गणपती बाप्पा मोरया - भाग ५ Vrishali Gotkhindikar द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गणपती बाप्पा मोरया - भाग ५

सार्वजनिक गणेश उत्सवात भजन ,पुजन ,कीर्तन हे सामाजिक कार्यक्रम केले जातात .
पूर्वी या काळात रस्त्यावर सिनेमे दाखवले जात असत .
आता करमणुकीचे कार्यक्रम केले जातात .
एक दिवस सत्यनारायण पूजा ही ठेवली जाते .
सार्वजनिक गणेश मंडळांचे गणपती विसर्जन हे अनंत चतुर्दशीलाच केले जाते .मोठ मोठ्या मिरवणुकी काढुन ताल वाद्यांच्या गजरात हे गणपती शहरातील तळी अथवा नदीत विसर्जन केले जातात .
घरगुती गणपती विसर्जन प्रत्येक घराच्या प्रथे नुसार केले जात असते
काही घरात अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते व गणेश विसर्जन त्या दिवशीच केले जाते.
अनंत चतुर्दशीचे व्रत भाद्रपद शुध्द चतुर्दशीला केले जाते .
अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही आणि कधी संपणार नाही तो आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्यरूपी शक्ती.

गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्रीविष्णु देवतेला अनुसरून केल्या जाणार्‍या या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते. घरी प्रथा असल्यावर किंवा अनंताचा दोरा सापडल्यास हे व्रत करतात .
अनंताच्या पूजेत चौदा गाठी मारलेल्या तांबडा रेशमाचा दोरा पूजतात. पूजेनंतर दोरा यजमानाच्या उजव्या हातात बांधतात.
चतुर्दशी पौर्णिमायुक्त असल्यास विशेष लाभदायक ठरते असे म्हणतात
मानवी देहात १४ प्रमुख ग्रंथी असतात. या ग्रंथींचे प्रतीक म्हणून दोर्‍याला १४ गाठी असतात.

अनंतपूजनात भोपळ्याचे घारगे आणि वडे यांचा नैवेद्य दाखवतात कारण यामध्ये पूजास्थळी कार्यमान असणार्‍या क्रियाशक्तीच्या लहरी अल्प कालावधीत स्थानबद्ध होऊ शकतात. असा क्रियाशक्तीने भारित नैवेद्य ग्रहण केल्याने देहातही त्याच पद्धतीचे बलवर्धकतेला पूरक असे वायूमंडल निर्माण होण्यास साहाय्य मिळते.

अनंत पूजा व्रत व त्याचे फल याविषयी कहाणी सांगितली जाते .
कौरव आणि पांडव पण लावून द्यूत खेळत होते. त्या द्यूतक्रीडेत पांडवांचे सर्वस्व हरण केले व त्यांना बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला.
युधिष्ठीर अर्ध्या राज्याचा स्वामी, पण तो आपले भाऊ व द्रौपदी यांच्यासह घोर अरण्यात अनंत दुःखे भोगीत होता.
पांडव वनवासात असतानाही कौरव अनेक कपटकारस्थाने करून त्यांना त्रास देत होते.
पांडवांचे सत्व हरण करून त्यांना क्लेश देत होते.
पांडवांचे सत्व हरण करण्याचे जेव्हा जेव्हा कौरवांनी ठरवले तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी श्रीकृष्णाने त्यांचे रक्षण केले. पांडव खुप त्रास भोगत आहेत हे पाहून एकदा श्रीकृष्ण त्यांना भेटावयास गेला.
श्रीकृष्णाला पाहताच युधिष्ठिराने त्याला लोटांगण घातले. त्याची यथासांग पूजा केली. मग त्याने हात जोडून श्रीकृष्णाला प्रार्थना केली -

"हे भक्तवत्सला, कृष्णनाथा, तुझा जयजयकार असो. हे कृष्णा, तूच या विश्वाचे उत्पत्ती-स्थिती-लय यास कारण आहेस. तूच ब्रम्हा-विष्णू-महेश आहेस. दृष्ट-दुर्जनांचा नाश व संतसज्जनांचे रक्षण यासाठीच तू अवतार घेतोस. पांडव माझे “प्राण” आहेत असे तू सर्वांना सांगतोस, मग आमची उपेक्षा का करतोस?
तुझ्याशिवाय आम्हाला कुणाचा आधार आहे सांग.?
तुझे आमच्यावर कृपाछत्र असताना आम्हाला ही दुःखे का बरे भोगावी लागत आहेत? आम्ही काय केले असता आम्हाला आमचे गेलेले राज्य परत मिळेल?"

