला.
"सगळे आईचेच लाड आहेत हे, त्यामुळेच चिरंजीव हाताबाहेर चालले आहेत." - सदा कुमुदला उद्देशून बोलला आणि आईने इशाऱ्यानेच शांत रहा असे त्याला सुचवले. कुमुद मात्र अपमानित झाल्यामुळे आतील खोलीत निघून गेली.
"अरे, त्याच्या मित्रांचे फोन असलेली वही तरी आणून द्या!! मी फोन करतो, तेवढे तरी जमेल का?" - सदा
सदाचा स्वभाव तसा शांत होता पण राग आल्यावर मात्र समोर कोण आहे याची तमा तो बाळगत नसे, समोरच्याला आपल्या बोलण्याने किती वाईट वाटत असावे याचे त्याला अजिबात भान रहात नसे.
"सदा जरा शांत पणाने घे, इथे सगळेच चिंतेत आहेत." - सदाचे वडील.
वडिलांच्या आज्ञेपुढे मात्र सदाचे काहीच चालत नसे. कुलकर्णी कुटुंबाचे संस्कारच होते तसे. शिवाय आपणच वडिलांची अवज्ञा केली तर आपल्या मुलावरही तसेच संस्कार होतील हे सदाला पक्के ठाऊक होते, त्यामुळे आपल्या हातून वडिलांची अवज्ञा होणार नाही याची विशेष काळजी तो घेत असे.
कुमुदने निमूटपणे वही आणून दिली. फोन मध्ये सगळे नंबर असतानाही अशी वेगळी वही लिहिण्याचा त्याचा वैयक्तिक हट्टच होता. त्यामुळे त्याच्या फोनमध्ये केवळ गरजेपुरतेच नंबर असत. वहीत मात्र सगळेच नंबर सुरेख हस्ताक्षरात शिस्तबद्ध पद्धतीने नोंदवले असल्याने सदाला नंबर शोधायला फार कष्ट पडले नाहीत. एक एक करून निनादच्या मित्रांच्या घरी फोन करायला सुरुवात केली. सगळीकडे त्यांच्या मुलांच्या मार्कांचे गुणगान सुरु होते. त्यामुळे सदा मोकळेपणाने निनादविषयी विचारू शकत नव्हता.
निनादने केवळ हुशार मुलांशीच मैत्री करावी अशीही शिकवण त्याला जाणीवपूर्वक देण्यात आली होती. त्याच्या मित्रांचे मार्क ऐकून सदा मनोमन सुखी होत होता आणि त्याच वेळी निनादच्या पत्ता लागत नसल्याने त्याच्या मनात नाना शंकाही येऊ लागल्या होत्या.
शेवटचा फोन त्याने सागरच्या घरी लावला. निनादने सागरशी फार मैत्री वाढवू नये असे सदाचे मत होते, तसे त्याने निनादला बाजावलेही होते. त्यामुळेच निनाद सागरकडे जाण्याची शक्यता कमी होती. म्हणून खरेतर सदा सागराकडे फोन करायचे टाळत होता. पण निनाद इतर कोणाकडेच गेला नसल्याने नाईलाजाने त्याला सागर कडे फोन लावावा लागला.
"हॅलो, मी सदाशिव कुलकर्णी. निनादचे वडील." - सदा
"हो, बोलाना कुलकर्णी. सागर सध्या घरात नाही आहे. खाली खेळायला गेला आहे तो." - सागरची आई
"मग किती मार्क पडले सागरला?" - सदा, सदाला थेट मुद्द्याला हात घालणे रास्त वाटले नाही.
"सागरला का? अहो त्याला पंच्याऐंशी टक्के पडले. एटी फाईव्ह." - सागरची आई अतिशय आनंदाने सांगत होती.
सदाला मात्र त्यांना नक्की कशाचा आंनद होत आहे हे समजत नव्हते कारण त्याच्या मते किमान नव्वद टक्के मिळवणे ही काळाची गरज होती. त्यामुळे निनादला आपण सागर पासून दूर रहायला सांगून कसे बरोबर केले आहे याची त्याला खात्री पटली.
"अरे वा, छानच की." - सदा काहीश्या नाराजीनेच म्हणाला.
