Khidki - 1 books and stories free download online pdf in Marathi

खिडकी - १

खिडकी

आज बाबांचा नोकरीचा शेवटचा दिवस. मी आज ऑफिसला सुट्टीच टाकली होती. दुपारच्या जेवणांनतर बाबांच्या ऑफिसात छोटासा सेंड ऑफचा कार्यक्रम आयोजित केला होता. आई, मी, नंदा (माझी बायको) आणि मुले असे सहकुटुंब सहपरिवार आम्ही बाबांना आणायला निघालो होतो.

कार्यक्रम अतिशय नेटका झाला, वेळेनुसार सुरु होऊन संपला देखील. बाबांच्या ऑफीसातील शिस्त कार्यक्रमात ठासून जाणवत होती. सहकाऱ्यांची भाषणे झाली, निरोप समारंभ झाला आणि मग आम्ही घरी निघालो.

घरीदेखील आईने जैयत तयारी ठेवली होती, बाबांच्या आवडीचे सगळे पदार्थ तयार होते. या सगळ्या लवाजम्यामुळे बाबादेखील खुष होते.

दुसऱ्या दिवशी मात्र मी नित्यनियमाने ऑफिसात गेलो, मुले शाळेत गेली, आई आणि नंदा त्यांच्या कामात दंग झाल्या. बाबांनी सुटीचा पहिला दिवस निवांतपणे झोपून काढला. बाबांनी त्यांचा नित्यक्रम ठरवलेला होता. इतकेवर्ष तरी त्यांनी तो मोडला नव्हता. निवृत्तीनंतर देखील त्यांनी नवीन नित्यक्रम ठरवून घेतला होता.

सगळे कसे सुरळीत सुरु होते, त्या दिवशी मी नेहमीप्रमाणेच घरी आलो तर मला वातावरणात दडपण जाणवत होते, आई आणि नंदा दोघीही शांतच होत्या, कोणीच कोणाशी बोलत नव्हते. मी देखील फार चौकशी केली नाही.

"आपण आता नवीन ए.सी. घेतला आहे न, मग जुना खिड्कीतला एसी देऊन टाकला आज." - नंदा, खोलीचे दार बंद करत दबक्या आवाजात म्हणाली.

"अच्छा, मग तेव्हा काही बाबांनी विरोध केला का? त्यांना जुन्या वस्तू द्यायला नको वाटते, म्हणून असेल." - मी

मागे घरातील टीव्ही बदलला तेव्हाही जुना टीव्ही देऊन टाकायला बाबांनी विरोधच केला होता पण आई आणि नंदाच्या जोडीपुढे त्यांचा फार निभाव लागला नव्हता आणि जुना टीव्ही नाराजीनेच बाबांनी देऊन टाकला होता.

"तुम्ही आधी माझे पूर्ण ऐकून घ्या की. लगेच कसली माझी समजूत काढता." - नंदा

तिचे बरोबर होते, मी पहिल्या वाक्यावरूनच निष्कर्ष काढायला नको होता.

"बर बोल, आता नाही अडवणार." - मी

"या वेळी तर बाबांनीच जुना एसी देऊन टाकला." - नंदा

"अरे वा!" - नकळतच माझ्याकडून मोठ्याने प्रतिक्रिया दिली गेली आणि नंदाच्या वाटरलेल्या डोळ्यांनी आपली घोडचूक मला समजली. 'पुढे बोल' असे दबक्या आवाजात सांगून मी वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला.

"हो ना, आम्हा दोघींनाही असेच वाटले होते. पण थोड्यावेळाने मी एसीची जागा साफ करायला घेतली आणि सहजच आईंना म्हणाले की या खिडकीची आता काही गरज नाही, तशीही ती केवळ एसी साठीच बनवलेली होती. आता नवीन एसी खिडकीत ठेवायची गरज नसते तर आपण ही खिडकी बुजवून टाकू -" - नंदा

"बरोबर आहे तुझे. मी देखील हेच म्हणणार होतो कारण तसेही मुख्य खिडकीतून भरपूर प्रकाश आणि वारा येतो." - मी, अति उत्साहात मी नंदाला परत अडवले होते, जे तिला अजिबात आवडले नव्हते.

"ठीक आहे तर, मग आता बाबांनाही तुम्हीच समजवा. आज आधीच मी या शहाणपणा बद्दल खूप बोलणी खाल्ली आहेत बाबांची. आता आम्हाला ती खिडकी आठवडाभरात बंद करून द्या म्हणजे झाले." - नंदा रागाने बोलत होती.

आता मात्र मी नंदाला मधेच अडवले याचा मला पश्चाताप होऊ लागला बाबांना पटवण्याची अवघड जबाबदारी तिने अतिशय चलाखीने माझ्यावर ढकलली होती.

पुढे एक दोन दिवस मी नित्यक्रमाने ऑफिसात गेलो. घरीही शांतता होती, त्यामुळे नंदापुढे मी काही खिडकीचा विषय काढलाच नाही. पण त्या दिवशी जेवण उरकून मी खोलीत येऊन पाठ टेकली तोच आई दबक्या पावलाने खोलीत आली, बाबा बाहेर टीव्ही बघण्यात दंग आहेत याची तिने खात्री केली.