सर्व पांडवांनी व द्रौपदीने हात जोडून श्रीकृष्णाला हेच विचारले. त्यावेळी श्रीकृष्ण पांडवांना म्हणाला, "तुमचे गेलेले वैभव परत मिळविण्यासाठी मी तुम्हाला एक व्रत सांगतो. ते व्रत केले असता तुमचे गतवैभव तुम्हाला लवकर प्राप्त होईल.
सर्व व्रतांमध्ये “अनंतव्रत” अतयंत श्रेष्ठ व प्रभावी आहे. ते व्रत तुम्ही करा म्हणजे तुमचे राज्य तुम्हाला लवकर प्राप्त होईल. तो अनंत म्हणजे शेषशायी विष्णू तेच माझे मूळ रुप आहे.
मीच तो नारायण. दृष्टांचे निर्दालन करून भूभार हलका करण्यासाठीच मी वसुदेवकुळात श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला.
मीच जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी त्रैलोक्याला व्यापून राहिलो आहे. मीच सर्वकाही आहे.
मीच तो अनंत नारायण चराचर विश्वाला व्यापून राहिलो आहे. त्या अनंताची, म्हणजे माझीच तुम्ही यथासांग पूजा करा.

ही पूजा आणि व्रत कसे करावे याविषयी मी तुम्हाला एक कहाणी सांगतो असे श्रीकृष्ण म्हणाला .

सुशीला व कौंडीण्य हे एक सामान्य परिस्थितीत राहणारे जोडपे होते एकदा प्रवासा दरम्यान सुशीला आणि कौंडीण्य एका रथात बसून निघाले होते .
दुपारच्या वेळी कौंडीण्याच्या अनुष्ठानाची वेळ झाली म्हणून एका नदीच्या तीरावर त्यांनी रथ थांबविला. कौंडीण्य अनुष्ठानासाठी गेले सुशीला रथातच बसून राहिली होती .
तिने सहज नदीच्या तीराकडे पहिले. तेथे लाल साड्या नेसलेल्या काही स्त्रिया एकत्र जमून निरनिराळ्या कलशांची पूजा करीत होत्या. सुशिलेने त्यांच्या जवळ जाऊन त्यांना विचारले, "तुम्ही ही कसली पूजा करीत आहात ? या पूजेचा विधी कसा असतो ? ही पूजा केली असता काय फळ मिळते, हे सर्व मला सांगाल का?"
त्या स्त्रिया म्हणाल्या, "याला अनंतचतुर्दशी व्रत असे म्हणतात. ही अनंतपूजा दरवर्षी केली असता सर्वप्रकारच्या सुखसमृद्धीची प्राप्ती होते. अनंतस्वरूप भगवान विष्णूची आपल्यावर कृपा होते.

चौरंगावर दर्भाच्या बनविलेल्या सात फण्यांच्या शेषरुपी अनंत नागाची प्राणप्रतिष्ठा करून त्याच्यापुढे अनंत दोरक ठेवावयाचा. त्याची पूजा करावी. चौरंगावर गंगेचा एक व यमुनेचा एक असे दोन जलपूर्ण कलश ठेवावेत. त्यांची पूजा करावी. चतुर्भुज विष्णूचे ध्यान करून 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' हा मंत्र म्हणत दर्भाच्या गाठीयुक्त नागाची 'अनंत' म्हणून मनात धारणा करावी. नवीन ग्रंथीयुक्त दोरे दोन्ही कलशांवर ठेवून पुरुषसूक्त मंत्रांनी त्यांची पूजा करावी.
. नैवेद्याला १४ लाडू, करंज्या, भोपळ्याचे अपूप इत्यादी पदार्थ असावेत. हे व्रत किमान चौदा वर्षे करावयाचे असते. चौदा वर्षे झाल्यावर या व्रताचे उद्यापन करावे. या व्रतामुळे सर्वप्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात. सर्व सुखसमृद्धींची प्राप्ती होते. अनंतस्वरुपात भगवान विष्णूची आपल्यावर पूर्ण कृपा होते.
सुशिलेने हे व्रत करायची इच्छा दाखवली तेव्हा त्या बायका म्हणाल्या तु हे आत्ताच का सुरु करीत नाहीस
तेव्हा सुशिलेने लगेच तिथेच ते व्रत सुरु केले .

क्रमशः