"तसे नाही, निनादपेक्षा थोडे कमी आहेत पण ठीक आहेत. आम्ही सागरला मार्क कमावण्यासाठी फार ताण देत नाही. त्यामुळे पांच्याऐंशी सुद्धा चांगलेच वाटले मला, मान्य आहे निनादपेक्षा 4 टक्के कमी आहेत. पण नव्वदसाठी एक टक्का हुकला म्हणून उदास होणाऱ्या निनादप्रमाणे त्याने वागू नये असे मला वाटते.
त्यामुळे तो खुष आहे आणि खाली निवांत खेळतो आहे.
तुमच्या निनादप्रमाणे शाळेच्या चौथऱ्यावर घरी काय संगायचे याची काळजी करत रडत बसलेला नाही." - सागरची आई.
सदाच्या बोलण्यातील नाराजी सागरच्या आईने अचूक हेरली होती. सदाविषयी सागरच्या आईचे मत देखील फारसे चांगले नव्हते आणि ते सदापर्यंत पोचवायची संधी त्यांनी कधीच सोडली नाही.
सागरच्या आईच्या बोलण्यामुळे मात्र सदाचा भावनिक गोंधळ झाला होता. अनेक भावना त्याच्या मनात उचंबळून येत होत्या.
निनादला एक टक्का कमी पडल्याने त्याचा राग राग होत होता. परीक्षेच्या वेळी निनाद हट्टाने रोज एक तास खेळण्यात घालवत असे, त्याच ऐवजी जर तोच वेळ अभ्यासात घालवला असता तर हा एक टक्का सहज कमावता आला असता या सदाच्या मताला निनादच्या निकालामुळे दुजोरा मिळाला होता. त्याचवेळी स्वतःच्या मुलांविषयी इतकी निष्काळजी असलेली बाई आपल्याला या कारट्यामुळे बोलली हा अपमान पचवणे जड जात होते, त्याचवेळी निनादने चौथऱ्यावरच रडत बसून घरच्यांची अब्रू चव्हाट्यावर आणली याचाही त्याला रागच येत होता.
कुमुदने देखील निनादकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे असेही त्याचे मन त्याला समजावू पाहत होते.
या भावनिक गोंधळामुळे तो हातातील फोन खाली ठेवायलाच विसरला, त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला. त्याचा राग पाहून आता हा रागाचा गोळा कोणावर फुटणार या भीतीने सगळ्यांनाच अस्वस्थ केले.
"अरे बाबा काय म्हणाल्या त्या?" - सदाच्या वडिलांनी सदा आपल्यावर काही ओरडणार नाही या खात्रीने विषयाला हात घातला.
"एक टक्का कमी पडला आहे निनादला." - सदा
"म्हणजे नापास झाला का तो?" - सदाच्या वडिलांनी निरागसपणे प्रश्न विचारला.
बाबांच्या या प्रश्नाचा सदाला खरेतर खूप राग आला होता.
"बाबा, नापास कसा होईल तो? एकोणनव्वद टक्के पडले आहेत त्याला."- सदानें स्वतःचा राग आवरत उत्तर दिले आणि त्याच्या वडिलांनी कपाळावर हात मारून घेतला.
"अरे मग चिडतोयस कसला, पेढे वाट. एवढे मार्क आमच्या पिढीने कधी पहिले नाहीत बाबा.
आमच्या वेळी असे मार्क पडले असते तर आम्हाला आकाश ठेंगणे झाल्यासारखे वाटले असते समजलास काय?" - सदाचे वडील सदाची समजूत घालण्यासाठी म्हणाले.
सदाला वडिलांचा हा तर्क कधीच पटला नव्हता.
"काळ बदलला आहे." - एवढेच वाक्य सदा अतिशय संयमाने म्हणाला आणि तेवढ्यात दारावरची बेल खणणली.
घरात त्या क्षणभर एक अस्वस्थ शांतता पसरली, याचवेळी निनाद घरी परतला असल्याच्या शक्यतेने कोमल आणि सदाची आई मनातून आनंदित झाल्या.
"आला वाटते घरी, बघतोच आता त्याच्याकडे."
