एक्स्ट्रॉ मॅरीटल अफेअर [भाग-१] Aniket Samudra द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एक्स्ट्रॉ मॅरीटल अफेअर [भाग-१]

“अरे रोहन, रात्री जरा माझ्याबरोबर येशील प्लिज?”, शरयु ने स्वयंपाक-घरातुन हात पुसत-पुसत विचारले.

“आता कुठे? मोठ्या मुश्कीलीने शनिवार-रविवार मिळतात त्यात तुझी काम!”, रोहन नाराजीच्या स्वरात म्हणाला.

“अरे, एअर-पोर्ट वर जायचे आहे. तुला ती राधीका आठवते? आपल्या कॉलेज मध्ये होती? माझी मैत्रिण? ती येणार आहे ऑस्ट्रेलियाहुन. तिला आणायला जायचे आहे.” शरयु

राधीकाचे नाव ऐकताच रोहनचे कान टवकारले. राधीका, कॉलेजमधील एक हॉट-बेब, कुणालाही आवडावी अश्शीच. रोहनला ही आवडायची. पण तो कधी तिच्याशी याबद्दल बोलु शकला नाही. पुढे शरयुशी त्याची ओळख झाली आणि मैत्रिचे रुपांतर प्रेमात होऊन दोघांनी लग्न केले. ७-८ वर्षांनंतर मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात असलेली ‘राधीका’ आणि तिच्या आठवणी रोहनच्या मनात उफाळुन बाहेर आल्या.

“हो.. आठवते आहे, थोडी-थोडी. पण ती कधी ऑस्ट्रेलियाला गेली?”, रोहन

“अरे, तिला तिकडच्या विद्यापिठात स्कॉलरशीप मिळाली म्हणुन शिक्षणासाठी गेली होती. नंतर काही वर्ष नोकरी सुध्दा केली तिकडे. आता भारतात परतायचे म्हणतेय. एअर-पोर्ट तुला माहीतेय ना कित्ती दुर आहे, आणि रात्रीच्या वेळी टॅक्सी-रिक्षा सुध्दा मिळत नाहीत, त्यातुन तिने एकटीने येणे म्हणजे… म्हणुन तिच्या इमेलमध्ये मीच तिला म्हणले, मी येते न्यायला म्हणुन.. प्लिज.. चल ना रे रोहन!!”, शरयु.

“एकटी? का? तिचा नवरा कुठे गेला?”, रोहन
“अरे तिचे नाही झाले लग्न अजुन तर नवरा कुठुन येणार? एकटीच आहे अजुन ती”, शरयु.

रोहनला उगाचच आनंद झाला. मग त्याने आढेवेढे घेत होकार दिला.

घड्याळाचा काटा मोठ्या मुश्कीलीने पुढे-पुढे सरकत होता. वेळ झाली तशी रोहनला पटकन उठुन आवरावेसे वाटत होते. पण उगाचच आपल्याला काहीच घेणे-देणे नाही अश्या आवेशात, उपकार केल्यासारखे तो थोडा उशीराच उठला.

“आओगे जब तुम, मेरे साजना… अंगना.. फुल खिलेंग..”, लोकल एफ-एम वर गाणं लागलं होतं. रोहन शरयु चे लक्ष नाही बघुन सारखा आरश्यात बघुन स्वतःला ठिक-ठाक करत होता. ‘कशी दिसत असेल राधीका आता? होती तश्शीच असेल का बदलली असेल?’, मनात विचारांचे चक्र चालु होते. शरयुशी नजरा-नजर तो शक्यतो टाळत होता. आपल्या डोळ्यांवर आणि चेहऱ्यावरील ओसंडुन वाहणाऱ्या उत्साहवर त्याचेच नियंत्रण नव्हते. उगाचच शरयुला काही-तरी वाटेल म्हणुन तो तिच्याकडे पहाण्याचे टाळत होता.

एअर-पोर्ट वरील राधीकाची फ्लाईट एक तास उशीरा आहे कळल्यावर रोहन मनोमन अतिशय चरफडला होता. मनातली आगतीकता दाखवु न देता तो शक्यतो नॉर्मल रहाण्याचा प्रयत्न करत होता.