"बाबारे, मला खूप काळजी वाटते बाबांची. तूच आता काहीतरी कर आणि ती खिडकी बुजवून घे" - आई घाबरल्या आवाजात बोलत होती.

"मी निवृत्त झालो तरी म्हातारा झालेलो नाही, माझे कान ठणठणीत आहेत. कोणीही माझी काळजी करायचे कारण नाही. खिडकीला जो हात लावेल त्याची गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवा." - बाबा बाहेरच्या खोलीतूनच ओरडले आणि आईला अश्रू अनावर झाले. 'तूच बघ आता' असे बोलून ती हुंदका आवरत खोलीतून बाहेर गेली.

एकंदरीत प्रकरण गंभीर होते. नंदा खोलीत येईल तेव्हा तिला सर्व कहाणी विचारावी या विचारात मी पुस्तक वाचत बसलो.

"तसेही तू मला सिरियसली घेतच नाहीस. बघू, आता आईंनी सांगितले आहे. आता तरी कदाचित स्वारी काहीतरी करतील." - नंदा तावातावाने बोलत होती, इतक्या तणावात देखील मी शांतपणे पुस्तक वाचत बसल्याचे कदाचित तिला सहन झाले नसावे.

"नक्की काय झाले आहे? इथे शांत बस आणि सांग." - मी

तिने हातातील काम टाकले आणि समोर येऊन बसली.

"आम्हा दोघीनाही बाबांची काळजी वाटते, परवा ती खिडकी रिकामी केल्यापासून त्यांनी तिथे खुर्चीच ठेवली आहे. दिवसभर टक लावून बाहेर बघत बसलेले असतात. कोणाशी काहीच बोलत नाहीत. आज तर बेल वाजलेली पण समजली नाही त्यांना.

खिडकीत बसले न की कुठे हरवून जातात कोण जाणे." - नंदा

नंदाच्या बोलण्यातून तिची चिंता स्पष्ट जाणवत होती, आईला देखील काळजी वाटणे सहाजिक होते.

हे सगळे खरे असले तरी बाबांचा दरारा अजूनही कायम होता, त्यांच्या समोर शब्द काढायची कोणाचीच हिंमत नव्हती आणि टीव्हीचे प्रकरण तर ताजेच होते. ही सर्व परिस्थिती बघता बाबांना समजावण्याची म्हणजेच पर्यायाने त्यांची बोलणी खायची कामगिरी एकमताने माझ्यावर सोपवण्यात (लादण्यात) आली होती. मी देखील कमीत कमी बोलणी खाऊन हे काम करता येईल का किंवा काही पर्यायाने हे काम टाळता येईल का याची चपापणी करत होतो.

यातील दुसरा पर्याय मला सोपा वाटला, आणि खिडकी न बुजवण्याचे फायदे आणि ती सुशोभित करण्याचे मार्ग यावर मी एक दिवसभर संशोधन केले आणि संध्याकाळी आई आणि बायकोसमोर ते मांडले. दोघींनीही माझे बोलणे अतिशय शांतपणे ऐकून घेतले, हा चमत्कार कसा झाला हे मला समजले नाही.

"मग काय म्हणता तुम्ही? करायची का सुरुवात?" -मी, मला त्यांचे मत जाणून घ्यायचे होते.

नंदा काहीच न बोलता मला त्या खोलीत घेऊन गेली, बाबा तिथेच खिडकीत बसले होते, टक लावून कुठे तरी दूर बघत होते. आम्ही दोघेही थोडावेळ तिथेच उभे होतो. आम्ही आल्याचेही त्यांना लक्षात आले नाही.

आता मात्र फार वेळ तिथे उभे राहणे मला शक्य नव्हते म्हणून मी लगेचच बाहेर निघून आलो.

"मला वाटते आपण उद्याच सजावटीला सुरुवात करावी." - नंदा खोचकपणे म्हणाली.

तिच्या बोलण्यातील खोचकपणा मला समजला. आता मात्र मला दोघींपुढे बसणे अधिक अस्वस्थ होऊ लागले, त्यामुळे मी घरातून निघून खाली आमच्या कट्ट्यावर येऊन बसलो.

"काय रे श्रीरंग कुठे आहे? दिसला नाही तो गेले दोन दिवस" - शेजारचे जोशी काका बाबांविषयी चौकशी करत म्हणाले.

मी त्यांना थातूरमातूर उत्तरे देऊन कटवले, त्यानंतर मित्रांबरोबर तासभर गप्पा मारून मी परत घरी आलो.

आई बाबा दोघेही जेवून झोपले होते आणि नंदा डायनिंग टेबलवर भुकेल्या वाघिणीसारखी माझी वाट बघत बसली होती. मित्रांबरोबर तासभर गप्पा मारून दूर केलेला मनावरचा ताण ते दृष्य पाहून क्षणार्धात दुप्पट वजनाने परत आला.

काहीच न बोलता मी टेबलावर येऊन बसलो. नंदानेही काहीच न बोलता मला ताट वाढले, जेवणेदेखील काहीच न बोलता उरकली.

