गणपती बाप्पा मोरया - भाग-१ Vrishali Gotkhindikar द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गणपती बाप्पा मोरया - भाग-१

गणपती बाप्पा मोरया....!!!

आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे वेध भक्तांना खुप आधीपासून लागलेले असतात.

गणपतीचं आगमन, त्याची पूजा, गणेशोत्सावाचा सोहळा आणि गणेश विसर्जन महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात. एवढंच काय तर अगदी विदेशातही धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो.

संपूर्ण भारतात आणि विदेशातही लोक आपापल्या परंपरेनुसार दीड दिवस ते अगदी 11 दिवसापर्यंत गणपतीची स्थापना करून गणेशोत्सव साजरा करतात.

भारतातुन गणपतीच्या मुर्ती विदेशात पाठवल्या जातात.

भगवान शंकर आणि पार्वती पुत्र गणपती हे बुद्धीची देवता आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आद्य देवता गणपतीची स्थापना करून पुजा केली जाते.

हिंदू धर्मात भगवान श्री गणेशाला प्रथम पूजेचा मान आहे. कोणतंही कार्य असल्यावर सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते.

कारण गणपती विघ्नहर्ता आहे. गणपतीची अनेक नावं आहेत त्यापैकीच हे एक नाव.

विघ्नहर्ता अर्थात संकटाचं हरण करणारा असं आहे. म्हणून प्रत्येक शुभ कार्याच्या वेळी सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते.

तसंच गणेशोत्सवाचा पहिला दिवस असतो गणेश चतुर्थीचा. या दिवशीच प्रारंभ होतो गणेशोत्सवाला. गणेशाच्या आगमनाने सगळीकडेच भक्तीमय वातावरण दिसुन येते.

हिंदू कॅलेंडरनुसार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते.

गणपती बाप्पाचा जन्मदिवस म्हणून गणेश चतुर्थी साजरी केली जाते. असं मानलं जातं की, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षादरम्यान गणपती म्हणजेच गण+पती = गणपती देवाचा जन्म झाला होता.

इंग्रजी कॅलेंडरनुसार हा दिवस ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येतो. हा दिवस चार्तुमासात येतो. चार्तुमास हे अनेक सणांनी भरलेले चार महिने आहेत.

गणेश ही विद्येची देवता

संकटांचं निवारण करणारी देवता

गणांचा अधिपती

शुभ कार्याचा जनक

कोणत्याही चांगल्या कार्याच्या आरंभी ' श्री गणेशाय नम: ' म्हणून गणेशाची स्तुती व आराधना करण्याचा प्रघात आहे.

त्याचप्रमाणे अध्ययनाच्या आरंभीही गणेशाचा नामोच्चार करतात.

हा देव सकळ विघ्नांचा हर्ता व मंगलमूर्ती असा मानला जात असल्यामुळे या देवाचे पूजन सर्वांच्या घरी होते.

गणपतीला हत्तीचे मुख कसे लागले याविषयी अनेक आख्यायिका आहेत त्यापैकी एक अशी आहे की

पार्वतीला वाटले आपल्याला एक मुलगा असावा ,पण शंकराला अजिबात वेळ मिळेना मग पार्वतीने आपल्या मळा पासुन एक मुलगा निर्माण केला होता.

ज्याला नायक नाही तो “विनायक “असे तिने त्या बालकाचे नामकरण केले होते .

एकदा पार्वती आंघोळीला गेली असता तिने त्या बालकाला राखण करण्यासाठी बाहेर ठेवले होते .

अचानक शंकराचे आगमन झाले या बालकाने त्यांना आत जाण्यापासून अडवले .शंकराला अतिशय राग आला व त्याने त्या बालकाचे मुंडके उडवले .

पार्वतीदेवी जेव्हा स्नान करून बाहेर आली तेव्हा तिने हा प्रकार पाहिला आणि ती खुप संतापली .

ते धडावेगळं शिर पाहून तिने आक्रोश करून पूर्ण ब्रम्हांड हादरवून सोडलं.

सर्व देव अगदी ब्रम्हदेवापासून सगळ्या देवानी पार्वतीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला , पण पार्वती कोणाचं काहीही ऐकून घेइना .

तेव्हा भगवान शंकरांनी आपल्या गणाला आदेश दिला की, पृथ्वीतलावर जाऊन सर्वात आधी जो प्राणी दिसेल त्याचं शिर कापून घेऊन ये .