शेवटी ‘सिडने’ वरुन येणारी फ्लाईट उतरली आणि रोहनची नजर गेट कडे लागली. थोड्याच वेळात त्याला राधीका येताना दिसली. लाल रंगाचा गुडघ्यापर्यंतचा फ्रॉक, तिचा ट्रेड-मार्क असणारा गॉगल, नेहमीच्याच स्टाईल-मध्ये केसांमध्ये अडकवलेला, खांद्याला पर्स, हातात स्ट्रॉली आणि दुसरा हात सतत चेहऱ्यावर कोसळणारे केस सावरण्यात. अगदी तश्शीच जशी रोहनने तिला शेवटचे पाहीले होते. किंबहुना वय वाढुनही अंगी बळावलेल्या आत्मविश्वासाने चेहरा, चालण्यातील ठसका अधीकच मन मोहुन घेणारा.

रोहन उगाचच आपले लक्ष नाही असे दाखवत इतरत्र बघत होता, तरीही शक्य असेल तेंव्हा तो तिच्याकडे बघत होता.

“ए.. ती बघ राधीका आली”, शरयु राधीकाकडे बोट दाखवत रोहनला म्हणाली, आणि तिच्याकडे जवळ-जवळ धावतच गेली.

ह्रुदयाची वाढलेली धडधड, श्वासाचा वाढलेला वेग, हाताला आणि पायाला सुटलेला कंप रोहनला जाणवत होता. दीर्घ श्वास घेउन तो आपल्यावर नियंत्रण ठेवण्याचा अटोकाट प्रयत्न करत होता. इतक्या वर्षांनंतर राधीका ओळखेल का आपल्याला? काय बोलेल? आपण काय बोलायचे याचाच विचार मनात चालु असताना राधीका आणि शरयु त्याच्या जवळ पोहोचले सुध्दा.

“हाय रोहन.. ओळखलंस?”, राधीकाने आपली मिलीअन डॉलर स्माईल देउन रोहनकडे बघत हात पुढे करुन विचारलं

“म्हणजे काय? ओळखलं ना!”, रोहनने तिच्याशी हात मिळवत उत्तर दिले. तिच्या स्पर्शाने रोहनच्या अंगातुन विज सळसळली.

“अरे, कित्ती बदलला आहेस तु? स्मार्ट झाला आहेस अजुन. शरयु लकी आहे हं” असं म्हणुन राधीका पुढे चालु लागली.

राधीकाच्या त्या अनपेक्षीत वाक्याने रोहनं एकदम खुष झाला. गाडीमध्ये शरयु आणि राधीकाच्या जोर-जोरात गप्पा चालु होत्या. रोहन जणु त्यांच्यात नव्हताच. रोहनही आपले जणु लक्ष नाही दाखवत होता, परंतु त्याचे पुर्ण लक्ष त्यांच्या बोलण्याकडे होते. मधुनच तो आरश्यातुन राधीकाला न्याहाळत होता. एका बेसावध क्षणी अचानक आरश्यात त्याची आणि राधीकाची नजरानजर झाली तसा तो चपापला. मग मात्र त्याने त्यांच्याकडे दुर्लक्षच केले.

रात्री बिछान्यावर पडल्यापडल्या रोहन राधीकाबद्दल विचार करत होता. शरयु स्वयंपाकघरातुन आवरुन बेडरुम मध्ये आली. आवरुन झाल्यावर ति रोहन शेजारी पांघरुणात शिरली आणि रोहनला बिलगली. रोहनने तिच्या विनंतीला मान देउन तिच्याबरोबर आला म्हणुन शरयु खुष होती. रोहनला इतक्या वेळानंतर प्रथमच शरयुची जाणीव झाली. “काय करतो आहेस रोहन तु? तुझ्या लग्नाला चार वर्ष होऊन गेली. शरयु तुझी बायको आहे आणि तु परस्त्रीचा विचार करत आहेस? शोभते का तुला? अरे कोण कुठली राधीका? किती वेळा बोलला आहेस तिच्याशी तु कॉलेज मध्ये? सगळे कॉलेज तिला ‘फ्लर्ट’ म्हणुन ओळखायचे, तिच्यासाठी तुला बायकोचा विसर पडला? शेम.. शेम”.. रोहनला स्वतःच्याच कृत्याची लाज वाटली. मग त्याने मोठ्या कष्टाने राधीकाला मनातुन तात्पुरते का होईना दुर केले आणि दिवा मालवुन तो शरयुला जवळ घेउन झोपी गेला.