इथपर्यंत सर्व नीट झाले आहे, आता आपण फार वेळ न लावता गुपचूप खोलीत जाऊन झोपावे हा विचार मी माझ्या मनात पक्का केला आणि हात धुण्यासाठी उठलो.

"तुझा हा पळपुटेपणा कधी संपणारे देवजाणे, तुझी बाबांशी बोलायची हिंमत झाली की मगच आपण बोलू. मी आजपासून मुलांच्या खोलीत शिफ्ट होत आहे." - नंदा अतिशय थंडपणे कढईतील भाजी भांड्यात काढता काढता बोलली.

आयुष्यात माणसाला कोणतेही कर्म करायचे असेल तर त्यासाठी प्रेरणा गरजेची असते, आणि बाबांशी खिडकी विषयी बोलण्यासाठी नंदाचे ते एक वाक्य आणि खोलीत एकट्याने काढलेली एक रात्र पुरेसे असेल याची पुरेपूर कल्पना नंदाला आधीपासूनच असावी अशी मला शंका वाटू लागली.

त्याच विचारात मी खोलीत परत आलो आणि बाबांशी कसे बोलावे या विचारातच झोपी गेलो, पहाटे पाच वाजता नंदा खोलीत आली आणि माझा फोन शोधू लागली. त्यामुळेच माझी झोप मोडली आणि मी रागानेच फोन नंदाकडे दिला आणि परत झोपी गेलो.

त्यानंतर मात्र मला खूप शांत झोप लागली.

सूर्याची किरणे डोळ्यावर आल्यामुळे मला जाग आली आणि आज भलताच उशीर झाला आहे हे मला समजले. त्या गडबडीतच मी बाहेर आलो, मुले आवरून शाळेत गेली होती, आई आणि नंदा किचनमध्ये काहीतरी करत होत्या.

"मला ऑफिसला उशीर होतो आहे, मी पाचच मिनिटात फ्रेश होऊन येतो आहे. माझा डबा भरून ठेवा." - मी लांबूनच जोरात ओरडून बोललो, काल रात्रीच्या प्रकरणामुळे मी अजूनही चिडलेलो आहे आणि मला नंदाशी थेट बोलायचे नाही हेच मला प्रदर्शित करायचे होते.

मी अतिशय रागाने केलेल्या त्या सूचनेवर, नंदा मात्र खूपच गोड हसली आणि माझ्या डोक्यात धोक्याची घंटा वाजली.

"आई, यांना म्हणावे की आज घाई करायचे काही कारण नाही. त्यांच्या साहेबांशी माझे मगाशीच चॅट करून झाले आहे. सध्या ऑफिसात विशेष काम नसल्यामुळे साहेबांनी यांची सुटी मान्य केली आहे" - नंदा हसत हसत आईला म्हणाली आणि माझा चेहरा जवळ जवळ पांढरा पडला.

मी धावतच मुलांच्या खोलीत गेलो आणि माझा मोबाईल शोधू लागलो. नंदाने नक्की काय घोळ घातला होता हे जाणून घेणे मला गरजेचे होते.

नंदाने खरेच माझ्या साहेबांशी चॅट केले होते, ती आजारी असल्याचे कारण सांगून मी ऑफिसात येऊ शकत नाही असे सांगितले होते. साहेबांनीदेखील रजा मान्य केली होती. 'सध्या ऑफिसात फार काम नाही, बाजारात मंदी आहे न.' असे मी परवाच तिला सांगितले होते आणि त्याचा तिने पुरेपूर फायदा घेतला.

बाबा सकाळीच बँकेत जाणार आहेत आणि त्यावेळी आईला आणि नंदाला माझ्याशी बोलायचे आहे असे नंदाने मला चहाचा कप हातात देताना सांगितले. एकंदरीत ही बैठक चुकवण्यासाठी माझ्याकडे कोणतेच कारण शिल्लक राहिले नव्हते.

बाबा आता बँकेत गेले होते साधारण तास दोन तास तरी ते परत येणार नव्हते. त्यामुळे मी त्यांच्या खुर्चीत जाऊन बसून बघायचे ठरवले, तिथून आमची बाग आणि पलीकडचा रस्ता अगदी स्पष्ट दिसत होता. बाबा त्या बागेकडे आणि रस्त्याकडे असे का बघत असावेत हा विचार करत मी बाहेर बघू लागलो. मी विचारात इतका हरवलो होतो कि नंदा आणि आई दोघी शेजारी आलेल्या सुद्धा मला कळले नाही.

नंदाने हातातले फुलपात्र जमिनीवर आपटल्याने कर्ण-कर्कश आवाज झाला आणि मी दचकुन किंचाळलो, मा‍झ्या किंचाळण्यामुळे आई आणि नंदा आपसूकच घाबरल्या आणि दोन पावले मागे सरकल्या.

काय झाले हे मला समजल्यावर मात्र मी भानावर आलो आणि दोघींनाही शांत केले.

“असेच टक लावून बसतात बाहेर. काय दिसतयं रे एवढे त्या खिडकीतून?” – आई

-क्रमशः

इतर रसदार पर्याय