भारतीय दीपावली - भाग १ Vrishali Gotkhindikar द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

भारतीय दीपावली - भाग १

भारतीय दीपावली भाग १

या सणाचा उगम फार प्राचीन काळी, आर्यांचे वास्तव्य उत्तर धृवप्रदेशात होतं, त्या काळात झाला, असं मानण्यात येतं.
सहा महिन्यांची दीर्घ रात्र संपून सहा महिन्यांचा दिवस सुरू होताच त्या प्रदेशातील लोकांना नवीन आयुष्य सुरू झाल्यासारखे वाटत असणार आणि त्यासाठीच ते हा आनंदोत्सव साजरा करत असावेत. आर्यांच्या सात पाकयज्ञांपैकी पार्वण, आश्वयुजी व आग्रहायणी या तीन यज्ञांचे एकीकरण व रुपांतर होऊन दीपावलीचा उत्सव सुरू झाला असावा, अशी कल्पना आहे.

काही लोकांची अशी श्रद्धा आहे की, चौदा वर्षांचा वनवास संपवून राम सीतेसह अयोध्येला परत आला, ते याच दिवसांत.
या आनंदा प्रीत्यर्थ त्या वेळी अयोध्येतल्या प्रजेने दीपोत्सव केला आणि तेव्हापासून हा उत्सव दरवर्षी चालू झाला.

जैन धर्मीयही दीपावलीचा उत्सव वैदिक धर्मियांइतकाच आस्थेने साजरा करतात .
हरिवंश पुराणात या उत्सवाची सुरुवात कशी झाली, त्याची गोष्ट सांगितली आहे.
आश्विन अमावास्येला भगवान महावीर या शेवटच्या तीर्थंकरांचे निधन झाले. त्या वेळी जे देव, राजे व भक्त तिथे उपस्थित होते, त्यांनी महावीरांची पूजा करून दीपाराधना केली.
'ज्ञानदीप निर्वाणाला गेला आहे, आता आपण साधे दिवे लावून त्यांच्या ज्ञानाचा प्रकाश कायम ठेवू या', असा विचार जैनांनी केला. तेव्हापासून भगवान महावीरांचे भक्त दरवर्षी जिनेश्वराची पूजा करून दीपोत्सव साजरा करू लागले. जैनांनी ती तिथी महत्त्वाची मानून वीर-निर्वाण-संवत नावाचा एक नवा शक सुरू केला.

सम्राट अशोकाच्या दिग्विजयाप्रीत्यर्थ दीपोत्सव सुरू झाला, असंही एक मत आहे,
सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य याच्या राज्याभिषेकसमारंभात जो दीपोत्सव करण्यात आला, तोच पुढे दर वर्षी साजरा करण्याची प्रथा पडली.

वात्स्यायनाच्या कामसूत्रात यक्षरात्री नामक उत्सवाचा उल्लेख आहे. कामसूत्रात यक्षरात्री, कौमुदीजागर व सुवसंतक या तीन सणांना 'सणांचे महामणि' असं म्हटलं आहे. ही यक्षरात्री म्हणजेच दिवाळी.
वराह पुराणातही कार्तिक शुद्ध प्रतिपदेला यक्षाची पूजा होत असल्याचा उल्लेख सापडतो. कुबेर हा यक्षांचा राजा, व धनाचा, संपत्तीचा राजा मानला जातो. गुप्तयुगात वैष्णव संप्रदायाच्या प्रभावामुळे कुबेराच्या पूजेऐवजी लक्ष्मीपूजनाचं महत्त्व वाढत गेलं असावं.

दिवाळीचा सण प्रचारात कधी व कसा आला, हे सांगणं तसं अवघड आहे. मात्र त्याला आजचं स्वरूप पौराणिक काळात प्राप्त झालं, हे नक्की.
शिव व विष्णू यांचे महत्त्व वाढल्यानंतर त्यांच्या उपासकांनी या दैवतांसंबंधी अनेक कथा रचून पूर्वापार चालत आलेल्या कित्येक विधींचा व सणांचा संबंध या दैवतांशी जोडला.
विष्णूचा अवतार समजल्या जाणार्‍या श्रीकृष्णासाठी दिवाळी साजरी करावी, असं वैष्णवांनी ठरवलं.
या सणाचा कृष्णाशी संबंध जोडल्यानंतर कृष्णचरित्रात अनेक अद्भुत गोष्टींचा समावेश होत गेला.
प्राचीन काळी गृहस्थाश्रमी पुरुषाने काही गृह्य संस्कार करणे अपेक्षित असे. अशा अनेक गृह्य संस्कारांचे रुपांतर होऊन आजचे कित्येक सण प्रचारात आले आहेत.शिवाय या निमित्ताने घरातील सर्व व्यक्तींचे एकत्र येणे व आनंद वाटून घेणे हे ही होत असे .