राधीकाच्या मनात काय होते? तिलाही रोहन-बद्दल आकर्षण वाटले होते का? त्या दोघांमध्ये काही केमीस्ट्री शिजत होती का?

कसं असतं ना.. असं म्हणतात की नवऱ्याच्या मनात काही पाप असेल तर बायकोला कळु नये म्हणुन तो तिच्याशी जास्ती प्रेमाने वागतो.. (असं म्हणतात बरं का..) दुसरा दिवस, रविवार सुट्टीचा पुर्ण दिवस रोहन ने शरयु बरोबरच घालवला. दिवसभर फिरणं, शॉपिंग, हॉटेलस. नविन आठवड्याला सुरुवात झाली आणि रोहन कामात मग्न होऊन गेला. राधीकाबद्दलचे त्याचे विचार हळु हळु कमी होत गेले.

शनिवारी संध्याकाळी रोहन टी.व्ही चाळत बसला होता इतक्यात बेल वाजली. रोहनने दरवाजा उघडला आणि समोर राधीकाला बघुन क्षणभर स्तब्ध झाला. गडद निळ्या रंगाचा सलवार-कुर्ता, हातामध्ये मॅचींग बांगड्या, डोक्यावर चढवलेला गॉगल, चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे कोसळणारे केस आणि चेहऱ्यावर तेच ते चार्मिंग स्माईल. ‘गॉर्जियस’, रोहन स्वतःशीच पुटपुटला. मागोमाग शरयु आल्यामुळे त्याला काही बोलताच आले नाही.

“सरप्राईज”, राधीका शरयुला म्हणाली, “चल लवकर तयार हो.. आपल्याला बाहेर जायचे आहे”.
“अगं पण कुठे?”, शरयु ने विचारले.

“मस्त प्लॅन आहे पिक्चरचा. दोन तिकीटं काढली आहेत. नविन हॉरर सिनेमा लागला आहे विजयला, चलं पटकनं..” शरयुला जवळ जवळ ढकलतच राधीका म्हणाली.

“आत्ता? अगं पण आधी विचारायचसं तरी!”, शरयु कपाळावर हात मारत म्हणाली.

“का? काय झालं? तुमचा काही दुसरा प्लॅन होता का?”, राधीका

“नाही गं. प्लॅन वगैरे काही नाही. आम्ही आत्ता आई-बाबांकडे जाणार होतो. आई ने पापड काढले आहेत करायला.. तर मी जाणार होते मदत करायला.”, शरयु म्हणाली.

“काय गं..:-( उद्या जा ना! मस्त आहे सिनेमा.”, राधीका निराश होतं म्हणाली.

“नाही गं. आईने सगळी तयारी करुन ठेवली असेल. उद्या परत नाही जमणार. आणि तुझ्याबरोबर सिनेमाला आले तर रोहनचे जेवायचाही प्रश्न येईल कारण आम्ही आई कडेच जेवणार होतो त्यामुळे स्वयंपाकही काही केला नाही मी”, शरयु

“श्शी बाबा.. माझंच चुकलं आधी विचारायला हवं होतं. आत्ता या तिकीटांचं काय करु? वायाच गेली म्हणायचं!”, राधीका हताशपणे तिकीटांकडे बघत म्हणाली.

दोन क्षण शांततेत गेले.

"मग आता?"

मग शरयुच म्हणाली, “नाही तर एक काम करतेस का? रोहनला घेउन जा ना सिनेमाला. तसेही त्याला आई बाबांकडे यायचे नव्हतेच. उगाच तु काढलेली तिकीटं नको वाया जायला”
रोहन या अनपेक्षीत धक्याने दचकलाच होता..”ए नाही हा. मी नाही जाणार तुला एकटीला सोडुन, आपण जाऊ नंतर सिनेमाला.”

[क्रमशः]