भाग १ - आखाडा
प्रस्तुत शिवकालीन ऐतिहासिक प्रेमकथा हि इतिहासातील काही सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती.
दरवर्षी प्रमाणे पंचक्रोशीतली सर्वात मोठी होणारी मल्हारी मार्तंडाची मानाची जत्रा मुढाळ गावात भरली होती. कुस्तीच्या आखाड्या भोवती लोकांची गर्दी उसळली होती. भापकर पाटलांचा पोसलेला मल्ल यशवंत मैदानात मोठमोठ्याने आरोळ्या अन शड्डू ठोकत होता. मागील चार पाच वर्षांपासून जत्रेत होणाऱ्या कुस्तीच्या दंगलीत यशवंत अजिंक्य होता. पंचक्रोशीमध्ये अजून त्याच्या तोडीचा मल्ल गवसलेला नव्हता. यशवंतचा सामना करण्यासाठी मैदानात एकही पैलवान यायला तयार नव्हता. एका बाजूला चार पाच धनगरांची पोरं एकाला बळेबळे कपडे काढून आखाड्यात ढकलत होती.
"आरं...गप कि... न्हाय जायचं मला आखाड्यात.. एक डाव संगीतल्यावं कळत न्हाय का? आता हात लावला तर तंगडच मोडीन एकेकाचं."
"आरं जा कि शिवा... भितु का काय त्या येश्याला?? आमचं तंगडं मोडण्यापरीस आत जाऊन दम दाव तुझा..."
आणि दोघा तिघांनी जोर लावून शिवाला मैदानात ढकलून दिले. जसा शिवा आत मध्ये आला, लोकांनी जोर जोर आरोळ्या ठोकायला सुरुवात केली. मैदानाच्या सभोवती दोर घेऊन उभे असलेले लोक आत येणाऱ्या लोकांना मज्जाव करत होते. शिवाने एकवार सभोवती नजर टाकली. लोकांचा कल्ला वाढला होता, शिट्ट्या अन फेटेही हवेत उडत होते. आता माघारी फिरणं अवघड होऊन बसलं होतं.
शिवा मुढाळ गावात राहणारा पांढरे धनगराचं पोर. शांत स्वभावाचा शिवा कधी कुणाच्या अध्यात ना मध्यात. आपण भले अन आपलं काम. रोज सकाळी ओढ्यावर व्यायाम करून थंडगार पाण्यानं अंघोळ करायचा. अन जवळच असलेल्या मर्ढेश्वराचं दर्शन घेऊन आपल्या पाच पन्नास बकऱ्या गावाच्या पलीकडच्या माळावर चरायला घेऊन जात असे. वीस बावीस वर्षांचं वय. हाडापेरानं मजबूत, उंच बांधा, पिळदार शरीरयष्टी, भारदस्त मिशा, सरळ नाक, घारे टप्पोरे डॊळे, कानात सोनेरी बाळ्या, डोक्यावर पिवळं मुंडासं, गळ्यात काळ्या दोऱ्यात बांधलेली चांदीची पेटी, अंगात पांढरा सदरा, खांद्यावर डाव्या बाजूवरून टाकलेली घोंगडी कमरेच्या उजव्या बाजूला भगव्या शेल्याने कच्चुन बांधलेली. शेल्याची गाठ डाव्या बाजूला मारलेली. डाव्या हातात तांब्याचं जाडजूड कडं अन दंडाला काळा दोरा बांधलेला. तसाच काळा दोरा उजव्या मनगटात बांधलेला. कमरेखाली घोट्यापर्यंत धोतर, पायात कोल्हापुरी बाज असलेली जाडजूड चामडी वहाण अन डाव्या हातात डोक्यापेक्षा जरा उंच काठी अन त्यावर लडकलेले घुंगरू. काठीबरोबर हलताना छन छन आवाज करत असत. असा एकंदरीत त्याचा पेहराव होता.
कुस्ती सुरु झाली होती. धरपकड होऊ लागली. यशवंत ने शिवाला मातीत चांगलंच घुसळून काढलं होतं. पण दर वेळी आपल्या चपळ हालचालींमुळे शिवा त्याच्या तावडीतून सुटत असे. घामाघूम झालेल्या अंगावर आखड्यातली लाल माती चिकटल्यामुळे शिवा शेंदूर फासलेल्या मारुतीसारखा भासू लागला होता. काही वेळातच कुस्तीचा नूर पालटू लागला. यशवंतच्या हालचाली मंद होऊ लागल्या. शिवाच्या चपळ हालचालींनी यशवंतला भांबावून सोडले होते. कारण यशवंतच्या कोणत्याच डावाला शिवा दाद देत नव्हता. अत्यंत हुशारीने तो यशवंतला हुलकावणी देत होता. प्रतिस्पर्धी मल्लाला एक दोन डावात चितपट करणारा यशवंत आज शिवापुढे हतबल झाला होता, त्रासला होता. रागाच्या भरात कुस्तीतले डाव विसरून शिवाला पकडण्याच्या नादात चुकांवर चुका करत होता. अन एका संधीची वाट पाहत असलेला शिवाने, अचानक यशवंत च्या कमरेला विळखा घातला अन बकरी उचलावीत तसं यशवंतला फिरवून पाठीवर टाकलं. दुसऱ्याच क्षणी त्याने त्याच्या सकट यशवंतच्या अंगावरून जमिनीवर कोलांट उडी मारली. शिवाचा सगळा भार यशवंतच्या छातीवर पडल्यामुळे त्याच्या छातीच एखादं हाड मोडल्याचा आवाज आला, अन यशवंत तसाच उताणा आकाशाकडे पाहत पडला. इकडे पाटीलही, हे काय अकस्मात घडले? म्हणून आ वासून समोर बघत राहिले. लोक शिट्ट वाजवत, फेटे उडवत मैदानात घुसले अन शिवाच्या नावाने आरोळ्या ठोकत त्याला खांद्यावर घेऊन नाचू लागले. आपल्या मैत्रिणींसह जत्रेतली दंगल पाहायला आलेली पाटलांची पारू, आखाड्यात शिवाला पाहिलं अन नकळत तिचा त्याच्यावर जीव जडला.
क्रमशः