असे बोलत सदा दाराकडे सरसावला. सदाच्या त्या आवेशामुळे निनादला नक्कीच मार बसेल आणि सदा कोणाचेही ऐकणार नाही अशी काळजी त्यांना वाटत होती. त्यामुळे निदान आता तरी दारावर निनाद नसुदेत अशी मनोमन प्रार्थना कुुमुद आणि सदाची आई करू लागली.
सदानें दार उघडले आणि समोरील पिंकीचा मंजुळ आवाज ऐकून दोघींनी निनादसाठी सुटकेचा निश्वास टाकला.
"काका, हे घ्या पेढे. मला 92 टक्के पडले." - अतिशय गोड आवाजात पिंकीने तिचे मार्क सांगितले. घरातील सगळ्यांना पेढे वाटले मोठ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. तिची शिस्त पाहून आणि मार्क ऐकून सदा चांगलाच खुश झाला.
"काका, निनाद कुठे आहे?" - पिंकीने घरभर नजर फिरवत विचारले.
"अग खाली गेला आहे तो. येईल इतक्यात." - कुमुदने प्रसंग सावरून घेत सांगितले.
"ठीक आहे, हा त्याचा पेढा. मला अजून समोरच्या बिल्डिंगमध्ये पण जायचे आहे." - पिंकी तेथून पळत पळत बाहेर गेली. तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.
"बघितलेस, थोड्याशा कौतुकाने मुले किती आनंदित होतात." - सदाचे वडील सदाला समजावत म्हणाले.
"बाबा अशी शिस्त आणि असे मार्क असल्यावर कोण बरे ओरडले अशा मुलीला? निष्काळजीपणा आणि बेशिस्त दिसली तरच मी ओरडत असतो निनादला." - सदा त्याची बाजू मांडत म्हणाला.
"हो जस काही काल रात्रीच तुम्हाला कळले होते, त्याला कमी मार्क पडणारेत म्हणून." - कुमुद सगळी हिंमत एकवटून म्हणाली आणि सदाने रागाचा कटाक्ष तिच्याकडे टाकला.
"सूनबाई तू अजिबात घाबरू नकोस.
सदा तू काल काही बोललास का निनादला?" - सदाच्या वडिलांनी कुमुदला अभय दिले आणि सदाला जाब विचारला. सदा खाली मान घालून शांत उभा होता.
"काल खूप ओरडले हे निनादला. तो बिचारा झोपेतून सुद्धा घाबरून उठला होता निकालाच्या भीतीने. आज निकाल काय लागणार आणि मार्क कमी पडले तर बाबा मारणार तर नाहीत ना, याचीच भीती वाटत होती त्याला." - अभय मिळाल्यामुळे कुमुद आता अधिक धीराने आणि सविस्तर बोलू लागली.
"अरे सदा, कधी सुधारणार रे तू? मुलाला इतका धाक असणे बरे नव्हे.
ओरडले नाही तर मुलगा बिघडेल अशी भीती तुला वाटणे सहाजिक आहे पण मला सांग मी तरी ओरडायचो का तुला? आणि न ओरडल्याने तू बिघडलास का? सगळे सुरळीत चालू आहे न." - सदाचे वडील सदाला समजावत म्हणाले.
"बाबा, मुळातच मी शिस्तप्रिय होतो. तुम्हाला बोलायला जागा मिळू नये म्हणून तुमचे सगळे नियम न चुकता पाळायचो, अर्थात अजूनही पाळतो. कारण ते पाळल्याने माझ झाला तर फायदाच आहे हे मी माझ्या मनावर लहानपणापासून बिंबवले आहे." - सदा परत त्याची बाजू मांडू लागला.
त्याच्या बोलण्यातही तथ्य होते. सदा नेहमीच आज्ञाधारक सुपुत्र होता, वडिलांचा अपेक्षभंग फारच क्वचित त्याने केला होता. त्यामुळे सदाचा हा मुद्दा खोदून काढणे सदाच्या वडिलांना फारच जड जाणार होते. सदाला काय उत्तर द्यावे याचा विचार करत असताना परत एकदा दारावरची बेल वाजली.