गण बाहेर पडल्यावर सर्वात आधी त्याला हत्ती दिसला.

तो त्याचं शिर घेऊन आला .

भगवान शंकरांनी ते शिर बालकाला लावले आणि त्याला जिवंत केले. हा पार्वतीचा मानस पुत्र गज (हत्ती) आनन (मुख) म्हणजेच गजानन म्हणून ओळखला जातो .

शंकर देवाने त्याला गणाचा ईश म्हणेज देव म्हणून गणेश नाव ठेवलं.

हा दिवस चतुर्थीचा होता. त्यामुळे चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणून महत्त्व आहे.

पण पार्वतीने शंका उपस्थित केली की अशा तोंड हत्तीचे व शरीर माणसाचे अशा बालकाची पूजा कशी केली जाईल .

तेव्हा शंकराने सर्व गणाना बोलावले व सांगितले की हे बालक खुप “शुभ “आहे व सर्वांनी याची पूजा केल्यास सर्व कार्य सिद्धीस जाईल .

गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक होय. गणांचा अधिपति म्हणून गणपती असेही नाव या देवतेस आहे.तेव्हापसुन हे बालक गणपती म्हणुन ओळखले जाऊ लागले व सगळीकडे प्रथम पूजनीय झाले .

सर्व सिद्धी त्याच्यापासुन प्राप्त होतात म्हणून त्याला “सिद्धिविनायक “असेही नाव प्राप्त झाले .

शनीच्या कटाक्षापासून होणाऱ्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करून पार्वतीने एकदा शनीला गणपतीकडे बघण्यास सांगितलं.

कारण तिला आपल्या पुत्राचा फार अभिमान होता.

त्याला काहीही होणार नाही अशी तिची खात्री होती .

शनीने गणपतीकडे दृष्टी फिरवताच गणपतींचं मस्तक जळून खाक झालं

तेव्हा पार्वतीला अतिशय दु:ख होऊन तिने ब्रह्मदेवास ही हकीकत कथन केली.

ब्रह्मदेवाने तिला सांगितलं की तुला पहिल्या प्रथम ज्या प्राण्याचं मस्तक मिळेल ते मस्तक धडाला लाव म्हणजे गणपती पूर्ववत होईल. ब्रह्मादेवाच्या सांगण्याप्रमाणे ती मस्तकाच्या शोधात निघाली .

प्रथम तिला हत्तीचं मस्तक मिळाले . याप्रमाणे गणपती 'गजवदन ' झाला .

गणपती “एकदंत” कसा झाला याची पण एक कथा आहे .

एकदा परशुराम शंकराची भेट घेण्यासाठी कैलास पर्वतावर जातात. त्यावेळी शंकर निदिस्त असतात.

तेव्हा परशुरामाला अंतर्गृहात येण्यास गणपती मज्जाव करतो.

त्या दोघांमध्ये बाचाबाची होऊन युद्ध जुंपतं.

गणपती परशुरामाला आपल्या सोंडेत धरून गरगर फिरवताच त्याला मूर्च्छा येते

सावध झाल्यानंतर परशुराम आपला परशू गणपतीवर फेकतात. शंकरानेच तो परशू परशुरामाला दिलेला असतो. त्यामुळे गणपती आदराने तो आपल्या एका दातावर झेलतो .

पण त्यामुळे त्याला तो दात गमावावा लागतो.

म्हणूनच गणपतीला ' एकदंत ' किंवा ' एकदंष्ट ' असं म्हणतात.

व्यासांनी सांगितलेलं महाभारत गणपतीने लिहिलं अशी समजुत आहे. अंगाने स्थूल , किंचित पिवळट वर्णाचा , मोठ्या पोटाचा , चार हात असलेला व एकदंत , हत्तीचं डोके असलेला , असं गणपतीचं रूप पुराणात वर्णिले आहे. त्याने आपल्या चारही हातात शंख , चक्र , गदा व पद्म ही आयुधं धारण केली आहेत. उंदराला त्याने आपले वाहन केले आहे .

पुराणामध्ये एका अध्यायात राधा गणेशाची पूजा करत असे , असं सांगितलं आहे.

गणेश खंडात शिवाने गणपतीला प्रसन्न करून घेण्यासाठी दहा वर्षं घोर तपश्चर्या केली व त्यापासून त्रिपुरासुराचा वधाचा वर प्राप्त करून घेतला असं वर्णन आलेलं आहे.

क्रमशः