भादपद शुद्ध चतुर्थीस (गणेश जन्मदिवसापासून) या सणाला आरंभ होतो. गणेशदेवता व शेतीचा हंगाम यांचा संबंध जोडला जातो .
कारण पावसाला उशीर झाल्यामुळे आगामी पीकपाण्याबद्दल अनिश्चितता वाटू लागल्यावर ' विघ्नहर्ता ' गणेशाचं पूजन करणं हे प्रसंगोचित व जरूरी असते व या पूजेनंतर त्यानंतर पावसाचे आगमन होते .
विनायकी व संकष्टी चतुर्थी या व्रतांचा संबंध चंद्राकडे नसून गणेशाकडेच आहे.
परंतु गणेश व चंद्र यांचाही अन्योन्य संबंध आहे .ही गोष्ट गणेशचतुर्थीस दिसून येते.
गणपतीची कोणतीही मूर्ती पाहिली तरी गणपतीबाप्पांच्या पायाशी वाहन म्हणून असलेला मूषक किंवा उंदीर दिसतोच.
उंदीर हेच गणपतीचे वाहन म्हणून आपण मानतो. याबद्दल एक कहाणी या प्रकारे आहे:
एकदा इंद्रसभेत गंभीर विषयावर चर्चा सुरू होती परंतू क्रौंच नावाच्या गंधर्वाचे मन अजून कुठेतरी रंगलेले होते.
क्रौंच तेथे उपस्थित असलेल्या अप्सरांसोबत थट्टामस्करी करत होते.
हे बघून इंद्र नाराज झाले आणि त्यांनी गंधर्वाला शाप दिला, की आता तू उंदीर होशील.
या शापाने क्रौंचाचे उंदरात परिवर्तन झाले.
तो उंदीर पराशर ऋषींच्या आश्रमाजवळ पडला.
या उंदराने पराशर ऋषींच्या आश्रमात खूप धुमाकूळ घातला. आश्रमातल्या अन्नधान्याची नासाडी करण्यास सुरुवात केली. आश्रमातील ग्रंथ-पोथ्या, कपडेसुद्धा त्याने कुरतुडून टाकले.
त्याने आश्रमवासी आणि पराशरऋषींना भंडावून सोडले. शेवटी पराशरऋषींनी श्रीगजाननाची प्रार्थना केली, ‘ हे गजानन! आम्हाला या उंदराच्या त्रासापासून सोडव.’
मग गणपतीने तेथे प्रकट होऊन आपला पाश उंदरावर टाकला. पाताळात उंदराचा पिच्छा करत पाशने त्याचा कंठ बांधला आणि त्याला गणपतीसमोर आणले .
तेव्हा तो उंदीर आपली सुटका करावी म्हणून गणपतीकडे गयावया करु लागला.
उंदीर शरण आला म्हणून गणपतीने त्याला वर मागण्यास सांगितले. पण उंदराचा “उन्मत्तपणा” अजूनही गेला नव्हता.
त्याने गर्विष्ठपणे गणपतीलाच म्हटले, ‘मला तुझ्याकडून कोणताही वर नको आहे .
हवं असल्यास तुच माझ्याकडे वर माग.’
त्याचा हा “उध्दटपणा” पाहून गणपती स्मितहास्य करीत लगेच म्हणाला
‘जर तुझं वचन सत्य आहे तर आजपासून तु माझे वाहन हो.’
उंदराने “तथास्तु” म्हटले आणि गणपती लगेच उंदराच्या पाठीवर आसनस्थ झाले.
मग मात्र गणपतीचा भार उंदराला सहन होईना ,तेव्हा उंदराने प्रार्थना केली की मला तुझा भार सहन करण्यायोग्य बनव .
आणि त्या दिवसापासुन उंदीर गणपतीचे “वाहन” झाला.
एकदा गणेश आपल्या मुषक वाहनावरून निघाले असताना त्याला पाहुन चंद्राला फार हसु आले व त्याने गणपतीच्या मोठ्या पोटाची व त्याच्या छोट्या वाहनाची ,मुषकाची चेष्टा केली .
तेव्हा गणपतीला राग आला व त्याने त्याला शाप दिला की गणेशचतुर्थी दिवशी तुझ जो तोंड बघेल त्याच्यावर चोरीचा “आळ” येईल त्यामुळे तुझ्याकडे कोणीही पाहणार नाही .
चंद्राला पश्चात्ताप झाला त्याने गणपतीची क्षमा मागितली व उश्शाप देण्याची विनंती केली .
तेव्हा गणपतीने त्याला उश्शाप दिला की दर संकष्टीला मात्र तुझे तोंड पाहिल्याशिवाय कोणीही उपास सोडणार नाही .
चतुर्थीचा चंद्र पाहणं व विपद्ग्रस्त होणं या गोष्टी मराठीत समानार्थी मानल्या जातात.
पुराणात- गणपतीचे चार व आठ अवतार अनुक्रमे सत्ययुगात , त्रेतायुगात , द्वापारयुगात व कलियुगात झाले असा उल्लेख आहे.