यावेळी मात्र निनाद आला असेल या कल्पनेने कुमुद आणि सदाची आई दोघीदेखील आनंदित झाल्या होत्या पण दरवाजा उघडताच दोघींचाही भ्रमनिरास झाला आणि बाहेर उभ्या असलेल्या शेजारवर्गाला बघून त्यांचे चेहरे परत दुःखी झाले. शेजारच्या पिंकीने स्वतःचे मार्क सांगताना कुलकरण्यांचा निनाद अजून घरी आलेला नाही ही बातमी पसरवण्याचे काम नकळतच पण अचूक केले होते.
त्यांनंतर मात्र नकळतच घरचे वातावरण कधी शोकसभेत रूपांतरित झाले कोणालाच कळले नाही. कोणी निनादच्या आठवणी सांगत होता, तर कोणी त्याचे गुण ऐकवत होता. एकमेकांकडे बघून बायका आपल्या डोळ्यातील आसवांना मुक्त करत करत होत्या. हा सगळं प्रसंग पाहून सदाचाही धीर सुटत चालला होता, आपण उगाचच निनादला ओरडत असतो असे त्याचे मन त्याला समजावू लागले होते. सदाचे वडील त्याच्या शेजारी बसून त्याच्या पाठीवर हात फिरवून त्याला धीर देत होते.
एवढ्यात दारावर पोलिसांच्या काठीने टक टक झाली.
पिंकीचे वडील आले होते. ते जवळच्याच पोलीस ठाण्यात सबइन्सपेक्टर या पदावर काम करत होते. पिंकी आणि निनादच्या मैत्री मुळे ते निनादला आणि सदाला बऱ्यापैकी ओळखत होते. म्हणूनच कामातून वेळ काढून आणि आपल्या पदामुळे काही मदत करता येईल या उद्देशाने ते सदाकडे आले होते.
"कुलकर्णी येऊ का आत?" असे म्हणत ते घरात घुसले. घरात सभोवताली त्यांची पोलिसी नजर फिरवली. घरातील वातावरण बघून ते अस्वस्थ झाले.
"किती वेळ झाला निनाद मिसिंग आहे?" - पिंकीचे वडील.
घरातील शोकाकुल वातावरण बघून त्यांनी अत्यंत सामंजस्याने मुद्द्याला हात घातला होता.
पण मिसिंग हा शब्द आणि घरातील वातावरण याच्या मिश्रणाने त्या प्रश्नाचा सदा आणि कुटुंबियांवर अतिशय नकारात्मक परिणाम झाला. परिणामस्वरूपी घरातील वातावरण अजूनच शोकाकुल झाले.
"साधारण चार-पाच तास झाले असतील." - सदानें स्वतःला सावरत कसे बसे उत्तर दिले.
"म्हणजे फार वेळ गेलेला नाहीये. मला सांगा तुम्हाला काही चिट्ठी मिळाली का? की कुणाचा फोन वैगेरे?" - पिंकीचे वडील. आता मात्र ते पूर्ण पणे पोलिसिडोक्याने या प्रकरणाकडे पाहू लागले होते.
"म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे तुम्हाला?" - सदा अतिशय निराशेने म्हणाला.
पिंकीचे वडील सदाला उत्तर देणारच होते तेव्हाच सदाच्या वडिलांनी त्यांना अडवले. मी बोलतो असे खुणेनेच सांगितले. त्यांची पोलिसी भाषा सदाला फार पचणार नाही आणि प्रसंग हाताबाहेर जाईल हे सदाच्या वडिलांनी अचूक हेरले होते.
"अरे, निनाद अजून घरी आलेला नाही याच्या त्यांच्या मनात दोन शक्यता निर्माण झाल्यात. पहिली म्हणजे तो स्वतःहून घर सोडून गेला आहे आणि दुसरी म्हणजे त्याचे शाळेतून घरी येताना त्याचे कोणीतरी अपहरण केले आहे.
जर पहिली शक्यता खरी धरली तर निनादने आपल्यासाठी काही चिट्ठी वैगेरे लिहिली असावी असा त्यांचा अंदाज आहे आणि दुसरी शक्यता गृहीत धरली तर खंडणीसाठी फोन येईल असे त्यांना वाटते." - सदाच्या वडिलांनी अत्यंत समर्पक शब्दात पिंकीच्या वडिलांच्या प्रश्नाचा अर्थ सदाला समजवला.
- क्रमशः