पितरांबद्दल आदर व प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रत्येक पौर्णिमेस व अमावास्येस त्यांच्याप्रीत्यर्थ पार्वण किंवा पिंडपितृयज्ञ नावाचा पाकयज्ञ करण्यात येई.
शिवाय नवीन धान्य घरात आणताना करण्याच्या यज्ञाला विशेष महत्त्व होतं. भाऊबीज, नरकचतुर्दशी या दिवशी यमाला दिले गेलेले महत्त्व पाहता दीपोत्सवाची सुरुवात पितरांच्या उद्धारासाठी झाली, असं मानण्यास भरपूर वाव आहे.

पौराणिक काळी यमासंबंधी जुनी कल्पना जाऊन त्याला निराळे व भयंकर रूप प्राप्त झाले.
वेदकाळात तो नरकाचा स्वामी नसून स्वर्गातील एक मुख्य देव होता. सत्कर्मे करणार्‍यांस सद्गती देणारा व सज्जनांना मदत करणारा म्हणून त्याची स्तुतीस्तोत्रे ऋग्वेदात गायलेली आढळतात.
पुराणांत यमाला सूर्यपुत्र म्हटले आहे.
सूर्याच्या गतीबरोबर मनुष्यमात्राचे आयुष्य क्षीण होत जाते.
अर्थात मृत्यूचे दिवस जवळ आणणारे दैवत सूर्यपुत्र असे मानले गेले, . आकाश हा पिता व अरुणोदय ही माता, यांच्या पोटी यमाचा जन्म झाला, असं ऋग्वेदात सांगितलं आहे.
यमाची बहिण यमी हिचाही उल्लेख असून या दोघांचं एकमेकांवर निरतिशय प्रेम होतं. या संबंधात ऋग्वेदात केलेले विवेचन वाचल्यास दिवस व रात्र यांस यम व यमी अशी अलंकारिक नावं देण्यात आली होती.
यमद्वितीया या सणाद्वारे आपल्या पूर्वजांनी यम व यमी यांच्या संबंधांनाच मूर्त स्वरूप दिलं आहे .

वेदकाळात कृष्णाचे महत्त्व वाढले आणि कृष्ण हा इंद्राहूनही श्रेष्ठ आहे, हे दाखवण्यासाठी त्याच्या हातून इंद्राचा पराजय झाला व त्याने करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून गाई व गोप यांचे रक्षण केले, अशी गोष्ट प्रचलित झाली.
प्रत्येक अवताराचं इतिकर्तव्य म्हणजे असुरांचा संहार व गोब्राह्मणांचा प्रतिपाळ. याच्याशी जुळेल अशा रीतीने नरकासुराची व इतर दैत्यांच्या कथा रचल्या गेल्या.
पुराणकारांनी यमराजाला स्वर्गातून नरकात आणलं. त्यालाच पुढे नरकासुर बनवून, पूर्वेकडे, म्हणजे त्याच्या वडिलांच्या, सूर्याच्या दिशेकडे असलेल्या प्रागज्योतिषपूरास वास्तव्यास आणलं.
राशीत सूर्य गेल्यावर चतुर्दशी व अमावास्या या दोन दिवशी संध्याकाळी पुरुषांनी हातात कोलीत घेऊन पितरांस मार्ग दाखवावा. यास उल्कादर्शन असं म्हणतात. यानंतर अमावास्येच्या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान करून देवपूजा आटोपल्यावर दुपारी पार्वण श्राद्ध करावे. संध्याकाळी दिवे लावावे , उल्कादर्शन व लक्ष्मीपूजन झाल्यानंतर भोजन करावे. लहान मुले, वृद्ध व रोगी यांखेरीज इतरांनी दिवसा भोजन करू नये असे संकेत असत .

आश्विन महिन्यात पाऊस संपलेला असतो. सांपत्तिक स्थिती चांगली असते. यामुळे हा कृषिविषयक सण लोकांना आवडला. घरात नवीन धान्य आल्यावर त्याची व ते धान्य देण्यास कारणीभूत झालेल्या गोकुळाची पूजा करणं, लोकांनी पटकन स्वीकारलं.

दिवाळीच्या अशा विविध संकल्पना आहेत .

क्रमशः