गणपती बाप्पा मोरया - भाग-३ Vrishali Gotkhindikar द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गणपती बाप्पा मोरया - भाग-३

पुण्याजवळ चिंचवडला गणपतीची स्वयंभू मुर्ती असून त्या ठिकाणी मार्गशीर्ष वद्य प्रतिपदेपासून षष्ठीपर्यंत मोठा उत्सव करण्यात येतो. इथल्या मोरया गोसावी नावाच्या साधूने गणपतीला प्रसन्न करून घेतले होते.

मोरया गोसावीची भक्ती इतकी होती की मंदिराबाहेर बसलेल्या मोरया गोसावीना भेटायला गणपती मंदिर सोडुन बाहेर आला असे म्हणतात . ' मी तुझ्या शरीरात व तुझ्यामागून होणाऱ्या सहा पुरुषांत अंश रूपाने वास करेन असा गणपतीने त्याला “वर” दिला.

त्याप्रमाणे मोरया गोसावी व त्याचे सहा वंशज यांच्यामध्ये गणपती वास करतो अशी समजूत असून या सात जणांच्या समाधीची गणपती या नात्याने दररोज पूजा करण्यात येते. या गणपती संस्थानला अनेक भाविकांनी देणग्या दिल्या असून , खुद्द औरंगजेब बादशहानेदेखील त्या संस्थानला आठ खेडी इनाम दिल्याचा उल्लेख आढळतो.

.

गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिकेचं व्रत केलं जातं. हे व्रत कुमारिका चांगला पती मिळावा म्हणून तर सुवासिनी आपल्या नवऱ्याला उदंड आयुष्य मिळावं म्हणून करतात.

या दिवशी शंकर देव आणि पार्वती देवीची स्थापना करून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी निर्जळ व्रत करून हा उपास गणेश चतुर्थीला सोडला जातो. गणपतीच्या विसर्जनासोबतच या व्रताच्या पूजेचेही विसर्जन केले जाते.

गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाची मुर्ती घरी किंवा सार्वजनिक मंडळाच्या मंडपात आणली जाते.

पंचांगातील मुहूर्ताप्रमाणे मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाते.

पूर्वी शाडूच्या मातीपासून गणपतीच्या मुर्ती बनवल्या जात असत. कालांतराने प्लास्टर ऑफ पॅरीस पासून मुर्ती बनवल्या जाऊ लागल्या. या मुर्ती पाण्यात विरघळत नसल्यामुळे आणि त्यांना लावलेल्या रंगामुळे अशा मुर्तीच्या विसर्जनानंतर होणारे जलाशयांचे प्रदूषण लक्षात घेता अनेक जलाशयांमध्ये मुर्ती विसर्जनास बंदी घालण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने गणपतीची मुर्ती दान करण्याचे अभियान राबवण्यात येते.

अलिकडच्या काळात पर्यावरण स्नेही शाडूच्या मुर्ती बनवण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. अनेक शाळांमध्ये आणि अनेक संस्थातर्फे शाडूच्या मातीच्या गणपती मुर्ती बनवण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येतात.

प्रतिष्ठापना पूजेमध्ये आवाहन, स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुलं, पत्री आणि नेवैद्य इ. सोळा उपचारांनी षोडशोपचारे गणपतीची पूजा केली जाते.

गणपतीला आवडणारी लाल जास्वंदीची फुलं, शमी आणि दुर्वा तसंच विविध पत्रीपानं या पूजेमध्ये वापरली जातात.

या दिवशी गणपतीची पूजा झाल्यावर उकडीच्या मोदकांचा प्रसाद दाखवला जातो. गणपतीला मोदक सर्वच प्रकारचे आवडतात पण त्यातल्या त्यात नारळ गुळ सारण असलेले तांदुळाच्या पीठाचे उकडीचे मोदक त्याच्या विशेष पसंतीचे असतात .

गणपतीसोबतच त्याचं वाहन असलेल्या मूषक म्हणजेच उंदराचीही स्थापना केली जाते.

गणेश चतुर्थीला सुरू होणारा हा उत्सव 10 दिवसानंतर अनंत चतुर्दशीला संपतो तेव्हाच गणपतीचं विसर्जन केलं जातं.

काही घरात दीड दिवस ,पाच दिवस असाही गणपती बसवला जातो .

गणपतीची पूजा करताना नेहमी दुर्वांची जुडी वाहिली जाते.