हे अवतार खालीलप्रमाणे मानले जातात .
“महोत्कट विनायक”
हा दशभुजाधारी व रक्तवर्णी अवतार. याचे वाहन सिंह. या अवतारात त्याने नरान्तक आणि देवान्तक नावाच्या दोन असुर भावांचा व धूम्राक्ष नावाच्या दैत्याचा वध केला.
“मयूरेश्वर”
हा सहा भुजांचा व श्वेतवर्णी अवतार आहे. याचे वाहन मोर आहे. त्रेतायुगात शिवपार्वतींचा पुत्र म्हणून हा जन्मला. या अवतारात सिंधू नामक दैत्याचा त्याने वध केला. अवतारसमाप्तीच्या वेळी आपले वाहन असलेला मोर त्याने त्याचा भाऊ कार्तिकेय यास दान केला .
मोरगाव येथे मोरेश्वराचे मंदिर आहे.
“गजानन”
हा चतुर्भुज व रक्तवर्णी अवतार. वाहन उंदिर. द्वापार युगात शिवपार्वतींचा पुत्र म्हणून जन्मला. या अवतारात सिंदूर नामक दैत्याच्या वध केला.अवतारसमाप्तीच्या वेळेस राजा वरेण्य यास गणेश गीता सांगितली.
“धूम्रकेतु”
द्विभुज अथवा चतुर्भूज व धूम्रवर्णी अवतार. वाहन निळा घोडा. हा अवतार कलियुगाच्या शेवटी अवतीर्ण होईल व अनेक दैत्यांचा नाश करेल असे सांगितले जाते.
गणपतीच्या आणखीनआठ अवतारांचे वर्णन खालीलप्रमाणे ..
“वक्रतुण्ड “
हा प्रथम अवतार. याचे वाहन सिंह असून या अवतारात मत्सर्यासुराचा (अर्थात मत्सराचा) वध त्याने केला अशी आख्यायिका आहे.
“एकदन्त “
आत्मा व परमब्रह्माचे प्रतीक म्हणून हा अवतार ओळखला जातो. याचे वाहन मुषक असुन या अवतारात त्याने मदासुराचा वध त्याने केला अशी आख्यायिका आहे.
“महोदर”
वक्रतुण्ड व एकदंताचे सम्मिलित रूप. बह्माच्या प्रज्ञेचे प्रतीक। मोहासुर (अर्थ मोह) याचा वध केला. हा अवतारही मूषकवाहन आहे.
“गजवक्त्र वा गजानन”
महोदर अवताराचे अन्यरूप. लोभासुर (लोभ) याचा वध केला.
“लंबोदर”
ब्रह्माच्या शक्तीचे प्रतीक.वाहन मूषक. क्रोधासुराचा वध केला.
“विकट “
सूर्याचे प्रतीक. कामासुराचा वध केला. वाहन मयूर.
“विघ्नराज”
विष्णूचे प्रतीक.ममासुराचा (अहंकार) वध हा या अवतारचे उद्देश्य.
“धूम्रवर्ण “
शिवाचे प्रतीक. ब्रह्माच्या विनाश शक्तीचे प्रतीक. वाहन घोडा.अभिमानासुराचा नाश केला.
पेशव्यांच्या राजवाड्यात प्रतिवर्षी भादपद शुद्ध चतुर्थी ते दशमीपर्यंत गणेशोत्सव होत असे.
त्याप्रसंगी गणपती रंग महालात मोठी आरास केली जाई. सर्व कार्यक्रम तिथेच होत असे . स्वच्छ हंडे , झुंबरे , मोठाले आरसे व विविध चित्रं यामुळे त्या महालाचं सौंदर्य द्विगुणित होत असे.
मध्यावर सोन्याच्या भरजरीचं काम जिच्यावर केलं आहे अशी पेशव्यांची ' मनसद ' उर्फ गादी मांडलेली असे.
दोन्ही बाजूला मुख्य मराठे सरदार , शिलेदार व दरबारी हे भरजरी पोशाख घालून आपापल्या दर्जाप्रमाणे रांगेने बसलेले असत.
भालदार , चोपदार यांच्या ललकारीत स्वारी दरबारात प्रवेश करून मोठ्या ऐटीने सिंहासनारूढ होत असे.
गणपती रंग महालात त्यावेळी गाणं , नाच , कथा-कीर्तनं वगैरे कार्यक्रम होत.
या उत्सवात सर्व नोकर- चाकर मोठ्या हौसेने मिसळत. त्यांना पेशव्यांकडून मिठाई वाटण्यात येई.
या काळात बरीच ब्राह्माणभोजनं होत.
विसर्जनाच्या दिवशी पुष्पांनी शृंगारलेल्या पालखीतून थाटाची मिरवणूक काढून गणपती विसर्जन होई
त्यावेळी पेशवे आपल्या सर्व कुटुंबासहित जातीने हजर असत.
क्रमशः