कारण बाप्पाला दुर्वा फारच प्रिय आहेत आणि त्यामुळे गणपती प्रसन्न होतो.

गणपतीला नेहमी 21 दुर्वांची जुडी प्रामुख्याने वाहिली जाते. गणपतीच्या डोक्यावर दुर्वा वाहिल्या जातात त्यामागेही एक आख्यायिका आहे.

अनलासुर नावाच्या एका असुराने स्वर्ग आणि पृथ्वीवर उच्छाद मांडला होता. त्याच्यापासुन सुटका व्हावी म्हणुन गणेशाला गाऱ्हाणे घालण्यात आले.

गणपतीने त्या अनलासुराला गिळले आणि सर्वांचा त्रास संपला.

पण त्या राक्षसाला गिळल्यामुळे गणपतीच्या पोटात प्रचंड आग सुरू झाली. काही केल्या ती थांबेना.

यावर कश्यप ऋृषींनी बाप्पाला दुर्वांचा रस प्यावयास दिला.

तो प्राशन केल्यावर गणपतीच्या पोटातील आग थांबली आणि तेव्हापासून गणपतीला दुर्वा आवडत्या झाल्या.

गणपती पूजेत दुर्वा आवर्जून वाहिल्या जातात.

दुर्वांप्रमाणेच गणपतीला प्रिय आहे ते जास्वंदीचं लाल फुल.

कारण गणपतीचा वर्ण शेंदरी किंवा लाल आहे. त्यामुळे गणपती पूजेत जास्वंदाच्या लाल फुलाला विशेष महत्त्व आहे.

त्यामुळे गणपतीला जास्वंदीच्या फुलांचा हार प्रामुख्याने वाहिला जातो.

गणपतीच्या आरत्या मध्ये

सुखकर्ता दुःखहर्ता… ही गणपतीची आरती सगळीकडे सर्वप्रथम म्हटली जाते. ही आरती समर्थ रामदास स्वामी यांनी रचली आहे.

गणेश चतुर्थीला घराघरात ही आरती ऐकु येते.

गणनायकाय गणदेवताय गणाध्यक्षाय धीमहि ।

अशा अनेक आरत्यामधून

आयुष्यातला आनंद गणरायाच्या कानाइतका विशाल असावा

अडचणी उंदरा इतक्या लहान असाव्या...
आयुष्य तुमचं गणरायाच्या सोंडेइतकं लांब असावं
आणि आयुष्यातील क्षण मोदकसारखे गोड असावे..
अशी प्रार्थना केली जाते .

गणपर्ति विघ्रराजो लम्बतुण्डो गजानन:।

द्वेमातुरश्च हेरम्ब एकदन्तो गणाधिप:।।

विनायकश्चारुकर्ण: पशुपालो भवात्मज:।

द्वाद्वशैतानि नामानि प्रातरुत्थाय य: पठेत्।।

विश्वं तस्य भवे नित्यं न च विघ्नमं भवेद् क्वचिद्

गणपतीची ही बारा नावे उच्चारीत केल्यास मनोकामना पूर्ण होतात

गणपती बाप्पाचं आगमनचं भक्तासाठी सर्वकाही असते .

त्याच्यासमोर भक्ताचं वंदन करणं हेच भक्तांचे काम असते आणि बाप्पा आपल्या सर्व इच्छा पुर्ण करेल अशी खात्री असते .

प्रचलित गणेशोत्सवाच्या पूर्वी श्री समर्थ रामदास स्वामींनी हा उत्सव सुरू केल्याची नोंद इतिहासात आहे .

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. लोकमान्य टिळकांनी ब्रिटीशांच्या काळात समाजातील “एकी” वाढण्याकरिता या उत्सवाला सार्वजनिक स्वरुप दिले.

तेव्हापासून गणेशोत्सव हा घरगुती आणि सार्वजनिकरित्या साजरा केला जातो.

जितक्या उत्साहाने गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीचं आगमन होतं तितक्याच भावनात्मकरित्या गणरायाला निरोपही दिला जातो.

गणपत्ती बाप्पा मोरया

पुढच्या वर्षी लौकर या असे आमंत्रण दिले जाते

या उत्सवात सर्वांच्या तनामनात बसणाऱ्या या गणेशाला निरोप दिल्यावर ..

गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला अशी अवस्था होते ..

क्रमशः